चालू घडामोडी - २८ ऑक्टोबर २०१७

Date : 28 October, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस दुस-यांदा बनले जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती :
  • न्यू यॉर्क : अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे दुस-यांदा काही काळासाठी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत, अशी माहिती वॉल स्ट्रीट जनरलनं दिली आहे.

  • शुक्रवारी अमेरिकेचा शेअर बाजार खुलताच अ‍ॅमेझॉनच्या शेअर्सनी १३.५ टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्यामुळे बेझोस यांची संपत्ती ९० अब्ज डॉलरच्या पार गेली. तसेच बिल गेट्स यांची संपत्ती ८९ अब्ज डॉलरच्या घरात आहे. 

  • गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी ‘अ‍ॅमेझॉन’चे सीईओ जेफ बेझोस हे काही तासांसाठी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले होते.

  • त्यांच्या कंपनीचे समभाग अचानक उसळल्यामुळे त्यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील ‘औटघटकेचा राजा’ होण्याचे भाग्य लाभले होते.

  • ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने ही माहिती जारी केली होती. फोर्ब्सने म्हटले की, जेफ बेझोस यांना श्रीमंतीच्या क्षेत्रातील हा औटघटकेचा राजमुकुट मिळाला. अ‍ॅमेझॉनच्या समभागांनी उसळी घेतल्यानंतर कंपनीच्या एका समभागाची किंमत १,०८३.३१ डॉलर झाली होती.

ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या, दूरदर्शनवरुन जनजागृती करा - सर्वोच्च न्यायालय :
  • नवी दिल्ली - आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. चेन्नईच्या एका वकिलाने ब्लू व्हेल गेमवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

  • ब्लू व्हेल गेममुळे गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात जवळपास १०० आत्महत्या झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचं निरीक्षण नोंदवलं. 

  • यासोबतच ब्लू व्हेल गेमचे धोके लक्षात यावेत यासाठी दूरदर्शन आणि खासगी चॅनेल्सवर जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती करा असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिला आहे.

  • केंद्राने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना सांगितलं आहे की, तज्ञांची समिती गठीत केली असून, पुढील तीन आठवड्यात रिपोर्ट सादर करण्याचा आदेश दिला आहे. 

जिवंत माणसाशी स्पर्धा करणा-या 'सोफिया'ला दिलं नागरिकत्व, सौदी अरेबिया जगातला पहिला देश :
  • रियाध - ती म्हणते, मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही चांगलं काम करू शकते... तुम्ही विचार करू शकता तसा मी देखील करू शकते, एवढंच नाही तर तुमच्यापेक्षाही पुढे जाऊन मी विश्लेषण करू शकते.

  • तुमची बुद्धीमत्ता आणि माझी बुद्धीमत्ता यात जमिन-आसमानचा फरक असेल...तुमच्याकडे बघुनही मला कळेल की तुम्हाला राग आलाय का? असं सांगणा-या सोफियाला सौदी अरेबियानं नागरिकत्व दिलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोफिया नेमकी कोण?

  • धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली ही सोफिया आहे अत्याधुनिक यंत्रमानव. विचार करायची क्षमता असलेली, निर्णय क्षमता असलेली, कृत्रिम बुद्धिमत्ता लाभलेली चालती-बोलती रोबोट. 

  • 'सोफिया' या नावाची सध्या भलतीच चर्चा आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. धातूचे तुकडे आणि तारांपासून बनलेली सोफिया ही कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळवणारी पहिली कृत्रिम बुद्धिमान यंत्रमानव (humanoid robot) बनली आहे. 

शेल कंपन्यांच्या मालमत्ता शोधा, केंद्राचे राज्य सरकारांना आदेश :
  • नवी दिल्ली : मान्यता रद्द करण्यात आलेल्या २.१ लाख शेल कंपन्यांच्या मालमत्ता हुडकून काढा, तसेच या मालमत्तांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार यापुढे होणार नाहीत, याची खबरदारी घ्या, असे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिले आहेत.

  • कायदा, न्याय आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी सांगितले की, या कंपन्यांच्या मालमत्ता शोधून काढण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि त्याची माहिती कालबद्ध पद्धतीने कंपनी व्यवहार मंत्रालयाला कळवा.

  • कंपनी कायद्यांतर्गत मान्यता रद्द करण्यात आलेल्या कंपन्यांवरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी चौधरी यांनी एक बैठक घेतली. त्यांनी म्हटले की, देशभरातील जमिनींचे रेकॉर्ड आता संगणकीकृत करण्यात आले आहे.

  • त्यामुळे कंपन्यांच्या मालमत्तांची माहिती जिल्हा प्रशासनास तसेच केंद्र सरकारास कळविण्यास फार वेळ लागणार नाही. चौधरी यांनी राज्यांच्या प्रतिनिधींना सांगितले की, या कंपन्यांची मान्यता कंपनी निबंधकांनी रद्द केली आहे.

गुजरातमध्ये भाजपाला पुन्हा मोदींचा आधार, पंतप्रधान मोदींच्या तब्बल ५०-७० सभांचं आयोजन :
  • अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून प्रकर्षानं असल्याचे दिसत आहे.

  • भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यामध्ये होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास ५० ते ७० जनसभांना संबोधित करणार आहेत. 

  • दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मुख्य शहरामध्ये  पंतप्रधान जवळपास  ५० ते ७० जनसभा घेणार असल्याचे बोलले जात असून १० नोव्हेंबरनंतर पंतप्रधान मोदी पूर्णतः निवडणुकांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत.

  • भाजपासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीपासून ते आतापर्यंत गुजरातचा १० वेळा दौरा केला आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन

महत्त्वाच्या घटना

  • १४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.

  • १४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.

  • १६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.

  • १८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

  • १९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

  • १९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.

जन्म दिवस

  • १८६७: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)

  • १८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)

  • १९५५: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.

  • १९५५: भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.

  • १९५८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.

  • १९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.

मृत्य दिन 

  • १६२७: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)

  • १८११: राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर१७७६)

  • १९४४: डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)

  • २००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)

  • २०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर१९३८)

  • २०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.