चालू घडामोडी - २९ डिसेंबर २०१७

Date : 29 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक :
  • नवी दिल्ली : २०१७च्या तिस-या तिमाहीत अ‍ॅपलने सर्वाधिक १५१ डॉलर प्रति युनिट नफा कमावला. प्रति युनिट ३१ डॉलर नफा कमावून सॅमसंग दुसºया स्थानी राहिली.

  • संशोधन संस्था काउंटर पॉइंटच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली. जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार, अ‍ॅपलचा प्रति युनिट नफा सॅमसंगपेक्षा पाचपट अधिक राहिला. चिनी कंपन्यांच्या सरासरी प्रति युनिट नफ्यापेक्षा तो तब्बल १४ पट अधिक आहे. चिनी कंपन्या हुवेई, ओप्पो आणि विवो यांचा प्रति युनिट नफा अनुक्रमे १५ डॉलर, १४ डॉलर आणि १३ डॉलर राहिला. शिओमीचा प्रति युनिट नफा सर्वांत कमी २ डॉलर प्रति युनिट राहिला.

  • अ‍ॅपलला सुट्यांच्या हंगामाचा चांगला लाभ होईल. आयफोन एक्स मालिकेच्या महागड्या किमतीमुळे कंपनीचा नफा वाढला. २५६ जीबी क्षमतेच्या आयफोन एक्सला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले, असे काउंटर पॉइंटचे संशोधन संचालक नील शाह यांनी सांगितले. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, जागतिक पातळीवर हँडसेट उत्पादक कंपन्यांचा नफा वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढला.

  • एका तिमाहीत चिनी कंपन्यांचा नफा प्रथमच १.५ अब्ज डॉलरच्या वर पोहोचला आहे. आतापर्यंत बहुतांश नफ्याची वाटणी सॅमसंग आणि अ‍ॅपल या दोनच कंपन्यांत होत होती. अन्य कंपन्यांचा नफ्यातील वाटा नगण्य असायचा.

इस्रायलमध्ये भारत करणार तेल संशोधन :
  • नवी दिल्ली : भारत सरकारच्या मालकीची कंपनी ओएनजीसी विदेश लिमिटेडच्या (ओव्हीएल) नेतृत्वाखालील कंपनी समूह इस्रायली समुद्रात प्रथमच तेल व गॅस संशोधन करणार आहे. भारताच्या याच कंपनी समूहाने इराणमधील फर्जाद-बी गॅस क्षेत्रात संशोधन करून साठे शोधून काढले होते. तथापि, तेथे उत्पादन करण्याचा परवाना देण्यास इराणने टाळाटाळ चालविली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि इस्रायल यांच्यातील जवळीक महत्त्वाची आहे.

  • इस्रायलच्या ऊर्जा मंत्रालयाने ११ डिसेंबर रोजी एका ब्लॉकमध्ये तेल व गॅस संशोधन करण्यास ओव्हीएलच्या नेतृत्वाखालील कंपनी समूहास परवानगी दिली आहे. या समूहात ओव्हीएलव्यतिरिक्त इंडियन आॅइल, आॅइल इंडिया आणि भारत पेट्रोलियमची उपकंपनी भारत पेट्रो रिसोर्सेस यांचा समावेश आहे. ग्रीसच्या एनर्जीयर समूहाला पाच ब्लॉकमध्ये संशोधनाची परवानगी मिळाली आहे.

  • तेल क्षेत्रात इस्रायलचा पर्याय वापरून भारत सरकारने इराणला योग्य तो संदेश दिला आहे. ओएनजीसी विदेशचे व्यवस्थापकीय संचालक एन. के. वर्मा यांनी सांगितले की, वितरित झालेल्या ब्लॉकमध्ये तेल अथवा गॅससाठी वेधन (ड्रिलिंग) करण्यापूर्वी कंपनी समूह काही प्रक्रिया पार पाडील.

  • इस्रायलने चार वर्षांपूर्वी पूर्व भूमध्य समुद्रात विदेशी कंपन्यांना संशोधन करण्यास मनाई केली होती. त्यानंतर हे क्षेत्र पहिल्यांदाच विदेशी कंपन्यांसाठी खुले करण्यात येत आहे.

अनंतकुमार हेगडेंच्या माफीमुळे वाद निवळला :
  • नवी दिल्ली : घटना बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी लोकसभेत गुरुवारी माफी मागितल्यानंतर निवळला. आपल्या वक्तव्याला चुकीचे स्वरूप दिले गेल्याचा दावाही त्यांनी केला.

  • ‘‘माझे शब्द विचित्र वळण देऊन सादर केले गेले. मी तसे काही बोललोच नव्हतो. तरीही जर कोणी दुखावले गेले असेल तर मी त्या सदस्यांची क्षमा मागतो’’, असे हेगडे म्हणाले. प्रश्नोत्तराचा तास संपताना अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हेगडे यांना तुमच्या विधानांमुळे जर कोणी दुखावले गेले असेल तर त्यांची माफी मागा, असे आवाहन केले होते.

