चालू घडामोडी आणि दिनविशेष - 02 एप्रिल 2022

Date : 2 April, 2022 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्पेनला जर्मनीचे, तर फ्रान्सला डेन्मार्कचे आव्हान; ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर :
  • कतार येथे होणाऱ्या आगामी ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यात आली असून माजी विश्वविजेते आणि जागतिक फुटबॉलमधील बलाढय़ संघ स्पेन आणि जर्मनी यांचा ‘इ’ गटात समावेश आहे. तसेच आशियातील आघाडीचा संघ जपानही या गटाचा भाग असल्याने याला ‘ग्रुप ऑफ डेथ’ असे संबोधले जात आहे.

  • ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेच्या कार्यक्रमपत्रिका निश्चितीचा सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू काका, इटलीचा माजी मध्यरक्षक आंद्रेया पिर्लो आदींनी हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान दिएगो मॅराडोना, पॉलो रॉसी, गेर्ड मुलर आणि गॉर्डन बँक्स या दिवंगत दिग्गज फुटबॉलपटूंना चित्रफितीच्या साहाय्याने आदरांजली वाहण्यात आली. ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फान्टिनो यांनी यावेळी उपस्थित मान्यवर आणि चाहत्यांना संबोधून भाषण केले. ‘‘यंदाचा विश्वचषक हा आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट विश्वचषक असेल. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण जग कतार येथे एकत्रित येईल,’’ असा विश्वास इन्फान्टिनो यांनी व्यक्त केला.

  • त्यानंतर कार्यक्रमपत्रिका जाहीर करण्यास सुरुवात झाली. विश्वचषकात ३२ संघांना आठ गटांत विभागण्यात आले असले तरी या कार्यक्रमात एकूण ३७ देशांचा सहभाग होता. यजमान या नात्याने कतारला ‘अ’ गटात अव्वल स्थान देण्यात आले. या गटात विश्वचषकातील तीन वेळा उपविजेत्या हॉलंडला सर्वोत्तम संघ मानले जात आहे. ‘ब’ गटात जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेला आणि १९६६चा विश्वविजेता संघ इंग्लंडचा समावेश असून यंदाही त्यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

  • आपले अखेरचे विश्वचषक खेळणारे आघाडीचे फुटबॉलपटू लिओनेल मेसीचा अर्जेटिना आणि ख्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल या संघांना अनुक्रमे ‘क’ आणि ‘ह’ गटात स्थान मिळाले आहे.

  • तसेच ‘ग’ गटही आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून यात जागतिक क्रमवारीतील अव्वल आणि पाच वेळा विश्वविजेता ब्राझील, तसेच सर्बिया आणि स्वित्र्झलड हे संघ समाविष्ट आहेत. ‘ड’ गटातील गतविजेत्या फ्रान्सचा साखळी फेरीत डेन्मार्कशी सामना होईल.

रशिया अमेरिकचं भांडण भारताचा लाभ?; स्वस्तात तेल देण्याची रशियाची ऑफर, दर आहे :
  • युक्रेनमध्ये घुसखोरी करून युद्ध छेडल्याचा आरोप करत अमेरिकेसह मित्रदेशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध टाकलेत. याच पार्श्वभूमीवर रशियाने कच्च्या तेलासाठी नवे ग्राहक शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. रशियाने भारताला ३५ डॉलर प्रति बॅरल इतक्या स्वस्त दराने कच्चे तेल देऊ केले आहे. याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिल्याचं वृत्त आहे.

  • रशियाने भारताला उरल्स ग्रेडचे कच्चे तेल (Urals grade oil) देऊ केले आहे. हे कच्चे तेल भारताला सवलतीच्या दरात म्हणजेच ३५ डॉलर प्रति बॅरलने मिळणार आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात याच कच्च्या तेलाचे दर १०० रुपये प्रति बॅरलच्या वर आहेत. त्यामुळे भारतासाठी ही सवलतीच्या दरातील कच्चा तेलाची ऑफर फायदेशीर मानली जात आहे.

  • रशिया भारताला कच्चा तेलाच्या निर्यातीची सुरुवात म्हणून यंदाच्या वर्षी १५ मिलियन बॅरल कच्चे तेल देऊ इच्छित आहे. याबाबत सरकारच्या पातळीवरही चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

  • रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत. अशा स्थितीत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश असलेल्या भारताने रशियाकडून कच्चा तेलाची आयात वाढवली आहे. असं असलं तरी अद्यापही भारताच्या आयातीत आखाती देशांसह अमेरिकेचा मोठा वाटा आहे. मात्र, आता रशियाच्या ऑफरने भारताला मोठा फायदा होऊ शकतो. युरोपमधून रशियाच्या कच्चा तेलाच्या खरेदीवर निर्बंध आल्याने सध्या आशियात चीन आणि भारत रशियाचे मोठे ग्राहक म्हणून समोर येत आहेत.

‘जीएसटी’ वसुलीचा विक्रम; मार्चमध्ये सरकारी तिजोरीत जमा झाली एवढी रक्कम :
  • करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर भारतातील आर्थिक घडामोडी पुन्हा रुळावर येताना दिसत आहेत. जीएसटी संकलनाची मार्च महिन्याची आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थ मंत्रालयाने आज (शुक्रवार) जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात जीएसटी संकलन विक्रमी १.४२ लाख कोटी रुपये झाले आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी जानेवारीमध्ये जीएसटी संकलन सर्वाधिक १,४०,९८६ कोटी रुपये होते.

