चालू घडामोडी - ३० डिसेंबर २०१८

Updated On : Dec 30, 2018 | Category : Current Affairsअमेरिकेतील सरकार पुढील आठवड्यातही ठप्प राहणार :
 • वॉशिंग्टन : मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यास करावयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीवरून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संसद यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे अमेरिकी सरकार अंशत: ठप्प झाले असून, यावर तोडगा न निघाल्यामुळे हा पेचप्रसंग दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करणार आहे.

 • अमेरिकी संसदेच्या सिनेट सभागृहात गुरुवारी केवळ काही मिनिटांचेच काम होऊ शकले. अर्थसंकल्पावर २ जानेवारी रोजी चर्चा करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सभागृहाचे कामकाज संपले.

 • विरोधी डेमोक्रॅटिक पार्टीने भिंतीसाठी निधी देण्यास विरोध केला आहेच; पण सत्ताधारी रिपब्लिकन पार्टीमधील काही खासदारांनीही भिंतीला निधी देण्यास विरोध केला आहे.

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा : जोतिबा अटकळेला ५७ किलो वजनी गटात कांस्यपदक :
 • पुणे : पुण्याच्या सह्याद्री क्रीडा संकुलात शनिवारपासून मातीतल्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत पहिल्या दिवशी 57, 74, आणि 97 किलो वजनी गटाच्या कुस्त्या रंगल्या. त्यात महाराष्ट्राच्या जोतिबा अटकळेनं 57 किलो वजनी गटाचं कांस्यपदक पटकावलं.

 • जोतिबानं राजस्थानच्या शुभम सेनवर मात करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं. जोतिबा हा मूळचा शेगावच्या धुमाला गावचा असून तो पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान आहे. 57 किलो गटात महाराष्ट्राचा आणखी एक पैलवान विजय पाटीलला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

 • दरम्यान या राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंग उपस्थित होते. याशिवाय यंदाचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखनंही स्पर्धेच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेत 32 राज्यातील पैलवान सहभागी झाले आहेत.

 • युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं मातीतल्या कुस्तीवर जागतिक मान्यतेची मोहोर उमटवल्यानंतर भारतीय कुस्ती महासंघानं मातीतल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेचं यजमानपद महाराष्ट्राला बहाल करण्यात आलं आहे.

उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मिळणार एसटीचा मोफत पास :
 • मुंबई : राज्यात नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या 76 तालुक्यातील महसुली मंडळातील विद्यार्थ्यांनाही उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. पूर्वी जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली असून आता नव्याने दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतील विद्यार्थ्यांनाही येत्या 1 जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे रावते यांनी सांगितले.

 • पावसाअभावी शेतकरी सध्या अडचणीत आहे. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थीतीमुळे अडचणीत आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एकप्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत.

 • सध्या शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण भागीत लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचेही कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पाससाठी 100 टक्के सवलत देण्यात येत असल्याचं दिवाकर रावते यांनी सांगितले.

 • राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांना विविध सवलती जाहीर केल्या आहेत. एसटी महामंडळाने मोफत प्रवास सवलत पास योजना राबवून ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे.

टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, मालिकेत २-१ ने आघाडी :
 • मेलबर्न :  टीम इंडियानं प्रभावी आक्रमणाच्या जोरावर मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासह भारतानं चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय आक्रमणासमोर दुसऱ्या डावातही लोटांगण घातलं.

 • ऑस्ट्रेलियाचा 261 दुसरा डाव धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमराने तीन आणि रविंद्र जाडेजानं तीन तर ईशांत शर्मा आणि मोहम्मह शमीनं दोन विकेट्स घेतल्या. भारतानं ऑस्ट्रेलियन भूमीवर एकाच मालिकेत दोन कसोटी जिंकण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. याआधी 1977 सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतानं मालिकेत दोन कसोटी जिंकल्या होत्या.

 • चौथ्या दिवशी पॅट कमिन्स आणि नॅथन लायनच्या झुंजार भागिदारीमुळे मेलबर्न कसोटीत टीम इंडियाला विजयासाठी पाचव्या दिवसाची प्रतिक्षा करावी लागली. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसअखेर आठ बाद 258 धावांची मजल मारली होती. पॅट कमिन्स 61 तर नॅथन लायन 7 धावांवर खेळत होते. यात पॅट कमिन्सने केवळ 2 धावांची भर घातली. तर लायन 7 धावांवर बाद झाला.

नवे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी :
 • येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षांमध्ये तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे पाहण्याचा योग जुळून आला असून नऊ वर्षांनी भारतातून ग्रहणे पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. तर आगामी वर्षांमध्ये केवळ दोन सुट्टय़ा रविवारी आल्याने चाकरमान्यांची चंगळ होणार आहे.

 • नव्या वर्षांत (२०१९) तीन सूर्य ग्रहणे आणि दोन चंद्र ग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी १६ जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण आणि २६ डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. दक्षिण भारताताली कोईम्बतूर, कन्नूर, मंगलोर, उटी या ठिकाणांहून सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्थितीचे दर्शन घडणार आहे.