  • जीवनात असे होते की जे आम्ही म्हणालो ते बरोबर होते, असे वाटते परंतु त्यामुळे इतर अजूनही दुखावले जाऊ शकतात, असे महाजन म्हणाल्या.

  • तत्पूर्वी, हेगडे म्हणाले की, घटना माझ्यासाठी सर्वोच्च असून एक नागरिक या नात्याने मी कधीही त्याविरोधात जाऊ शकत नाही. घटना, संसद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला परम आदर आहे. हेगडे यांच्या खुलाशाला काँग्रेसचे सभागृहातील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्षेप घेतल्यावर हेगडे म्हणाले होते की, माझ्या वक्तव्यांनी जर कोणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागायला तयार आहे.

एम. जे. अकबर यांच्या भाषणाने शाहबानो खटल्याची आठवण :
  • नवी दिल्ली- लोकसभेत तिहेरी तलाकवर बंदी घालण्यासाठी विधेयक गुरुवारी (28 डिसेंबर) मंजुर करण्यात आले. या विधेयकात कायद्याचा भंग करणा-यास शिक्षेची तरतूद करण्यात आली असल्याने बहुतांश विरोधी पक्षांनी त्यात दुरुस्ती सुचवली.

  • या विधेयकावर बोलताना लोकसभा सदस्य मीनाक्षी लेखी, सुप्रिया सुळे, तथागत सत्पती, एम. जे. अकबर यांनी विशेष उल्लेखनीय भाषणे केली. १९८६ साली केलेल्या कायद्याचे परिमार्जन करण्याची ही चांगली संधी आहे असे यापैकी बहुतेकांनी मत मांडले. मात्र परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अशी वेळ पुन्हा लवकर येणार नाही असे सांगत हे विधेयक मंजूर करण्यासाठी आग्रह धरला. 

  • काय म्हणाले एम. जे अकबर - एम. जे. अकबर आपल्या भाषणात म्हणाले, या विधेयकामुळे सर्व प्रश्न तात्काळ सुटतील, सर्वजणांना स्वर्ग दिसेल असे नाही. पण प्रश्न सोडवण्याच्या दिशेने टाकलेले ते पाऊल असेल. एखादी चांगली गोष्ट ती केवळ आदर्श नाही म्हणून टाळणे योग्य ठरणार नाही, तसेच या विधेयकाबाबत आहे.

  • प्राचीन काळातील अनेक हात तोडणे,  चाबकाचे फटके देणे अशा शिक्षांचे कायदे बदलले गेले आहेत मग या कायद्याबाबत मात्र धर्मग्रंथाचा का आधार घेतला जातो ? पुरुषांच्या गुन्ह्यांबाबत कायदे चटकन बदलले गेले मग इथे का विरोध होतो ? या विधेयकामुळे कोणत्याही धर्माचे नुकसान होणार नाही, झालेच तर काही पुरुषांच्या दमनशक्तीचे होईल.

  • १९८६ साली आपण केलेल्या कायद्यात बदल करण्याची ही एकमेव संधी आहे. ३० वर्षांनंतर या संधीचा लाभ आपल्याला झाला आहे. अशी एेतिहासिक संधी पुन्हा येणार नाही. अकबर यांनी आपल्या भाषणात कुराणातील आणि विचारवंतांचे अनेक दाखले दिले. त्यांच्या भाषणाला सभागृहातील सदस्यांनी बाकं वाजवून विशेष दाद दिली.

चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात मृत्यूचा रस्ता :
  • बीजिंग- मृत्यूची टांगती तलवार म्हणजे काय? याचा अनुभव घ्यायचा असेल तर, लोक चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात जातात. उंच डोंगरांच्या अगदी भिंतीसारख्या भागावर लाकडी प्लेट्स लावून येथून जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे. येथून जाताना झालेली थोडीशी चूक त्या व्यक्तीला मृत्यूच्या खाईत ढकलू शकते.

  • अगदी असंही म्हणतात की, येथे येणारे लोक मृत्यू जवळून पाहण्यासाठीच येतात. खूप हिंमतवान लोकच या भागात येतात आणि या भागातून चालण्याचे धाडस करतात. जमिनीपासून ७०८७ फूट उंचीवर केवळ एका लाकडी फळीवरून चालणे सोपी गोष्ट नाही. चीनच्या दक्षिण

  • भागात असणारा हा पर्वत पर्यटकांचे खास आकर्षण आहे. असे सांगतात की, पूर्वी या भागात मंदिर होते. त्यामुळे पुजारी आणि संन्यासी येथे येत असत. आपल्या सुविधेसाठी त्यांनी या शिड्या बनविल्या.असे सांगतात की, या भागात दरवर्षी १०० जणांचा मृत्यू होतो.

चीनी मीडियाने मान्य केला 'मोदी लाटे'चा दबदबा, 'मोदी ब्रॅण्ड'ने गाजवलं 2017 वर्ष :
  • नवी दिल्ली - वारंवार प्रत्येक गोष्टीवर भारतावर टीका करत डोळे वटारुन दाखवणा-या चीनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल काहीही मत असलं तरी तेथील सरकारी प्रसारमाध्यमं मात्र पंतप्रधान मोदींचा दबदबा मान्य करत आहेत.

