चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ जुलै २०१९

Date : 27 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
तुलसी गबार्ड यांच्याकडून ‘गूगल’वर ५० दशलक्ष डॉलरचा दावा :
  • वॉशिंग्टन : अमेरिकी काँग्रेसच्या पहिल्या हिंदू सदस्य आणि आगामी अध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार असणाऱ्या तुलसी गबार्ड यांनी गूगलवर ‘भेदभाव’ केल्याचा आरोप करून ५० दशलक्ष डॉलरचा दावा केला आहे.

  • तुलसी यांनी गूगलवर आरोप केला आहे की, गूगलने त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असून त्यांच्या प्रचार प्रक्रियेमध्ये भेदभाव केला आहे. २०२० मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी २० हून अधिक जण मैदानात असून ३८ वर्षीय गबार्ड त्यापैकी एक आहेत.

  • गबार्ड यांच्या निवडणूक प्रचार समितीनुसार २७ आणि २८ जून रोजी झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर गूगलने त्यांच्या प्रचार अभियानाशी निगडित जाहिरातींचे खाते सहा तासांसाठी बंद केले होते. त्यामुळे त्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि निधी मिळवण्यात अडथळा निर्माण झाला, असा आरोप गबार्ड यांनी  केला आहे.

  • यावर गूगलचे प्रवक्ते जोस कास्टानेडा यांनी गूगलची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जाहिरात करणाऱ्यांच्या खात्यामधून विपरित क्रियेतून कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी गूगलची स्वयंचलित यंत्रणा खाते चिन्हांकित करत असते. गबार्ड यांच्याबाबतीतही तेच झाले आहे. आमच्या यंत्रणेने खात्याचे कामकाज थांबवून पुन्हा ते कार्यान्वित केले.

‘हे’ आहेत २१२ कोटींचे वार्षिक वेतन घेणारे भारतीय :
  • ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स तयार करणाऱ्या एचइजी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवि झुंझुनवाला हे 2018-19 या आर्थिक वर्षात सर्वाधित वेतन घेणारे व्यक्ती ठरले आहेत. या आर्थिक वर्षात त्यांनी 121.27 कोटी रूपयांचे वेतन घेतले. गेल्या आर्थिक वर्षापेक्षा त्यांचे सुरू आर्थिक वर्षातील वेतन तब्बल 180 टक्क्यांनी अधिक आहे. सर्वाधिक वेतन घेणाऱ्या व्यक्तीच्या यादीत ते आता पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत.

  • सुरू आर्थिक वर्षात ग्रॅफाइच्या किंमतीत रेकॉर्ड वाढ झाली होती. त्याचाच फायदा एचइजी कंपनीला झाला होता. दरम्यान, कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत घट झाली असल्याचे सांगत त्यांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ ही अयोग्य असल्याचे कॉर्पोरेट गव्हर्नंन्सवर देखरेख ठेवणाऱ्यांकडून सांगण्यात आले. अद्याप सर्व कंपन्यांनी आपले अॅन्युल रिपोर्ट सादर केले नाहीत. परंतु अन्य कंपन्यांची आकेडवारी आल्यानंतर झुंझुनवाला पहिल्या क्रमांकावरून घसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • गेल्या आर्थिक वर्षात टेक महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीपी गुरनानी 146 कोटी रूपयांच्या वेतनासह पहिल्या क्रमांकावर होते. तर सन टीव्हीचे अध्यक्ष कलानिधि मारन 87.5 कोटी रूपयांच्या वेतनासह दुसऱ्या क्रमांकावर होते. दरम्यान, झुंझुनवाला यांना मिळालेल्या वार्षिक वेतनात कंपनीला मिळालेल्या नेट प्रॉफिटच्या 2.5 टक्के कमिशनही सामिल आहे. गे

  • ल्या आर्थिक वर्षात झुंझुनवाला यांचे वेतन 43.33 कोटी रूपये तर 2017 या आर्थिक वर्षात त्यांचे वेतन 2.34 कोटी रूपये होते. सुरू आर्थिक वर्षात एचइजी कंपनीचा नेट सेल 140 टक्क्यांनी वाढून 6 हजार 593 कोटी रूपये झाला आहे. तर नेट प्रॉफिटही 175 टक्क्यांनी वाढून 3 हजार 26 कोटी रूपये झाले आहे. दरम्यान, झुंझुनवाला यांच्यानंतर हीरो मोटोकॉर्पच्या पवन मुंजाल यांचा क्रमांक आहे. त्यांनी सुरू आर्थिक वर्षात 81.41 कोटी रूपयांचे वेतन घेतले.

