चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ सप्टेंबर २०२१

Updated On : Sep 01, 2021 | Category : Current Affairs


India’s GDP Growth - सकल विकासझेप :
 • भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीमध्ये सरलेल्या एप्रिल ते जून २०२१ तिमाहीत २०.१ टक्क्य़ांची वाढ नोंदविण्यात आली. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी अधिकृतपणे जाहीर केलेली ही आकडेवारी सर्वसाधारण अंदाजाच्या जवळच असली तरी, रिझव्‍‌र्ह बँकेने अनुमान केलेल्या २१.४ टक्क्य़ांच्या दरापेक्षा कमी नोंदली गेली आहे.

 • २०११-१२ च्या स्थिर किमतीच्या आधारे यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन ३२.३८ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज बांधला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो २६.९५ लाख कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे सरलेल्या तिमाहीत सकल मूल्यवर्धन हे १८.८ टक्क्य़ांच्या वाढीसह ३०.४८ लाख कोटी रुपये राहिले, जे गत वर्षी याच तिमाहीत २५.६६ लाख कोटी रुपये होते.

 • गेल्या वर्षी करोनाचा पहिला तडाखा आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीने जवळपास ठप्प झालेल्या अर्थचक्राचे प्रतिबिंब हे उणे २४.४ टक्क्य़ांपर्यंत तळात पोहोचले होते. त्या तुलनेत करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असून एप्रिल-जून २०२१ तिमाहीत दिसून आलेली वाढ ही आर्थिक आणि औद्योगिक उपक्रम विनाखंड सुरू राहिल्याचे सूचित करणारी आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

 • आधीच्या म्हणजे, जानेवारी ते मार्च २०२१ तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा दर १.६ टक्के नोंदविण्यात आला होता, जो सलग तीन तिमाहीत नकारात्मकतेनंतर, जीडीपी वाढीत दिसून आलेली ही सकारात्मक वाढ होती.

सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक शपथविधी : 
 • सर्वोच्च न्यायालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या नऊ न्यायाधीशांना मंगळवारी झालेल्या सोहळ्यात या पदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे आता या न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ झाली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच नऊ न्यायाधीशांनी एकाच वेळी न्यायाधीशपदाची शपथ घेतली.

 • सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी त्यांना अधिकार पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या आता ३३ झाली असून ज्या नऊ न्यायाधीशांना शपथ देण्यात आली त्यात न्या. अभय श्रीनिवास ओक, न्या. विक्रम नाथ, न्या. जितेंद्र कुमार, न्या. माहेश्वरी, न्या. हिमा कोहली व न्या. बी.व्ही नागरत्ना यांचा समावेश आहे. या शिवाय न्या. सी. टी. रविकुमार, न्या. एम. एम. सुंदरेश, न्या. बेला एम त्रिवेदी , न्या. पी. एस. नरसिंह यांनाही शपथ देण्यात आली.

 • न्या. नागरत्ना या माजी सरन्यायाधीश इ. एस व्यंकटरामय्या यांच्या कन्या असून त्या २०२७ मध्ये सरन्यायाधीश होऊ शकतील. पण त्यांचा सरन्यायाधीशपदाचा काळ तुलनेत कमी असेल.  न्या. नाथ, न्या. नरसिंह हेही सरन्यायाधीशपदाच्या रांगेत आहेत. पारंपरिक पद्धतीत न्यायाधीशांचा शपथविधी हा सरन्यायाधीशांच्या कक्षात होत असे, पण या वेळी तो शेजारच्या इमारतीतील सभागृहातील कक्षात घेण्यात आला.

 • कोविड नियमांचे पालन करून हा शपथविधी घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेली नेमणूक पत्रे या वेळी वाचून दाखवण्यात आली. न्या. नाथ यांच्यानंतर न्या. नागरत्ना यांना एक महिन्याचा काळ सरन्यायाधीशपदी मिळण्याची शक्यता आहे. न्या. नरसिंहा हे नंतर न्या. नागरत्ना यांची जागा घेऊ शकतील. त्यांचा कार्यकाळ सहा महिने आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या न्यायाधीशांच्या नावाची शिफारस १७ ऑगस्टला केली होती.

दोहामध्ये पहिल्यांदाच भारत आणि तालिबान यांच्यात बैठक :
 • फगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या आक्रमणाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर जगभरात चिंतेंच वातावरण आहे. आपापल्या देशाच्या राजदूतांना तसंच नागरिकांना वाचवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न करत त्यांना तेथून बाहेर काढले जात आहे.

