चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ मार्च २०२१

Date : 1 March, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
एकापाठोपाठ १९ उपग्रह अवकाशात :
  • ध्रुवीय प्रक्षेपकाच्या मदतीने ब्राझीलचा ‘अ‍ॅमेझॉनिया १’ हा उपग्रह व इतर १८ उपग्रह रविवारी सकाळी यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे  या वर्षांतील हे पहिले प्रक्षेपण होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोलसेनारो यांचे त्यांच्या  देशाचा उपग्रह यशस्वीरित्या सोडण्यात आल्याबाबत अभिनंदन केले आहे.

  • पीएसएलव्ही सी ५१ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाचे उड्डाण सकाळी १०.५४ वाजता सतीश धवन अवकाश केंद्राच्या पहिल्या तळावरून करण्यात आले. अ‍ॅमेझॉनिया हा उपग्रह उड्डाणानंतर सतरा मिनिटांनी कक्षेत स्थापित झाला. दीड तासाने इतर उपग्रह कक्षेत सोडले गेले, त्यात चेन्नईच्या ‘स्पेस किड्स इंडिया’ या संस्थेचा उपग्रह असून त्याचे नाव ‘सतीश धवन उपग्रह’ असे आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र कोरलेले आहे.

  • एका पाठोपाठ एक असे इतर १८ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी मोहीम यशस्वी झाल्याचे जाहीर केले व सर्व १९ उपग्रह कक्षेत प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट केले.

सैन्य भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक; परीक्षा रद्द :
  • सैन्य भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक झाल्यानंतर रविवारी देशभरात विविध ठिकाणी होणारी ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या माहिती आधारे शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पुणे मुख्यालयातील दक्षिणी कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स युनिट आणि पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाने संयुक्त कारवाई केली.

  • या कारवाईत विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला होता, ज्यात सैनिक (जनरल ड्युटी) भरतीसाठी कॉमन एन्ट्रन्स परीक्षेची (सीईई) प्रश्नपत्रिका प्राप्त झाली, अशी माहिती सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

  • प्राप्त झालेली प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात नियोजित परीक्षेची असल्याची पुष्टी मिळाल्यानंतर लष्कराच्या अधिकार्‍यांनी परीक्षा रद्द केली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. भरती प्रक्रियेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या जातील, असेही ते म्हणाले.

  • याप्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत लष्कराच्या माजी सैनिकाला आणि दोन नागरिकांना अटक केली आहे. पेपर कसे लीक झाले आणि संशयित ते कसे वितरीत करीत होते याचा शोध घेण्यात येत आहे. सध्या सेवेत असणाऱ्या जवानांच्या संभाव्य सहभागाचीही चौकशी केली जात आहे.

‘मन की बात’ मध्ये मोदींनी केली या विषयांवर चर्चा :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सकाळी ११ वाजता आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ७४ व्या भागात देशाला संबोधित केले. या महिन्याच्या सुरूवातीलाच पंतप्रधानांनी देशातील लोकांना कला, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रातील प्रेरणादायी कथा सुचविण्यासाठी सांगितले होते.

  • जानेवारीच्या ‘मन की बात’मध्ये प्रेरणादायक उदाहरणांच्या माध्यमातून कला, संस्कृती, पर्यटन आणि शेतीविषयक विविध नाविन्यपूर्ण विषयांवर त्यांनी प्रकाश टाकला होता. कार्यक्रमाच्या मागील भागात मोदींनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय राजधानीत शेतकरी आणि दिल्ली पोलिस यांच्यात झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला होता.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ भाषण दरम्यान जलसंधारणाचे महत्त्व यावर जोर दिला. जल शक्ती मंत्रालय लवकरच ‘कॅच द रेन’ नावाची जलसंधारण मोहीम राबवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

  • “जलसंधारणाबाबतची आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. काही दिवसात जलशक्ती मंत्रालय ‘कॅच द रेन’ ही मोहीम राबवेल. त्याचा नारा म्हणजे ‘कधीही आणि कुठेही पाऊस पडो, कॅच द रेन’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

इस्रोची २०२१ मधली पहिली कामगिरी यशस्वी :
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२१ मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) येथून हे प्रक्षेपण झाले. चेन्नईपासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेट ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या अमेझोनिया -१ उपग्रहाचे प्रक्षेपण करत आहे.

  • या उपग्रहाला सतीश धवन उपग्रह किंवा एसडी सॅट असे नाव देण्यात आले असून ते २५,००० लोकांची नावे अंतराळात पाठवणार आहे. नॅनो सॅटेलाइटमध्ये भगवतगीतेची एक प्रत एसडी कार्डच्या रूपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले असून हा त्यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे.

  • इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत. पीएसएलव्ही-सी ५१ रॉकेट हे पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) चे ५३ वे मिशन आहे, यात ब्राझीलचा अॅमेझोनिया -१ हा प्राथमिक उपग्रह आहे आणि इतर १८ पेलोड आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या पहिल्या लॉन्चपॅडवरून हे प्रक्षेपित करण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांना ऊर्जा क्षेत्रातील पुरस्कार :
  • पुढील आठवड्यातील एका परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हॉयर्नमेंट लीडरशिप’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी हे ‘सेरावीक परिषद २०२१’ मध्ये बीजभाषण करणार असून १ ते ५ दरम्यान ही परिषद ऑनलाइन घेण्यात येणार आहे, असे आयएचएस मर्किट या संस्थेने म्हटले आहे.

  • या परिषदेत अमेरिकेचे ऊर्जा दूत जॉन केरी, बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सहसंस्थापक बिल गेट्स, अरम्को या सौदी अरेबियातील ऊर्जा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासेर  सहभागी होणार आहेत.

  • आयएचएस मार्किटचे उपाध्यक्ष व परिषदेचे अध्यक्ष डॅनियल येरगिन यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात आहोत. भारत हा जगातील मोठा लोकशाही देश असून सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हॉयर्नमेंट लीडरशिप पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आम्हाला आनंदच आहे.

  • शाश्वत विकास व ऊर्जेच्या गरजा यात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. आर्थिक वाढ, दारिद्र्य निर्मूलन व नवीन ऊर्जा भवितव्य यात भारताने जागतिक पातळीवर काम केले असून ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रातही चांगली भूमिका पार पाडली आहे. उद्योग धुरीण, देशांचे नेते,धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार आहेत. जगाला  नवीन ऊर्जा तंत्रज्ञानाची गरज असून त्यासाठी औद्योगिक क्षेत्राने पुढे येण्याची गरज आहे.

विनेश फोगटला सुवर्णपदक :
  • करोना साथीच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने झोकात पुनरागमन केले आहे. रविवारी विनेशने २०१७च्या विश्वविजेत्या व्ही. कॅलाडझिन्स्कायला नामोहरम करून कीव्ह आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पध्रेचे सुवर्णपदक जिंकले.

  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या विनेशला ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या बेलारूसच्या कॅलाडझिन्स्कायने तोलामोलाची लढत दिली. विनेशने सुरुवातीला ४-० अशी आघाडी घेतली.

  • मग कॅलाडझिन्स्कायने ४-४ अशी बरोबरी साधली. मग विनेशने पुन्हा ६-४ अशी आघाडी घेतली. कॅलाडझिन्स्कायने दडपण वाढवत चार गुणांची कमाई करीत पुन्हा आगेकूच केली. पण विनेशने चार गुणांची कमाई करीत १०-८ अशा फरकाने लढतीवर वर्चस्व गाजवले.

०१ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.