नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करून देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर राजकारण बाजूला ठेवून विचारमंथन करण्यासाठी भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मंगळवारी ‘राष्ट्रमंच’ या व्यासपीठाची औपचारिक स्थापना केली.
भाजपाचे आणखी एक नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याखेरीज दिनेश त्रिवेदी (तृणमूल काँग्रेस), रेणुका चौधरी (काँग्रेस), माजीद मेमन (राष्ट्रवादी) व संजय सिंग (आम आदमी) या खासदारांसह सोमपाल व हरमोहन धवन हे माजी केंद्रीय मंत्री, गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता आणि लोकदलाचे जयंत चौधरी हे या मंचात सहभागी झाले.
आज देशातील परिस्थिती ७० वर्षांपूर्वी गांधीजींच्या हत्येच्या वेळी होती तितकीच भीषण आहे व लोकशाही संस्था धोक्यात आल्या आहेत, असा आरोप करून यशवंत सिन्हा यांना केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मात्र आपला हा मंच राजकारणापासून वेगळी अश्ी राष्ट्रीय चळवळ आहे, असा त्यांनी दावा केला.
‘भाजपामध्ये आज सर्वजण भयभीत आहेत, पण आम्ही त्या भयाला जुमानत नाही’, असे ते म्हणाले. पक्षात मोकळेपणाने मते मांडता येत नाहीत, म्हणून आपण या मंचावर आलो. पण असे करणे पक्षविरोधी नाही, असे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.(source :lokmat)
न्यूयॉर्क : जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. भारताची संपत्ती 8 हजार 230 अब्ज डॉलर इतकी आहे. अमेरिका जगातील सर्वात श्रीमंत देश ठरला आहे. न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
या अहवालात देशातल्या संपत्तीमध्ये नागरिकांच्या खासगी संपत्तीचा समावेश असून सरकारी संपत्ती वगळण्यात आली आहे. 64 हजार 584 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेला अमेरिका हा सर्वात धनाढ्य देश आहे.या यादीत चीन दुसऱ्या तर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने फ्रान्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली या देशांनाही मागे टाकलं आहे.
2017 साली भारत हा सर्वात चांगली कमाई करणारा देश असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 2007 साली भारताची संपत्ती 3,165 अब्ज डॉलर होती. एका दशकात ती 160 टक्क्यांनी वाढून 8 हजार 230 अब्ज डॉलरवर गेली आहे.
2016 मध्ये भारताची संपत्ती 6 हजार 584 अब्ज डॉलर होती. म्हणजे वर्षभरात या संपत्तीत 25 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळत आहे.
भारतामध्ये एकूण 20 हजार 730 कोट्यधीश व्यक्ती आहेत. कोट्यधीशांचा विचार करता भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे. तर देशात 119 अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत भारताचा अमेरिका आणि चीननंतर तिसरा क्रमांक लागतो.(source :abpmajha)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी नवीन राजकीय वाटचालीसाठी ‘राष्ट्र मंच’ची स्थापना केली आहे. यामध्ये भाजपचेच खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह इतर पक्षांचे नेतेही सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी हे भाजपविरोधी कृत्य नसल्याचे सांगितले आहे.
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी, यशवंत सिन्हा यांच्यासारख्या भाजपच्या जुन्या नेत्यांना बाजूला सारण्यात आले होते. यामुळे या नाराज नेत्यांनी मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा देखील आघाडीवर होते.
मंगळवारी यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी मंगळवारी ‘राष्ट्र मंचा’ची स्थापना केली. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी, काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी, राष्ट्रवादीचे माजीद मेमन, आपचे संजय सिंह, गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता आणि संयुक्त जनता दलाचे रवन वर्मा यांनी हजेरी लावल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
महात्मा गांधी यांची ७० वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली. आणि आज लोकशाही आणि त्याच्या पायावर हल्ले करण्यात येत आहेत. देशातील शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार ‘भिकाऱ्या’ची उपमा देत असल्याची टीका यशवंत सिन्हा यांनी केली. तसेच ही राजकीय हेतूने प्रेरित असलेली संघटना नसून केंद्र सरकारच्या चुकीच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धोरणांना विरोध करण्यासाठी निर्माण केलेली चळवळ आहे. भाजपमध्ये सर्वजण भीतीच्या छायेत वावरत आहेत. आपण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.(source :loksatta)
नवी दिल्ली : एमसी मेरी कोम (५१ किलो) आणि शिव थापा (६० किलो) या भारताच्या स्टार मुष्टियोद्ध्यांनी आपआपल्या वजनी गटामध्ये चमकदार कामगिरी करताना इंडिया ओपन मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यासह दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेतील पदक निश्चित केले आहे.
