चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३१ ऑगस्ट २०१९

Date : 31 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लिव्हरपूलचा व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी :
  • मोनाको : लिव्हरपूलचा कौशल्यवान फुटबॉलपटू व्हर्गिल व्हॅन डिक दुहेरी पुरस्कारांचा मानकरी ठरला. गुरुवारी रात्री झालेल्या यूईएफए चॅम्पियन्स लीग पुरस्कार सोहळ्यात (२०१८-१९ या वर्षांतील कामगिरीसाठी)व्हॅन डिकला वर्षांतील सर्वोत्तम खेळाडू आणि बचावपटू या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. त्याने लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या नामांकित खेळाडूंचा साम्राज्य मोडीत काढले.

  • लिव्हरपूलला २०१८-१९च्या चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात व्हॅन डिकचा मोलाचा वाटा होता. बचावपटू म्हणून हा पुरस्कार मिळवणारा तो गेल्या सात वर्षांतील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी २०१२मध्ये मँचेस्टर सिटीच्या व्हिन्सेंट कोम्पनीने असा पराक्रम केला होता.

  • आंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड्स फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या व्हॅन डिकला मे महिन्यात प्रीमियर फुटबॉल लीगचासुद्धा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले होते. २८ वर्षीय व्हॅन डिकने युव्हेंटसच्या रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेसी यांना मागे टाकले. गेल्या आठ वर्षांत मेसी अथवा रोनाल्डो यांच्यापैकीच एकाने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.

  • याव्यतिरिक्त, मेसीने सर्वोत्तम आक्रमक, तर लिव्हरपूलच्याच अ‍ॅलिसन बेकरने सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळवला.

सरकारी बँकांचे महाविलीनीकरण ; दहाऐवजी आता चार मोठय़ा बँका :
  • नवी दिल्ली : थकीत कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सशक्त करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गतिमान करण्यासाठी गरजेची असलेली मोठी कर्जे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारने १० सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. देशाच्या बँकिंग क्षेत्रात दूरगामी परिणाम करणाऱ्या या महाविलीनीकरणाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत केली.

  • सरकारी बँकांच्या महाविलीनीकरणामुळे देशात आता १२ मोठय़ा सार्वजनिक बँका कार्यरत राहतील. २०१७ मध्ये ही संख्या २७ इतकी होती. भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी असून विलीनीकरणामुळे पंजाब नॅशनल बँक ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक होणार आहे. पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक यांच्या विलीनीकरणामुळे त्यांची एकत्रित उलाढाल १७.९५ लाख कोटी रुपये इतकी होणार असून या तीन बँकांचा विस्तार पंजाब नॅशनल बँकेच्या दीडपट अधिक असेल.

  • बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या दोन्ही सार्वजनिक बँक म्हणून स्वतंत्रपणे कार्यरत राहतील. सार्वजनिक बँकांच्या विलीनीकरणाची ही तिसरी फेरी आहे.

  • देशाची अर्थव्यवस्था पाच हजार कोटी डॉलर इतकी विस्तारण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले असून त्यासाठी मोठी कर्जे उपलब्ध करून देण्याची क्षमता असलेल्या जागतिक बँकांच्या आकाराच्या बँका देशात निर्माण करण्याची गरज असल्याची कारणमीमांसा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर कर्तारपूर मार्गिकेची पहिलीच बैठक :
  • भारताने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेताना अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतरची कर्तारपूर मार्गिकेबाबत तांत्रिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीची पहिली बैठक  आज झाली. दोन्ही देशात तणाव असतानाही कर्तारपूर मार्गिकेचा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे पाकिस्तानने आधीच स्पष्ट केले आहे.

  • शून्य बिंदूवर भारत व पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात दोन्ही बाजूचे प्रत्येकी पंधरा अधिकारी सहभागी होते. सुमारे दोन तास ही बैठक चालली, त्यात तांत्रिक मुद्दय़ांवर चर्चा झाली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. ज्या शून्य बिंदूच्या ठिकाणी बैठक झाली तेथे प्रसारमाध्यमांना प्रवेश नव्हता. पाकिस्तानच्या बाजूने याबाबत अधिकृत काही सांगण्यात आलेले नाही. पाकिस्तानातील  कर्तारपूर येथे असलेल्या कर्तारपूरसाहिब व भारतातील गुरूदासपूर जिल्ह्य़ात असलेल्या डेरा बाबा नानक ही दोन ठिकाणे कर्तारपूर मार्गिकेने जोडली जाणार आहेत.

