राज्यात दहावीची परीक्षा उद्यापासून,१६ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठीच्या उपाययोजना राज्य मंडळाने केल्या असून, २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परीरक्षक बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहतील. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येईल. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे. राज्य मंडळाच्या भरारी पथकासह जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
गेल्या वर्षी परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा सहा हजार खासगी आणि आठ हजार पुनर्परीक्षार्थी वाढले आहेत, असे गोसावी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक असली, तरी निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
युक्रेनला मदत करण्यासाठी पाश्चात्य सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा धोका निर्माण होईल, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा हा इशारा आला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या आठवडय़ाच्या सुरूवातीला म्हटले होते की युक्रेनमध्ये पाश्चात्य देशांचे सैन्य तैनात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. या विधानाचा संदर्भ देऊन, पुतिन यांनी असा इशारा दिला.
रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. युक्रेनच्या काही भागांवर रशियाने कब्जा केला आहे. पण तणाव अद्याप कायम आहे. युद्ध अद्याप थांबलेले नाही आणि युक्रेनच्या बाजूने आक्रमकताही कमी झालेली नाही. आमच्या विषयांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नाही. जो कोणी रशियावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल, त्याला दुसऱ्या विश्वयुद्धाहून भयंकर परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे लागेल, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे.
रशियामध्ये १५ ते १७ मार्च या कालावधीत होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांना आव्हान देऊ शकणाऱ्या प्रमुख समीक्षकांना एकतर तुरुंगात टाकण्यात आले आहे किंवा ते परदेशात राहत आहेत, तर बहुतेक स्वतंत्र माध्यमांवर बंदी घालण्यात आली आहे. पुतिन यांची पुन्हा निवड होणे हे खात्रीशीर मानले जात आहे.
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
नोकरीच्या आमिषाने रशियात गेलेले काही भारतीय तरुण रशिया-युक्रेन संघर्षात अडकले आहेत. या तरुणांची सुटका करण्यासाठी भारत सरकारकडून पुरेपूर प्रयत्न केला जातोय. भारतीय परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार अशा २० तरुणांची रशियन सैनिकांच्या ताब्यातून सुटका व्हावी यासाठी हे प्रयत्न केले जातायत. रशियात असेलेल्या भारतीयांनी युद्धात सहभाही होऊ नये. तसेच युद्धाच्या क्षेत्रात जाऊन कठीण परिस्थितीत अडकू नये, असे आवाहन भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी केले आहे.
“भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत”
“आम्ही रशियन प्रशासनाच्या संपर्कात आहोत. दिल्ली तसेच मॉस्कोतून आमचे या भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू आहेत,” असेही जैस्वाल यांनी सांगितले. सोमवारी परराष्ट्र खात्याने याआधीच रशियाने काही भारतीयांची सुटका केली आहे, असे सांगितले होते.
“निदर्शनास आलेल्या सर्व प्रकरणांची गंभीर दखल”
रशिया-युक्रेन युद्धात रशियाने काही भारतीयांना सपोर्ट स्टाफ म्हणून सामील करून घेतले आहे. तसेच रशियाकडून लढण्यासाठीही या भारतीयांवर दबाव टाकण्यात येतोय, असे माध्यमांत सांगितले जात होते. त्यालाच उत्तर म्हणून “माध्यमांत चुकीचे वृत्त दिले जात आहे. रशियन सैनिकांकडून आमची सुटका करा, अशी मागणी काही भारतीयांकडून केली जात आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले होते. परराष्ट्र खात्याच्या निदर्शनास आलेल्या अशा प्रकरणांची गंभीर दखल घेतली जात आहे. याआधीच काही भारतीयांची रशियाने सुटका केलेली आहे,” असे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले.
एका तरुणाचा मृत्यू
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसने याआधी दिलेल्या वृत्तानुसार मूळचा सुरत येथील राहिवासी असलेल्या २३ वर्षीय हेमिल मंगुकिया या तरुणाचा रशियात क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला आहे. २१ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. मंगुकिया हा तरुण रशियात युक्रेनच्या सीमेवर युद्धक्षेत्रात होता. तो मदतनीस म्हणून या युद्धभूमीवर काम करत असल्याचे इंडियन एक्स्प्रेच्या या वृत्तात म्हणण्यात आले होते.
