भारताचीच मक्तेदारी; नऊ पर्वात आठव्यांदा आशियाई कबड्डी स्पर्धेचे जेतेपद
- भारतीय संघाने कबड्डीतील मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. कोरियातील बुसान येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी भारतीय पुरुष संघाने कडवी झुंज देणाऱ्या इराणला ४२-३२ अशा फरकाने पराभूत केले. भारताने नऊ पर्वात आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली.भारतीय संघाने या स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना आपले पाचही साखळी सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आणि अंतिम फेरीत इराणचे आव्हान परतवून लावले.
- अंतिम लढतीत भारताने दमदार सुरुवात केली. दहाव्या मिनिटाला भारताने इराणवर लोण दिला. कर्णधार पवन सेहरावतने खोलवर चढाई करताना इराणच्या दोन खेळाडूंना बाद करत भारताला १०-४ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आणखी एक लोण चढवताना भारताने मध्यंतरापर्यंत आघाडी २३-११ अशी वाढवली.
- उत्तरार्धात अपेक्षेप्रमाणे इराणने खेळ उंचावला. मात्र, भारतानेही वेगवान खेळ सुरू ठेवताना पुन्हा इराणवर लोण देत ३३-१४ अशी आघाडी भक्कम केली. यानंतर मात्र इराणने पुनरागमन केले. दोन मिनिटे शिल्लक असताना इराणने भारताची आघाडी ३८-३१ अशी कमी केली. त्या वेळी केवळ अस्लम इनामदार मॅटवर शिल्लक होता. परंतु इराणचा कर्णधार मोहम्मदरेझा शाबलोउई चियानेला अस्लमला बाद करण्यात अपयश आल्याने भारताला ‘सुपर टॅकल’चे तीन गुण मिळाले. त्यामुळे भारताचा विजय सुनिश्चित झाला.
राज्य परीक्षा परिषदेचे राज्य मंडळात स्थलांतर
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेचे कार्यालय राज्य मंडळात तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले असून, नव्या इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत परीक्षा परिषद राज्य मंडळातून चालवली जाणार आहे.
- पुण्यातील डॉ. आंबेडकर रस्ता येथील लाल देवळासमोर राज्य परीक्षा परिषदेचे कार्यालय आहे. परीक्षा परिषदेतर्फे विभागीय परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आदींचे आयोजन केले जाते. परीक्षा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे.
- त्यामुळे परीक्षा परिषदेचे प्रशासकीय कार्यालय शिवाजीगर येथील आगरकर रस्ता येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्य मंडळात असलेल्या कार्यालयातून परीक्षा परिषदेचे नियमित कामकाज सुरू राहील, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.
युक्रेन प्रश्नासह द्विपक्षीय सहकार्यावर मोदी-पुतिन चर्चा, 4 जुलै रोजी शांघाय सहकार्य संघटनेची परिषद
- रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरध्वनीवरून संवाद साधला. यात उभय देशांची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याविषयी सकारात्मक चर्चा झाली, तसेच युक्रेन पेचावरही विचारविनिमय झाला, असे रशिया सरकारतर्फे सांगण्यात आले.
- येत्या ४ जुलै रोजी शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) आभासी शिखर परिषद होणार असून त्याचे यजमानपद भारताकडे आहे. त्याआधी पुतिन आणि मोदी यांच्यात ही चर्चा झाली.क्रेमलिनतर्फे सांगण्यात आले की, ही चर्चा सकारात्मक आणि अर्थपूर्ण ठरली. द्विपक्षीय धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच उभय बाजूने संपर्क वाढविण्यावर चर्चेत भर देण्यात आला. युक्रेनसभोवतालच्या प्रदेशांतील स्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. विशेष लष्करी क्षेत्रातील सद्यस्थितीची माहिती पुतिन यांनी मोदी यांना दिली. हा पेच राजनैतिक आणि राजकीय चर्चेतून सोडविण्यास युक्रेनने साफ नकार दिला आहे, असे त्यांनी मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले, असे क्रेमलिनच्या निवेदनात म्हटले आहे.
- हे युद्ध गतवर्षीच्या फेब्रुवारीपासून सुरू आहे. रशियाने युक्रेवर केलेल्या चढाईचा भारताने अद्याप निषेध केलेला नाही. हा प्रश्न चर्चेतून राजनैतिक मार्गाने सोडविला पाहिजे, अशी भारताची दीर्घकाळपासूनची भूमिका आहे.शांघाय सहकार्य संघटना तसेच जी २० परिषदांमधील सहकार्याबाबतही उभय नेत्यांनी संवाद साधला.
