कमी दर्जाचे प्लास्टिक व पॉलिथीन यामुळे पर्यावरण, वन्यजीवन व आरोग्यावर वाईट परिणाम होत असून लोकांनी प्लास्टिकचा वापर बंद करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात केले आहे.
५ जूनला पर्यावरण दिन आहे व त्यात लोकांनी झाडे लावण्यावर लक्ष केंद्रित करतानाच प्लास्टिकचा वापर सोडावा, असे सांगून ते म्हणाले, की केवळ झाडे लावून उपयोगाची नाही ती जगतात की नाही यासाठी त्यांची काळजी घेतली पाहिजे, रोपटय़ाचा वृक्ष होईपर्यंत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, की पर्यावरण संरक्षण व निसर्गाबाबत संवेदनशीलता या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अलिकडे अवकाळी पाऊस व धुळीची वादळे सुटली होती, तो हवामानाचे स्वरूप बदलत असल्याचा परिणाम होता. त्यामुळे अनेक लोकांनी प्राण गमावले, असे त्यांनी सांगितले. केवळ जागतिक तपमानवाढीच्या नावाने हाकाटी पिटून चालणार नाही.
त्यासाठी निसर्गाबाबत संवेदनशील राहिले पाहिजे. ते संस्कारच आपल्या संस्कृतीत रुजले पाहिजे. या वर्षी बीट प्लास्टिक पोल्यूशन म्हणजे प्लास्टिक प्रदूषण बंद करा हा प्रमुख विषय पर्यावरण दिनाला आहे. प्लास्टिकमुळे निसर्ग, वन्यजीवन तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. पृथ्वी ग्रह स्वच्छ व हिरवागार करण्यासाठी काय करता येईल यावर विचार करा. त्यासाठी अभिनव गोष्टी शोधून काढा.
ठाणे : आंतरराष्ट्रीय शिळवादन स्पर्धेत भारताला प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या मुंबईच्या निखिल राणे याने नुकतीच ठाण्यात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने हिंदी-मराठी आणि क्लासिकल गाण्यांवर शिळवादन करून शिटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, भविष्यात व्हिसलिंग इन्स्टिट्युशन सुरू करून येणाºया पिढीला शिळवादन या क्षेत्रात आणण्याचा मानस व्यक्त केला. प्रत्येकाकडे गाणे नसते, पण शिटी नक्की असते, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
एका खाजगी इव्हेंट्स संस्थेने निखिलची सदिच्छा भेट आयोजित केली होती. यानिमित्ताने ठाणेकरांना निखिलशी संवाद साधण्याची संधी मिळाली. १९७२ सालापासून आंतरराष्ट्रीय शिळवादन स्पर्धा विविध देशांत आयोजित केली जाते. तब्बल ४६ वर्षांनी म्हणजेच २०१६ मध्ये प्रथमच भारत या स्पर्धेत उतरला आणि यात निखिलने भारताचे प्रतिनिधित्व केले.
जपान व्हिसलिंग असोसिएशनच्या वतीने जपान येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात आठ देशांतील ५० स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शवला होता. हिकीफुकी, अलाइड आटर््स, रेकॉर्डेड अकंपनीमेंट अशा तीन प्रकारांत ही स्पर्धा घेतली जाते. हिकीफुकी या प्रकारात निखिलने प्रथम क्रमांक पटकावला. २०१८ मध्ये ३ मे रोजी सुरू झालेली ही स्पर्धा ५ मे रोजी संपली. या स्पर्धेत ११ देशांचे ६७ स्पर्धक सहभागी झाले होते. निखिलने ‘मेहबुबा मेहबुबा’ आणि ‘वेस्टर्न क्लासिकल’ गाणं वाजवून पुन्हा एकदा त्याच प्रकारात पहिला क्रमांक पटकावला.
यंदाचे या स्पर्धेचे ४८ वे वर्ष होते. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धा जिंकल्यानंतर प्रथमच निखिल ठाण्यात आला. ठाणेकरांशी त्याचा संवाद व्हावा, या क्षेत्रात येणाºयांना प्रोत्साहन मिळावे, असा या भेटीमागचा उद्देश असल्याचे हर्षद समर्थ यांनी लोकमतला सांगितले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी शिटी वाजवतो. पाच वर्षे हिंदुस्थान क्लासिकलचे धडे घेतले आहेत. माझ्या गळ्यात इन्स्ट्रूमेंट आहे, तर त्याचा वापर करून मी शिटीवादनाला विकसित केले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' द्वारे देशवासियांसोबत संवाद साधला. 'मन की बात' कार्यक्रमाचा आजचा 44वा भाग आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंतप्रधान मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी वीर सावरकर यांचा साहसी क्रांतिकारक असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की, अनेक विशेष गुणांचे असे सावरकरजींचे व्यक्तिमत्त्व होते. शस्त्र आणि शास्त्र दोन्हींचे ते उपासक होते. ब्रिटीश राजवटीविरोधात त्यांनी दिलेल्या संघर्षासाठी ते विशेषतः ओळखले जातात, मात्र याशिवाय ते एक कवी आणि समाजसुधारकदेखील होते.
पुढे त्यांनी कार्यक्रमात कटक येथील प्रकाश राव नावाच्या एका चहावाल्याचे कौतुक केले. 50 वर्षांपासून चहा विकत असलेल्या राव यांनी 'आशा-आश्वासन' नावाची एका शाळा सुरू केली आहे. यामध्ये ते परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे 70 मुलांना शिकवतात.
