चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 सप्टेंबर 2023

Date : 1 September, 2023 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती, उद्यापासून स्वीकारणार पदभार
  • रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. जया वर्मा सिन्हा या आयआरटीएस अधिकारी असून त्या रेल्वे बोर्डावर सदस्या होत्या.
  • रेल्वे मंत्रालयाने एक निवेदन काढून याबाबतची माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ नियुक्त समितीने जया वर्मा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे, असं या निवदेनात म्हटलं आहे. १ सप्टेंबरपासून त्या पदभार स्वीकारणार आहेत. जया वर्मा १ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. परंतु, त्यांना त्याच दिवशी पुन्हा नियुक्त केले जाणार असून त्यांचा कार्यकाल ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे.

कोण आहेत जया वर्मा?

  • बालासोर दुर्घटना झाली तेव्हा जया वर्मा चर्चेत आल्या होत्या. जटिल सिग्नल यंत्रणेचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. जया वर्मा या अलाहाबाद विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी असून त्या १९८८ साली भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत सामील झाल्या. त्यांनी उत्तर रेल्वे, एसई रेल्वे आणि पूर्व रेल्वे विभागात काम केलं आहे.
  • बांगलादेशातील ढाका येथे असलेले भारतीय उच्चायुक्त येथेही चार वर्षे रेल्वे सल्लागार म्हणून काम केलं आहे. कोलकाता ते ढाका या मैत्री एक्स्प्रेसचे उद्घाटनही त्याच कार्यकाळात झाले होते. तसंच, सियालदह विभागातील पूर्व रेल्वेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.
‘सूट’ दुर्बिणीद्वारे सूर्याची अतिनील किरणे, तापमानाचा अभ्यास
  • ‘चंद्रयान ३’ मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) सौर मोहिमेअंतर्गत सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य एल १’ यान शनिवारी (२ सप्टेंबर) प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेत सूर्याच्या अभ्यासासाठी समाविष्ट सात उपकरणांमध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राने विकसित केलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’चा (सूट) समावेश असून, या उपकरणाद्वारे सूर्याची अतिनील किरणे, तापमान इत्यादी घटकांचा अभ्यास केला जाणार आहे.
  • आदित्य एल १ मोहीम आणि सूट दुर्बिणीचे महत्त्व या बाबत सूट दुर्बीण विकसित करणाऱ्या ‘आयुका’च्या संशोधन गटातील वैज्ञानिक अधिकारी चैतन्य राजर्षी यांनी माहिती दिली. सूर्याच्या अभ्यासासाठीच्या मोहिमेची घोषणा इस्रोने २००८ मध्ये केली. आतापर्यंत नासा, युरोपियन स्पेस एजन्सी अशा मोजक्या देशांतील संशोधन संस्थांनी अंतराळातील सौर मोहिमा केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या पहिल्या अंतराळ सौरमोहिमेत सूट ही दुर्बीण समाविष्ट असेल हे निश्चित झाल्यावर २०१३ पासून संशोधन आणि विकासाचे काम आयुकात सुरू करण्यात आले. इस्रोच्या सहकार्याने आयुकाचे प्रा. ए. एन. रामप्रकाश आणि प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली सूट दुर्बीण विकसित करण्यात आली.
  • या दुर्बिणीच्या आराखड्याचे काम आयुकात करण्यात आले, तर निर्मिती व चाचणी इस्रोमध्ये झाली. त्यासाठी आयुकाने अंतराळ मोहिमेसाठीच्या विशिष्ट गरजा असणारी प्रयोगशाळा इस्रोच्या बंगळुरू केंद्रात तयार केली. या दुर्बिणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. या दुर्बिणीद्वारे सूर्याचे प्रकाश क्षेत्र (फोटोस्फेअर), सूर्याच्या बाहेरील थर (क्रोमोस्फेअर), सूर्याचे प्रभामंडल (कोरोना), सूर्याचे तापमान, अतिनील किरणे, ओझोन थरावर होणारा परिणाम अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात येईल. ही दुर्बीण अतिनील किरणांच्या २०० ते ४०० नॅनोमीटर श्रेणीमध्ये काम करणार आहे, असे राजर्षी यांनी सांगितले.
मांडवा – गेटवे जलवाहतुक १ सप्टेंबरपासून सुरू होणार; मेरीटाईम बोर्डाचा हिरवा कंदील
  • अलिबाग - मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानची फेरीबोट जलवाहतूक सेवा १ सप्टेंबरपासून सुरु करण्यास मेरीटाईम बोर्डाने अनुमती दिली आहे. मुंबईला जोडणारा हा सर्वात जवळचा आणि वेळेची बचत करणारा मार्ग असून वर्षातील तीन महिने ही सेवा बंद असते, त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर जाणवत असतो. त्यामुळे फेरीबोट सेवा कधी सुरु होणार याकडे येथील प्रवाशांसह पर्यटन व्यावसायिकांचे लक्ष असते.
  • हा मार्ग खुला होत असल्याने मुंबईतील पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे वाढणार आहे. नऊ महिने अलिबाग मांडवा ते गेटवे, गेटवे ते अलिबाग मांडवा असा प्रवास बोटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मेरीटाईम बोर्डाच्या माहितीनुसार पंधरा लाखाच्या आसपास आहे. या जलमार्गावरून पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात.
  • दर अर्ध्यातासाने एक फेरीबोट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते. स्पीडबोट, रो-रो पेक्षा फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे, प्रदुषण, वाहतुक कोंडी यापासून सुटकाराम्हणून विशेषतः अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील प्रवासी मुंबई-गोवा महामार्गावरुन किंवा इतरमार्गाने मुंबईला जाण्यापेक्षा अलिबाग,मुरुड मधील प्रवासी फेरीबोटीचा वापर जास्तीत जास्त करतात.
Hotstar आणि Jio च्या स्पर्धेत प्रेक्षकांना झाला मोठा फायदा, Asia Cup पाठोपाठ विश्वचषकाचाही घेता येणार मोफत आनंद
  • आशिया कप २०२३ स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेनंतर आयसीसीची मोठी स्पर्धा एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरु होणार आहे. ही स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. त्तत्पुर्वी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी + हॉटस्टारने एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण डिज्नी + हॉटस्टारने जिओ सिनेमाला टक्कर देण्यासाठी आशिया कप पाठोपाठ एकदिवसीय विश्वचषक मोबाईल अॅपवर विनामूल्य प्रवाहित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • जिओ सिनेमाने आपल्या मोबाईल अॅपवर मोठ्या क्रिकेट टूर्नामेंट्सचे मोफत स्ट्रीमिंग ऑफर करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आयपीएल २०२३ चा हंगाम विनामूल्य दाखवले. त्यामुळे त्यांच्या अॅपला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला. आशिया चषक २०२३ स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका येथे ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळली जात आहे. त्यानंतर आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक ५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे.