ओपन बुक परीक्षा पद्धतीची राज्य मंडळही करणार चाचपणी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीसाठी ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्या धर्तीवर राज्य मंडळाकडून येत्या काळात ओपन बुक परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत विचार केला जाणार आहे.
राज मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. ओपन बुक परीक्षा पद्धतीमध्ये परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी पाठ्यपुस्तके, मार्गदर्शक साहित्याचा वापर करण्याची मुभा असते. सीबीएसईकडून ओपन बुक परीक्षा पद्धत वापरण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अद्याप त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र प्रायोगिक तत्त्वावर काही शाळांमध्ये ओपन बुक परीक्षा पद्धत वापरून, त्याचे फायदे, तोटे, मर्यादा यांचे मूल्यमापन केल्यानंतर सीबीएसईकडून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाला मोठ्या प्रमाणात उपाययोजना कराव्या लागतात. त्यामुळे ओपन बुक परीक्षा पद्धतीचा अवलंब करण्याबाबत गोसावी म्हणाले, की ओपन बुक परीक्षा पद्धत काही पदभरती परीक्षांमध्ये वापरली जाते. मात्र दहावी-बारावीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील संकल्पना, सूत्रे समजण्यासाठी ही परीक्षा पद्धत उपयोगी पडू शकते. त्यामुळे येत्या काळात या परीक्षा पद्धतीबाबत विचार करता येऊ शकेल.
आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचा आदेश!
आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज (२९ फेब्रुवारी) विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित होते.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्यामाध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
आले होते २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करून अंतिम गुणवत्ता यादीनुसार १४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना आज पदस्थापनेचे आदेश देण्यात आले.
दरम्यान, वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने ३० जानेवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. याबाबत ३१ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून आज आदेश देण्यात आले.
राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धा: मिथुन, अनुपमाला विजेतेपद
रेल्वेच्या मिथुन मंजुनाथ आणि हरियाणाची अनुपमा उपाध्याय यांनी ८४व्या राष्ट्रीय बॅडिमटन स्पर्धेत विजेतेपद मिळवले. मिथुनचे एकतर्फी वर्चस्व, तर अनुपमाला विजेतेपदासाठी करावा लागलेला संघर्ष हा अंतिम लढतीच्या निर्णयातील महत्त्वाचा फरक ठरला. मिथुनने मध्य प्रदेशाच्या प्रियांशु राजावतचा२१-१६, २१-११ असा सहज पराभव केला. महिला एकेरीत अनुपमाने छत्तीसगडच्या आकर्षि कश्यपचे आव्हान २०-२२, २१-१७, २४-२२ असे तीन गेमच्या लढतीत मोडून काढले.
कारकीर्दीत श्रीकांतवर दुसऱ्यांदा विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या मिथुनने अंतिम लढतीत थॉमस चषक विजेत्या संघातील प्रियांशु राजावतविरुद्ध एकतर्फी वर्चस्व राखले. राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीकांतवर विजय मिळविल्यावर मिथुनने अंतिम लढतीत विजेतेपदाच्या निर्धारानेच खेळ केला. पहिल्या गेममध्ये आघाडीनंतर गेमच्या मध्याला एका गुणाने मागे पडल्यानंतरही उत्तरार्धात मिथुनने आक्रमक खेळ करताना प्रियांशुवर दडपण आणले आणि पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममधील मिथुनचे वर्चस्व लक्षणीय होते. मिथुनच्या वेगवान आणि आक्रमक फटक्यांना प्रियांशु उत्तर देऊ शकला नाही. दुसऱ्या गेमच्या मध्यात ११-८ अशा आघाडीनंतर मिथुनने उत्तरार्धात प्रियांशुला केवळ तीनच गुणांची कमाई करून दिली यावरूनच त्याच्या एकतर्फी वर्चस्वाची कल्पना येते.
