चालू घडामोडी - २६ मे २०१८

Date : 26 May, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सीबीएसई बारावीचा निकाल आज :
  • नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील.

  • मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण 11, 86, 306  विद्यार्थी बसले होते. 4, 138 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. पेपर लीकमुळे ही परीक्षा वादात सापडली होती.

  • पेपर लीकमुळे वाद - खरंतर सीबीएसई बारावीची परीक्षा 13 एप्रिल रोजी संपणार होती. शेवटचा पेपर फिजिकल एज्युकेशन विषयाचा होता. पण देशातील अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याने अर्थशास्त्राचा पेपर रद्द करण्यात आला होता. 25 एप्रिल रोजी अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्यात आला होता.

दहावी-बारावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर करु: बोर्ड

  • निकाल कुठे पाहता येणार - विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे.

  • तसंच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मायक्रोसॉफ्टने एक खास अॅप बनवलं असून विद्यार्थी तिथे आपला निकाल पाहू शकतात.

  • याशिवाय मेसेजद्वारेही तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या निकालासाठी मेसेज बॉक्समध्ये जा. तिथे cbse12 लिहा आणि 7738299899 ह्या नंबरवर पाठवा.

आठ राज्यांत हिंदुंना अल्पसंख्याक म्हणून दर्जा :
  • नवी दिल्ली : देशाच्या आठ राज्यांतील हिंदुंना अल्पसंख्याक म्हणून दर्जा द्यावा का, याचा निर्णय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या १४ जूनच्या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्यांला या प्रश्नासाठी आयोगाकडे जाण्याचे सुचविले होते.

  • जम्मू-काश्मीर, पंजाब, लक्षद्वीप, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मणिपूर या आठ राज्यांमध्ये हिंदुंचे प्रमाण अन्य धर्मगट वा समाज यांच्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे तेथील हिंदू समाजाला अल्पसंख्याक म्हणून घोषित करून, तसे अधिकार देण्यात यावेत, अशा आशयाच्या मागणीची भाजपाचे अश्विनीकुमार उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.

  • मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. न्या. रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने निर्णय घ्यावा, असे सांगून याचिकाकर्त्याने तिथे जावे, असे सांगितले होते. आता राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगच त्याबाबत १४ जून रोजी यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

  • जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लिमांचे प्रमाण ६८.३0 टक्के असतानाही राज्य सरकारने ७५३ पैकी ७१७ शिष्यवृत्त्या मुस्लीम विद्यार्थ्यांनाच देण्यात आल्या आणि एकाही हिंदू विद्यार्थ्याला ती मिळाली नाही, अशी तक्रार याचिकेत करण्यात आली होती. केंद्र सरकारने देशात १९९६ साली मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध व पारशी धर्मीयांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला आणि २0१४ साली त्या यादीत जैनांचाही समावेश केला, याचा उल्लेखही याचिकेत आहे.

आयपीएल फायनलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद भिडणार :
  • कोलकाता : अफगाणिस्तानच्या रशिद खानने अष्टपैलू कामगिरी बजावून सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या फायनलचं दुसरं तिकीट मिळवून दिलं. त्यामुळे आयपीएलच्या विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल पाहायला मिळेल.

  • ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर 13 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने 20 षटकांत 9 बाद 161 धावांची मजल मारली.

  • रशिद खानची धडाकेबाज फलंदाजी - हैदराबादने 20 षटकात सात बाद 174 धावांची मजल मारली होती. खरं तर हैदराबादला अठरा षटकांत सात बाद 138 धावाच जमवता आल्या. पण तळाला रशिद खानने 10 चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 34 धावांची खेळी उभारली. त्यामुळे हैदराबादच्या खात्यात अखेरच्या दोन षटकांत 36 धावांची भर पडली. त्याआधी, रिध्दिमान साहाने 35, शिखर धवनने 34, शकिब अल हसनने 28 आणि दीपक हूडाने 19 धावांची खेळी केली.

  • हैदराबाद पुन्हा चेन्नईसोबत भिडणार - क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने हैदराबादवर मात करुन, फायनलचं तिकीट बूक केलं होतं. कोलकात्याचा पराभव करुन हैदराबादने आता फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर 27 मे रोजी खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात चेन्नई आणि हैदराबाद पुन्हा आमनेसामने असतील.

