चालू घडामोडी - २७ फेब्रुवारी २०१८

Date : 27 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
स्ट्रेंड्जा मुष्टीयुद्ध स्पर्धा : विकास कृष्ण ठरला सर्वोत्तम खेळाडू :
  • नवी दिल्ली : नुकताच झालेल्या स्ट्रेंड्जा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेल्या भारताच्या विकास कृष्ण याची स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. यामुळे त्याच्या यशाला ख-या अर्थाने सुवर्ण झळाळी प्राप्त झाली.

  • २६ वर्षीय विकासने मिडलवेट (७५ किलो) गटामध्ये सुवर्ण पदक जिंकताना अमेरिकेच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्य विजेता ट्राय इसले याला नमविले होते. विशेष म्हणजे, गतवर्षी एप्रिल - मे महिन्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पटकावल्यानंतर विकासने पटकावलेले हे पहिले पदक ठरले.

  • त्याचवेळी हाताच्या दुखापतीतून सावरुन पुनरागमन केलेला विकासला गेल्यावर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला वॉकओव्हर देण्याच्या कारणावरुन बेशिस्तपणाच्या कारवाईलाही सामोरे जावे लागले होते. त्यामुळे हे सुवर्ण पदक विकाससाठी खूप महत्त्वाचे आहे.

  • स्पर्धेत सर्वोत्तम ठरल्यानंतर विकासने वृत्तसंस्थेला म्हटले की, ‘हे खूप चांगले पुनरागमन ठरले व आता मी स्वत:ला खूप मजबूत मुष्टीयोद्धा मानतो. आपल्या वजनी गटाला एका निश्चित स्तरावर कायम राखण्यात आता मला पूर्वीप्रमाणे अडचण होत नाही. मी तंत्रामध्ये आणि शारीरिक क्षमतेत सुधारणा केली आहे.’(source :lokmat)

बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू, मृतदेह येण्यास विलंब; आज अंत्यसंस्कार :
  • दुबई/मुंबई : ख्यातनाम अभिनेत्री श्रीदेवी हिचा मृत्यू हृदयक्रिया अचानक बंद पडून नव्हे, तर हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून झाल्याचे दुबई पोलिसांनी सोमवारी जाहीर केले. दिवसभर वृत्तवाहिन्यांनी संशय व्यक्त केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी तिच्या कुटुंबाने श्रीदेवीच्या मृत्यूमध्ये आम्हाला संशय घेण्यासारखे काही वाटत नाही, असे स्पष्ट केले.

  • श्रीदेवीचे पार्थिव सोमवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबईत येण्याची शक्यता आहे. पार्थिव आल्यानंतर काही वेळ ते रिक्रिएशन हॉलमध्ये ठेवण्यात येईल आणि नंतर विलेपार्ले येथील पवनहंसजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. सिनेसृष्टीतील असंख्य तारे-तारकांनी सांत्वन करण्यासाठी अनिल कपूरच्या निवासस्थानी रीघ लावली, तर चाहते श्रीदेवीच्या लोखंडवालामधील घराच्या बाहेर प्रतीक्षा करीत होते.

  • दुबई पोलिसांचे काय म्हणणे - श्रीदेवी आधी बेशुद्ध झाली व नंतर बाथटबमध्ये बुडाली, असे दुबई पोलिसांचे म्हणणे आहे. शवविच्छेदनानंतर श्रीदेवीचा मृतदेह सुस्थितीत राहावा, यासाठी त्याच्यावर रासायनिक मुलामा दिला गेला. त्यानंतर, पुढील कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रॉसिक्युटर कार्यालयाकडे सुपुर्द केला गेला. पार्थिव आणण्यासाठी रविवारीच खासगी विमान गेले होते.

  • दुबईत भाच्याच्या लग्नाला गेलेल्या श्रीदेवीचा गेल्या आठवड्यापासून जुमेरा एमिरेट््स टॉवर हॉटेलच्या २२व्या मजल्यावरील स्युटमध्ये मुक्काम होता. लग्नानंतर श्रीदेवीचे पती बोनी कपूर मुंबईला परतले. मात्र, शनिवारी सायंकाळी ते परत दुबईला गेले.(source :lokmat)

मराठमोळं मॉरिशस; पाचूच्या बेटावर दीडशे वर्षं फडकतेय भगवी पताका :
  • स्वच्छ समुद्रकिनारे आणि स्वर्गीय निसर्गसौंदर्य लाभलेले मॉरिशस हे बेट म्हणजे हिंद महासागरातील आफ्रिका खंडाजवळ असलेला देश आहे. या देशाला वेगवेगळ्या जाती-जमातींमधील सामाजिक सौंदर्यामुळे चांगले स्थैर्य लाभले आहे. येथे सुमारे ६५% लोकसंख्या भारतीय वंशाची आहे.

