चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ जानेवारी २०२१

Date : 1 January, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मुकेश अंबानींना मागे टाकत चीनचे बॉटल वॉटर किंग शानशान बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :
  • चीनचे के झोंग शानशान हे एक असे श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा माध्यमांमध्ये खूपच कमी प्रमाणात उल्लेख होतो. मात्र, शानशान यांनी विविध क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचं चीनमध्ये मोठ नाव आहे. हेच शानशान आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारताचे मुकेश अंबानी आणि चीनचे जैक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी हे स्थान पटकावलं आहे.

  • ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, शानशान यांची एकूण संपत्ती ७०.९ अब्ज डॉलरपासून ७७.८ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. याप्रकारे शानशान जगातील ११ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. शानशान यांनी ही संपत्ती खूपच कमी वेळेत कमावली आहे, जो स्वतःच एक विक्रम आहे. काही काळापर्यंत चीनच्या बाहेर जगात त्यांच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहिती होती.

  • ६६ वर्षीय शानशान यांचा राजकारणात हस्तक्षेप नाही त्यामुळे त्यांची ‘लोन वोल्फ’ अशीही ओळख बनली आहे. त्यांनी विविध क्षेत्रात चांगलं यश मिळवलं आहे. चीनची लस बनवणारी कंपनी बीजिंग वंताई बायोलॉजिकल फार्मेसी इंटरप्रायझेसला त्यांनी एप्रिल महिन्यांत अधिग्रहित केलं. त्यानंतर काही महिन्यांनंतर बाटलीबंद पाणी तयार करणारी कंपनी नोंग्फू स्प्रिंग देखील ताब्यात घेतली. त्यानंतर या कंपनीला त्यांनी बाजारातील मोठी कंपनी बनवलं. शेअर बाजारात नोंग्फूचे शेअर १५५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर वंताईच्या शेअरमध्ये २ हजार टक्के वाढ झालेली पहायला मिळाली.

CBSC 2021 - सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर :
  • सीबीएससी बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा ४ मे पासून घेण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं आहे. या परीक्षा १० जूनपर्यंत चालतील. १५ जुलैपर्यंत निकाल लागेल असंही त्यांनी सांगितलं. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं की सीबीएससीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखांची घोषणा ते ३१ डिसेंबरला करतील. त्यानुसार त्यांनी ही घोषणा केली आहे.

  • परीक्षेच्या तारखा समजल्याने सीबीएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरुन या तारखांची घोषणा केली आहे. याआधी जेव्हा जेव्हा त्यांनी सोशल मीडियावरुन संवाद साधला तेव्हा असे वाटले होते की ते परीक्षेच्या तारखा जाहीर करतील. मात्र त्यांनी आज तारखा जाहीर केल्या आहेत.

  • रमेश पोखरियाल यांनी पहिल्यांदा लाइव्ह सेशन घेतलं होतं तेव्हा त्यांनी जेईई परीक्षेच्या तारखांना मंजुरी दिली. त्यानंतर शेवटच्या वेबिनारच्या वेळी ते मोठी घोषणा करतील असं वाटलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर त्यांनी याबाबतची घोषणा ३१ डिसेंबरला करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता आज त्यांनी या परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.

औषध आणि काळजी हाच नववर्षांचा मंत्र :
  • देशातील करोनाबाधितांच्या संख्येत वेगाने घट होत आहे, परंतु जनतेने गाफील न राहता लस टोचून घेतल्यानंतरही कोविड-१९बाबतच्या नियमांचे, मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले. राजकोट येथील नव्या ‘एम्स’चा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. जगातील सर्वात मोठय़ा लसीकरण मोहिमेसाठी भारत सज्ज असल्याचा विश्वासही या वेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.

  • लसीबाबत अपप्रचार - यापूर्वी आपण जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत निष्काळजीपणा नाही (जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही) असे सांगत होतो, मात्र आता औषधही आणि काळजीही हा २०२१चा मंत्र असेल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले. जनतेने लसीबाबतच्या अफवा आणि निराधार दाव्यांवर विश्वास ठेवू नये, काही जणांनी लसीबाबत अपप्रचार सुरूही केला आहे, असा दावाही मोदी यांनी केला.

