भारताची उदयोन्मुख नेमबाज ईलाव्हेनिल व्हालारिव्हन हिने गुरुवारी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले, परंतु ऑलिम्पिक स्पर्धेचे स्थान निश्चित करण्यात ती अपयशी ठरली आहे.
२० वर्षीय ईलाव्हेनिलने २५१.७ इतके गुण कमावले, तर ब्रिटनच्या सीओनैड मॅकिन्टोश (२५०.६) आणि चायनीज तैपईच्या यिंग लिन (२४९.५) यांना अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ईलाव्हेनिलचे हे वरिष्ठ गटातील पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.
ऑलिम्पिकसाठी एका देशाच्या दोनच खेळाडूंना थेट संधी मिळवण्याची अनुमती असून भारताच्या अंजुम मुदगिल आणि अपूर्वी चंडेला यांनी गतवर्षीच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेद्वारे ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला आहे. टोक्यो येथे पुढील वर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे.
ईलाव्हेनिलने सुवर्णपदक पटकावले असले तरी भारताच्या अंजुमला या फेरीत १६६.८ गुणांसह सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले, तर चंडेला पात्रता फेरीत ११व्या स्थानी राहिल्याने ती अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली.
विश्वचषकात सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने मी फार आनंदी असून माझे सल्लागार गगन नारंग आणि अन्य सर्व प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले. भविष्यात होणाऱ्या स्पर्धासाठी हे यश मला प्रेरणा देईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येईल. फेरपरीक्षेचा निकाल आल्यानंतर विद्यार्थांना त्यांचे पुनर्मुल्यांकन करता येईल. तसेच विद्यार्थांना पुढील शैक्षणिक प्रवेशही घेता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थांना बैठक क्रमांक आणि आईचे नाव लागेल. या दोन्हींशिवाय निकाल पाहता येणार नाही.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. १७ जुलै ते ३० जुलैदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. मार्चमधील परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या किंवा श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मंडळाने शुक्रवारी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
निकालासाठीची संकेतस्थळे
mahresult.nic.in
maharashtraeducation.com
hscresult.mkcl.org
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल आणि प्रिंट आऊटही घेता येईल.
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी ६ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
छाननी समितीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत मतदारसंघनिहाय संभाव्य उमेदवारांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. पुढील बैठक ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सहमती झालेली आहे. प्रत्येक १०६ मतदारसंघांचे पक्षीय वाटप झाले आहे. त्यामुळे २१२ जागा निश्चित झाल्या असून ४०-४२ जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील. उर्वरित जागा ४४-४६ जागांबाबत योग्य वेळी अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
या जागांबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतरच पक्षीय उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी सहा सदस्यांची छाननी समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिाकार्जुन खरगे आदी सहा सदस्यांची नावे जाहीर झाली होती. त्यात वडेट्टीवार यांचा समावेश केलेला नव्हता. मात्र पक्षाध्यक्षांच्या आदेशानंतर वडेट्टीवार यांनीही समितीत सहभागी करून घेण्यात आले आहे.
वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे.
नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.
वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता कित्येक पटीने वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक वा पालकाला भोगावा लागणार आहे.
परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड ५०० रुपयांवरून ५ हजार रुपये केला गेला आहे. मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता ४०० रुपयांऐवजी २ हजार रुपये दंड आकारला जाईल.
कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून न दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
भाजपच्या पक्षाध्यक्ष पदाची निवडणूक डिसेंबर महिन्यात होईल, अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ हा नियम कटाक्षाने पाळला जातो. विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा केंद्रीय गृहमंत्री झाल्यामुळे अध्यक्षपद शहा यांच्याकडेच कायम राहते, की भाजप नवा राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त करेल याबाबत उत्सुकता आहे. दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भाजपने कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करून नड्डा यांच्याकडे सूत्रे दिली आहेत.
भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुका १० ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. बूथ स्तरावरील निवडणूक १० ते ३० ऑक्टोबर या काळात होईल. नोव्हेंबरमध्ये जिल्हा आणि राज्य स्तरावर निवडणूक होऊन प्रदेशाध्यक्ष, संघटनाप्रमुख तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील पक्षांतर्गत निवडणुका घेतल्या जातील, असेही नड्डा यांनी सांगितले.