 • मुंबईमधूनही हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असून ८५ टक्के सूर्य ग्रासित दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसले होते. मात्र ११ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. तथापि, २१ जानेवारी २०१९ आणि १९ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आकाशात सुपरमून दिसणार आहे, असे खगोलअभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

 • पुढील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि ईद – ए – मिलाद या तीन सुट्टय़ा रविवारी येत असून उर्वरित २१ सुट्टय़ा इतर वारी येत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी सुट्टय़ांची चंगळ होणार नाही. नूतन वर्षी चारच दिवस दिवाळी असणार आहे. वसुबारस व धनत्रयोदशी एकाच दिवशी २५ ऑक्टोबर रोजी येत आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा व २९ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, असे ते म्हणाले.

५५ महिन्यात पंतप्रधान मोदींच्या ९२ परदेश दौऱ्यावर २०२१ कोटी रुपये खर्च :
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परदेश दौऱ्यावरुन सतत टीका होत असते. मोदी देशात कमी आणि परदेशात जास्त असतात असा विरोधक त्यांच्यावर आरोप करतात. मागच्या साडेचारवर्षांपासून सत्तेवर असलेले पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यासंदर्भात एक महत्वाचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहेत. पुढच्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

 • त्याआधी पंतप्रधान मोदींनी आणखी दोन परदेश दौरे केले तर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर सर्वाधिक परदेश दौरे करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरतील. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून ११३ देशांचे दौरे केले होते. पंतप्रधान म्हणून मोदींनी ९२ देशांचे दौरे केले आहेत. यामध्ये काही देशांना त्यांनी पुन्हा पुन्हा भेट दिली आहे. पूर्वसुरि मनमोहन सिंग यांच्यापेक्षा मोदी यांचा फक्त एक दौर कमी आहे. पंतप्रधानपदावर असताना मनमोहन सिंग यांनी ९३ देशांचे दौरे केले होते. यामध्ये काही देशांना त्यांनी पुन्हा पुन्हा भेट दिली होती.

 • तिघांच्या परदेश दौऱ्यामध्ये फरक इतकाच आहे की, मोदींनी पाच वर्षांपेक्षा कमी काळात ९२ परदेश दौरे केले आहेत. तेच मनमोहन सिंग यांनी १० वर्षात ९३ देशांचे दौरे केले तर दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात ११३ देशांना भेटी दिल्या. परदेश दौऱ्यामध्ये पंतप्रधानांसाठी खास आरक्षित विमान असते. हॉटलाइन सारख्या सुविधा असतात.

 • मोदींनी चार वर्ष सात महिन्यांच्या कार्यकाळात ९२ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी एकूण २०२१ कोटी रुपये खर्च आला. विमानाची देखभाल, चार्टर्ड विमाने आणि हॉट लाइन यासाठी २०२१ कोटी खर्च झाले.  यामध्ये पंतप्रधानांच्या हॉटेलचा खर्च आणि अन्य लवाजम्याच्या खर्चाचा समावेश नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १९०६: ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे स्थापना. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.

 • १९२४: एडविन हबलने आकाशगंगे खेरीज इतर दीर्घिकाही अस्तित्त्वात असल्याचे जाहीर केले.

 • १९४३: सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.

 • २००६: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना फाशी देण्यात आली.

जन्म 

 • १८६५: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश लेखक रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९३६)

 • १८७९: भारतीय तत्त्ववेत्ते वेंकटरमण अय्यर तथा योगी रमण महर्षी यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९५०)

 • १८८७: मुंबईचे पहिले गृहमंत्री डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १९७१)

 • १९०२: भाषाशास्त्रज्ञ डॉ. रघू वीरा यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९६३)

 • १९२३: भारतीय शैक्षणिक व राजकारणी प्रकाश केर शास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७७)

 • १९३४: हबल स्पेस टेलिस्कोप चे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑगस्ट २००५)

 • १९५०: सी + + प्रोग्रामिंग भाषाचे जनक बर्जनी स्ट्रास्ट्रुप यांचा जन्म.

 • १९८३: इन्स्टाग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रम यांचा जन्म.

मृत्यू 

 • १६९१: आयरिश रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईल यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १६२७)

 • १९४४: साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च लेखक, नाटककार व संगीत समीक्षक रोमें रोलाँ यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८६६)

 • १९७१: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१९)

 • १९७४: गांधीवादी कार्यकर्ते आचार्य शंकरराव देव यांचे निधन.

 • १९८२: चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: २ डिसेंबर १९१३ – कोल्हापूर)

 • १९८७: संगीतकार दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता यांचे निधन.

 • १९९०: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक रघुवीर सहाय यांचे निधन. (जन्म: ९ डिसेंबर १९२९)

 • २०१५: भारतीय कवी, नाटककार, आणि अनुवादक मंगेश पाडगावकर यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९२९)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)