  • प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आहे, देशातील नवकरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये करोनाच्या प्रादुर्भावामुळे नैराश्याचे वातावरण होते, सगळीकडे संशयाचे वातावरण होते, मात्र २०२१ हे करोनावरील उपचाराचा आशेचा किरण घेऊन येत आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

  • ‘मेड इन इंडिया’ लस - भारतातील लसीकरण मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे, प्रत्येक पात्र लाभार्थ्यांला ‘मेड इन इंडिया’ लस मिळेल यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी भारत सुसज्ज आहे, अन्य देशांच्या तुलनेत करोनाची लागण आणि मृत्यू या बाबतची भारतातील स्थिती अधिक चांगली आहे कारण देशाने योग्य वेळी परिणामकारक पावले उचलली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • करोनाच्या काळात आरोग्य, कामगार, शास्त्रज्ञ आणि अन्य संबंधित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी जो त्याग केला आणि समाजाची सेवा केली त्यांच्याबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारतातील वैद्यकीय शिक्षणात सुधारणा व्हावी यासाठी आपण मोहीम हाती घेतली आहे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची स्थापना झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि प्रमाण यामध्ये सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.

आजपासून काय बदलणार :
  • नवीन धनादेश देय पद्धती : रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत. ५०,००० रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • संपर्करहित एटीएम कार्ड मर्यादा : ‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता २०२० मध्ये अंमलात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे. एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली २,००० रुपयांची मर्यादा ५,००० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

  • व्हॉट्सअ‍ॅपचे मर्यादित भ्रमणध्वनी व्यासपीठ :अ‍ॅण्ड्रॉईडच्या ओएस ४.०.३ तसेच आय फोनच्या आयओएस ९ मंच सुसज्ज असलेल्या मोबाइलवरून व्हॉट्सअ‍ॅपची सुविधा घेता येणार नाही. तसेच निवडक संख्या असलेल्या केएआय २.५.१ तंत्रज्ञानावरील फोनवरही ही संदेश वहन यंत्रणा काम करू शकणार नाही.

  • लॅण्डलाईन-मोबाइल कॉलसाठी आता शून्य : स्थिर पद्धतीच्या (लँडलाईन) दूरसंपर्क माध्यमाद्वारे भ्रमणध्वनीवर केले जाणाऱ्या कॉलसाठी आता (एसटीडीप्रमाणे) क्रमांकाआधी शून्य लावावा लागेल. यामुळे दूरसंचार क्रमांकाच्या भाऊगर्दीत सुसूत्रता येईल, असा दूरसंचार विभागाचा दावा आहे.

  • यूपीआय व्यवहार देय : यूपीआयद्वारे होणारे निधी व्यवहारांसाठी आता वाढीव किंमत मोजावी लागेल. अ‍ॅमेझॉन पे, गूगल पे, फोन पेसारख्या देय मंचावरून होणाऱ्या निधी हस्तांतरण रकमेबरोबर काही प्रमाणात शुल्क द्यावे लागेल.

  • वाहन खरेदी महागडी : प्रवासी तसेच एसयूव्ही वाहनांच्या किंमत १ जानेवारी २०२१ पासून वाढत आहेत. विदेशी विनिमय चलनातील फरक तसेच वाहनांसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांच्या किंमती अप्रत्यक्ष करामुळे वाढल्याने वाहनांच्या एकूण किंमती ३ ते ५ टक्क्य़ांपर्यंत वाढल्या आहेत. अनेक कंपन्यांची त्यांही ही दरवाढीची मात्रा १ जानेवारीपासून लागू करत असल्याचे जाहीर केले आहे.

  • एलपीजी सिलिंडर गॅस किंमत : स्वयंपाकासाठीच्या गॅस सिलिंडरच्या किंमती नव्या वर्षांच्या पहिल्या महिन्यापासून वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतीतील लक्षणीय बदलापोटी गॅस वितरक कंपन्या त्यांच्या सिलिंडरच्या किंमती सातत्याने बदलत असतात. नव्या वर्षांलाही ही परंपरा कायम राहणार आहे.

‘ईपीएफ’वरील व्याज आजपासून खात्यात :
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मिळणारे २०१९-२० साठीचे वार्षिक व्याज ८.५ टक्केच कायम राहणार आहे. हे व्याज नववर्षांपासून (१ जानेवारी २०२१) कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) ६ कोटी सदस्यांना ८.५ टक्के व्याजदर देण्याबाबतची केंद्रीय कामगार खात्याची शिफारस अर्थ विभागाने मान्य केली आहे.

  • कामगारमंत्री संतोष गंगवार हे अध्यक्ष असलेल्या संघटनेने याबाबत सर्वप्रथम मार्च २०२० मध्ये शिफारस केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये संघटनेने हे व्याज विभागून देण्याबाबतची सूचना केली होती. मात्र त्याबाबत अंमलबजावणी झाली नाही.

०१ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.