  • शीख मुलीच्या धर्मातराचा मुद्दा गंभीर- अमरिंदर - चंडीगड : पाकिस्तानातील नानकाना साहिब येथे शीख मुलीचे अपहरण करून तिचे सक्तीने इस्लाममध्ये धर्मातर केल्याचा मुद्दा  परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानपुढे उपस्थित करावा, अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली आहे. शीख मुलीचे अपहरण करून तिचे मुस्लीम धर्मात सक्तीने धर्मातर केल्याचा प्रकार पाकिस्तानात झाला असून चित्रफितीत तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार या मुलीचे अपहरण करून तिचे इस्लाम धर्मात जबरदस्ती धर्मातर केल्याचे म्हटले आहे. त्यात पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्तक्षेपाची मागणीही करण्यात आली होती.

‘एनआरसी’मध्ये नाव नसल्यास कायदेशीर मदत :
  • गुवाहाटी : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची (एनआरसी) अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध होणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील जनतेला न घाबरण्याचे आवाहन केले आहे. जे खरोखरच भारतीय आहेत त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी सरकारच्या वतीने आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील आणि गरिबांना कायदेशीर मदतही उपलब्ध करून दिली जाईल, असेही सोनोवाल यांनी स्पष्ट केले.

  • एनआरसीच्या अंतिम यादीत एखाद्याचे नाव नसले याचा अर्थ तो परदेशी नागरिक आहे असा नव्हे, कारण त्याबाबतचा निर्णय योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतर परकीय नागरिक लवाद घेऊ शकतो. त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी सरकार आहे. ज्यांचे नाव अंतिम यादीत नसेल त्यांना ते भारतीय नागरिक आहेत हे सिद्ध करण्याची पुरेशी संधी दिली जाईल, असेही सोनोवाल म्हणाले.

  • एनआरसी मसुदा गेल्या वर्षी ३० जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामधून ४०.७ लाख लोकांची नावे वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. एकूण ३.२९ कोटी अर्जदारांपैकी २.९ कोटी लोकांचाच समावेश करण्यात आला होता.

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक :
  • नवी दिल्ली : भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरीची असूनही दुपटीहून अधिक आहे,असे एका अभ्यासात दिसून आले आहे.

  • ‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की  देशात ८.७ टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के पुरुषांना नोक ऱ्या नाहीत. महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोक ऱ्या मिळण्यास कठीण जाते.

  • भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात २०१६-२०१७  दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. २११०४ उमेदवारांनी वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २८६९९१ अर्ज केले होते. कर्मचारी भरती व्यवस्थापक व कर्मचारी बाजारपेठ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, अजूनही नोकरी देताना भारतात लिंगभेदाचा परिणाम होत आहे. पात्रता व अनुभव, पर्याय, अर्ज प्रक्रिया यात महिलांना अडचणी आल्याचे दिसून आले. जर भारतातील नोकऱ्यांत महिलांना योग्य स्थान मिळाले तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे २७ टक्के वाढू शकते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर :
  • मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी गुरुवारी (29 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. विश्वचषकानंतर धोनीने लागोपाठ दुसऱ्या मालिकेतून माघार घेतली आहे. विराटच्या नेतृत्वाखालील या संघात रिषभ पंतकडेच यष्टिरक्षणाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे.

  • दक्षिण आफ्रिका आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात ट्वेन्टी-20 मालिकेपासून करेल. ही मालिका तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची असून पहिला सामना धर्मशालाच्या एचपीसीए स्टेडियममध्ये 15 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येईल. टी20 मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 2 ऑक्टोबरपासून तीन कसोटी मालिकला सुरुवात होईल.

  • महेंद्र सिंह धोनीने काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीशिवाय भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान मिळालेलं नाही, तर श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली आहे. तसंच हार्दिक पंड्याही पुन्हा मैदानावर दिसेल.

दिनविशेष :
  • बालस्वातंत्रदिन.

महत्वाच्या घटना 

  • १९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला.

  • १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात.

  • १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.

  • १९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले.

  • १९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले.

  • १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान.

  • १९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.

  • १९७१: अमेरिकन अंतराळावीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोव्हर चालवणारा पहिला मानव ठरला.

  • १९९१: किरगिझिस्तान सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

  • १९९७: प्रिन्सेस डायना आणि तिचा मित्र डोडी अल फायेद ठार झाले.

जन्म 

  • १५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १६२७)

  • १८७०: इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९५२)

  • १९०२: रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म.

  • १९०७: फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५७)

  • १९१९: कागज ते कॅन्व्हास या कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर २००५)

  • १९३१: पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २००५)

  • १९४०: मृत्युंजय कादंबरीचे लेखक साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर २००२)

  • १९४४: वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म.

  • १९६९: जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ यांचा जन्म.

  • १९७९: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते युवन शंकर राजा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८६)

  • १९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९२)

  • १९९५: खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या. (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२)

  • २०१२: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९३८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.