 • अशातच अफगाणिस्तानात तालिबानी सरकारच्या स्थापनेनंतर भारताशी त्यांच्या संबंधांबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, दोहा येथील कतारमधील भारतीय राजदूताने तालिबानचे सर्वोच्च नेते शेर मोहम्मद स्टानेकझाई यांची भेट घेतली. पहिल्यांदाच भारत आणि तालिबान यांच्यात औपचारिक बैठक झाली आहे.

 • भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांची भेट घेतली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, तालिबानने भेटण्यासाठी ही विनंती केली होती. दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधींची ही भेट झाली. या दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा झाली.

शासकीय सेवेत २० टक्के अनुकंपा नोकरभरती : 
 • राज्य शासनाच्या सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या कु टुंबावर ओढावलेल्या आर्थिक संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी, कु टुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याच्या धोरणास गती देण्यासाठी सध्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. विविध विभागांत, कार्यालयांत पदभरतीस मान्यता असणाऱ्या पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 • घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे त्याच्या कु टुंबाला आपत्तीजनक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अनुकंपा तत्त्वावर तातडीने नियुक्ती देणे अभिप्रेत आहे. परंतु संबंधित उमेदवाराने अर्ज के ल्यानंतर नियुक्ती मिळण्यास काही वर्षांचा कालावधी जातो, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनुकंपा प्रतीक्षासूचीतील उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 • करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार तातडीने रोजगार उपलब्ध करून दिल्यास या योजनेचा उद्देश साध्य होईल. त्यानुसार अनुकंपा नियुक्त्या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होण्यासाठी सध्याच्या प्रमाणित कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात येत असल्याचे शासनाने म्हटले आहे.

 • या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने २६ ऑगस्ट रोजी जारी के लेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाले असेल, त्याच्या वारसाने के लेल्या अर्जाची छाननी करून त्याच दिवशी अनुकंपा प्रतीक्षासूचित त्याचे नाव समाविष्ट करण्याची कार्यालय प्रमुखावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गट क व गट ड संवर्गासाठी स्वतंत्र प्रतीक्षासूची तयार करायची आहे. प्रत्येक कार्यालयाने प्रतीक्षासूची वेळोवेळी अद्ययावत करून त्यांच्या संके तस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. सरळसेवेने पदभरतीस मान्यता असलेल्या पदांपैकी २० टक्के पदांवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त्या देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : अश्विन-जडेजा एकत्रित की चार वेगवान गोलंदाज :
 • इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात रवींद्र जडेजा-रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकी जोडीला एकत्रित खेळवावे की चार वेगवान गोलंदाजांचीच रणनीती कायम राखून एकाच फिरकीपटूला संघात स्थान द्यावे, असा पेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसमोर उभा ठाकला आहे.

 • ओव्हल येथे गुरुवारपासून भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. या कसोटीत अश्विनला न खेळवल्यामुळे अनेकांनी नाराजी दर्शवली. त्याशिवाय जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याच्या समावेशाबाबत संभ्रम कायम आहे. अशा स्थितीत चौथ्या कसोटीत भारतीय संघाच्या गोलंदाजांच्या फळीत बदल होण्याची दाट शक्यता आहे.

 • तिसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा ही वेगवान चौकडी आणि जडेजाच्या रूपात एकमेव फिरकीपटू भारताने खेळवला. परंतु ओव्हलच्या खेळपट्टीवर चौथ्या-पाचव्या दिवशी फिरकीपटूंना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे.

IPL मध्ये दिसणार ‘दस का दम’; नव्या संघासाठी BCCI ने काढलं टेंडर, कोण होणार मालक :
 • आयपीएलच्या १५व्या हंगामाविषयी एक मोठे अपडेट समोर आले आहे. पुढील हंगामात, आणखी दोन नवीन संघ आयपीएलमध्ये खेळताना दिसतील, त्यापैकी एका संघाच्या मालकी आणि संचालन करण्यासाठी बीसीसीआयने निविदा जाहीर केली आहे. निविदा खरेदी करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.

 • आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने निविदा प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत. यात काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.

 • पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी घटक ‘निविदा आमंत्रण’मध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. हे शुल्क १० लाख रुपये इतके असेल. तसेच यात वस्तू आणि सेवा कराचाही समावेश आहे.

०१ सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)