चालू घडामोडी - ३१ डिसेंबर २०१८

Date : 31 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चीननं बांधला जगातला पहिला तीन मजली सोलर हायवे :
  • चीननं सोलर हायवेची उभारणी केली आहे आणि हा हायवे जगातील पहिला सोलर हायवे ठरला आहे. एक किलोमीटर लांबीचा हा हायवे असून याद्वारे विद्युतनिर्मिती करता येणार आहे. तसंच येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचं कामदेखील हा हायवे करणार असल्याचं म्हटलं जात आहे. चीनमधील जिनानमध्ये बांधण्यात आला आहे.

  • चीनमध्ये बांधण्यात आलेला हा सोलर हायवे तीन मजली आहे. यामध्ये काँक्रीट, सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे लेअर्स आहेत. या हायवेच्या माध्यमातून एका वर्षात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किलोवॅट वीजनिर्मित केली जाऊ शकते.

  • हिवाळ्यात जमलेला बर्फ वितळवण्याचे कामही या हायवेद्वारे होऊ शकते. एक किलोमीटरच्या सोलर हायवेनं 63,200 स्क्वेअर फूट परिसर व्यापला आहे. सामान्य हायवेच्या तुलनेत हा सोलार हायवे दहा पट अधिक भार झेलू शकतो.

  • दरम्यान, सोलर हायवे प्रकल्पावर फ्रान्स, हॉलंड सारखे देशही काम करत आहेत.

गोड बातमी! हिटमॅन रोहित बनला 'बाप'माणूस, शर्मा कुटुंबीयांना 'कन्यारत्न' :
  • मुंबई - टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे ही आनंदवार्ता कळाली तेव्हा रोहित मिशन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, या आनंदी वार्तामुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

  • 'हिटमॅन' रोहित शर्मा आतुरतेनं पाहतोय या 'Life Changing Moment'ची वाट !

  • ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यासोबत एका मुलाखतीमध्ये रोहितने याबाबत माहिती दिली होती. लवकरच, मी बाप  होणार असल्याचं रोहितनं स्पष्ट केलं होतं. रोहितच्या या गुडन्यूजमुळे टीम इंडियातील त्याच्या सहकाऱ्यांनीही आनंद व्यक्त केला होता. अखेर, रोहितच्या घरी आज ही गुडन्यूज आली. त्यानुसार, रोहितची पत्नी रितिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दरम्यान, सध्या रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे.

  • मात्र, आपल्या लाडक्या लेकीला पाहण्यासाठी तो लवकरच भारत दौरा करू शकतो. भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, ज्या दोन्ही सामन्यात रोहित खेळला, ते दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले असून ज्या सामन्यात रोहितला विश्रांती दिली होती, त्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

‘ट्रिपल तलाक’ विधेयक आज राज्यसभेत मांडणार :
  • नवी दिल्ली : ‘ट्रिपल तलाक’ विधेयक सोमवारी राज्यसभेत मांडण्यात येणार आहे, तर हे विधेयक सद्य:स्थितीत मंजूर होऊ देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सत्तारूढ भाजपाने वरिष्ठ सभागृहात व्हिप जारी करून आपल्या सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

  • कायदामंत्री रविशंकर प्रसाद राज्यसभेत हे विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकाला गुरुवारी लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर या विधेयकाच्या बाजूने २४५, तर विरोधात ११ मते पडली होती.

  • रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारीच असा दावा केला आहे की, भलेही राज्यसभेत भाजपाकडे पर्याप्त संख्याबळ नसेल; पण सभागृहात या विधेयकाला समर्थन मिळेल.

  • अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी कोचीमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, समविचारी पक्षांना बरोबर घेऊन हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. १० विरोधी पक्ष लोकसभेत या विधेयकाविरुद्ध समोर आले होते, असेही ते म्हणाले.

  • तथापि, अण्णाद्रमुकसह जे पक्ष विविध मुद्यांवर सरकारचे समर्थन करीत होते त्यांनीही या विधेयकाला विरोध केल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. विरोधकांनी ट्रिपल तलाकच्या तरतुदीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विधेयकावर आणखी विचार करण्यासाठी ते संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे पाठविण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा, मुलांच्या संगोपनासाठी रजा :
  • मुंबई  : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. महिला कर्मचारी, पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल.

  • मंत्री रावते म्हणाले की, महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने महिलांच्या भरतीला मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. त्यामुळे महामंडळात वाहक पदासह इतर विविध पदांवर सध्या मोठ्या संख्येने महिला काम करीत आहेत. यात विशेष करुन ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या मुलींची संख्या अधिक आहे. एसटी महामंडळातील नोकरीमुळे या महिला कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या अर्थिक सक्षमीकरणास मोठा हातभार लागत आहे.

