लोकसभेत ट्रिपल तलाक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार. भाजपाने यासंदर्भातला व्हिप जारी केला आहे. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळावी यासाठी मोदी सरकारला एनडीए आणि इतर विरोधी पक्षांवर अवलंबून रहावं लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे विधेयक राज्यसभेचा अडथळा दूर करू शकलेलं नाही. त्यामुळे आज हे राज्यसभेत मंजूर होणार की नाही हा प्रश्न आहे.
ट्रिपल तलाक विधेयकाला एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी कडाडून विरोध दर्शवला. ते लोकसभेत बोलत असताना त्यांनी हे विधेयक आणले गेले तर किती तोटे होतील याचा एक पाढाच वाचून दाखवला. मात्र भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी मात्र त्यांना जशास तसे उत्तर दिले. एवढंच नाही तर किती साध्या साध्या कारणांवरुन ट्रिपल तलाक दिला जातो हेदेखील सांगितले. लोकसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता राज्यसभेत मंजुरी मिळणार की नाही? हा प्रश्न कायम आहे.
ट्रिपल तलाक विधेयकावर माहिती अधिकार विधेयकाप्रमाणेच मतदान होऊ शकते अशी शक्यता आहे. २४० सदस्यांच्या राज्यसभेत भाजपा आणि एनडीएकडे ११९ मतं आहेत. तर विरोधकांकडे १२१ मतं आहेत. त्यामुळे या विधेयकाचे काय होणार हा प्रश्न कायम आहे.
अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क लवकरच कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून याबाबत विचार सुरू असून पुढील महिन्यापासून हे शुल्क कमी केले जाण्याची शक्यता आहे. झी बिझनेसने सुत्रांच्या आधारे याबाबतचं वृत्त दिलं आहे.
एटीएम वापराबाबतच्या सर्व शुल्कांची समीक्षा करण्यासाठी आरबीआयने एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल तयार केला असून यामध्ये अन्य बँकांच्या एटीएम वापरासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ही समिती लवकरच आपला अहवाल आरबीआयकडे सुपूर्द करेल. एटीएमचा गेल्या काही काळातील वाढलेला वापर पाहून आवश्यक त्या सर्व शुल्कांची समीक्षा करून या समितीने आपला अहवाल तयार केला आहे.
एटीएमच्या वापरासाठीचे शुल्क कमी करण्याची मागणी ग्राहकांकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. त्यानंतर ही समस्या सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली होती. या समितीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींसह बँकांचे अधिकारी आणि ग्राहकांच्या प्रतिनिधींचाही समावेश होता.
या समितीचा अहवाल आता तयार झाला असून पुढील महिन्यात तो सादर केल्यानंतर आठवडाभरात त्या शिफारशी अंमलात येण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सध्या महिन्यातून पाच वेळा अन्य बँकांचे एटीएम विनाशुल्क वापरता येते. तर ही मर्यादा मेट्रो शहरांसाठी तीन व्यवहारांची आहे.
गंगा नदीत काही प्रकारच्या डॉल्फिनचा अधिवास आढळल्याने तो गोडय़ा पाण्यातला की खाऱ्या पाण्यातला? सोयाबीनच्या ३१ वाणांपैकी दुष्काळी भागात कमी पाण्यावर कोणते वाण तग धरू शकेल? या आणि अशा ५०हून अधिक प्रश्नांच्या उत्तरांसाठी मागास श्रेणीत गणल्या जाणाऱ्या मराठवाडय़ात संशोधन सुरू आहे.
दुष्काळाचा दाह सोसणाऱ्या मराठवाडा-विदर्भात कमी पाण्यावर सोयाबीनचे कोणते वाण तग धरू शकेल, हे शोधायचे असेल तर सोयाबीनच्या जनुकामध्ये काय बदल होतात, याचा अभ्यास आवश्यक ठरतो. गंगेत काही डॉल्फिनचा संचार असल्याने त्याचे जनुक सापडले तर त्यावर संशोधन करता येईल आणि त्याच्या अधिवासाचे मूळ शोधता येईल, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बार कोडिंग अॅण्ड बायोडायव्हर्सिटी स्टडीज’ या केंद्रातील ३६ संशोधकांना आहे. हे ३६ संशोधक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत आहेत.
त्यांच्या अपूर्ण मुदतीचे बाळ आणि पूर्ण वाढ झालेले बाळ यांच्या पोटात होणाऱ्या बदलांमुळे त्याला भविष्यात कोणत्या ‘अॅलर्जी’ला सामोरे जावे लागेल, याचे संशोधन दिनेश नलगे करीत आहेत. एका अर्थाने जनुक (डीएनए) आता सामाजिक पातळीवर अभ्यासला जात आहे.
गर्भाशयाच्या कर्करोगावरही जनुकाच्या अनुषंगाने संशोधन सुरू आहे. पायाभूत सुविधांची कमतरता असणाऱ्या भागात डीएनए संशोधनासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभी करण्यात ‘पॉल हेबर्ट सेंटर फॉर डीएनए बार कोडिंग अॅण्ड बायोडायव्र्हसिटी स्टडीज’ केंद्राचे संचालक प्रा. गुलाबराव खेडकर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना यश येत आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचं अध्यक्षपद सध्या रिकामं आहे. काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत अंदाज बांधले जात असताना आता अध्यक्षपदासाठी प्रियांका गांधी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काँग्रेसच्या काही मोठ्या नेत्यांनी प्रियांका यांच्या नावाला पसंती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी जबाबदारी स्विकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नवीन अध्यक्ष कोण होणार याची गेले कित्येक दिवस चर्चा सुरु आहे. मात्र आता या पदासाठी प्रियांका गांधी यांचं नाव चर्चेत आलं आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर, सी. वेणूगोपाल राव यांच्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही प्रियांका यांच्या नावाला पसंती दिली आहे. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी एक्सलंट चॉईस असतील आणि संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठिशी उभा असेल, असं ट्वीट कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण? यावरून गेले कित्येक दिवस खलबते रंगली आहेत. ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून तरुण नेत्याला पक्षाचे नेतृत्व द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या एका गटातून पुढे येऊ लागली आहे. अध्यक्षपदासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. मात्र शिंदे यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ चेहऱ्यांना काँग्रेसमधून विरोध होत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी युवा नेत्याला नवा अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली होती. ज्येष्ठांनी युवा नेत्यांसाठी मार्ग खुला करावा असेही त्यांनी यापूर्वी म्हटले आहे. देशव्यापी ओळख आणि जमिनीशी नाळ जुळलेल्या युवा नेत्याला ही जबाबदारी द्यावी, असे सिंह यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या घटना
१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
१९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
१९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.
१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल.
२००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
जन्म
१८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)
१८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)
१९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.
१९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.
१९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)
१९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.
मृत्यू
१९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.
१९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)
१९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)
१९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
१९९५: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२०)
२०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)
२०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.