पाच वेळची विश्वविजेती आणि आशियाई चॅम्पियन मेरी कोमने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर भारताच्याच बीना देवी हिला सहजपणे नमवले. मणिपूरच्या ३५ वर्षीय मेरी कोमने एकतर्फी झालेल्या लढतीमध्ये ५-० असा दबदबा राखताना बाजी मारली. महिलांच्या अन्य लढतीमध्ये सरितादेवी हिनेही अपेक्षित कामगिरी करताना थायलंडच्या पीमविलाई लाओपीम हिचा ४-१ असा पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे पुरुषांच्या गटात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या शिव थापा याने उझबेकिस्तानच्या शेरबेक राखमातुलीव याला धक्का दिला. सावध सुरुवात केलेल्या शिवने अखेरच्या तीन मिनिटांमध्ये आपला हिसका दाखवताना परीक्षकांच्या गुणांच्या जोरावर बाजी मारली.
उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताच्याच मनीष कौशिकविरुद्ध होईल. मनीषने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपीन्सच्या चार्ली सुआरेज याला पराभूत केले. विशेष म्हणजे गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत शिव आणि मनीष आमनेसामने आले होते. त्यामध्ये मनीषने बाजी मारली असल्याने शिवपुढे कडवे आव्हान असेल.(source :loksatta)
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये गेली ५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ रिकामी असलेल्या पदांवर आता कायमची संक्रांत येण्याची चिन्हे दिसत आहेत. ही पदे यापुढे कधी भरली जाणार नाहीत. कारण ती रद्दच करण्याचे निश्चित झाले आहे. तसा निर्णयच घेण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
२ आठवड्यांपूर्वी अर्थमंत्रालयाने अन्य सर्व मंत्रालये आणि संबंधित विभागांना ५ वर्षांपासून अधिक काळ रिकामी असलेल्या पदे रद्द करण्यासाठी काय कारवाई केली, याबाबत सविस्तर अहवाल करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेल्या पदांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. अर्थात, ही कायमस्वरूपी नोकºयांची पदे आहेत. हंगामी स्वरूपाच्या पदांचा यात समावेशच नाही.
अर्थमंत्रालयाने सर्व मंत्रालयांकडून रिक्त पदांबाबत माहिती मागविली होती. काही मंत्रालयांनी याबाबत माहिती दिली, परंतु अनेकांनी ही माहिती तुकड्या-तुकड्यात सादर केली, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
त्यामुळे १६ जानेवारी रोजी अर्थमंत्रालयाने पत्रक काढून आर्थिक सल्लागार, प्रशासन विभागाचे संयुक्त सचिव, सर्व मंत्रालये आणि संबंधित विभागांना ५ वर्षांहून अधिक काळ रिक्त असलेली पदे निकालात काढण्याबाबत सविस्तर अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या. या पत्रकाआधारे गृहविभागानेही अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, निमलष्करी दलाचे प्रमुख आणि संबंधित विभागांकडून रिक्त जागांबाबत माहिती मागविली आहे.(source :loksatta)
बिजींग - सीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर जे मतभेदांचे मुद्दे आहेत त्यावर चर्चेने तोडगा काढण्याची तयारी चीनने दाखवली आहे. चीन-पाकिस्तानमध्ये बनणारा 50 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. त्यावरुन दोन्ही देशांमध्ये काही मुद्यांवर मतभेद आहेत.
चीनमधील भारताचे राजदूत गौतम बांबावले यांनी ग्लोबल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सीपीईसी प्रकल्पावरुन ज्या समस्या आहेत त्यावर तोडगा कढाला पाहिजे असे मत व्यक्त केले होते. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ च्युनयिंग यांनी सुद्धा यासंबंधी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
मतभेदांमुळे दोन्ही देशांच्या राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचू नये यासाठी चीन सीपीईसी प्रकल्पावरुन जे मतभेद आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे असे हुआ च्युनयिंग यांनी सांगितले. कोणा एकाला आपण समस्या सोडवायला सांगू शकत नाही. या मुद्यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी भारताबरोबर चर्चा करण्याची आमची इच्छा आहे असे च्युनयिंग म्हणाल्या.
