चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ ऑगस्ट २०१९

Date : 28 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अरूण जेटलींना आदरांजली; ‘या’ स्टेडिअमला मिळणार त्यांचं नाव :
  • माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी निधन झाले. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना आदरांजली म्हणून दिल्लीतील फिरोजशहा कोटला स्टेडियमला माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी केली होती.

  • त्यानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) स्टेडियमला जेटली यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (DDCA) चे अध्यक्ष रजत शर्मा यांनी ही माहिती दिली.

  • अरुण जेटली यांचा राजकीय प्रवास अनेकांना ज्ञात आहे, पण त्यांनी अनेक क्रिकेटपटू घडवण्यातही  मोठा वाटा उचलला. त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळेच भारतीय क्रिकेटला वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा, विराट कोहली, ऋषभ पंत यांसारखे खेळाडू मिळू शकले. याशिवाय जेटली यांच्या कार्यकाळात त्या स्टेडियमला एक नवे आणि अत्याधुनिक रुप प्राप्त झाले होते. या स्टेडियममध्ये अव्वल दर्जाचे ड्रेसिंग रूम बांधण्यात आले.

  • त्यातही जेटली यांचे योगदान होते. या स्टेडियममध्ये चांगल्या सुविधा आणि प्रेक्षकांना बसण्याची आसनक्षमता या बाबींकडे त्यांनी लक्ष पुरवले. स्टेडियममधील आसनक्षमता वाढवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी पाठपुरावा केला आणि त्याप्रकारे योजनांची अंमलबजावणी करून घेतली.

पूरस्थितीवर मात करण्यासाठी ‘इस्रो’ची मदत :
  • गेल्या पंधरा वर्षांत राज्यातील सर्व नद्यांच्या काठांवरील जमीन वापर पद्धती (लॅण्ड यूज पॅटर्न) कशी बदलली आहे, याचा अभ्यास उपग्रह नकाशांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) मदत घेण्यात येणार असून हा अभ्यास लवकरच सुरू होणार आहे. या अभ्यासातून येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येतील.

  • यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांना पुराचा फटका बसला. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळेच कोल्हापूर, सांगलीत पुराची समस्या उद्भवते, असे मानता येणार नाही. कृष्णा खोऱ्याची भौगोलिक स्थिती, अतिवृष्टी हे मुद्देही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पूर परिस्थिती नेमकी कशामुळे तयार होते, याबाबत उपग्रह नकाशांच्या मदतीने नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अभ्यासासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी लागेल. याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा झाली आहे.

  • दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तसेच उर्वरित राज्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर – एमआरएसएसी), भारतीय हवामान विभाग, भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमडब्लूआरआरए), जलक्षेत्रातील विश्लेषक यांची तज्ज्ञ अभ्यास समिती गठित केली आहे. ही समितीही राज्यातील नदीकाठांचा डिजिटल विदा तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना करणार आहे.

पी. व्ही. सिंधू देशाचा अभिमान - पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची भेट घेतली आणि तिचं कौतुक केलं आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटून पी. व्ही. सिंधूने २६ तारखेला स्वित्झर्लंड या ठिकाणी झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतपदावर आपले नाव कोरले.

  • सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहराला २१-७, २१-७ अशा सेटमध्ये हरवत पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पी. व्ही. सिंधूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. पी. व्ही. सिंधू आपल्या देशाचा अभिमान आहे असे गौरोद्गार त्यांनी काढले आहेत. सिंधूने बॅडमिंटनच्या स्पर्धेत जगज्जेतेपदावर नाव कोरल्याचा आनंद झाला असेही मोदींनी म्हटले आहे. त्यांनी तिचं कौतुक केलं तसेच तिला भविष्यातल्या चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

  • स्वित्झर्लंड येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने उपात्यपूर्व फेरीत शनिवारी चीनच्या चेन यू फेईचे आव्हान सहज परतवून लावले होते. सिंधूने फेईचा २१-७, २१-७ असा सरळ पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. 

  • यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपदाने सिंधूला दोनवेळा हुलकावणी दिली होती. मात्र मागील अपयशावर मात करीत सिंधूने अखेर जेतेपदाला गवसणी घातली. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सिंधू आपल्या देशाचा अभिमान आहे तिच्या कामगिरीचा गौरव वाटतो असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

पहिल्या पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचे निधन :
  • देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे मुंबईत सोमवारी निधन झाले. उत्तराखंड पोलीस दलाने त्यांच्या निधनाबाबत समाजमाध्यमावर संदेश पाठवून दु:ख व्यक्त केले आहे. भट्टाचार्य यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तराखंड आयपीएस पोलीस संघटनेने त्यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे की, भट्टाचार्य यांची अमूल्य सेवा सर्वाच्या स्मरणात राहील.

  • मुंबई येथील रूग्णालयात त्यांचे प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांच्या पश्चात पती व दोन मुली आहेत. चौधरी या १९७३ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी  होत्या. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशात झाला. २००४ ते २००७ या काळात त्या उत्तराखंड पोलिस दलात महासंचालक पदावर होत्या. 

  • ३३ वर्षांच्या सेवेत त्यांनी बॅडमिंटनपटू सईद मोदी  मृत्यू प्रकरण, रिलायन्स -बॉम्बे डाइंग प्रकरण यात तपास केला होता. त्याआधी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातही काम केले. १९९७ मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक मिळाले. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना राजीव गांधी पुरस्कारही मिळाला होता. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जम्मू काश्मीरमध्ये केंद्राचा रोजगार निर्मितीवर जोर :
  • जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पाऊले उचलली आहेत. यासाठी रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असून, स्थानिक तरुणांसाठी लष्कर आणि निमलष्करी दलात मेगा भरतीही केली जाणार आहे.

  • केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवले आहे. लवकरच जम्मू काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले जाणार आहे. यापार्श्वभूमीवर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात निर्बंध घालण्यात आले होते. आता ही बंधने हळूहळू शिथिल केली जात आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकासाला चालना देऊन रोजगार निर्मितीवर केंद्राने लक्ष वळवले आहे. याचाच एक भाग म्हणून जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील तरुणांसाठी लष्कर आणि निम लष्करी दलात 50,000 जागांची भरती करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.

  • यासंदर्भात केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत जम्मू , काश्मीर आणि लडाखमध्ये केंद्राच्या विविध योजना पोहोचवण्यावर चर्चा करण्यात आली. काश्मीर खोऱ्यातील निर्बंध उठवण्यात आल्यानंतर ही कामे सुरू केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. विकासाच्या प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. शांततापूर्ण मार्गाने विकास करण्यासाठी तसेच तरुणांमध्ये रोजगारक्षम कौशल्य निर्मिती करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.

  • १९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.

  • १९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.

  • १९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

जन्म 

  • १७४९: जर्मन महाकवी, कलाकार योहान वूल्फगाँग गटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च १८३२)

  • १८९६: उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९८२)

  • १९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.

  • १९१८: मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)

  • १९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.

  • १९२८: सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च २००४)

  • १९३४: सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा सुजाता मनोहर यांचा जन्म.

  • १९३८: कॅनडाचे पंतप्रधान पॉल मार्टिन यांचा जन्म.

  • १९५४: भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री रवी कंबुर यांचा जन्म.

  • १९६५: पोकेमोन चे निर्माते सातोशी ताजीरी  यांचा जन्म.

  • १९६६: माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११)

  • १९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन.

  • १९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१)

  • २००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.