  • मॉरिशस ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, तेव्हा तेथे राबण्यासाठी त्यांनी दीडेकशे वर्षांपूर्वी भारतातील विविध प्रांतातून काही मजूर नेले होते. बिहार, तमीळनाडू आणि महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र-कोकण परिसरातील अनेक जणांना तेव्हा बळजबरी तिथे नेण्यात आलं होतं. 

  • मराठी वंशाचे मजूर जेव्हा मॉरिशसमध्ये आले तेव्हा मराठी संस्कृती आणि भाषा या दोन अमूल्य गोष्टींशिवाय त्यांच्याकडे काहीच नव्हते आणि त्यांनी हा खजिना इतका बहुमोलपणे जपून ठेवला की, आज आम्ही सातासमुद्रापलीकडे असूनही महाराष्ट्रापासून दूर आहोत असे वाटतच नाही.

  • वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाद्वारे मराठी संस्कृती आणि भाषा अजूनही जपली जात आहे. १८व्या शतकात महाराष्ट्रातून मॉरिशसमध्ये स्थलांतरित झालेल्या मजुरांनी जागरण, गोंधळ, संकष्ट चतुर्थी, सत्यनारायणाची कथा, गुढीपाडवा, गणेश चतुर्थी या पूजांद्वारे आणि सणांद्वारे आपली संस्कृती टिकवली आहे.(source :lokmat)

सुनीत जाधव सलग पाचव्यांदा महाराष्ट्र श्री :
  • मुंबई : भव्यदिव्य आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा शरीरसौष्ठवपटूंचा मुकाबला आणि मुंबईकर प्रेक्षकांनी भरभरुन दिलेली दाद... महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच विजेतेपदाचा 'पंच' मारला. सलग पाचव्यांदा 'महाराष्ट्र श्री'चा किताब पटकवण्याचा मान सुनीतने मिळवला. विजेत्या सुनीतला दीड लाखांच्या रोख पुरस्कारासह रॉयल एनफिल्ड देऊन गौरवण्यात आलं.

  • जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारे महेंद्र चव्हाण, आजी-माजी मुंबई श्री सुजन पिळणकर आणि अतुल आंब्रेवर यांच्यावर मात करत सुनीतने सलग पाचव्यांदा राज्य अजिंक्यपद राखलं. संपूर्ण स्पर्धेवर मुंबईकरांनी आपले वर्चस्व गाजवलं, तर फिजीक स्पोर्ट्स प्रकारामध्ये पुणेकरांनी बाजी मारली.

  • पुरुषांमध्ये रोहन पाटणकर तर महिलांमध्ये स्टेला गौडे विजेती ठरली. मुंबईने सांघिक विजेतेपदावर तर उपनगरने उपविजेतेपदावर आपला कब्जा केला.

  • शनिवारी झालेल्या प्राथमिक फेरीतील फुललेलं पीळदार सौंदर्य पाहिल्यानंतर रविवारची अंतिम फेरी ब्लॉकबस्टर होणार, याचा अंदाज बांधला जात होताच. मुंबईत वांद्रे पूर्वेला असलेलं पीडब्ल्यूडी मैदान संध्याकाळी पाच वाजताच खचाखच भरलं होतं. कृष्णा (महेश) पारकर यांनी अभिनव फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने शरीरसौष्ठवाचा राज्य सोहळा साकारला होता.(source :abpmajha)

लहान मुलांच्या हातात फोन, टॅब देत आहात ?... तर मग वेळीच सावध व्हा :
  • मुंबई - मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप कौतुकानं देणं हा काही स्टेटस सिम्बॉल नाही. ‘आम्ही किती आधुनिक’ म्हणून मिरवण्याचीही गोष्ट नाही. उलट यामुळं तुमच्या मुलाला याचा फटका बसू शकतो. इंग्लंडमधील डॉक्टरांनी नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, जी मुलं फोन किंवा टॅबचा वापर करतात त्यांच्या बोटाच्या मांसपेशींचा विकास व्यवस्थित होत नाही. त्यामुळं त्यांना पेन अथवा पेन्सिल पकडताना त्रास होऊ शकतो. 