  • चीनमधील सरकारी मीडिया शिन्हुआच्या वेबसाईटवर प्रकाशित एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 'नरेंद्र मोदी वेव्ह वर्क्स मॅजिक फॉर इंडियाज रुलिंग बीजेपी इन 2017' असं लेखाचं शिर्षक आहे.

  • नरेंद्र मोदी सरकारने तीन वर्ष पुर्ण केल्याच्या पार्श्वभुमीवर हा लेख लिहिण्यात आला आहे. हे वर्ष संपायला आलं आहे, जर आपण देशातील राजकीय घडामोडींकडे पाहिलं तर भारताच्या राजकारणात 'ब्रॅण्ड मोदी'चा दबदबा राहिला असं लेखात सांगण्यात आलं आहे. 

  • लेखात लिहिलं आहे की, 2014 मधील निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेल्या जबरदस्त यशासोबत मोदी लाटेची सुरुवात झाली. यानंतर भाजपाने अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला. या वर्षात ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक झाली तिथे फक्त मोदीच स्टार चेहरा आणि मास्टर स्ट्रोक म्हणून समोर आले.

  • गेल्या अनेक वर्षांत नरेंद्र मोदी जनतेचे लोकप्रिय नेता म्हणून समोर आले आहेत. हेच कारण आहे ज्यामुळे पक्षाने 17 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत 9 विजय मिळवले. ज्यामध्ये उत्तर प्रदेशसोबत नुकतीच पार पडलेली गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणूक आहे. 

‘ट्रिपल तलाक’ होणार गुन्हा, लोकसभेत विधेयक मंजूर :
  • नवी दिल्ली : महिलांच्या दृष्टीने अन्यायकारक अशी मुस्लीम समाजातील ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर असा तलाक देणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तुरुंगात पाठविण्याची तरतूद असलेले विधेयक केंद्रातील मोदी सरकारने गुरुवारी बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले.

  • काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध व दुरुस्त्या नाकारून मंजुरी मिळाली असली तरी सत्ताधा-यांचे बहुमत नसलेल्या राज्यसभेत ते मंजूर करून घेण्यात सरकारचा कस लागेल. विधेयकावरील चर्चेच्या वेळी काँग्रेससह संपूर्ण विरोधी पक्षाने या विधेयकाच्या स्वरूपावर आक्षेप घेतला. काँग्रेस, अण्णाद्रमुक, डावे पक्ष, सपा, आरएसपी, राजद, बीजेडी यांच्यासह अन्य पक्ष ‘ट्रिपल तलाक’ची प्रथा बंद व्हायला हवी, या बाजूचे दिसले. मात्र हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यावर त्यांचा आक्षेप होता.

  • सविस्तर विचार निनिमयासाठी विधेयक संसदीय समितीकडे पाठविले जावे व नंतर ते एकमताने मंजूर करता येईल, असे त्यांचे म्हणणे होते. रविशंकर प्रसाद म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही जर असे तलाक दिले जात असतील तर त्यावर काय कारवाई करावी यासाठी प्रचलित कायद्यात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे संसदेने हे विधेयक मंजूर करुन त्याला कायदेशीर स्वरुप द्यावे. त्यामुळे मुस्लिम पुरुषांच्या अत्याचारापासून महिलांची सुटका होऊ शकेल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९३०: सर मुहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्र सिद्धांत तसेच पाकिस्तानच्या निर्मितीचा दृष्टीकोन मांडला.

  • १९५९: नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.

  • १९५९: पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

जन्म

  • १८००: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १८६०)

  • १८०८: अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १८७५)

  • १८०९: ब्रिटीश पंतप्रधान विल्यम ग्लँडस्टोन यांचा जन्म.

  • १८४४: कॉंग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमकेशचंद्र बनर्जी यांचा जन्म.

  • १९००: मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)

  • १९०४: ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ कुवेम्पू यांचा जन्म. (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)

  • १९१७: निर्माते-दिगदर्शक रामानंद सागर यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)

  • १९२१: फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हियाचे पहिले अध्यक्ष डोब्रिका कोसिक यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे २०१४)

  • १९४२: सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुलै २०१२)

  • १९६०: ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड बून यांचा जन्म.

  • १९७४: अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांचा जन्म.

मृत्य

  • १९६७: गायक, पंडित ओंकारनाथ ठाकुर यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९७)

  • १९८६: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड मॅकमिलन यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)

  • १९७१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे निधन.

  • २०१२: इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक टोनी ग्रेग यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

  • २०१३: भारतीय लेखक आणि अनुवादक जगदीश मोहंती यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १९५१)

  • २०१४: भारतीय-हाँगकाँगचे व्यापारी हरी हरिलेला यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९२२)

  • २०१५: पंजाबचे २५ वे राज्यपाल ओमप्रकाश मल्होत्रा यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.