महिला एकेरीत अनुपमाने १ तास १८ मिनिटांच्या कडव्या प्रतिकारानंतर सामना जिंकला. फटक्यांवर राखलेले अचूक नियंत्रण आणि फटक्यांची अचूक दिशा ही अनुपमाच्या खेळाची ताकद ठरली. या जोरावरच पहिली गेम गमावल्यानंतरही अनुपमाने विजेतेपद मिळवले. तिसऱ्या निर्णायक गेमला मात्र आकर्षिने अगदी अखेरच्या टप्प्यात आपला खेळ उंचावल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली होती. त्यामुळे ४-२, १०-६, ११-६, १५-१० अशा आघाडीनंतरही आकर्षिने सलग पाच गुण घेत पिछाडी भरून काढत १९व्या गुणाला बरोबरी साधून एकवेळ २०-१९ अशी आघाडी घेतली. मात्र, मॅचपॉइंट साधण्यात आकर्षिला अपयश आले. निर्णायक क्षणी सामना पुन्हा २०-२० असा बरोबरीत आला. यावेळी अनुपमाने संयमाने दोन गुण मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मिश्र दुहेरीत हेमनागेंद्र बाबू आणि कनिका कन्वल या रेल्वेच्या जोडीने तेलंगणाच्या सिद्धार्थ एलान्गो आणि दिल्लीच्या खुशी गुप्ता जोडीचा
२१-१७, २१-१६ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. महिला दुहेरीत अव्वल मानांकित केरळची ट्रिसा जॉली आणि तेलंगणाच्या गायत्री गोपीचंद जोडीने दिल्लीच्या काव्या गुप्ता-दीपशिखा सिंगला संधीच मिळू दिली नाही. ट्रिसा-गायत्रीने २१-१०, २१-९ अशी अंतिम लढत सहज जिंकली. पुरुष दुहेरीत कर्नाटकच्या कुशल-प्रकाश राज जोडीने महाराष्ट्राच्या दीप रामभिया-अक्षन शेट्टी जोडीचे आव्हान ८-२१, २१-१९, २१-८ असे संपुष्टात आणले.
झळांचा कहर! फेब्रुवारी २०२३ ठरला १२२ वर्षांमधला सर्वात उष्ण महिना
फेब्रुवारी २०२३ हा मगाच्या १२२ वर्षांमधला सर्वात उष्ण महिना ठरला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये अंगाची लाही होऊ लागलीच होती. फेब्रुवारी महिन्यातच एप्रिल-मे सारखं वातावरण जाणवत होतंच अशात आता IMD ने दिलेल्या महितीनुसार १२२ वर्षांमध्ये हा सर्वात उष्ण महिना ठरला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९०१ नंतर फेब्रुवारीत पहिल्यांदाच पारा इतका वाढला की १२२ वर्षात हा महिना इतका उष्ण ठरला आहे. १९८१ ते २०१० या कालावधीत वाढलेलं तापमान हे सर्वसाधारण होतं.
देशाच्या अनेक भागांमध्ये अधिक तीव्रतेच्या तापमानाची नोंद होते आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जेवढं तापमान असते ते तापमान फेब्रुवारीतच वाढल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही पाच दिवसांपूर्वी हेदेखील हवामान विभागाने हे स्पष्ट केलं होतं की पुढील पाच दिवसांमध्ये वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान हे तीन ते पाच अंशांनी जास्त असणार आहे. पाच दिवसांपूर्वी हा इशारा दिलेला असतानाच आता ही माहिती समोर आली आहे.
१९८१ ते २०२० या तीस वर्षांच्या कालावधीत फेब्रुवारी महिन्यात भारतात तापमान किती होते? याच्या तपशीलावर नजर मारली असता असे निदर्शनास येते की मागचे तीस वर्ष फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान हे २८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहत होते. तर किमान तापमान हे १५ अंशांच्या आसपास राहायचे. ही आकडेवारी आतापर्यंत सामान्य मानली जात होती. अर्थात प्रत्येक प्रदेशानुसार या आकडेवारीत थोडेफार बदल व्हायचे. वायव्य, पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये सामान्य तापमान अधिक असते.
