चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ मे २०२०

Date : 1 May, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोनावर औषध सापडलं; अमेरिकन संशोधकांचा दावा :
  • जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने जगभरात २ लाख २७ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोना विषाणूवर परिणामकारक ठरणाऱ्या लसीचा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरातील ८० वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सुरु असतानाच अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. येथील संशोधकांनी रेमडेसिवीर (Remdesivir) हे औषध करोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा केला आहे. करोनावर मात करणारे औषध सापडल्याचा दावा करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या करोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे अढळून आलं आहे, असं फॉउसी यांनी स्पष्ट केलं आहे.

  • रेमडेसिवीर देण्यात आलेल्या रुग्णांनी करोनावर ३० टक्के वेगाने मात केल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अलर्जी अण्ड इफेक्शियस डिसीजने (एनआयएआयडी) रेमडेसिवीर औषध दिलेले रुग्ण हे इतर औषध देण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक वेगाने करोनावर मात करु शकले असं म्हटलं आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेले रुग्ण ११ दिवसांमध्ये तर इतर औषधांवर असणारे रुग्ण १५ दिवसांमध्ये करोनामधून बरे झाल्याचे निरिक्षक नोंदवण्यात आलं आहे.

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान - नरेंद्र मोदी :
  • करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे.

  • राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी ट्विटवरुन महाराष्ट्रातील जनतेला मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.

  • देशातील जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे असं मोदींनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्यातल्या बंधू- भगिनींना माझ्या शुभेच्छा. देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो. जय महाराष्ट्र!”, असं ट्विट मोदींनी केलं आहे.

गरिबांच्या मदतीसाठी ६५ हजार कोटी आवश्यक :
  • नवी दिल्ली : करोनाचा सर्वाधिक फटका देशातील गरिबांना बसला असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. त्यासाठी आपत्तीच्या काळात ६५ हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी व्यक्त केला.

  • काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी दूरचित्रसंवादाद्वारे राजन यांच्याशी देशाच्या आर्थिक परिस्थितीसंदर्भात तीस मिनिटे चर्चा केली. देशाची अर्थव्यवस्था २०० लाख कोटी रुपयांची असून गरिबांसाठी त्यातील ६५ हजार कोटी रुपये ही फार मोठी रक्कम नाही. सरकारला गरिबांना वाचवायचे असेल तर एवढी रक्कम देण्यात कोणतीही अडचण येऊ नये, असे मत राजन यांनी व्यक्त केले.

  • टाळेबंदीमुळे रोजंदारी मजुरांकडे उपजीविकेचे साधन राहिललेले नाही. त्यांच्या जगण्यासाठी अन्नधान्य आदींची तातडीने व्यवस्था करावी लागणार आहे. देशात अनेक ठिकाणी सार्वजनिक वितरण व्यवस्था पुरेशा प्रमाणात पोहोचलेली नाही. अनेक लोक या व्यवस्थेच्या बाहेर राहिलेले आहेत. त्यांनाही अन्नधान्य पुरवले पाहिजे. त्यासाठी तात्पुरत्या शिधापत्रिका देण्याचा पर्याय माझ्यासह अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी यांनी सुचवलेला आहे. करोना ही आपत्ती असून त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांकडे त्याच तीव्रतेने पाहावे लागेल, असेही राजन म्हणाले.

राज्यात १३ हजार उद्योगांत उत्पादन सुरू :
  • मुंबई : टाळेबंदीच्या काळात उद्योग-व्यवसायाला काही भागात परवानगी देण्याच्या धोरणाला आता चांगला प्रतिसाद मिळत असून ३० एप्रिलअखेर राज्यात एकू ण १३ हजार ५६० उद्योगांमध्ये उत्पादन सुरू होऊन एक लाख ३९ हजार कामगार कामावर रूजू झाल्याने अर्थचक्र  पुन्हा गती घेत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात विश्वासाचे वातावरण तयार होत असून पुढील काही दिवसांत ही संख्या वाढण्याची उद्योग विभागाची अपेक्षा आहे.

  • देशात टाळेबंदीच्या काळात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याच्या धोरणानुसार २० एप्रिलपासून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या उद्योग विभागाने आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारखाने सुरू करण्यासाठीच्या परवानग्यांची प्रणाली सुरू के ली.

  • पहिले दोन-तीन दिवस काही तांत्रिक अडचणी, स्थानिक प्रशासनाच्या परवानग्या मिळण्यात अडचण असे अडथळे आले. पण नंतर हळूहळू परिस्थिती सुधारत आहे.

भारताचे माजी फुटबॉल कर्णधार चुनी गोस्वामी यांचं निधन :
  • भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार चुनी गोस्वामी यांचं गुरुवारी कोलकात्यात निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते, १९६२ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना चुनी गोस्वामी यांनी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. फुटबॉल व्यतिरीक्त गोस्वामी बंगालकडून स्थानिक क्रिकेटही खेळले आहेत.

  • भारतीय फुटबॉल संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची ओळख होती. १९६२ च्या यशानंतर १९६४ सालीही गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला रौप्यपदक मिळालं होतं.

  • गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्यामुळे गोस्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मधुमेह, ब्लड प्रेशर यासारख्या अनेक आजारांनी गोस्वामी त्रस्त होते. कार्डिएक अरेस्टमुळे गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • गोस्वामी यांनी ५० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं होतं. याव्यतिरीक्त कोलकात्यातील मोहन बागान फुटबॉल क्लबकडूनही ते सुरुवातीच्या दिवसांमध्ये खेळत होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय फुटबॉल क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

देशात करोनाग्रस्तांची संख्या ३५ हजारांवर; १ हजार १४७ जणांचा मृत्यू :
  • देशात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. देशात करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सादर केलेल्या आकडेवारीनुसार १ मे रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत देशातील करोनाग्रस्तांची संख्या ३५ हजार ४३ वर पोहोचली आहे.

  • तर करोनामुळे देशभरात १ हजार १४७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत ८ हजार ८८८ रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

  • सध्या देशभरात २५ हजार ७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढून की १० हजार ४९८ वर पोहोचली आहे. तर गुजरातमध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ३९५ आणि दिल्लीत ३ हजार ५१५ वर पोहोचली असल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान केंद्रानं चाचण्यांसाठी केवळ RTP-CR टेस्टिंगचाच वापर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे.

०१ मे चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.