संसदीय समित्यांची नियुक्ती :
  • नवी दिल्ली : संसदेच्या विविध समित्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून अत्यंत महत्त्वाची वित्तीय समिती लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • संरक्षण, रेल्वे, कररचना, नागरी विकास तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या ताळेबंदावरील महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालाची छाननी करण्याची जबाबदारी लोकलेखा समितीकडे असते. गेल्या वर्षी राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भातील कॅगचा अहवाल लोकलेखा समितीकडे दिल्याचा दावा केंद्र सरकारने केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.

  • केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्याचे काम लोकलेखा समिती अप्रत्यक्षपणे करत असते. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याकडे या समितीचे अध्यक्षपद दिले जाते. मात्र गेल्या लोकसभेप्रमाणे नव्या लोकसभेतही विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला संख्याबळाअभावी मिळालेले नाही. विरोधी पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाचे गटनेते या नात्याने अधीर रंजन चौधरी यांच्याकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या समितीतील २२ सदस्यांपैकी सात राज्यसभेचे सदस्य आहेत.

  • गिरीश बापट अंदाज समितीचे अध्यक्ष : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयाच्या खर्चाचा आणि निधी वापराचा हिशोब ठेवणाऱ्या अंदाज समितीचे (एस्टिमेट्स कमिटी) अध्यक्षपद गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आले असून सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षा भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी असतील. इतर मागासवर्गीय कल्याण समिती नियुक्त झाली असून गणेश सिंह हे समितीचे अध्यक्ष असतील. अनुसूचित जाती-जमाती कल्याण समितीचे अध्यक्षपद किरीट सोळंकी यांच्याकडे देण्यात आले आहे.

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार :
  • बंगळुरू : कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. ए. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी चौथ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाटय़ावर पडदा पडला असला तरी येडियुरप्पांसमोर ३१ जुलैपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे.

  • कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना राज भवन येथे झालेल्या समारंभात मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. शुक्रवारी केवळ येडियुरप्पा यांनीच शपथ घेतली.

  • राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव ९९ विरुद्ध १०५ मतांनी फेटाळण्यात आल्यानंतर कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस आघाडीचे सरकार कोसळले आणि त्यानंतर तीन दिवसांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तारूढ झाले आहे.

  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी मी दूरध्वनीवरून चर्चा केली तेव्हा शहा यांनी शुक्रवारीच शपथविधीसाठी तयार राहण्याची सूचना आपल्याला केली, असे येडियुरप्पा म्हणाले, तसेच मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश करावयाचा याचा निर्णय शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतरच घेण्यात येईल, असे येडियुरप्पा म्हणाले. कर्नाटकमधील यापूर्वीच्या काँग्रेस-जेडीएस आघाडीच्या १५ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर मंगळवारी आघाडी सरकार कोसळले.

राज्यातील नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी ट्रस्टची स्थापना होणार :
  • मुलुंडयेथील कालीदास नाट्यमंदीर येथे अस्तित्वात असलेल्या ट्रस्टच्या धर्तीवर राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकामधील नाट्यगृहांची दुरुस्ती व देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याबाबत निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील सिने कलावंत, नाट्य व लोककलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याविषयासंदर्भात विधानभवनात बैठक पार पडली.

  • यावेळी नाटयगृहात चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नाटयगृहाची पाहणी करावी, सर्व नाटयगृहातील स्वच्छतागृहात पाण्याची सोय करणे, नाटयगृहातील खिडक्या, जाळया, दारे, फर्शी दुरुस्ती कचरापेटी उपलब्ध आहेत किंवा नाही नाही इत्यादी बाबींची पाहणी करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाटयगृहात आपत्तकालीन स्थितीत अधिकाऱ्यांचा दुरध्वनी क्रमांक नाटयगृहात दर्शनी भागात लावण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

  • यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कलाकारांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती सादर करण्यात आली. यावेळी नाट्यकलावंत आदेश बांदेकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, कार्यवाह सुशांत शेलार उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच अभिनेते भरत जाधव यांनी नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत आपले मत व्यक्त केले होते.

  • ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे भरतने एक फेसबुक व्हिडीओ करत त्याचा संताप व्यक्त केला होता. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये भरतच्या नाटकाचा प्रयोग सुरु होता. यावेळी नाट्यगृहातील एसी बंद होते. अनेक वेळा याविषयी तक्रार करुनही येथील प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे भरत जाधव प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले होते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

  • १८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.

  • १८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.

  • १९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.

  • १९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.

  • १९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.

  • १९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.

  • १९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.

  • १९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

  • १९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.

  • २००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.

  • २०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

जन्म

  • १६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)
  • १८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.

  • १९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)

  • १९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.

  • १९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.

  • १९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.

  • १९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.

  • १९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.

  • १९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)

  • १८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.

  • १९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.

  • १९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)

  • १९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० - गझनी, अफगाणिस्तान)

  • १९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.

  • २००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)

  • २००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)

  • २०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.