हॉटस्टारचे मोठे नुकसान झाले -

  • डिज्नी + हॉटस्टारच्या युजरबेसमध्ये सातत्याने घट होत आहे. रॉयटर्सच्या मते, डिस्ने + हॉटस्टारकडे गेल्या वर्षी सर्वात जास्त युजरबेस होता. तथापि, मार्च २०२२ पासून ते कमी होऊ लागले, परिणामी कंपनीचे $41.5 दशलक्ष इतके मोठे नुकसान झाले. त्याच वर्षी ऑक्टोबर ते जुलै दरम्यान युजरबेस सुमारे २५ टक्क्यांनी घसरला, ज्यामुळे कंपनीवर पुन्हा फायदेशीर होण्याचे मार्ग शोधण्याचा दबाव आला.
लाडक्या बाप्पाचे आगमन १८ की १९ सप्टेंबरला, जाणून घ्या…
  • सप्टेंबर आला की गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध सुरू होतात. मुर्त्यांचे बुकिंग सुरू पण झाले. आता मात्र एक संभ्रम आहे. बाप्पाला घरी कधी आणावे. कारण काही कॅलेंडर मध्ये १८ सप्टेंबरची तारीख दिली आहे.तर पंचांगकार १९ सप्टेंबर हाच योग्य मुहूर्त असल्याचे म्हणतात. राज्य शासनाने १९ सप्टेंबर पासून सुरू होणार असल्याचे सार्वजनिक गणेश मंडळास पुरस्कार देण्याची घोषणा करीत जाहीर केले आहे. सूर्य सिद्धांताच्या आधारे काही १८ तारखेचा मुहूर्त सांगतात. पण पंचांगकर्ते दा. कृ.सोमण हे १९ तारीखच योग्य असल्याचे कळवितात.
  • दृक गणिताच्या आधारे तृतीया समाप्ती १८ रोजी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी होते. त्यामुळे गणेश चतुर्थी १९ लाच येत असून या दिवशी गणेशाची स्थापना करावी, असे सोमण स्पष्ट करतात. तर गार्गी ज्योतिषी अजय शास्त्री हे पण १९ सप्टेंबर हाच मुहूर्त असल्याचे ठासून सांगतात.
  • गणपती स्थापनेस कोणताही दोष लागत नाही. मुहूर्त साधायचा झाल्यास १९ सप्टेंबरला दुपारी १ वाजून ४२ मिनिटापर्यंत तो आहे. पण याच दिवशी अंगारक योग असल्याने सूर्यास्तापर्यंत गणेश स्थापना करता येऊ शकते. तो मंगल काळ घेऊन येत असतो, असे गार्गी सांगतात.

01 सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.