श्रेणीसुधार परीक्षा ‘आयआयटी’, ‘एनआयटी’ प्रवेश मुदतीनंतर राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांसमोर पेच
- दर्जेदार अभियांत्रिकीच्या शिक्षणास प्रवेश मिळविण्यासाठी घेतलेल्या संयुक्त पात्रता परीक्षा, आयआयटी आणि एनआयटी प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेले परंतु बारावी परीक्षेत मात्र निकषाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यात दोन हजारांहून अधिक आहेत. या विद्यार्थ्यांच्या श्रेणीसुधार परीक्षा ऑगस्टमध्ये होणार असून, तत्पूर्वीच आयआयटी व एनआयटीचे प्रवेश बंद होत असल्याने अशा विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
- कोविडच्या काळात आयआयटी, एनआयटी व तत्सम महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी बारावीच्या गुणांची ७५ टक्क्यांची अट शिथिल करण्यात आली होती. या वर्षी ती पुन्हा लागू करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी बारावीची परीक्षा दिलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली. त्यात त्यांना प्रवेशाला लागणारे गुण मिळालेले आहेत. मात्र, बारावीची परीक्षा पूर्वी दिलेले व त्यात ७५ टक्के गुण नसल्यामुळे शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. या वर्षी बारावीची परीक्षा देऊन जेईईची परीक्षा देणारेही शेकडो विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी श्रेणीसुधार परीक्षा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने १० ते १८ ऑगस्ट दरम्यान घेतली जाणार आहे. त्यानंतर या परीक्षेचा निकाल लागेल. मात्र आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी ६ ऑगस्ट ही शेवटची तारीख असेल. त्यापूर्वी श्रेणीसुधार परीक्षा होत नसल्यामुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.
- गतवर्षी बारावीची परीक्षा दिलेले शेकडो विद्यार्थी आहेत. या वर्षी त्यांनी केवळ जेईईची तयारी करून परीक्षा दिली आहे. ज्यात आयआयटी, एनआयटी प्रवेशास ते पात्र आहेत; मात्र बारावीला कमी गुण असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तातडीची परीक्षा घेण्याची योजना केली, तर शेकडो विद्यार्थी आयआयटी, एनआयटी प्रवेशास पात्र ठरतील.-सचिन बांगड, समुपदेशक, अॅडमिशन मेक इझी, लातूर महाराष्ट्रातील एनआयटी, आयआयटी प्रवेशास पात्र होण्यासाठीचे गुण घेतलेले शेकडो विद्यार्थी आहेत. त्यांची ६ ऑगस्टपूर्वीच महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने तातडीची परीक्षा घेतली व निकाल लावून प्रवेशाची संधी दिली, तर राज्यातील शेकडो विद्यार्थी एनआयटी व आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरतील. –योगेश गुट्टे, ,समुपदेशक, व्हीजन करिअर कौन्सिलिंग सेंटर, लातूर.
भारतीय कबड्डी संघाने जिंकले सुवर्णपदक! इराणला धोबीपछाड देत बनला आशीयाई चॅम्पियन
- कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा ४२-३२ असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. याआधीही अशी अप्रतिम कामगिरी केली असून भारताचे हे नऊ आवृत्त्यांमध्ये आठवे विजेतेपद ठरले आहे.
- भारतीय कर्णधार पवन सेहरावतने सुपर १० बरोबर आघाडी केली. सामन्याच्या सुरुवातीच्या पाच मिनिटांत भारतीय पुरुष कबड्डी संघ इराणविरुद्ध गारद झाला. मात्र, खेळाच्या १०व्या मिनिटाला बचावाच्या काही टॅकल पॉइंट्स आणि पवन सेहरावत आणि अस्लम इनामदार यांच्या यशस्वी चढाईनंतर इराणला ऑलआऊट करण्यात टीम इंडियाला यश आले. इराणच्या मोहम्मदने भारताच्या अर्जुन देश्वालच्या काही चढाया अपयशी ठरल्यानंतर त्यांच्या संघासाठी खाते उघडले. मात्र, अखेर भारतीय संघाचा खेळाडू अर्जुनने पहिला गुण मिळवून दिला. ३-३ अशी गुणसंख्या असताना सामना अटीतटीचाच वाटत होता, पण सामन्यात नितेशची मजबूत पकड अन् पवन शेहरावतच्या जबरदस्त चढायांच्या जोरावर भारताने १०-४ अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिले नाही. नितिन रावतनेही चांगल्या कामगिरी केली. पहिल्या हाफमध्ये भारताने २३-११ अशी आघाडी मजबूत केली होती.
- या हाय-व्होल्टेज फायनलमध्ये भारताने पहिल्या हाफमध्ये २३-११ असे वर्चस्व राखले. पण नंतर कर्णधार मोहम्मदरेझा शादलुई छायानेहच्या सुरेख खेळामुळे इराणने उत्तरार्धात उत्तेजित पुनरागमन केले आणि हे अंतर बरेच कमी केले. दुसऱ्या सत्रात इराणकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. ३३-१४ अशा पिछाडीवर असलेल्या इराणने सामना ३८-३० असा चुरशीचा बनवला. त्या सत्रात भारताला केवळ पाच गुण मिळवता आले, पण दुसऱ्या बाजूला इराणने १६ गुणांची कमाई केली करत सामन्यात रोमांचकता आणली. शेवटच्या टप्प्यात भारताच्या खेळाडूंनी दमदार खेळ करत ४२-३२ असा रोमहर्षक विजय निश्चित केला.
- मात्र, शदालुईची शेवटच्या क्षणी झालेली चूक भारताला कोणत्याही अडचणीशिवाय विजेतेपद मिळवून देऊ शकली. पिचादिवरून आघाडी घेत भारतीय कबड्डी संघाचा स्टार कर्णधार पवन सेहरावतने विरोधी संघाकडून विजय खेचून आणला. त्यानेच सर्वाधिक गुण मिळवले आणि विजयात मोलाची भूमिका बजावली.