चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ ऑक्टोबर २०२१

Updated On : Oct 01, 2021 | Category : Current Affairs


विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा - पहिल्याच फेरीत अभिषेक पराभूत :
 • भारताचा आघाडीचा कंपाऊंड तिरंदाज अभिषेक वर्माचे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या ब्रॅडेन गेलेंथीनने अभिषेकचा १४६-१४२ असा चार गुणांनी पराभव केला.

 • ब्रॅडेनने पाच वेळा अचूक १० गुण मिळवले. २०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक पॅरिसला झालेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या टप्प्यात जेतेपद पटकावून या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. याशिवाय २०१५च्या विश्वचषक स्पर्धेत अभिषेकने रौप्यपदकही जिंकले होते.

 • त्यानंतर २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात अभिषेकने वैयक्तिक कांस्य आणि ज्योती सुरेखा व्हेन्नमच्या साथीने मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.

भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारे दबाव आल्यास गंभीर दखल घेतली जाणार :
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) राबवल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसंदर्भात एखाद्या विशिष्ट पद्धतीने निर्णय घेण्याबाबत किंवा निर्णय न घेण्याबाबत प्रयत्न करण्याची कृती दबाव समजून अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली जाईल, असा स्पष्ट इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे.

 • एमपीएससीकडून या संदर्भातील प्रसिद्धिपत्रक गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. आयोगामार्फत भरती प्रक्रियेत नियमांना बगल देऊन किंवा अपवाद करून एखाद्या विशिष्ट प्रकरणी कार्यवाही करण्याची किंवा कार्यवाही न करण्याची गैरवाजवी अपेक्षा किंवा मागणी संबंधित लाभार्थी उमेदवार किंवा काही संघटित किंवा असंघटित घटकांकडून केली जात असल्याचे दिसून आले आहे.

 • त्यासाठी शासन यंत्रणा किंवा राजकीय, अराजकीय, व्यक्ती, घटकांमार्फत दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे, विविध प्रसिद्धी, समाजमाध्यमांचा वापर करण्यात येत असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. अशा प्रकारे विविध पद्धतीने आयोगावर येणाऱ्या दबावाची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.

आयोगामार्फत आयोजित भरतींसाठी निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये ‘या’ सुधारणा :
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित विविध भरती प्रक्रियांचे अंतिम निकाल जाहीर करण्याबाबतच्या प्रचलित कार्यपद्धतीचा साकल्याने विचारून निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची बाब आयोगाच्या विचाराधीन होती. या संदर्भात आयोगाकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

 • त्यानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व भरतीप्रक्रियांकरीता सर्वसाधारण गुणवत्त यादी आयोगाच्या संकेतस्थळार प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच, बहूसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांकडून पसंतीक्रम मागवून त्याच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल.

 • याशिवाय, बहूसंवर्गीय पदांच्या भरतीप्रक्रिया वगळता अन्य भरतीप्रक्रियांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येणार आहे.

भारत-चीन यांच्यात सीमा करार होईपर्यंत सीमेवरील घटना थांबणे कठीण :
 • भारत आणि चीन यांच्यात सीमा करार झाल्याशिवाय या दोन देशांमध्ये सीमेवर होणाऱ्या घटना थांबणार नाहीत, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी सांगितले.

 • अफगाणिस्तानातील ताज्या घडामोडींवर भारतीय लष्कराचे नक्कीच लक्ष असून, त्यातून असलेल्या धोक्याचा अदमास घेऊन त्यानुसार धोरण तयार करणे आम्ही सुरूच ठेवले आहे, असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात बोलताना लष्करप्रमुख म्हणाले.

 • चीनच्या संदर्भात जनरल नरवणे यांनी सांगितले की, ‘आमच्यातील सीमावाद दीर्घकाळापासून प्रलंबित आहे. कुठल्याही दु:साहसाचा सामना करण्याची आमची तयारी असून, यापूर्वी आम्ही ती दाखवून दिली आहे’.

