चालू घडामोडी - २७ एप्रिल २०१८

Date : 27 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रिलायन्स जिओमध्ये 'मेगा' भरती ८० हजार जणांना मिळणार नोकऱ्या :
  • मुंबई: चालू आर्थिक वर्षात रिलायन्स जिओकडून 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. सध्या रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांची संख्या 1 लाख 57 हजार इतकी आहे. लवकरच यामध्ये 75 ते 80 हजार कर्मचाऱ्यांची भर पडेल, अशी माहिती कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख संजय जोग यांनी एका कार्यक्रमानंतर बोलताना दिली. 

  • सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात रिलायन्स जिओकडून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार का, असा प्रश्न संजय जोग यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला जोग यांना होकारार्थी उत्तर दिलं. कंपनीनं देशभरातील सहा हजार महाविद्यालयांशी करार केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

  • यामध्ये तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचाही समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. या संस्थांमधील काही अभ्यासक्रम रिलायन्स जिओच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार रिलायन्स जिओमध्ये काम करण्यासाठी अगदी योग्य ठरतील, असं जोग यांनी सांगितलं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भरती करण्यात येईल, अशी माहितीदेखील जोग यांनी दिली.

१९५३ नंतर प्रथमच उत्तर कोरियन नेता जाणार दक्षिण कोरियामध्ये :
  • सेऊल- उद्याचा शुक्रवार आशिया आणि पर्यायाने जागतिक शांततेच्या दिशेने नवे पाऊल टाकण्यासाठी महत्त्वाचा छरणार आहे. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या नेत्यांची अणूकार्यक्रमासह इतर अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. 1953 नंतर उत्तर कोरियाची सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये जाणारे किम जोंग उन हे पहिले उ.कोरियन नेते असतील.

  • नव्याने जाहीर झालेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम यांची सकाळी स्थानिकवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता (भारतीय वेळेनुसार 6 वाजता) भेट होणार आहे. उत्तर कोरिया आपल्या अण्वस्त्रांचा भविष्यात त्याग करू शकेल का या संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या विषयावर यामध्ये चर्चा होऊ शकते. तसेच या दोन्ही शेजारी देशांमधील तणाव निवळण्यासाठीही या परिषदेचा उपयोग होऊ शकतो.

  • यापुर्वी 2000 आणि 2007 साली अशाच प्रकारची परिषद झाली होती. या बैठकीमुळे किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या चर्चेसाठीही आशादायक प्रगती होणार आहे.

ग्रामीण बँक कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे पेन्शन :
  • नवी दिल्ली : देशातील 56 ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांनाही आता राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच पेन्शन मिळणार आहे. राजस्थान हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान देणारी केंद्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.

  • ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच निवृत्ती वेतन देण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने 2012 मध्ये दिले होते. मात्र केंद्राने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

  • न्यायमूर्ति कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठाने केंद्र सरकारला तीन महिन्यांच्या आत राजस्थान हायकोर्टाच्या आदेशांचं  पालन करण्यास सांगितलं आहे.

  • 1993 पासून कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ होणार आहे. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही पेन्शन मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने  ग्रामीण बँकांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • राष्ट्रीयकृत बॅंकांप्रमाणे पेन्शन लागू व्हावं, यासाठी ग्रामीण बॅंकांचे कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्नशील होते. ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळण्याचा अधिकार नाही, त्यामुळे सरकार अतिरिक्त आर्थिक बोजा पडेल, असा दावा केंद्राने केला होता.

मनरेगाचा मोठा हलगर्जीपणा उघड, ८९ लाख लोकांचा आधार नंबर सार्वजनिक :
  • नवी दिल्ली- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने(मनरेगा)तील मोठा घोळ समोर आला आहे. आंध्र प्रदेशातल्या मनरेगा योजनेत नोंद असलेल्या जवळपास 89 लाख लोकांचा आधार डेटा आंध्र सरकारनं सार्वजनिक केला आहे. द हिंदूच्या रिपोर्टनुसार, गुरुवार(26 एप्रिल) सकाळी हैदराबादेतल्या इंटरनेट सुरक्षा संशोधक कोडाली श्रीनिवास यांनी आधार नंबर लीक झाल्याची माहिती दिली.

  • त्यानंतर लगेचच साइटवरून त्या नंबरांना ब्लर करण्यात आलं. आंध्र प्रदेशात बेनिफिट डिस्बर्समेंट पोर्टल(बीडीपी) मनरेगाशी संबंधित लोकांची मजुरी, सोशल सिक्युरिटीसह पेन्शनचा हिशेब ठेवते. राज्यातील 89 लाख 38 हजार 138 लोकांनी स्वतःचा आधार नंबर या योजनेबरोबर जोडला आहे. या सर्व लोकांचे नाव, गावाचं नाव, जॉब कार्ड नंबर, आधार नंबर वेबसाइटवर टाकण्यात आले आहेत.

