चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जुलै २०२१

Date : 2 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अभिमन्यू जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू :
  • भारताचा अमेरिकास्थित बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा याने बुधवारी हंगेरीतील बुडापेस्ट येथे ग्रँडमास्टरसाठीचा तिसरा टप्पा पार करत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. अभिमन्यूने ग्रँडमास्टर सर्जी कार्याकिन यांचा गेली १९ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडला.

  • १२ ऑगस्ट २००२मध्ये कार्याकिन यांनी १२ वर्षे आणि सात महिन्यांचा असताना ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. ५ फेब्रुवारी २००९ मध्ये जन्मलेल्या अभिमन्यूने १२ वर्षे, चार महिने आणि २५ दिवसांचा असताना ग्रँडमास्टर किताबाला गवसणी घातली आहे, असे ‘चेसडॉटकॉम’ या संकेतस्थळाने म्हटले आहे.

  • १२ वर्षीय अभिमन्यू अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहात असून त्याने आंतरराष्ट्रीय मास्टरपासून थेट ग्रँडमास्टर किताबापर्यंत झेप घेतली आहे. ग्रँडमास्टर किताबासाठीचा २५०० एलो रेटिंगचा टप्पा त्याने या स्पर्धेत पार केला. अभिमन्यूने बुडापेस्ट येथे काही महिने वास्तव्य करत लागोपाठ स्पर्धामध्ये भाग घेतला. त्याने या स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करत ग्रँडमास्टर किताब आणि विक्रमाची नोंद केली.

‘कोव्हिशिल्ड’ला नऊ युरोपीय देशांची मान्यता :
  • युरोपातील ९ देश तेथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोव्हिशिल्ड लशीला मान्यता देत असल्याचे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड व स्पेन हे देश कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या लोकांना प्रवासासाठी परवानगी देत आहेत. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडही कोव्हिशिल्डला मान्यता देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  • याशिवाय, जे भारतीय इस्टोनियाला जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या लशींना आपण मान्यता देणार असल्याचे त्या देशाने सांगितले आहे. ज्या भारतीय लोकांनी कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन या लशी घेतल्या आहेत व जे युरोपला जाऊ इच्छितात, त्यांना परवानगी देण्याबाबत स्वतंत्रपणे विचार करावा, अशी विनंती भारताने यापूर्वीच युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांना केली आहे.

  • करोना महासाथीच्या काळात मुक्तपणे प्रवास करता यावा यासाठी युरोपीय महासंघाचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र किंवा ‘ग्रीन पास’ गुरुवारपासून अमलात येत आहे. त्याच्या व्यवस्थेनुसार, युरोपीय औषध यंत्रणेमार्फत (ईएमए) प्राधिकृत केलेल्या लशी घेतलेल्या व्यक्तींना युरोपीय महासंघ क्षेत्रात प्रवासविषयक निर्बंधांपासून सूट दिली जाणार आहे.

सांगली टू दुबई व्हाया ताडसर… ७८ वर्षीय आजोबा ठरले ‘ड्रॅगन फ्रूट’ची निर्यात करणारे पहिले भारतीय शेतकरी :
  • सांगलीमधील ताडसर आणि वांगी या दोन छोट्या गावांमधील दोन वयस्कर शेतकऱ्यांची सध्या पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे. या चर्चेमागील कारण म्हणजे या दोघांनी आपल्या शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं आहे. इतकच नाही तर त्यांनी हा माल थेट दुबईला निर्यात केलाय. विशेष म्हणजे अशाप्रकारे भारतातून एखाद्या शेतकऱ्याने परदेशामध्ये ड्रॅगन फ्रूट पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

  • भारतामध्ये उत्पादन घेतलं जाणारं गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रॅगन फ्रूटचं या दोघांनी उत्पादन घेतलं असून १०० किलो माल त्यांनी दुबईला पाठवल्यांचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या दोघांनाही आपल्या शेतांमध्ये घेतलेल्या उत्पादानापैकी प्रत्येकी ५० किलोचा माल दुबईला पाठवला आहे. हे फळ कमळाच्या फुलासारखं दिसत असल्याने त्याला कमलम असंही म्हटलं जातं.

  • सांगलीसारख्या दुष्काळग्रस्त भागातील १५० एकरावर ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन घेतलं जात आहे. या फळाला चांगली मागणी असून या पिकाच्या आधारे येथील शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे. सांगली जिल्ह्यामधील कृषी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात द्राक्षं आणि ऊसाचं उत्पादन घेण्याऐवजी आता शेतकरी ड्रॅगन फ्रूटचं पिक घेताना दिसत आहे.

डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे निधन :
  • दोनवेळा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री राहिलेले डोनाल्ड रम्सफेल्ड यांचे मंगळवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. एक कुशल नोकरशहा आणि आधुनिक अमेरिकी लष्कराचे द्रष्टे म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. मात्र इराकमध्ये दीर्घकाळ चाललेल्या व महागड्या ठरलेल्या युद्धाने त्यांच्या या प्रतिमेला गालबोट लावले होते.

  • चार माजी सहकाऱ्यांनी रम्सफेल्ड यांचे वर्णन चलाख व तितकेच आक्रमक, देशभक्त आणि राजकीयदृष्ट्या धूर्त असे केले होते. त्यांनी चार अध्यक्षांच्या हाताखाली सरकारमध्ये, तर सुमारे २५ वर्षे कॉर्पोरेट जगतात काम केले.

  • २००८ साली निवृत्त झाल्यानंतर, जनसेवेला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सैनिकांच्या कुटुंबीयांना सेवा पुरवण्यासाठी व मदत करण्यासाठी त्यांनी ‘रम्सफेल्ड फाऊंडेशन’ची स्थापना केली.

  • परराष्ट्रमंत्री म्हणून रम्सफेल्ड यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ११ सप्टेंबर २००१ रोजी आत्मघातकी अपहरणकर्त्यांनी न्यू यॉर्कमधील वर्ल्डट्रेड सेंटरवर आणि पेंटॅगॉनवर हल्ला केला. यामुळे लष्कराची पुरेशी तयारी नसतानाही देश युद्धात ओढला गेला.

०२ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.