चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ डिसेंबर २०२१

Date : 1 December, 2021 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन - भारताच्या अभियानाचे नेतृत्व सिंधूकडे :
  • ‘बीडब्ल्यूएफ’ जागतिक बॅडमिंटन मालिकेच्या अंतिम टप्प्याला बुधवारपासून प्रारंभ होत असून, या स्पर्धेत भारताच्या अभियानाचे नेतृत्व पी. व्ही. सिंधूकडे आहे. याशिवाय लक्ष्य सेन तसेच पुरुष दुहेरीतील आशास्थान सात्त्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

  • भारताचे आतापर्यंतचे सर्वाधिक सात खेळाडू वर्षांअखेरच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. परंतु या स्पर्धेत २०१८मध्ये जेतेपद मिळवण्याची किमया साधणारी एकमेव भारतीय खेळाडू सिंधू उपांत्य फेरीचा अडथळा पार करून प्रतिष्ठेचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

  • अ-गटात समावेश असलेल्या सिंधूची पहिली लढत अग्रमानांकन लाभलेल्या थायलंडच्या पोर्नपावी चोचूवाँगशी होणार आहे.

  • श्रीकांतने २०१४मध्ये या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. त्याची सलामी मलेशियाच्या द्वितीय मानांकित ली झि जियाशी होणार आहे. पदार्पणवीर लक्ष्य आणि सात्त्विक-चिराग यांना खडतर गटाचे आव्हान आहे. अ-गटात लक्ष्यला ऑलिम्पिक विजेता व्हिक्टर अ‍ॅक्सेलसन, दोन वेळा विश्वविजेता केंटो मोमोटा, रॅसमस गेमके यांना सामोरे जावे लागेल.

मुंबईत शाळा १ डिसेंबरला सुरू होणार नाहीत; पुणे-नाशिकमध्येही निर्णय लांबणीवर : 
  • राज्यात गेल्या दीड वर्षाहून जास्त काळ करोनामुळे शाळा बंद आहेत. या शाळांमधील सर्व वर्ग येत्या १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार स्थानिक पातळीवर सर्व तयारी देखील झाली होती. मात्र, त्यापाठोपाठ ओमायक्रॉन (Omicron) नावाचा करोनाचा नवा विषाणू दक्षिण अफ्रिकेत आढळल्यानंतर त्याचा फटका शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला देखील बसला आहे.

  • राज्य सरकारने जरी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचं जाहीर केलं असलं, तरी स्थानिक पातळीवर मात्र शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकल्याचं चित्र अनेक महानगर पालिकांमध्ये दिसून येत आहे.

  • राज्य सरकारने १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने १ डिसेंबरपासून शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेच्या हद्दीतील शाळा आता १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत.

ओमायक्रॉनवर कोविशिल्ड लस प्रभावी की बूस्टर डोस घ्यावा लागणार?; अदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती :
  • जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, भारतात कोविशिल्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गरज भासल्यास नवीन करोना प्रकारासाठी वेगळी कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

  • कोविशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. अशा परिस्थितीत, आवश्यक असल्यास, ओमायक्रॉनचे संकट लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे, असे मत अदर पूनावाला यांनी मांडले आहे.

  • एनडीटीव्ही सोबत बोलताना अदर पूनावाला यांनी या नव्या प्रकाराबाबत भाष्य केले आहे. ‘ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील संशोधन करत आहेत, त्यांच्या संशोधनाच्या आधारे आम्ही एक नवीन लस बनवण्याचा विचार करू शकतो, जी बूस्टर डोस म्हणून काम करेल.

  • संशोधनाच्या आधारे, आम्ही लसीचा तिसरा आणि चौथा डोस देण्याबाबत निर्णय घेण्यास सक्षम होऊ, असे पूनावाला यांनी म्हटले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ओमायक्रॉन प्रकाराशी लढण्यासाठी विशिष्ट लस आवश्यक आहे, असे नाही. तसेच पूनावाला म्हणाले की बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास, कंपनीकडे आधीच पुरेसे डोस आहेत, जे त्याच किंमतीत दिले जातील.

अलिबाग - मांडवा सागरी पोलीस ठाण्याचा तटरक्षक दलाकडून सन्मान :
  • मांडवा सागरी पोलीस ठाण्याला भारतीय तटरक्षक दलाकडून दिला जाणारा बेस्ट अशोर युनिट २०१९-२० पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.  मार्च २०२० मध्ये मांडवा जवळ समुद्रात झालेल्या बोट दुर्घटनेत आठ प्रवाशांचे जीव वाचवल्याबद्दल हा मांडवा पोलीस ठाण्याला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

  • दिल्ली येथे २५ नोव्हेंबर येथे विज्ञान भवन येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख डॉ. के नटराजन उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘बेस्ट अशोर युनिट २०१९-२०’ सन्मान प्रदान करण्यात आला.

  • मार्च 2020 रोजी मांडवा जेट्टी येथील अल् फतेह प्रवाशी बोट बुडत होती. यावेळी मांडवा पोलीस ठाणेचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखून जवळ असलेल्या सदगुरू कृपा या बोटीच्या मदतीने ८ प्रवाशांची सुखरूप सुटका केली होती.  या मदत व बचाव कार्याची दखल घेऊन पोलीस ठाण्याला सन्मानित करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांत सहा लाख भारतीयांनी केला नागरिकत्वाचा त्याग; केंद्र सरकारची लोकसभेत माहिती :
  • एकीकडे सीएएच्या माध्यमातून इतर शेजारी देशातील नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असताना दुसरीकडे गेल्या ५ वर्षांत तब्बल ६ लाखांहून जास्त भारतीयांनी आपल्या नागरिकात्वाचा त्याग केल्याची माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली.

  • संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान यासंदर्भातली चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये या आकडेवारीचा समावेश आहे. या भारतीयांनी इतर देशाचं नागरिकत्व स्वीकारण्यासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • राय यांनी लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०१७मध्ये १ लाख ३३ हजार भारतीयांनी आपल्या नागरिकत्वाचा त्याग केला. २०१८मध्ये हाच आकडा १ लाख ३४ हजार झाला. २०१९मध्ये तो वाढून १ लाख ४४ हजारपर्यंत गेला.

  • २०२०मध्ये करोनाची साथ आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर असणारे निर्बंध, निरनिराळ्या देशांमध्ये लागू असलेले लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर हा आकडा खाली घसरून थेट ८५ हजार २४८ पर्यंत आला. तर २०२१मध्ये निर्बंध हटवण्यात आल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेल्या नागरिकांचा आकडा १ लाख ११ हजार इतका झाला आहे.

०१ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.