  • एसटी महामंडळाने महिला कर्मचाऱ्यांना प्रसुती काळात 6 ऐवजी 9 महिन्यांची रजा देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. असा निर्णय घेणारी देशातील एसटी महामंडळ ही एकमेव संस्था असून त्याच्याच पुढचा कौटुंबिक टप्पा म्हणून आता महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजाही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोकरी करीत असताना या महिला कर्मचाऱ्यांना बऱ्याच वेळा आपल्या मुलांकडे लक्ष देणे शक्य होऊ शकत नाही.

  • विशेषत: परिक्षांच्या वेळी मुलांना आपल्या पालकांची अधिक गरज असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे मंत्री  रावते यांनी सांगितले.

  • पत्नी हयात नसलेले पुरुष तसेच ज्या पुरुष कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळली आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांनाही 180 दिवसांची बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदींकडून अंदमानमधील ३ बेटांचं नामांतरण :
  • पोर्ट ब्लेअर : पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी अंदमान निकोबारच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर मोदींनी अंदमान निकाबारमधील तीन बेटांचे नामांतरण केले आहे. मोदींनी 'हॅवलॉक' बेटाचे 'स्वराज द्वीप', नील बेटाचे 'शहीद द्वीप' आणि 'रॉस' बेटाचे नामांतरण 'नेताजी सुभाषचंद्र द्वीप' असे केले आहे.

  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने इंग्रज सरकारविरोधात रणशिंग फुंकल्यानंतर 30 डिसेंबर 1943 रोजी अंदमान निकोबारमध्ये तिरंगा फडकवला. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण झाली त्यानिमत्ताने मोदींनी आज पोर्ट ब्लेअरला भेट दिली. यावेळी मोदींनी 150 फूट उंच झेंड्याचं ध्वजारोहण केले.

  • आज पोर्ट ब्लेअरमध्ये पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम 2004 च्या त्सुनामीत जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते येथे आयोजित एका रॅलीत ते सहभागी झाले होते. त्यानंतर मोदींनी हॅवलॉक, नील आणि रॉस या बेटांने नामांतरण केले.

बांगलादेश: शेख हसीना यांच्या पक्षाचा मोठा विजय, चौथ्यांदा पंतप्रधान होणार :
  • बांगलादेशाच्या शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने सर्वसाधारण निवडणुकीत मोठे यश मिळवले आहे. रविवारी रात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालानंतर याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, निवडणुकीच्या काळात राजकीय हिंसेत देशभरात १७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विरोधी पक्षांनी मतदानात गडबड केल्याचा आरोप करत पुन्हा एकदा मतदानाची मागणी केली आहे.

  • माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, अवामी लीगच्या नेतृत्वाखालील आघाडीने ३०० पैकी २६६ जागांवर एकतर्फी विजय नोंदवला आहे. बांगलादेशातील डीबीसी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार ३०० पैकी २९९ जागांचे निकाल हाती आले आहेत. अवामी लीगने २६६ जागांवर विजय मिळवला आहे. तर त्यांच्या सहकारी पक्षाने २१ जागा मिळवल्या आहेत. तर विरोधी आघाडी नॅशनल यूनिटी फ्रंटला अवघ्या ७ जागांवरच विजय मिळाला आहे.

  • स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय नोंदवला आहे. तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे तिथे निवडणूक झाली नव्हती. हसीना यांना दक्षिण पश्चिम गोपालगंज मतदारसंघात २,२९,५३९ मते मिळाली. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी बीएनपीच्या उमेदवाराला अवघे १२३ मते मिळाली, अशी माहिती बांगलादेश निवडणूक आयोगाने दिली.

  • बांगलादेशमधील विरोधी पक्ष एनयूएफ आघाडीने निवडणुकीचे निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. काळजीवाहू तटस्थ सरकारच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. एनयूएफ ही अनेक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये बीएनपी, गोनो फॉरम, जातीलय समाजतांत्रिक दल, नागोरिक ओयक्या आणि कृषक श्रमिक जनता लीगचा समावेश आहे. दरम्यान, शेख हसीना पुन्हा एकदा पंतप्रधान होणे भारतासाठी चांगले आहे. अवामी लीग पक्षाचे भारताशी नेहमी सौहार्दाचे संबंध आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

  • १८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

  • १९५५: जनरल मोटर्स वर्षातून १ अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.

  • १९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.

  • १९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

  • १९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.

  • २००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ - १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.

जन्म 

  • १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९५४)

  • १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)

  • १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)

  • १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.

  • १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स यांचा जन्म.

  • १९४८: अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१२)

मृत्यू 

  • १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८६३)

  • १९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)

  • १९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.

  • १९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)

  • १९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.