चालू घडामोडी - २७ मार्च २०१८

Date : 27 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हेरगिरीच्या आरोपावरुन ६० रशियन अधिकाऱ्यांची अमेरिकेतून हकालपट्टी :
  • वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प सरकारने अमेरिकेतून ६० रशियन अधिकाऱ्यांची हेर असल्याचा ठपका ठेवून गच्छंती केली आहे. एवढेच नाही तर सिएटल येथील रशियन दूतावास बंद करण्याचाही आदेश दिला आहे.

  • अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाला धडा शिकवण्यासाठी उचललेले हे पाऊल आहे अशीही चर्चा आता रंगली आहे.

  • कोणत्याही परिस्थिती हेरगिरी खपवून घेतली जाणार नाही. असं म्हणत या ६० जणांची हकालपट्टी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असं ट्रम्प प्रशासनाच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.

जागतिक रंगभूमी दिन : प्राथमिक शिक्षणात नाट्यकलेला प्राधान्य द्या - राम गोपाल बजाज :
  • ठाणे : ‘पृथ्वी हा ग्रह वाचवायचा असेल; तर रंगभूमी वाचवा. त्यासाठी मुलांना प्राथमिक शिक्षणात अभिनयकलेला प्राधान्य द्या. तरच, पुढची पिढी अधिक संवेदनशील असेल’, असा संदेश प्रसिद्ध रंगकर्मी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक राम गोपाल बजाज यांनी दिला असून तो युनेस्कोने जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जगभरात प्रसारित केला आहे.

  • १९६२ पासून युनेस्को दरवर्षी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने आमंत्रित केलेल्या एका जगप्रसिद्ध रंगकर्मीचा रंगभूमीविषयक संदेश ‘जागतिक रंगभूमी दिवस आंतरराष्ट्रीय संदेश’ म्हणून प्रसारित करते. १९४८ साली स्थापन झालेल्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटला ७० वर्षे झाल्याचे औचित्य साधून यावर्षी जगभरातील पाच नामवंत नाट्यकर्मींचे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत.

  • त्यात, भारतातून राम गोपाल बजाज, अरब देशांपैकी लेबनॉनमधील माया झबिब, युरोपमधून यूकेतील सायमन मॅकबर्नी, अमेरिकेतून मेक्सिकोच्या सबिना बर्मन आणि आफ्रिकेच्या आयव्हरी कोस्टच्या वेरे वेरे लायकिंग या पाच जणांचे संदेश प्रसारित झाले आहेत.

  • मुंबईत अनेक वर्षांपासून जागतिक रंगभूमी दिवसाचे निमित्त साधून अवतरण अकादमी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आायोजन करते. या संस्थेचे प्रमुख, प्रसिद्ध नाटककार आणि नाट्यप्रशिक्षक संभाजी सावंत इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या संदेशाचे मराठी भाषांतर करून, त्याचे वाचन करतात. बजाज यांनी जगाला दिलेल्या संदेशाचा त्यांनी मराठी अनुवाद केला असून २८ मार्चला बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रात्री ८.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात त्याचे वाचन करणार आहेत.

आता बेकायदा बांधकामांवर उपग्रहांची नजर :
  • बेकायदा इमारती आणि झोपडपट्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महापालिका उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांची मदत घेणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या संस्थांकडून ही छायाचित्रे घेण्याच्या प्रस्तावाला लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे.

  • बेकायदा इमारती, झोपड्या आणि अन्य बांधकामांवर पालिकेने कारवाई केल्यानंतर अनेक वेळा हे वाद न्यायालयात जातात. त्यामुळे कारवाईत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी उपग्रहामार्फत शहरातील काढलेल्या छायाचित्रांची मदत घेण्याच्या पर्यायाची चाचपणी पालिका करीत आहे.

  • राज्य सरकारने उपग्रहांमार्फत छायाचित्र घेण्याची परवानगी काही संस्थांना दिली आहे. त्या संस्थांकडून छायाचित्र घेऊन त्यांचे विश्‍लेषण करण्यात येईल. आता प्रशासकीय मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.

'स्वच्छ भारत अभियान' अभ्यासाचा विषय होणार :
  • स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) स्वच्छ भारत अभियान या वैकल्पिक विषयास मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम फक्त थिअरी पद्धतीने न राहता प्रॅक्‍टीकली स्वरूपात आणण्यात येणार आहे.

  • युजीसीच्या 530 व्या बैठक 20 मार्च रोजी झाली. या बैठकीत सीबीसीएस (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टिम) प्रणालीमध्ये स्वच्छ भारत अभियान या विषयाचा अंतर्भाव करण्यात आले आहे.

  • उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा वैकल्पिक विषय असणार आहे. या विषयामध्ये 15 दिवसाचे (100 तास) इंटर्नशिप विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. इतर विषयाप्रमाणे या विषयाला दोन क्रेडिट गुण देण्यात येणार आहेत.

  • उन्हाळ्यामध्ये घेण्यात येणाऱ्या इंटर्नशिपमध्ये ग्रामीण भाग, झोपडपट्टी भागात स्वच्छता अभियान घ्यायचे आहे. यासोबतच स्वच्छ केलेला भाग कायमचा स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष द्यायचे आहे. या इंटर्नशिपमधुन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारचा अनुभव मिळणार आहे, ज्यामुळे भारतातील शिक्षणाचा स्तर देखिल उंचावणार आहे.

पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणेंचे निधन :
  • औरंगाबाद - एक विचारवंत लेखक, दलित साहित्याचे अभ्यासक, संपादक आणि पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचे मंगळवारी (27 मार्च) निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजाराशी झूंज देत होते. अखेर मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

  • रात्री उशिरा 2 वाजण्याच्या सुमारास  पानतावणे यांनी औरंगाबाद येथील मणिक हॉस्पिटमध्ये अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर छावणी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 2018 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्यांना पुरस्कार स्वीकारता आला नाही.

  • डॉ. गंगाधर पानतावणे यांनी 2009 साली अमेरिकेतील सान होजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. दलित साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्यांनी केलेले बरेचसे लेखन हे दलित साहित्याच्या अनुषंगाने असेच आहे. त्यापैकी `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मुकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे.

  • अस्तितादर्श` या नियतकालिकाच्या संपादकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारीही त्यांनी घेतली होती. तसेच दलित आत्मकथा, दलित साहित्य, चर्चा आणि चिंतन, लोकरंग, स्त्री आत्मकथन, महारांचा सांस्कृतिक इतिहास हे त्यांनी संपादन केलेले काही ग्रंथ. चळवळीला वैचारिक अधिष्ठान देणारे नियतकालिका म्हणून अस्मितादर्शकडे पाहिले जाते. 

गुगलने साकारले 'चिपको आंदोलन'चे डुडल :
  • चिपको आंदोलनाला 26 मार्च रोजी 45 वर्षे पूर्ण झाल्याने गुगलने आपल्या डुडलवर चिपको आंदोलनाचे चित्र रेखाटले आहे.

  • उत्तराखंडमध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल या गावात 1973 साली सर्वप्रथम चिपको आंदोलनाची सुरवात झाली. जंगल व झाडे वाचवण्यासाठी हे आंदोलन खेड्यातील ग्रामस्थांनी सुरू केले.

  • जंगलातील मोठमोठी वृक्ष वाचवण्यासाठी दिलेला हा लढा आजही महत्त्वपूर्ण मानला जातो. सरकारचे ठेकेदार झाडे कापायला असंख्य लोक घेऊन यायचे, त्यावेळी गावातील महिला, लहान मुले त्याला विरोध करत झाडांना मिठी मारून उभ्या रहायच्या. 'पेड कटने नहीं देंगे'च्या घोषणा द्यायच्या. यामुळे अनेक जंगले, झाडे वाचली. त्या झाडांवर राहणारे पशुपक्षी वाचले. महिलांनी दाखवलेल्या या धैर्याचे आजही कौतुक होते.

  • अलकनंदा खोऱ्यातील जंगलाच्या एका भूभागात 'दाशैली ग्राम स्वराज्य संघ' या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती, पण सरकारने ती नाकारली. त्याऐवजी क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला हा भूभाग देण्याचे निश्चित करण्यात आले. यालाच विरोध म्हणून चिपको आंदोलनाची सुरवात झाली.

  • पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनात पुढाकार घेऊन सरकारला विरोध केला. त्याचबरोबर गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया या आंदोलनात उतरल्या. गौरादेवीने आसपासच्या गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात 'चिपको' आंदोलन सुरू केले.

दिनविशेष : 
  • जागतिक रंगमंच दिवस

महत्वाच्या घटना 

  • १६६७: शिवरायांना सोडुन गेलेल्या नेताजी पालकरचे औरंगजेबाने धर्मांतर केले व यांचे नाव महंमद कुली खान ठेवले.

  • १७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.

  • १८५४: क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९५८: निकीता क्रुश्चेव्ह सोविएत रशियाचे अध्यक्ष झाले.

  • १९६६: २० मार्च रोजी चोरीला गेलेला फुटबॉलचा विश्वचषक दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला सापडला. त्यानंतर हा चषक १९८३ मधे पुन्हा चोरीला गेला, तो आजतागायत सापडलेला नाही.

  • १९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर पॅन अ‍ॅम आणि के. एल. एम. या दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर होऊन ५८३ जण ठार झाले.

  • १९९२: पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.

  • २०००: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.

जन्म

  • १७८५: फ्रान्सचा राजा लुई (सतरावा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ जून १७९५)

  • १८४५: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विलहेम राँटजेन यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)

  • १८६३: रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते हेन्री रॉयस यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९३३)

  • १९०१: डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार कार्ल बार्क्स यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)

मृत्यू

  • १८९८: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचे निधन. (जन्म: १७ ऑक्टोबर १८१७)

  • १९५२: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोटा यांचे निधन. (जन्म: ११ जून १८९४)

  • १९६७: नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १८९०)

  • १९६८: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९३४)

  • १९९२: साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. शरच्‍चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.

  • १९९७: संगीत नाटकातील अभिनेते व गायक भार्गवराम आचरेकर यांचे निधन.

  • २०००: हिन्दी चित्रपट अभिनेत्री वेरा सुंदर सिंग तथा प्रिया राजवंश यांची चेतन आनंद यांच्या मुंबईतील रुईया पार्क येथील बंगल्यात हत्या करण्यात आली.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.