Lionel Messi ने जिंकला Fifa सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब: Kylian Mbappe चा पराभव करत रोनाल्डोच्या विक्रमाची केली बरोबरी
अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू आणि विश्वचषक विजेता लिओनेल मेस्सीला फिफाचा पुरुष गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब मिळाला आहे. त्याचबरोबर महिला गटात स्पेनच्या अलेक्सिया पुटेलासने ही कामगिरी केली. पुटेलासने २०२२ मध्ये बॅलन डी’ओर जिंकला.
पॅरिसमधील सल्ले येथे झालेल्या समारंभात मेस्सी म्हणाला की, ”एवढ्या मोठ्या संघर्षानंतर त्यामागे जाऊन आणि खूप मेहनत घेतल्यानंतर माझे स्वप्न पूर्ण करणे, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” मात्र, फ्रान्सच्या एम्बाप्पेलाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र मेस्सीने त्याला येथेही हरवून हा पुरस्कार पटकावला. सर्वोत्तम खेळाडूसाठी मेस्सीला एम्बाप्पेपेक्षा सर्वाधिक मते मिळाली.
यादरम्यान मेस्सी म्हणाला की, ”ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात सुंदर गोष्ट आहे. हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि फार कमी लोक ते पूर्ण करू शकतात. मी हे करू शकलो, त्यासाठी देवाचे आभार.” मेस्सीचा देशबांधव लिओनेल स्कालोनी याने वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक आणि एमिलियानो मार्टिनेझने वर्षातील सर्वोत्तम गोलकीपरचा पुरस्कार जिंकला. त्यांच्या समर्थकांना सर्वोत्कृष्ट चाहत्यांचा पुरस्कार देखील मिळाला, तर इंग्लंडला महिला युरो २०२२ चषकाने पुरस्कृत करण्यात आले.
राष्ट्रीय संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या जागतिक पॅनेलद्वारे, फिफाच्या २११ सदस्य देशांपैकी प्रत्येकी निवडलेल्या पत्रकारांनी आणि ऑनलाइन चाहत्यांनी केलेल्या मतदानाद्वारे तीन खेळाडूंची अंतिम निवड करण्यात आली होती. ३५ वर्षीय मेस्सीने फिफाद्वारे विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या गोल्डन बॉल ट्रॉफीच्या शर्यतीत एम्बाप्पेचा पराभव केला.
“अंबानी कुटुंबीयांना विदेशातही Z+ सुरक्षा द्या, या सुरक्षेचा खर्च…”, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश
जगातील सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत नुकतेच गौतम अदाणींना मागे टाकत मुकेश अंबानींनी अव्वल स्थान पटकाववंल आहे. त्यामुळे साहजिकच मुकेश अंबानी हे देशातील एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या एका आदेशाला आव्हान देणाऱ्या अर्जावरील सुनावणीदरम्यान यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार मुकेश अंबानी यांना फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच नाही, तर जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा दिली जावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय - मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांची तीन मुलं आकाश, अनंत आणि इशा यांना आलेल्या धमकी प्रकरणातील मूळ कागदपत्र आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश नुकतेच त्रिपुरा उच्च न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. या प्रकरणी केंद्राकडून विशेष सुट्टीकालीन याचिकाही करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने त्रिपुरा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण निकाली काढत याबाबत अंतिम आदेश दिले आहेत.
काय आहेत आदेश - न्यायालयाने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना देशातील सर्वोच्च दर्जाची अर्थात Z+ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, ही सुरक्षा फक्त मुंबईपुरतीच मर्यादीत न ठेवता भारतभर आणि जगात सगळीकडे पुरवण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रात ही सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, तर भारतभर आणि जगात जिथे जिथे ते जातील, त्या सर्व ठिकाणी ती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची असेल, असंही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
खर्च कोण करणार - फक्त मुंबईपुरती सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी कमी खर्चिक असली, तरी जगभरात सर्वोच्च दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा खर्च मोठा आहे. मात्र, हा खर्च अंबानी कुटुंबीय करतील, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा पूर्ण खर्च हा तेच करणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
PLI Scheme: लेऑफचे काय घेऊन बसलात ? सरकारच्या ‘या’ स्कीममुळे Apple ने भारतात निर्माण केल्या तब्बल १ लाख नोकऱ्या, जाणून घ्या
Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय हे अमेरिकेमध्ये असून, सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत या कंपनीमधून हजारो कमर्चाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. मात्र टेक्नॉलॉजी कंपनी असणाऱ्या Apple ने भारतामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.