भाजपने जुलैमध्ये सदस्य नोंदणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेद्वारे ७ कोटी नवे सदस्य भाजपला मिळाले असून पक्षाची एकूण सदस्यसंख्या १८ कोटी झाली आहे. २.२ कोटी सदस्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, सदस्य नोंदणी मोहीम अपेक्षापेक्षाही जास्त यशस्वी झाली आहे. जम्मू-काश्मीर, प. बंगाल आदी राज्यांमध्ये भाजपचा विस्तार झाला नव्हता. या नोंदणी मोहिमेमुळे या राज्यांमध्येही भाजपला मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचा दावा नड्डा यांनी केला.
गेल्या वर्षभरापासून अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या ट्रेड वॉरचा फायदा भारताला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, चीनमधील अनेक अमेरिकन कंपन्यांना इतर देशांच्या तुलनेत भारतीय बाजारपेठ अनुकूल मानत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तैवानच्या फॉक्सकॉन या कंपनीने आपला व्यवसाय भारतात सुरू करण्याची योजना आखली आहे. तर दुसरीकडे अॅपल आणि अॅमेझॉन इकोचे उत्पादन चीनमधून भारतात स्थानांतरीत होत असल्याची माहितीही समोर येत आहे.
फॉक्सकॉनला हॉन हाय प्रिसिसन इंडस्ट्री कंपनीच्या नावाने ओळखले जाते. या कंपनीने चार वर्षांपूर्वी भारतात आपली कंपनी सुरू केली होती. सध्या या ठिकाणी कंपनीचे दोन असेंबली प्लांट सुरू आहेत. तसेच कंपनीने अन्य दोन प्लांट सुरू करण्याची योजनाही आखली आहे. गेल्या वर्षी ट्रेड वॉरदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील अनेक उत्पादनांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आयफोन, अॅमेझॉन इको आदीचाही समावेश आहे.
दरम्यान, चीनच्या कंपन्यांकडून अमेरिकन कंपन्यांविरोधात अन्यायकारक स्पर्धा सुरू असल्याचा आरोप अमेरिकन कंपन्यांकडून करण्यात आला आहे. तसेच गुरूवारी अमेरिका-चीन व्यापार परिषदेचा वार्षिक अहवाल जाहीर करण्यात आला. यानुसार 81 टक्के कंपन्यांनी आपल्या नुकसान सोसावे लागले असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी हा आकडा 73 टक्के होता.
महत्वाच्या घटना
१५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले.
१८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
१८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली.
१९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली.
१९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची मानवी इतिहासातील ही पहिली नोंद आहे.
जन्म
१७२०: व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७९६)
१८१२: ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८६९)
१८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१)
१८५०: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३)
१८७१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३७)
१८८३: योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९६६ – मुंबई)
१९०३: हिंदी कथाकार, कादबंरीकार, कवी भगवतीचरण वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑक्टोबर १९८१)
१९०४: उद्योगपती नवल होर्मुसजी टाटा यांचा जन्म.
१९२३: हिंदी चित्रपट गीतकार शंकरदास केसरीलाल ऊर्फ शैलेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९६६)
१९३०: संगीतकार दशरथ पुजारी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल २००८ – डोंबिवली, मुंबई)
१९३०: अमेरिकन उद्योगपती वॉरन बफे यांचा जन्म.
१९३४: लेग स्पिन गोलंदाज बाळू गुप्ते यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००५)
१९३७: मॅक्लारेन रेसिंग टीम चे संस्थापक ब्रुस मॅक्लारेन यांचा जन्म. (मृत्यू: २ जून १९७०)
१९५४: बेलारूस देशाचे पहिले अध्यक्ष अलेक्झांडर लुकासेंको यांचा जन्म.
१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी रवीशंकर प्रसाद यांचा जन्म.
मृत्यू
१७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५)
१९४०: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६)
१९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२)
१९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु एज्केशनचे संस्थापक जे. पी. नाईक यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९०७)
१९९४: प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी शं. गो. तुळपुळे यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९१४)
१९९८: स्वातंत्र्यसैनिक, निर्भीड पत्रकार नरुभाऊ लिमये यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९०९)
२००३: अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन यांचे निधन. (जन्म: ३ नोव्हेंबर १९२१)
२०१४: भारतीय इतिहासकार बिपन चंद्र यांचे निधन. (जन्म: २७ मे १९२८)
२०१५: भारतीय विद्वान लेखक एम. एम. कळबुर्गी यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १९३८)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.