सीपीईसी हा आर्थिक सहकार्य प्रकल्प आहे. कुठल्या तिस-या पक्षाला लक्ष्य करण्याचा या प्रकल्पामागचा हेतू नाही असे त्या म्हणाल्या. सीपीईसी प्रकल्पातंर्गत पायाभूत सोयी-सुविधांचे जाळे उभे राहणार आहे. चीनचा शिनजियांग प्रात आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर या प्रकल्पाने जोडले जाणार आहे. सीपीईसी प्रकल्पामुळे दोन्ही देशातील जवळीक मोठया प्रमाणात वाढली आहे. या प्रकल्पातंर्गत चीनने पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक केली आहे.(source :lokmat)
मुंबई : खगोलप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण आज (31 जानेवारी) खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. यंदाच्या वर्षाचं हे पहिलंच चंद्रग्रहण आहे. इतकंच नाही तर आज चंद्र लाल दिसणार आहे.
लाल चंद्राचा योग - आज चंद्र लाल रंगाचा दिसेल. पण याचवेळी खग्रास चंद्रग्रहण असा 20 वर्षात एकदा येणारा दुर्मिळ योगही आहे. पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झालं तर लाल चंद्राचा योग जुळून येतो. खगोल शास्त्रज्ञांनी याला 'स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स' असं नाव दिलं आहे.
बहुतांश चंद्रग्रहणं ही खंडग्रास स्वरुपाची असतात. पण आज खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतात हे चंद्रग्रहण अर्धच दिसणार आहे. संध्याकाळी 6.20 वाजता चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल. तर 9.30 वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. खग्रास चंद्रग्रहण फक्त पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे.
दरम्यान, 2018 वर्षातील जानेवारी महिना पर्वणीचा आहे. कारण या महिन्यात दिसणारा चंद्र नेहमीप्रमाणे नसेल. खगोलप्रेमींना सुपरब्लू, ब्लू मूनसह चंद्रग्रहण आणि लाल चंद्रही पाहायला मिळणार आहे. खगोलीय भाषेत याला 'ब्लड मून' म्हटलं जातं.(source :abpmajha)
महत्वाच्या घटना
१९११: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दुसर्या जन्मठेपेची शिक्षा झाली. तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यात दोनदा जन्मठेपेची शिक्षा झालेले ते एकमेव आहेत.
१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिकावी सुरूवात.
१९२९: सोविएत रशियाने लिऑन ट्रॉटस्की याला हद्दपार केले.
१९४५: युद्धातुन पळ काढल्याबद्दल एडी स्लोव्हिक या सैनिकाला अमेरिकेने मृत्यूदंड दिला.
१९४९: बडोदा व कोल्हापूर ही संस्थाने (तत्कालीन) मुंबई राज्यात विलीन झाली.
१९५०: राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी संसदेपुढे पहिले भाषण केले.
१९५०: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांनी हायड्रोजन बॉम्ब बनवण्याच्या योजनेस मान्यता दिली.
जन्म
१८९६: कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे तथा अंबिकातनयदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९८१)
१९३१: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर २००८)
१९७५: चित्रपट अभिनेत्री व उद्योजिका प्रीती झिंटा यांचा जन्म.
मृत्यू
१९५४: एफ. एम. रेडिओचे संशोधक ई. एच. आर्मस्ट्राँग यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८९०)
१९६९: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८९४ – पुणे, महाराष्ट्र)
१९७२: नेपाळचे राजे महेन्द्र यांचे निधन.
१९८६: संगीतकार विश्वनाथ मोरे यांचे निधन.
१९९४: मराठी व हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन.
१९९५: बँकिंग तज्ञ, रोखे बाजार नियामक मंडळाचे (SEBI) चे अध्यक्ष सुरेश शंकर नाडकर्णी यांचे निधन.
२०००: हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९०८ – डेहराडून, उत्तराखंड)
२००४: गायिका व अभिनेत्री सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या यांचे निधन. (जन्म: १५ जून १९२९)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.