चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ जुलै २०२१

Date : 1 July, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
छोट्या बचत योजना, पीपीएफच्या व्याजदरासंबंधी केंद्राचा मोठा निर्णय :
  • छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे बचत योजनांवरील व्याजदर दुसऱ्या तिमाहीत जैसे थे राहणार आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच छोट्या बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाकडून मागे घेण्यात आल्यानंतर आता ही घोषणा करण्यात आली आहे.

  • नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून छोट्या बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र नंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असं स्पष्ट केलं होतं.

  • दरम्यान सरकारने सर्वसामान्यांची पसंती असणाऱ्या छोट्या बचत योजनांच्या व्याजरादत कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला असून बँक डिपॉझिट रेटच्या तुलनेत जास्त परतावा मिळणार आहे.

राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रवीणसिंह परदेशींना मंत्रालयात नियुक्ती :

१. १९८५च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांना मंत्रालयातील मराठी भाषा विभागामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

२. रणजित कुमार (२००८) यांची मंत्रालयातील आयटी विभागाच्या संचालक पदावरून मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली आहे.

३. व्ही. पी. फड (२०११) यांची उस्मानाबादच्या सीईओ पदावरून मराठवाडा स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य सचिव पदावर बदली करण्यात आली आहे.

४. पंकज आशिया (२०१६) यांची भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदावरून जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली करण्यात आली आहे.

५. राहुल गुप्ता (२०१७) यांची गडचिरोली अहेरीतल्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि सहय्यक जिल्हाधिकारी यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर बदली करण्यात आली आहे.

६. मंनुज जिंदाल (२०१७) गडचिरोली भामरागडच्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि अटापल्ली सबडिव्हिजनचे सहाय्यक जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांची जालना जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून बदली करण्यात आली आहे.

७. मिताली सेठी (२०१७) यांची अमरावती धेरणीच्या आयटीडीपीचे प्रकल्प अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर बदली करण्यात आली आहे.

‘भारत नेट’ योजनेंतर्गत गावागावांमध्ये इंटरनेट :
  • १६ राज्यांमधील ३ लाख ६१ हजार गावांमध्ये इंटरनेट ब्रॉडबॅण्डची सुविधा पोहोचवण्यासाठी १९ हजार कोटी तर, वीज वितरण क्षेत्रातील सुधारणांसाठी ३ लाख कोटींच्या खर्चाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या शिवाय, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या अन्य योजनांवरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

  • गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ६ लाख गावे १ हजार दिवसांमध्ये इंटरनेटने जोडली जातील अशी घोषणा केली होती.

  • गरीब कल्याण धान्य योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनीच दोन आठवड्यांपूर्वी केली होती. त्यासाठी केंद्राने ९३ हजार कोटींची तरतूद केली असून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य पुरवले जात आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या १.१० लाख कोटींच्या कर्जहमी योजनेलाही मंजुरी देण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण ६.२८ लाख कोटींच्या योजना जाहीर केल्या होत्या.

  • वीज वितरण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्राने राज्यांना आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. वीज ऊर्जा क्षेत्रासाठी ३.०३ लाख कोटींना मंजुरी देण्यात आली. मोठ्या शहरात स्वयंचलित यंत्रणा लागू करणे, सौर ऊर्जा यंत्रणेचा विस्तार करणे, गरिबांना प्रतिदिन रिचार्ज यंत्रणा लागू करणे आदी सुधारणा केल्या जाणार आहेत.

जागतिक कसोटीच्या प्रत्येक सामन्यासाठी समान गुण :
  • जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दुसऱ्या पर्वाच्या नियमांत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक सामन्यासाठी समान गुण मिळणार आहेत. सामना जिंकल्यास १२ गुण, अनिर्णीत राहिल्यास ४ गुण, तर बरोबरीत (टाय) सुटल्यास ६ गुण संघांना मिळतील.

  • भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपासून नवी नियमावली लागू होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ऑलरडाइस यांनी जून महिन्याच्या पूर्वार्धात नियमावलीत बदलाचे संकेत दिले होते.

  • ‘‘जागतिक कसोटी स्पर्धेच्या पहिल्या पर्वात प्रत्येक मालिकेसाठी समान म्हणजे १२० गुणांचा नियम कार्यरत होता. परंतु आता मालिका दोन कसोटींची असो किंवा पाच कसोटींची प्रत्येक सामन्यासाठी कमाल १२ गुण संघाला मिळवता येतील. मग उपलब्ध सामने व गुण याच्या टक्केवारीनुसार क्रमवारी निश्चित केली जाईल,’’ असे ‘आयसीसी’च्या कार्यकारी मंडळातील सदस्याने सांगितले.

शेतकरी पुत्रास जागतिक स्तरावरील ‘चेवनिंग’ शिष्यवृत्ती :
  • नेतृत्व विकासासाठी जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित अशा ‘चेवनिंग’ शिष्यवृत्तीसाठी येथील राजू केंद्रे या सामाजिक कार्यकर्ता विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिष्यवृत्ती निवड मंडळाने राजूला शेवटचा प्रश्न विचारला, ‘तुझी या स्कॉलरशिप साठी निवड झाली नाही तर काय करशील? माझी निवड नाही झाली तरी पुढच्या १० वर्षांत १० एकलव्य चेवनिंग स्कालर्स असतील’, असे उत्तर त्याने दिले आणि जगभरातील १६० देशातील एक हजार ३५० विद्यार्थ्यांमधून राजूची निवड झाली.

  • फॉरेन कॉमनवेल्थ विभागाच्या वतीने दिली जाणारी चेवनिंग शिष्यवृत्ती ब्रिटिश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील महत्त्वाची आणि मानाची समजली जाते. जवळपास ४५ लाख रुपयांची ही शिष्यवृत्ती असून इंग्लंडमध्ये शिकायला लागणारा सर्व खर्च पुरवते. या शिष्यवृत्तीसाठी १६० देशांमधील ६३ हजार अर्ज आले होते. त्यातील पाच हजार विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्यानंतर मुख्य मुलाखत दिली. त्यातून  एक हजार ३५० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीकरिता अंतिम निवड झाली.

  • मंगळवारी राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे याला ही शिष्यवृत्ती जाहीर झाली. बुलढाणा जिल्ह्यतील लोणार तालुक्यातील पिंप्री (खंदारे) हे राजू याचे गाव आहे. तेथे त्याचे आई-वडील शेती करतात. राजू केंद्रे याने यवतमाळच्या सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत असताना ‘एकलव्य अ‍ॅकेडमी’ नावाने शैक्षणिक चळवळ सुरू केली.

  • मुख्यमंत्री फेलाशिपमध्येही त्याने यवतमाळ जिल्ह्यत अनेक पारधी बेडय़ांवर काम केले. सध्या तो यवतमाळातून एकलव्य चळवळीद्वारे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करतो. या विद्यार्थ्यांसाठी अडगळीतील पुस्तके संकलन करून ती गरजूंना देण्याचा त्याचा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांना उपयोगी पडत आहे.

०१ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.