चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ जुलै २०१९

Date : 29 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मेरीसह भारताला सात सुवर्ण :
  • सहा वेळा विश्वविजेत्या एमसी मेरी कोमसह चार महिला आणि तीन पुरुष अशा एकूण सात बॉक्सिंगपटूंनी लॅबुआन बाजो (इंडोनेशिया) येथे झालेल्या प्रेसिडंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली आहे, तर दोघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मोनिका, जमुना बोरो, सिमरनजित कौर, अंकुश दहिया, नीरज स्वामी आणि अनंता चोपडे यांनी विजेतेपद पटकावले. अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताला सर्वोत्तम संघाचा पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात आला.

  • महिलांमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरीने ५१ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एप्रिल फ्रँक्सचा ५-० असा पराभव केला आणि आगामी जागतिक अिजक्यपद स्पर्धेत आशा उंचावल्या आहेत. ४८ किलो गटात मोनिकाने इंडोनेशियाच्या एंडँगचा

  • ५-० असा पाडाव केला. ५४ किलो गटात जमुनाने इटलीच्या गिऊलिया लॅमाग्नाचा ५-० असा धुव्वा उडवला. ६० किलो गटात सिमरनजितने इंडोनेशियाच्या हसानाह हुस्वातूनचा ४-० असा पाडाव केला.

  • पुरुषांमध्ये ६४ किलो गटात अंकुशने मकाऊच्या लेऊंग किन फाँगला ५-० असे नमवले. ५२ किलो गटात अनंताने अफगाणिस्तानच्या रहमान रामिशचा ५-० असा पराभव केला. ४९ किलो गटात नीरजने फिलिपाइन्सच्या मॅकाडो ज्यु. रॅमेलवर ४-१ असा विजय मिळवला. ५६ किलोमध्ये इंडोनेशियाच्या मँडगी जिलकडून ३-२ असा पराभव पत्करल्यामुळे गौरव भिदुरीला रौप्यपदक मिळाले. याचप्रमाणे इंडोनेशियाच्या समादा सपुत्राकडून हार पत्करल्यामुळे दिनेश डागरला उपविजेतेपद मिळाले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा ८ ऑगस्ट रोजी भारतरत्न किताबाने होणार गौरव :
  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना येत्या ८ ऑगस्ट रोजी देशाचा सर्वोच्च नागरी किताब भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आसामचे दिवंगत प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात येणार आहे. या किताबासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर ४५ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या किताबाने सन्मानित करण्यात आले होते.

  • प्रणव मुखर्जी यांच्या नावाची भारतरत्नसाठी घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह १२ जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे. सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर १९५५ पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

  • हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१० मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

‘फिर एक बार’ नेतान्याहू सरकार, इस्त्रायलमध्ये निवडणूक प्रचारासाठी मोदींच्या फोटोचा वापर :
  • जागतिक राजकारणात बेंजामिन नेतान्याहू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मित्र समजले जातात. इस्त्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत नेतान्याहू यांनी मोदींच्या प्रचारासाठी मोदींच्या फोटोचा वापर केला आहे.

  • इस्राईलमध्ये यावर्षी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. नेतन्याहू यांच्याकडे आघाडी होती मात्र इतर पक्षाशी त्यांची युतीही झाली नाही. त्यामुळे इस्राइलमध्ये सप्टेंबर महिन्यात पुन्हा निवडणूक होत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे.

  • मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशिल आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रुशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या फोटोंचा वापर नेतन्याहू निवडणूक प्रचारासाठी करत आहेत.

  • नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळे बेंजामिन नेतान्याहू यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. बेंजामिन नेतान्याहू हे इस्त्रायलच्या ७१ वर्षाच्या इतिहासातील इस्त्रायलचे सर्वाधिककाळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती ठरु शकतात.

केंद्र सरकारचं १०० दिवसांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड येणार; मोदींनी सांगितला 'हा' प्लॅन :
  • नवी दिल्ली - मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कामाचं रिपोर्ट कार्ड जारी करण्यात येणार आहे. या रिपोर्टमध्ये नवीन प्रकल्प तसेच महत्वाकांक्षी प्रकल्पाचे अपडेट दिले जाणार आहे. 

  • पंतप्रधान कार्यालयाकडून सर्व मंत्रालयाच्या सचिवांना आपल्या विभागाच्या कामांचा अहवाल तयार करण्यासाठी सांगितले आहे. त्यामध्ये तीन गोष्टींवर जास्त लक्ष देण्यात आलं आहेत. त्यात एखादी योजना अथवा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणतं लक्ष्य ठरविण्यात आलं आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी काय उपाययोजना आखली आहे. प्रकल्प काय, केव्हा आणि कधी पूर्ण होईल याची संपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे. मोदी सरकारअंतर्गत प्रत्येक प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी 10 ग्रुप ऑफ सेक्रेटरी बनविले आहे. ते वारंवार पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात राहणार आहेत. 

  • तसेच पंतप्रधान कार्यालयाने मंत्र्यांकडूनही त्यांच्या खात्यातील मोठ्या प्रकल्पांची यादी मागविली आहे. ती यादी महिनाभरात पूर्ण होईल. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे की, दुसऱ्या टर्ममध्ये प्रत्येक महिन्याला देशाच्या नागरिकांना पूर्ण झालेला प्रकल्पाचे अपडेट दिले जावे. तसेच सर्व मंत्रालयाकडून गुड गर्व्हनन्सचा वेगळा गट बनवून सरकारच्या चांगल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम केलं जावं असं सांगण्यात आलं आहे. 

  • संबंधित मंत्रालयाकडून योजनांची माहिती त्यासाठी लागणारा खर्च आणि पैसे कुठून येणार याची माहिती द्यावी लागणार आहे. योजना किंवा प्रकल्प सुरु केल्यानंतर त्यामुळे किती रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील यासाठी वेगळा कॉलम देण्यात आला आहे. जे मंत्रालय रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी चांगली योजना आणेल त्यांच्या प्रकल्पांना प्राधान्याने मान्यता दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे. 

दिनविशेष :
  • विषमता विरोधी दिन / आंतरराष्ट्रीय वाघ दिन

महत्वाच्या घटना 

  • १८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

  • १८७६: फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.

  • १९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.

  • १९२१: अॅडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.

  • १९४८: १२ वर्षांच्या काळखंडानंतर लंडन येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या.

  • १९५७: इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.

  • १९८५: मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • १९८७: भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.

  • १९९७: हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.

जन्म 

  • १८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.

  • १९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)

  • १९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.

  • १९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.

  • १९५९: हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७८१: जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)

  • १८९०: डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचे निधन. (जन्म: ३० मार्च १८५३)

  • १९८७: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर१८९४)

  • १९९४: नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन यांचे निधन.

  • १९९६: स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९०९)

  • २००२: गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १९१९)

  • २००६: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.