  • ब्रिटनमधील हॉर्ट ऑफ इंग्लंड फाउंडेशन एनएचएस ट्रस्टमधील लहान मुलांचा थेरपिस्ट सैली म्हणतात की, सध्या शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांच्या हाताचे स्नायू तितकेसे मजबूजत नाही जे दहा वर्षांपूर्वींच्या मुलांमध्ये पहायला मिळायचे. पेन, पेन्सिल पकडण्यासाठी आणि लिहण्यासाठी आपल्या बोटाच्या मासपेशीवर आपलं नियंत्रण असावं लागते.

  • या कौशल्याचा विकास करण्यासाठी मुलांना परिश्रम करावे लागतात. लहान वयामध्ये बोटाचा विकास होणं गरजेच आहे. त्यासाठी तो व्यायाम व्हावा. मोबाइल आणि टॅबच्या वापरामुळं मुलांचे पेन, पेन्सिल वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याचप्रमाणे ते मैदानी खेळही विसरले आहेत. 

  • गार्डियनच्या वृत्तानुसार, मुलांची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळं मासपेक्षीचा विकास चांगल्या प्रकारे होतील. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल आणि टॅब देण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावं.(source :lokmat)

ग्रंथालयांच्या शुल्कात वाढ , वीस वर्षांनंतर वाढ करण्याचा शासनाचा निर्णय :
  • पुणे : शासकीय ग्रंथालयांना आता ‘अच्छे दिन’ येणार आहेत. पुस्तकांच्या वाढलेल्या किमती आणि अपुरी व्यवस्था यामुळे वीस वर्षांनंतर शासकीय ग्रंथालयांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सभासदांना आता दोन वर्षांसाठी एकशे दहा रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. येत्या १ एप्रिलपासून नवीन शुल्क रचनेची आकारणी होणार आहे. भाषादिनी ग्रंथपालांना ही अनोखी भेट मिळाली आहे.

  • ग्रंथालयांचे वैयक्तिक सभासद व संस्था सभासदांच्या अनामत रक्कम तसेच प्रवेश शुल्कामध्ये १९९८ पासून वाढ झालेली नाही. गेल्या वीस वर्षांमध्ये पुस्तकांच्या किमती वाढल्या आहेत. ग्रंथांच्या वाढत्या किमतींमुळे सभासद संख्येच्या प्रमाणात ग्रंथांची खरेदी करता येत नसल्याने ग्रंथ अपुरे पडतात.

  • ग्रंथालयांची सोय व ग्रंथालयांचे कामकाज सुरळीतपणे होण्यासाठी सभासद संख्या मर्यादित ठेवावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून सरकारी विभागीय ग्रंथालये व जिल्हा ग्रंथालयांच्या वैयक्तिक सभासद व संस्था सभासदांची अनामत रक्कम आणि प्रवेश शुल्क रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • ५०० रुपये : सध्या जिल्हा आणि विभागीय ग्रंथालयांची वैयक्तिक सभासदांसाठी अनामत रक्कम शंभर रुपये आहे तर नोंदणीकृत संस्थेसाठी पाचशे रुपये आहे. २५० रुपये : वैयक्तिक सभासदांना दोन वर्षांसाठी प्रवेश शुल्क वीस रुपये, तर संस्थेसाठी दीडशे रुपये आहे.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.

  • १९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

  • १९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.

  • २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

  • २००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

जन्म

  • १८०७: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८८२)

  • १८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १८२२)

  • १८९९: इन्सुलिन चे सहसंशोधक चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)

  • १९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९)

  • १९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)

  • १९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)

  • १९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.

मृत्यू

  • १८९२: फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८२१)

  • १८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचे निधन. (जन्म: १३ जून १८२२)

  • १९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.

  • १९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६)

  • १९३६: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)

  • १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर१८८८)

  • १९९७: गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.

  • २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर१९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.