चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ नोव्हेंबर २०२१

Date : 1 November, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा - साथियन-हरमीतला जेतेपद :
  • जी. साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय जोडीने ट्युनिशिया येथे झालेल्या डब्ल्यूटीटी कंटेंडर ट्युनिस आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यांनी पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत इमॅन्युएल लेबेसन आणि अलेक्झांड्रे कॅसिन जोडीवर मात करत एकत्र खेळताना पहिल्या आंतरराष्ट्रीय जेतेपदावर नाव कोरले.

  • साथियन-हरमीत जोडीने लेबेसन-कॅसिन या फ्रेंच जोडीवर ११-९, ४-११, ११-९, ११-६ अशी मात केली. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये निसटता विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये निराशाजनक खेळ केला. मात्र त्यांना योग्य वेळी कामगिरीत सुधारणा करण्यात यश आले. त्यांनी तिसरा आणि चौथा असे सलग दोन गेम जिंकत सामन्यात बाजी मारली.

  • ‘‘पुरुष दुहेरीत आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची ही माझी वैयक्तिक पहिलीच वेळ होती. तसेच हरमीतसोबत खेळतानाही आमचे हे पहिले जेतेपद ठरले. आम्ही दीर्घ कालावधीनंतर एकत्र खेळत आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच सुवर्णपदक पटकावणे ही समाधानकारक बाब आहे,’’ असे साथियन म्हणाला. तसेच त्याने या यशाचे श्रेय त्याचा साथीदार हरमीतला दिले. साथियन-हरमीतने उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतरही हंगेरीच्या नॅन्दोर एसेकी आणि अ‍ॅडम झुडी जोडीला पराभूत केले होते.

एलन मस्कची संपत्ती ऐकून डोळे दिपतील; एवढी माया जमवणारा ठरलाय इतिहासातला एकमेव व्यक्ती :
  • इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत जगात सर्वात दिग्गज कंपनी असलेल्या टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत हे तुम्ही सर्वांनीच ऐकलं असेल. मात्र, ३११ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी संपत्ती असणारे एलन मस्क मानवी इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

  • मस्क यांची संपत्ती किती आहे याचा अंदाज केवळ या आकडेवारीवरून तुम्हाला येत नसेल तर एका उदाहरणावरून याचा अंदाज करता येईल. जर तुमचा पगार दरवर्षी १ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास ७ कोटी ४९ लाख रुपये असेल आणि तुम्ही या पगारातून कधी एक रुपयाही खर्च केला नाही तर एलन मस्क यांच्या एवढी संपत्ती कमवायला तुम्हाला ३ लाख २ हजार वर्षे लागतील, असं मत ग्रॅव्हिटी पेमेंटचे सीईओ डॅन प्राईस यांनी व्यक्त केलंय.

  • “अब्जावधींचे मालक एलन मस्क यांना केवळ ३.३ टक्केच कर द्यावा लागतो” - एलन मस्क ३.३ टक्के कर देतात. अनेक अब्जाधीशांना ८ टक्के कर द्यावा लागतो. अमेरिकेतील प्रत्येक कुटुंबाला सरासरी १४ टक्के कर द्यावा लागतो, असंही निरिक्षण डॅन यांनी मांडलंय. आपलं म्हणणं पटवून देताना त्यांनी काही अहवालांच्या लिंकही शेअर केल्यात त्यात एलन मस्क यांच्या संपत्तीचं विवरण देण्यात आलंय. एलन मस्क स्पेस एक्स या अंतराळ संशोधन संस्थेचेही प्रमुख आहेत. ही कंपनी नासासोबतही काम करते.

राज्यातील १३६४ केंद्रांवर पार पडली आरोग्य विभागातील गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा :
  • सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण ३४६२ पदे भरण्यासाठीची लेखी आज(रविवार) सुरळीतपणे पार पडल्याचे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

  • त्यांनी सांगितले की, आज राज्यातील १३६४ केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ४,६१,४९७ उमेदवारांनी अर्ज केले होते. ४१२२०० उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त करून घेतले होते.

  • चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्हयांमध्ये उमेदवारांनी परिक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परीक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना नियुक्ती करण्यात आली होते. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत कोणा उमेदवारांना आपले म्हणणे मांडावे, त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल.

  • वरील केंद्रांवर उमेदवारानां सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी मोहाडी, जि. भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परिक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फुटला महागाईचा बॉम्ब; एलपीजी सिलेंडर २६५ रुपयांनी महागला :
  • दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

  • एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

  • या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही.

  • दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत १५ रुपयांनी वाढवली होती.

तापमानवाढ रोखण्यासाठी कृती करा - जी २० नेत्यांना ब्रिटनच्या युवराजांचे आवाहन :
  • जी २० नेत्यांच्या बैठकीच्या अंतिम दिवशी, रविवारी जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर व्यापक ऊहापोह झाला. ब्रिटनचे युवराज चार्लस् यांनी जगातील श्रीमंत देशांच्या नेत्यांना आवाहन केले की, त्यांनी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले शब्द आता प्रत्यक्ष कृतीत आणावेत.

  • ग्लासगो (स्कॉटलंड) येथे संयुक्त राष्ट्रांची हवामानविषयक परिषद होणार असून त्याआधी जी २० बैठकीत हवामान बदलांबाबत चिंतेचा सूर तीव्र करण्यात आला आहे.

  • पृथ्वीवासीयांसाठी (स्वत:ला वाचविण्यासाठीची) कदाचित ही शेवटची संधी आहे, असा इशारा देत चार्लस् जी २० नेत्यांना उद्देशून म्हणाले की, जागतिक तापमानाढ थांबविण्यासाठी शाश्वत ऊर्जास्रोतांची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठीची अब्जावधी डॉलरची गुंतवणूक उभी करायची असेल तर सार्वजनिक- खासगी भागीदारी हा एकमेव पर्याय आहे.

  • त्यांनी या नेत्यांना सांगितले की, जगातील असहाय युवा तुमच्याकडे त्यांच्या भवितव्याचे नियंते म्हणून पाहात असताना यापुढे त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला अशक्य होणार आहे.

पोप यांना मोदींचे भारतभेटीचे आमंत्रण :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली आणि त्यांना भारतभेटीचे आमंत्रण दिले.

  • पोप यांच्याशी करोना विषाणू साथ आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली आव्हाने यांसह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे ट्वीट मोदी यांनी भेटीनंतर केले. पोप यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. आमची ही भेट अतिशय सौहार्दपूर्ण होती. मी त्यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले, असे मोदी यांनी म्हटले आहे.

  • मोदी आणि पोप यांच्यातील ही बैठक २० मिनिटांची असेल, असे निश्चित करण्यात आले होते, परंतु दोन्ही नेत्यांनी विविध जागतिक समस्यांवर सुमारे एक तास चर्चा केली. हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्या, गरिबी, करोना साथ या विषयांवर त्यांनी चर्चा केली. मोदी यांनी पोप यांना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारताने योजलेल्या उपाययोजनांची, त्याचबरोबर १०० कोटी लसीकरणाचे लक्ष्य गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

  • पंतप्रधान मोदी ‘जी२०’ परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेही आहेत. मोदी ग्लासगो येथे रविवारपासून सुरू होणाऱ्या हवामान परिषदेसाठीही उपस्थित राहणार आहेत.   

०१ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.