केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यावेळी नोएडातील मेघना श्रीवास्तव ही विद्यार्थीनी ९९.८ टक्के मिळवत देशात पहिली आली. मेघनाला एकूण ४९९ गुण मिळाले आहेत. निकाल लागल्यानंतर मेघना कोणत्या क्षेत्रात करिअर करणार हा प्रश्न सा-यांनाच पडला आहे. मात्र मेघनाने तिच्या करिअरविषयी एक खुलासा केला आहे.
मेघनाला मानसशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून पुढे ती मानसशास्त्र या विषयावर लक्षकेंद्रीत करणार आहे. मानसशास्त्र तिचा आवडता विषय असल्यामुळे याच विषयात काही तरी करावं अशी तिची इच्छा आहे. मात्र, पुढे जाऊन कोणत्या क्षेत्राची निवड करावी हे निश्चित नाही. त्यामुळे करिअरबाबत अद्याप काहीच ठरविले नसल्याचे तिने सांगितले. ‘करिअर म्हणून कोणत्या क्षेत्राची निवड करावी हे अजून ठरवलं नाही. त्यावर फक्त विचार सुरु आहे’, असेही ती म्हणाली.
पुढे ती असेही म्हणाली, वर्षभर मेहनत केल्यानंतर मला आजचा दिवस बघायला मिळत आहे. मला प्रत्येक विषय आवडतो त्यामुळे मी प्रत्येक विषयाला समान वेळ देत होते. मी रात्री जागून कधीच अभ्यास केला नाही. त्यामुळे माझ्या यशामागे कोणतंही मोठ गुपित लपलेलं नाही. उलट माझ्या मेहनतीबरोबर माझे आई-वडील आणि शिक्षक यांनीदेखील मेहनत घेतली. माझ्या गुणांमध्ये त्यांचे योगदान अधिक आहे, असे मेघनाने यावेळी सांगितले.
मेघनाने उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरमधील स्टेप बाय स्टेप स्कूल येथून शिक्षण पूर्ण केलं असून तिला इतिहास, भूगोस,मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर इंग्रजी या विषयात ९९ गुण मिळाले आहेत.
मुंबई : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने बडोदे येथे झालेल्या ९१व्या साहित्य संमेलनात गुजरातमध्ये ‘गुजरात मराठी अकादमी’ स्थापन करण्याची मागणी केली होती. गुजरातसह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व छत्तीसगड या सीमावर्ती राज्यांतही या अकादमीची स्थापना करण्याची सूचना या वेळी करण्यात आली होती. त्यानुसार, शासनस्तरावर कार्यवाही सुरू केल्याची माहिती अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली.
शासनाच्या मराठी भाषा विभागाने या दोन्ही ठरावांतील मागण्यांच्या अनुषंगाने सीमावर्ती राज्यांशी चर्चा केली आहे. तसेच मराठी अकादमी स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करावा, असे निर्देश शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकांना दिले आहेत.
त्याप्रमाणे, १४ मे रोजी ही माहिती शासनाने महामंडळाला पत्र लिहून उपलब्ध करून दिल्याचे जोशी यांनी सांगितले.
पुणे - आपण खरंच स्वतंत्र आहोत का? प्रत्येक मनुष्य हा धर्म, जात, भाषा यांची विशिष्ट ओळख घेऊन जन्माला येतो. यामध्येच मनुष्याची विभागणी झालेली आहे. या धर्म, जातीच्या भिंती तोडण्याचे काम हे साहित्य करते. लेखनाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करणे ही लेखकांची जबाबदारी आहे. त्यासाठी भीती बाळगण्याची गरज नाही. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’ अशी गर्जना करीत समाजात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली होती.
त्यामुळे लेखकांवर कुणीही बंधनं घालू शकत नाही, अशा शब्दांत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रसिद्ध उडिया लेखिका डॉ. प्रतिभा राय यांनी देशातील असहिष्णुतेवर टीका केली.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११२व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या वेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, चंद्रकांत शेवाळे, परिषदेचे विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते.
सुरुवातीलाच ‘‘महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करीत आहे, या मातीत जन्माला आलेल्या शूरवीर, ज्ञानी, गुणीजन व्यक्तींना सादर प्रणाम करते. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे,’’ अशा मराठी बोलातून प्रतिभा राय यांनी पुणेकरांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, ‘‘लेखकाच्या लेखणीमध्ये देवाला आव्हान देण्याबरोबरच हे काय चालले आहे? असा जाब विचारून शत्रुत्व स्वीकारण्याइतकी ताकद आहे.
भयमुक्त भारत होणार नाही तोपर्यंत ही पृथ्वी भयमुक्त होणार नाही. देशात धर्म, जात, असमानता यातून उद्भवणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर लेखकांनी प्रहार करायला हवा.’’
मुंबई : मुंबईचं वानखेडे स्टेडियम आयपीएलच्या 'आखरी जंग'साठी सज्ज झालं आहे. याच वानखेडे स्टेडियममधून सात एप्रिलला आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा रथ निघाला होता. चेन्नई सुपर किंग्सनं मुंबई इंडियन्सला हरवून नव्या मोसमाची विजयी सलामी दिली होती. चेन्नईच्या त्याच फौजेनं मग वानखेडे स्टेडियमच्याच साक्षीनं फायनलमध्ये धडक मारली. आता आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरायचं तर चेन्नईसमोर आव्हान आहे ते सनरायझर्स हैदराबादचं.