  • जवळपास या योजनेत 1 कोटी 2 लाख लोकांनी सहभाग नोंदवला आहे.  बेनिफिट डिस्बर्समेंट पोर्टल(बीडीपी)चे व्यवहार एपी ऑनलाइन सांभाळते. आंध्र प्रदेशमध्ये हे पहिल्यांदाच झालेलं नाही. कथित स्वरूपात हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या लाभार्थ्यांचा आधार नंबर, त्यांच्या जातीची माहिती, बँक अकाऊंट आणि दुसरी माहिती सार्वजनिक करण्यात आली.

  • याची माहिती कोडाली श्रीनिवास यांनी अधिका-यांना दिल्यानंतर वेबसाइटवरून आधार नंबर आणि व्यक्तिगत सूचना हटवण्यात आली आहे. जवळपास 45 लाख लोकांचे बँक अकाऊंट नंबर, रेशन कार्ड नंबर, जाती आणि इतर माहितीही वेबसाइटवर उपलब्ध आहे.

जगाचं लक्ष कोरियाकडे, भारताचं लक्ष चीनकडे, मोदी-जिनपिंग आज भेटणार :
  • वुहान (चीन):   आंतरराष्ट्रीय पातळीवर आज दोन महत्वाच्या बैठका होत आहेत. एक म्हणजे दक्षिण आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष इतिहासात पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहेत. तर दुसरी भेट म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.

  • जगाचं लक्ष या दोन्ही भेटींकडे लागलं आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष  मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे.

  • या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी चीनला औपचारिक दौऱ्यावर गेलेले नाहीत. मात्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात दोन्ही देशांबाबत विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे.

  • डोकलाम वादानंतर हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. या बैठकीत उभय देशांमध्ये कोणताही करार होणार नाही. गेल्या वर्षी डोकलाम मुद्दावरुन दोन्ही देशात निर्माण झालेला वाद आणि व्यापार विषयक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ई-मेल, एसएमएसवर पीएफची माहिती :
  • नवी दिल्ली : कंपनीने वेतनातून कापलेली भविष्य निर्वाह निधी (पीएफ)ची रक्कम पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता एसएमएस व ईमेलवर मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) ही माहिती एसएमएस/ई-मेलद्वारे देण्याचे ठरवले आहे.

  • यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफची रक्कम कापून ती प्रत्यक्षात खात्यात जमा न करणाºयांना कंपन्या व मालकांना चाप बसणार आहे.

  • या सोयीसाठी कर्मचाºयाचा मोबाइल नंबर व इमेल आयडी त्याच्या युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) शी लिंक असणे आवश्यक आहे. कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, ईपीएफओच्या या सुविधेतून कर्मचाºयांना त्यांच्या पीएफ खात्यातील रकमेची माहिती एसएमएस वा मिस्ड कॉलवर मिळू शकेल.

  • शिवाय सदस्य ई-पासबुकही पाहू शकतील. अनेक कंपन्या कर्मचाºयांच्या पीएफची रक्कम वेळेत वा अजिबातच जमा करीत नाहीत. अशा अनेक तक्रारी आहेत. अशा कंपन्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८५४: पुण्याहून मुंबईला तारायंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.

  • १९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.

  • १९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.

  • १९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.

  • १९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.

  • २००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

जन्म

  • १७९१: मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार सॅम्युअल मोर्स यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल१८७२)

  • १८२२: अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष युलिसीस एस. ग्रॅन्ट यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै १८८५)

  • १८८३: नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९६४)

  • १९१२: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर जोहरा सेहगल यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै२०१४)

  • १९२०: महात्मा गांधींचे अनुयायी डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९९३)

  • १९२७: मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी कोरेटा स्कॉट किंग यांचा जन्म.

  • १९७६: पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक फैसल सैफ यांचा जन्म.

मृत्यू

  • १५२१: पोर्तुगीज शोधक फर्डिनांड मॅगेलन यांचे निधन.

  • १९८०:  पद्मश्री सहकारमहर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)

  • १८८२: अमेरिकन लेखक व तत्वज्ञ राल्फ वाल्डो इमर्सन यांचे निधन. (जन्म: २५ मे १८०३)

  • १९८९: पॅनासोनिक कंपनी चे स्थापक कोनोसुके मात्सुशिता यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४)

  • १८९८: ज्योतिर्विद शंकर बाळकृष्ण दीक्षित यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८५३)

  • २००२: बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुली च्या जनक रुथ हँडलर यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९१६)

  • २०१७: भारतीय अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.