  • जर आपण वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर, मार्च २०२२ मध्ये एकत्रित GST महसूल १,४२,०९५ कोटी रुपये आहे. यामध्ये CGST रु. २५,८३० कोटी, SGST रु. ३२,३७८ कोटी, IGST रु. ७४,४७० कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या रु. ३९,१३१ कोटींसह) आणि उपकर रु. ९,४१७ कोटी (माल आयातीवर गोळा केलेल्या रु. ९८१ कोटींसह) यांचा समावेश आहे. मार्चमधील महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा १५ टक्क्यांनी जास्त आहे.

  • युक्रेन-रशिया संकट असूनही, जीएसटी संकलनात झालेली वाढ ही अर्थव्यवस्थेत सुधारणा आणि औद्योगिक गती पुन्हा रुळावर येण्याचे लक्षण आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत जीएसटी संकलनावर परिणाम होऊ शकतो, असे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे.

परीक्षेला उत्सव समजा, दडपण घेऊ नका!; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र :
  • ‘‘उत्सव साजरा करावा तसे परीक्षेला सामोरे जा, दडपण घेऊ नका, तुम्ही अनेकदा परीक्षा दिलेली आहे. तुम्ही समुद्र पार केलेला आहे, आता किनाऱ्यावर बुडण्याची भीती अजिबात बाळगू नका’’, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० व १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिला. मोदींनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ‘परीक्षा पे चर्चा’च्या पाचव्या पर्वात देशभरातील विद्यार्थ्यांशी सुमारे दोन तास संवाद साधला. करोनामुळे सलग दोन वर्षे हा कार्यक्रम प्रत्यक्ष होऊ शकला नव्हता. ‘’परीक्षेसाठी शिकू नका मग, कुठलीच परीक्षा अवघड जाणार नाही’’, असे सांगून मोदी म्हणाले की, स्पर्धा नसेल तर जगण्याला काय अर्थ उरला? स्पर्धा ही संधी समजा, स्पर्धेला सामोरे जा, स्पर्धेला स्वत:हून निमंत्रण द्या, तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल!

  • ऑनलाइन शाळा सुरू असताना लक्ष विचलित होते, ही विद्यार्थ्यांची चिंता सोडवत मोदी म्हणाले की, प्रत्यक्ष वर्गात बसल्यावर देखील अनेक विद्यार्थ्यांचे लक्ष नसते. शिक्षक काय शिकवतात हे त्यांच्या डोक्यात कुठे जाते? ऑनलाइन शिकतानाही लक्ष विचलित होते. तंत्रज्ञान ही समस्या नाही, मन ही समस्या आहे. मन भरकटू देऊ नका.. ध्यान धारणा म्हणजे योग करणे वगैरे मोठमोठय़ा गप्पा मारल्या जातात पण, अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर वर्तमानात जगणे म्हणजे ध्यान. तो एक क्षण जगण्याचा प्रयत्न करा. वर्तमान समजले की भविष्यात कुठले प्रश्न राहात नाहीत. शिक्षक काय शिकवतात हे जर तुमच्या डोक्यात गेले नाही, तर ते स्मृतीतही राहणार नाही. स्मृतीचा जगण्याशी संबंध असतो. त्यामुळे ध्यान निव्वळ परीक्षेपुरते मर्यादित ठेवू नका, असा सल्ला मोदींनी दिला.

  • नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना स्वत:ला समृद्ध करण्याच्या पूर्वी कधीही नव्हत्या इतक्या संधी मिळणार आहेत. २०व्या शतकाचे विचार आणि आयुधे घेऊन २१ व्या शतकात जगता येणार नाही. म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सूचनांवर ६-७ वर्षे सखोल विचार करून नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण बनवले गेले. त्याचे देशभर स्वागतही झाले. पूर्वी खेळाला कुठल्याही अभ्यासक्रमात स्थान दिलेले नव्हते. आता खेळ हा शिक्षणाचा हिस्सा बनला आहे. खेळ खेळण्यासाठी असतात, त्यातून प्रतिस्पध्र्यासमोर उभे राहण्यासाठी बळ मिळते. नव्या शिक्षण धोरणात खेळाला प्रतिष्ठा मिळाली आहे, असे समर्थन मोदींनी केले.

टेबल टेनिसपटू मीना परांडे यांचे निधन :
  • भारताच्या माजी टेबल टेनिसपटू मीना परांडे यांचे शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. मीना या १२ वर्षांपूर्वी पुण्याहून नागपूरला आल्या होत्या. प्रथम मैत्रबन वृद्धाश्रमात आणि मग वर्धा मार्गावरील समाधान केअर सव्‍‌र्हिसमध्ये त्या वास्तव्यास होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • मीना यांनी जवळपास दोन दशकांच्या टेबल टेनिसमधील कारकीर्दीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती. त्यांनी चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्या १९५३ ते १९५८ या कालावधीत महाराष्ट्र, तर १९५९ ते १९६५ या कालावधीत रेल्वेकडून खेळल्या. तसेच मीना यांनी १९५४मध्ये इंग्लंड, तर १९५६मध्ये जपान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सिंगापूर, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि श्रीलंका आदी देशांमध्येही स्पर्धा खेळल्या होत्या.

  • खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मीना यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावताना अनेक टेबल टेनिसपटू घडवले. डॉ. चारुदत्त आपटे, राजीव बोडस, सुहास कुलकर्णी, नीला कुलकर्णी यांसारख्या खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले होते.

०२ एप्रिल चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.