कोण होणार आयपीएलच्या अकराव्या मोसमाचा चॅम्पियन... केन विल्यमसनची सनरायझर्स हैदराबाद की महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स? दक्षिणेच्या याच दोन फौजांमध्ये आज संध्याकाळी सात वाजता आयपीएलची फायनल रंगणार आहे.
ऑरेंज आणि यलो आर्मीमधल्या या लढाईच्या निमित्तानं सारं वानखेडे स्टेडियम भगव्या आणि पिवळ्या रंगात जणू न्हाऊन निघणार आहे.
आयपीएलच्या यंदाच्या महायुद्धात हैदराबाद आणि चेन्नईच्या फौजा आमनेसामने येण्याची ही चौथी वेळ आहे. हैदराबाद आणि चेन्नई संघांमध्ये साखळीत दोन लढाया झाल्या आहेत. तिसरी लढाई होती ती क्वालिफायर वनची. लढाई कोणतीही असो... चेन्नईनं हैदराबादवर तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. ट्वेन्टी ट्वेन्टीच्या मैदानात सामन्याच्या दिवशी सर्वोत्तम खेळ करणारा संघ हा जिंकत असतो. त्यामुळे हैदराबादच्या विजयाची आशा मावळलेली नाही.
सनरायझर्स हैदराबादनं 2016 साली डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर विल्यमसनच्या नेतृत्वाखाली हैदराबादनं पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची तर आयपीएल फायनलमध्ये खेळण्याची ही तब्बल सातवी वेळ आहे. धोनीच्या चेन्नईनं 2010 आणि 2011 साली आयपीएल विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. पण 2008, 2012, 2013 आणि 2015 सालच्या आयपीएलमध्ये चेन्नईला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयाचे रुपांतर आता विद्यापीठामध्ये झाले आहे. या महाविद्यालयाला राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियांनातंर्गत तब्बल 55 कोटींचा निधी लवकरच मिळणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
मुंबईतील सेंट झेव्हिअर्स आणि मिठीबाई या महाविद्यालयांनी देखील विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी अर्ज केला होता. परंतु सध्या तरी या महाविद्यालयांचे अर्ज प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, बंगळुरुतील गव्हर्मेंट सायन्स कॉलेज आणि सेंट जोसेफ कॉलेजला देखील विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.
शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय असून, या महाविद्यालयातून अनेक नामवंत व्यक्तींनी आतापर्यंत शिक्षण घेतले आहे.
नवी दिल्ली - आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात सर्वाधिक कठोर कायदे आहेत. मात्र, शनिवारी (26 मे) गर्भपातासंबंधी झालेल्या जनमत चाचणीत 66.4 टक्के लोकांनी गर्भपातावरील बंदी उठवण्यासाठी मत नोंदवत आपले समर्थन दर्शवले आहे. या निकालामुळे एका संघर्षाचा विजय झाला आहे.
बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, आयर्लंडमध्ये महिलांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यासच गर्भपात करण्याची परवानगी दिली जाते. मात्र बलात्कार प्रकारात गर्भपात करण्याची अनुमती येथे नाही. दरम्यान, गर्भपातासंदर्भात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालामुळे भारताच्या एका मुलीच्या कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला आहे.
काय आहे नेमका यामागील संघर्ष - कर्नाटकमधील बेळगावातील सविता हलप्पनवारचं कुटुंबीय या जनमत चाचणीच्या निकालामुळे अत्यंत आनंदी आहेत. भारतीय डेंटिस्ट असलेल्या सविता हलप्पनवारला 2012 साली गर्भपात करण्याची परवानगी देण्यात न आल्यानं तिचा आयर्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
गर्भपात करण्यासाठी वारंवार मागणी करुनदेखील तिला परवानगी देण्यात आली नाही. गर्भावस्थेत संसर्ग झाल्यानं सविताचा मृत्यू झाला होता. सविताच्या मृत्यूमुळे आयर्लंडमध्ये गर्भपातासंदर्भात असलेल्या कठोर कायद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता व येथून संघर्षास सुरुवात झाली.
महत्वाच्या घटना
१८८३: अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.
१९०६: महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
१९४१: दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.
१९५१: मुंबई येथे तारापोरवाला मत्स्यालय सुरू झाले.
१९६४: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९९९: अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
२०१६: हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि हिबाकुशाला भेट देणारे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत.
जन्म
१९२३: अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते हेन्री किसिंजर यांचा जन्म.
१९३८: कादंबरीकार डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा जन्म.
१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी नितीन गडकरी यांचा जन्म.
मृत्यू
१९१०: नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८४३)
१९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांचे निधन.
१९६४: भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)
१९८६: संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरुळकर यांचे निधन.
१९८६: भारतीय राजकारणी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अजय मुखर्जी निधन. (जन्म: १५ एप्रिल १९०१)
१९९४: विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९०१)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.