Apple ने भारतामध्ये गेल्या १९ महिन्यांमध्ये तब्बल १ लाख नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. यानंतर ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामध्ये ब्ल्यू कॉलर जॉबची सर्वात मोठी निर्माती बनली आहे. भारतातील एक लाख नोकऱ्या या Apple च्या भारतातील प्रमुख विक्रेते आणि त्यांच्या पुरवठादारांनी निर्माण केल्या आहेत. एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.
चालू घडामोडी आणि दिनविशेष - 01 मार्च 2023
लीग चषक फुटबॉल - चेल्सीवर मात करत लिव्हरपूल अजिंक्य :
इंग्लंडमधील बलाढय़ संघ लिव्हरपूलला लीग चषक फुटबॉलमधील दशकभरापासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश आले. त्यांनी रविवारी रात्री झालेल्या अंतिम सामन्यात चेल्सीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ११-१० अशी सरशी साधत लीग चषकावर आपले नाव कोरले.
लंडनमधील वेम्बी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ९० मिनिटे आणि त्यानंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळानंतरही लिव्हरपूल व चेल्सीमध्ये गोलशून्य बरोबरी होती. विजेता ठरवण्यासाठी झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये दोन्ही संघांना पहिल्या प्रत्येकी १० पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतरण करण्यात यश आले. त्यानंतर ११वी पेनल्टी मारण्याची संधी दोन्ही संघांच्या गोलरक्षकांना मिळाली.
क्वीमहन केलेहरने चेंडू गोलजाळय़ात मारत लिव्हरपूलला ११-१० अशी आघाडी मिळवून दिली. मग चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाला गोल करता आला नाही आणि लिव्हरपूलने सामन्यात बाजी मारली.
आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवेवरील स्थगितीला मुदतवाढ :
नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या उड्डाणावर असलेल्या स्थगितीची मुदत ‘पुढील आदेशापर्यंत’ वाढवण्यात आली असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सोमवारी सांगितले. यापूर्वी १९ जानेवारीला या स्थगितीला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
करोना महासाथीच्या फैलावानंतर भारतात २३ मार्च २०२० पासून नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित करण्यात आली आहे. तथापि, काही देशांसोबत करण्यात आलेल्या करारानुसार (एअर बबल अरेंजमेंट) भारत आणि सुमारे ४५ देशांदरम्यान जुलै २०२० पासून विशेष प्रवासी सेवांचे संचालन होत आहे.
‘भारतातून जाणाऱ्या व भारतात येणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवांवरील स्थगितीची मुदत पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहतूक विमान सेवा आणि डीजीसीएने खास करून मंजुरी दिलेल्या उड्डाणांना लागू होणार नाहीत’, अ्से डीजीसीएने सोमवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे.
एअर बबल व्यवस्थेंतर्गतच्या विमानोड्डाणांवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०२१ पासून भारत नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा पुन्हा सुरू करेल, असे डीजीसीएने २६ नोव्हेंबर २०२१ ला जाहीर केले होते.
दुसऱ्याच दिवशी, करोनाच्या ओमायक्रॉन या उपप्रकाराच्या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय व डीजीसीए यांना केले होते. यानंतर, या विमानसेवेवरील स्थगिती किती काळ कायम राहील याचा उल्लेख न करता डीजीसीएने १ डिसेंबर २०२१ रोजी आपला २६ नोव्हेंबरचा निर्णय फिरवला होता.
युद्धादरम्यान युक्रेनमध्ये निर्माण झालं दुसरं मोठं संकट ; WHO ने देखील व्यक्त केली भीती :
युक्रेनमध्ये युद्धादरम्यान एक नव संकट निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा दिला आहे की, कीव्हसह इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमध्ये ६०० रुग्णालये आहेत. तेथे अजूनही १७०० करोनाचे रुग्ण दाखल आहेत.