राव हे आपल्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम ही या शाळेवर खर्च करतात आणि शिकायला येणाऱ्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि भोजनाची व्यवस्था करतात, अशी माहिती मोदींनी दिली.
मुंबई - सलामीवीर शेन वॉटसन (११७*) याने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमधील आपला दबदबा सिद्ध करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले. या शानदार कामगिरीसह चेन्नईने मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ३ विजेतीपदे पटकावण्याच्या पराक्रमाची बरोबरी केली. सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ६ बाद १७८ धावा फटकावल्यानंतर चेन्नईने १८.३ षटकांतच केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात १८१ धावा काढल्या.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तोडीस तोड खेळ झाला. पण तब्बल सहा अंतिम सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चेन्नईच्या नियोजनबद्ध खेळीपुढे हैदराबादचा निभाव लागला नाही. २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर हैदराबाद पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळत होते. पण त्यांच्या खेळीत आत्मविश्वासाचा अभाव दिसला.
धावांचा पाठलाग करणाºया चेन्नईला सुरुवातीला जखडवून ठेवल्यानंतर हैदराबाद आपल्या बलाढ्य गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईचे स्वप्न धुळीस मिळवणार, असे दिसत होते. मात्र, खेळपट्टीचा योग्य अंदाज घेतल्यानंतर सावध सुरुवात केलेल्या वॉटसनने संपूर्ण सामन्यात आपलाच दबदबा राखला.
वॉटसनने अखेरपर्यंत संघाचा किल्ला लढवताना ५७ चेंडूंत ११ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद ११७ धावांची आतषबाजी केली. विशेष म्हणजे त्याने झळकावलेले शतक आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यातील केवळ दुसरेच शतक ठरले. तसेच यंदाच्या सत्रात वॉटसनचे हे दुसरे, तर स्पर्धा इतिहासात एकूण चौथे शतक ठरले.
फाफ डू प्लेसिस (१०) अपयशी ठरल्यानंतर सुरेश रैनाने २४ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह ३२ धावा करत वॉटसनला चांगली साथ दिली. वॉटसन - रैना यांनी दुसºया गड्यासाठी ११७ धावांची भागीदारी करून संघाचा विजय आवाक्यात आणला. १४ व्या षटकात रैना बाद झाल्यानंतर अंबाती रायुडूने १९ चेंडूंत नाबाद १६ धावा काढून वॉटसनला अखेरपर्यंत साथ दिली.
नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक वेगवान मार्ग मानल्या जाणाऱ्या ईस्टर्न पेरिफरल एक्स्प्रेस-वेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले आहे. हा एक्स्प्रेस वे देशातील पहिला स्मार्ट आणि हरित एक्स्प्रेस-वे आहे. 135 किलोमीटर लांबीच्या असलेल्या या दिल्ली-मेरठ एक्सप्रेस-वेचा पंतप्रधान मोदी आज शुभारंभ केला. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण एक्स्प्रेस-वेची माहिती पंतप्रधानांना दिली. या एक्स्प्रेस-वेच्या 9 किमी लांब रस्त्याचे उद्घाटन मोदींनी केले. यावेळी मोदींनी 6 किमीपर्यंत रोड शोही केला.
रोड शो सुरू होण्यापूर्वी जेव्हा मोदी आपल्या वाहनातून पुढे जाऊ लागले. तेव्हा अचानक मोदींनी गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी गडकरींना आपल्या गाडीत येण्याचे संकेत दिले. गडकरी यांच्याबरोबर मोदींनी रोड शोची सुरूवात केली.
दरम्यान, या मार्गावर 120 किमी प्रति तास गतीनं गाडी चालवण्याची परवानगी असल्यानं यास सर्वाधिक वेगवान एक्स्प्रेस वे म्हटले जात आहे. या एक्स्प्रेस वेसाठी 11 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. राजधानी नवी दिल्लीतील वाहतूक कोंडी समस्येतून प्रवाशांना मुक्तता देण्याच्या योजने अंतर्गत हा एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जात आहे. गाजियाबाद, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा आणि पलवलला हा एक्स्प्रेस वे जोडला जाणार आहे.
महत्वाच्या घटना
१९०७: पहिली आइल ऑफ मॅन टीटी रेस आयोजित करण्यात आली.
१९३७: फोक्सवॅगन (व्ही.डब्ल्यू) जर्मन ऑटोमोबाइल उत्पादक कंपनी स्थापन झाली.
१९५८: ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
१९६४: पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) ची स्थापना झाली.
१९९८: बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
१९९९: इटली मध्ये लिओनार्डो दा विंची यांचे द लास्ट सपर हे चित्र प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले.
जन्म
१८८३: क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)
१९०३: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९९४)
१९०७: स्वातंत्र्यसेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९९४)
१९२१: शास्त्रीय गायक पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर १९५५)
१९२३: तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९९६)
१९४६: भारतीय कवी आणि समीक्षक के. सच्चिदानंदन यांचा जन्म.
मृत्यू
१९६१: प्राच्यविद्या संशोधक परशुराम कृष्णा गोडे यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १८९१)
१९८२: बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर यांचे निधन.
१९९४: हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.
१९९९: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते बी. विट्टालाचारी यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १९२०)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.