भारत बायोटेकच्या अर्जावर ऑक्टोबरमध्ये निर्णय :
 • ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या आणीबाणीकालीन वापराची परवानगी मागणाऱ्या भारत बायोटेकच्या अर्जावर ऑक्टोबरमध्ये निर्णय घेतला जाईल, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.

 • कोव्हॅक्सिनचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया ‘सध्या सुरू’ आहे. भारत बायोटेकने आपल्या लशीसाठी स्वारस्य अभिव्यक्ती १९ एप्रिलला सादर केली होती.

 • आपण या लशीबाबतची माहिती उघड करण्यास ६ जुलैला सुरुवात केल्याचे डब्ल्यूएचओने सांगितले. या प्रक्रियेमुळे माहिती मिळण्यास सुरुवात होत असल्याने, एकूण आढावा प्रक्रियेला गती देण्याच्या उद्देशाने लशीचा लगेचच आढावा घेण्यास सुरुवात करण्याची मुभा डब्ल्यूएचओला मिळते.

NEET PG Result 2021: नीट पीजी परीक्षेचे निकाल जाहीर, इथे तपासा :

NEET PG २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नेशनल एलिजिबिलिटी एंट्रेंस टेस्ट अर्थात NEET पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर केला आहे.

११ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या NEET PG 2021 परीक्षेला बसलेले उमेदवार आता NBE च्या अधिकृत वेबसाइट nbe.edu.in किंवा natboard.edu.in वर जाऊन हे निकाल पाहू शकतात.

NEET PG २०२१ निकाल कसे पाहाल

 • स्टेप १ : NBE च्या nbe.edu.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • स्टेप २ : मुख्यपृष्ठावर उपलब्ध ‘NEET PG Result 2021’ या लिंकवर क्लिक करा.
 • स्टेप ३ : एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे लॉगिन करावं लागेल.
 • स्टेप ४ : लॉग-इन क्रेडेंशियल्स एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा.
 • स्टेप ५ : तुमचा निकाल स्क्रीनवर ओपन होईल.
 • स्टेप ६ : येथे ctrl+f टाइप करा आणि आपला रोल नंबर शोधून आपला निकाल तपासा.
 • स्टेप ७ : आपला निकाल डाउनलोड करा आणि पुढील उपयोगासाठी एक प्रिंटआउट आपल्याकडे ठेवा.
जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा - भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात :
 • ‘फिडे’ जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील भारताचे आव्हान गुरुवारी उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानकडून पत्करलेल्या पराभवामुळे संपुष्टात आले. पहिल्या डावात २-२ अशी बरोबरी साधल्यानंतर दुसऱ्या डावात डावात मात्र कझाकस्तानने भारतावर २.५-१.५ अशी सरशी साधली.

 • पहिल्या डावात मेरी अ‍ॅन गोम्सने विजय मिळवला, तर द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांनी आपापले डाव बरोबरीत सोडवले. परंतु भक्ती कुलकर्णीच्या पराभवामुळे भारत विजयापासून वंचित राहिला. मेरीने गुलमिरा डॉलेटोव्हाला ८५ चालींमध्ये मात केली. हरिकाने झॅनसाया अब्दुमलिकशी ८० चालींनंतर, तर वैशालीने डिनारा सॅडुकासोव्हाशी ३९ चालींनंतर बरोबरी साधली. भक्तीने कॅमलिडेनोव्हा मेरूर्टकडून ५२ चालींनंतर पराभव पत्करला.

 • दुसऱ्या डावात मेरीने गुलमिरावर ५७ चालींमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. परंतु हरिका आणि तानिया सचदेव यांच्या पराभवांमुळे भारताची वाटचाल खंडित झाली. झॅनसायाने हरिकाला ४७ चालींत नमवले, तर मेरूर्टने ३६ चालींत तानियाला नामोहरम केले. तथापि, वैशालीला दिनाराने ५० चालींत बरोबरीत रोखले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला उपांत्य फेरीत अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

०१ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

टिप्पणी करा (Comment Below)