चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ ऑक्टोबर २०२०

Date : 1 October, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
न्यायाधीश निवडीचा अधिकार विद्यमान अध्यक्षांनाच :
  • अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. ‘सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडण्याचा मला अधिकार आहे’, असा दावा ट्रम्प यांनी केला, तर डेमोक्रॅटिक उमेदवार बायडेन यानी न्यायाधीशांची निवड निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षांनी करणे अपेक्षित होते असे सांगितले. कोविड१९ साथीची हाताळणी, प्राप्तिकराचा प्रश्न या मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांत खडाजंगी झाली.

  • ओहिओतील क्लिव्हलँड येथे वादविवाद चांगलाच रंगला. ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅमी कॉनी बॅरेट यांची नेमणूक केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक जिंकली आहे, मी अध्यक्ष असल्याने मला न्यायाधीश नेमणुकीचा अधिकार आहे.

  • बायडेन यांनी ट्रम्प यांच्या मताशी असहमती दर्शवत सांगितले की, अमेरिकी लोकांना सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश निवडण्याचा अधिकार आहे. जेव्हा ते अमेरिकेतील सिनेटर्ससाठी मतदान करतात व अमेरिकी अध्यक्ष निवडतात तेव्हा त्यातून हेच स्पष्ट होते. निवडणूक प्रक्रियेच्या मध्यावर असताना ट्रम्प यांनी न्यायाधीशांची निवड केल्याने लोकांचा तो अधिकार डावलला गेला आहे. त्यामुळे न्यायाधीश नेमणुकीला आमचा विरोध आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हजारो लोकांचे मतदान झाले आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष निवडून येण्याची वाट बघायला हवी होती.

शाळा-महाविद्यालयांना केंद्राची १५ ऑक्टोबरपासून परवानगी :
  • टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यानुसार शाळा-महाविद्यालये तसेच, अन्य शैक्षणिक संस्था १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मुभा देण्यात आली असून, निर्णयाची जबाबदारी राज्य सरकारांकडे सोपविण्यात आली आहे.

  • शाळा, महाविद्यालये, शिकवण्यांचे वर्ग १५ ऑक्टोबरनंतर टप्प्याटप्प्याने सुरू करता येऊ  शकतील. पण त्यापूर्वी शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापकांची सहमती गरजेची असेल. तसेच, विद्यार्थ्यांनी पालकांच्या लेखी परवानगीनेच शाळा-महाविद्यालयांमध्ये जावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

  • शैक्षणिक संस्था प्रत्यक्ष सुरू होत नाहीत तोपर्यंत ऑनलाइन शिक्षणालाच प्राधान्य देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत किंवा महाविद्यालयात न येता घरी राहून ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण घ्यायचे असेल, त्यांना तशी परवानगी दिली जावी. विद्यार्थ्यांना हजेरीची सक्ती करू नये, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

यूपीएसी पूर्वपरीक्षा; सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली, आयोगाला दिले निर्देश :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणारी यूपीएससी पूर्वपरीक्षा नियोजित वेळेप्रमाणेच होणार आहे. या परीक्षेसंदर्भात काही उमेदवारांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळून लावतानाच न्यायालयानं केंद्रीय लोकसेवा आयोगाला उमेदवारांच्या निवासासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

  • करोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांनी न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सुनावणी झाली.

  • सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून लावत याचिका निकाली काढली. ४ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणारी पूर्वपरीक्षा करोनाच्या कारणामुळे टाळता येणार नाही, असं सांगत न्यायालयानं याचिका निकाली काढली आहे. यावेळी न्यायालयानं यूपीएससीलाही महत्त्वाचे निर्देश दिले. आयोगानं सर्व राज्यांना असे निर्देश द्यावेत की, परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्यांचं ओळखपत्र दाखवल्यानंतर हॉटेलमध्ये रूम देण्यास परवानगी द्यावी. त्याचबरोबर करोनाचा संसर्ग झालेल्या उमेदवारांना परीक्षाला बसू द्यावं, असं न्यायालय आयोगाला सांगू शकत नाही, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

हॉकी संघाचे सराव शिबीर नोव्हेंबपर्यंत :
  • करोना साथीमुळे भारताच्या पुरुष हॉकी संघाचा प्रस्तावित हॉलंड दौरा रद्द करण्यात आला. मात्र त्यामुळे बेंगळूरु येथे पुरुष संघाच्या सुरू असलेल्या सराव शिबिराचा कालावधी वाढवण्यात आला आहे.

  • ३० सप्टेंबपर्यंत नियोजित असणारे सराव शिबीर आता २८ नोव्हेंबपर्यंत सुरू राहणार आहे. महिला हॉकी संघाचे सराव शिबीरही १२ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे.

०१ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.