डब्ल्यूएचओने आपल्या असेही म्हटले आहे की, करोना रुग्णांव्यतिरिक्त युक्रेनमधील नवजात, गर्भवती महिला आणि वृद्धांनाही वेळोवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते. युद्धाच्या काळात लोकांच्या मनस्थितीवर परिणाम झाल्याने परिस्थितीही चिंताजनक बनली आहे.
कठीण परिस्थितीमुळे तेथील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जवळपास संपला आहे. ऑक्सिजन जनरेटर प्लांटमधून हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत.
रशियाने युक्रेनवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा आजचा पाचवा दिवस आहे. देशभरात आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णालयांवर म्हणजेच आरोग्य सेवांवरही गंभीर संकट निर्माण झाले आहे. तसेच रुग्णवाहिकेतून रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना त्यांच्यावर गोळीबार होण्याचा धोकाही वाढला आहे.
“मंगळावर अडकलात तरी परत आणू!”; ‘ऑपरेशन गंगा’त सामील असलेल्या मंत्र्यांनी केलं मोदी सरकारचं कौतुक :
रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.
केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सिंग पुढे म्हणाले, तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी याबाबतीत दूरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं.
रशियन युद्धनौकेला आव्हान देणारे ते १३ सैनिक जिवंत; युक्रेनच्या नौदलानेच दिली माहिती :
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पहिल्याच दिवशी युक्रेनच्या ताब्यातील स्नेक बेटावरील संघर्षामध्ये १३ युक्रेनियन सैनिक शहीद झाल्याचं वृत्त युक्रेन नौदलाने फेटाळून लावलंय. हे सैनिक जिवंत असल्याची माहिती नौदलाने दिलीय.
बॉर्डर गार्ड म्हणून या छोट्याश्या बेटावर तैनात असणाऱ्या १३ सैनिकांना मृत्यूनंतर योग्य तो सन्मान दिला जाईल असं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भाषणात म्हटलं होतं. या सैनिकांनी रशियन नौदलाच्या जहाजाला नरकात जा असं सांगितल्याचं ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये आढळून आलेलं.
युक्रेनचं म्हणणं काय - रशियाने या बेटावरील सैनिक शरण आल्याचे म्हटलंय. युक्रेन नौदलाच्या फेसबुक पोस्टमध्ये, “आमचे सहकारी आमच्या सोबत असून ते सुरक्षित आहेत.” आमच्या या सहकाऱ्यांनी दोन वेळा रशियन नौदलाला यशस्वीपणे टक्कर दिली. मात्र नंतर दारुगोळा संपल्याने त्यांना संघर्ष करता आला नाही, असं युक्रेन नौदलाने स्पष्ट केलंय. रशियन नौदलाने या बेटावरील सर्व बांधकाम उद्धवस्त केलंय. यामध्ये दीपस्तंभ, इमारती, संदेश वहनसाठी वापरले जाणारे टॉवर आणि इतर सर्व यंत्रणा रशियन फौजांकडून नष्ट करण्यात आलीय.
भारतीयांना परत आणण्यासाठी चार मंत्री पाठविणार :
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अद्याप अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीयांच्या देशात स्थलांतराच्या प्रक्रियेच्या समन्वयासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शदे, किरेन रिजिजू आणि व्ही.के. सिंह हे चार केंद्रीय मंत्री भारताचे ‘विशेष दूत’ म्हणून जाणार असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले.
शिंदे हे रुमानिया व मोल्दोवातून होणाऱ्या स्थलांतराच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवतील, तर रिजिजू हे स्लोव्हाकिया येथे तळ ठोकतील. पुरी हे हंगेरीला जातील, तर पोलंडमधील व्यवस्थेची जबाबदारी व्ही.के. सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
स्थलांतर मोहिमेचा भाग म्हणून आतापर्यंत १३९६ भारतीय नागरिकांना सहा विमानांतून देशात परत आणण्यात आले असून, भारताने या महिन्यात यापूर्वी पहिली सूचनावली जारी केल्यापासून युक्रेनमधून बाहेर पडलेल्या भारतीयांची एकूण संख्या सुमारे ८००० झाली आहे, भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यास आणि त्यांना परत आणण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.