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण :
  • नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शनिवारी चार वर्षे पूर्ण होत असून, २0१९च्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी भाजपाने आता ‘साफ नियत, सही विकास - २0१९ में फिर से मोदी सरकार’ अशी घोषणा तयार केली आहे. मात्र मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप करून काँग्रेस उद्या ‘विश्वासघात दिन’ पाळणार आहे. चार वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त भाजपाने खास घोषणा तयार केली आहे. शिवाय भाजपाने विकासकामांचा व्हिडीओ तयार केला असून, तो प्रसारित केला जाईल.

  • काँग्रेसतर्फे आज विश्वासघात दिन - मोदी सरकार जनताविरोधी धोरणे कशी अवलंबत आहे, या काळात इंधनाचे दर कसे वाढवले, लोकांना रोजगारांना कसे मुकावे लागले, महागाई कशी वाढवली, काही उद्योगपतींचाच कसा फायदा झाला, हे सारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांमार्फत करण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. पक्षाने एक पोस्टर प्रकाशित केले असून, त्यावर ‘विश्वासघात’ असे लिहिलेले आहे. ते प्रत्येक शहर, जिल्हा, तालुका व राज्यांच्या राजधान्यांमध्ये लावण्यात येईल.

  • पण लोकप्रियतेत मोठी घट - मोदींना दुसरी टर्म देण्यास जवळपास अर्ध्या जनतेचा नकार विरोधकांची एकजूट, महागाई, बेरोजगारीवरून जनतेत असलेली नाराजी यांचा फटका मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला बसण्याची चिन्हे आहेत.एबीपी न्यूज-सीएसडीएस आणि लोकनीतीने संयुक्तरीत्या केलेल्या सर्व्हेनुसार मोदींच्या लोकप्रियतेत कमालीची घट झाली आहे. भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत घट होण्याची चिन्हे आहे. मोदींना दुसरी टर्म देण्यास जवळपास अर्ध्या जनतेने नकार दिला आहे.

  • राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपाचा पराभव होण्याची चिन्हे - राजस्थान, मध्यप्रदेशात येत्या काही महिन्यांमध्ये निवडणुका आहेत. तेथे सत्ताधारी भाजपाऐवजी काँग्रेसला पसंती आहे. महाराष्टÑातही मोदी सरकारबद्दल नाराजी वाढत आहे.

नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत सुप्रिया सुळेंची सायकलस्वारी :
  • बारामती : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नेदरलंडच्या उपपंतप्रधानांसोबत बारामतीत सायकलवरुन रपेट मारली. सुप्रिया सुळेंना सायकल चालवताना पाहून उपस्थित विद्यार्थिनीही भारावल्या.

  • बारामतीमध्ये काही स्वयंसेविका आणि विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि नेदरलँडच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन उपस्थित होत्या. दोघींच्या हस्ते हे सायकल वाटप करण्यात आलं.

  • यावेळी सुप्रिया सुळे आणि स्काऊटेन यांना सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे दोघींनी काही अंतर सायकल चालवत पुढील कार्यक्रमात आगमन केलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १९८६: युरोपियन समुदायाने (EU) नवीन ध्वज अंगीकारला.

  • १९८९: मुंबईजवळच्या न्हावा-शेवा बंदराचे उद्‍घाटन झाले.

  • १९९९: श्रीहरिकोटा येथून पी. एस. एल. व्ही. – सी. २ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय. एस. एस. पी. ४ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. – टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.

  • २०१४: नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली.

जन्म

  • १८८५: नाटककार, कवी व विनोदी लेखक राम गणेश गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)

  • १९०२: नाटककार व साहित्यिक सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ कुमुदबांधव यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९६८)

  • १९०६: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक बेन्जामिन पिअरी पाल यांचा जन्म. (मृत्यू: १४ सप्टेंबर १९८९)

  • १९३०: भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक करीम इमामी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जुलै २००५)

  • १९४५: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)

  • १९६१: भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक तारसेम सिंग यांचा जन्म.

मृत्यू

  • १९०२: अमेरिकन संशोधक अल्मोन स्ट्राउजर यांचे निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८३९)

  • १९०८: अहमदिया पंथाचे संस्थापक मिर्झा गुलाम अहमद यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १८३५)

  • २०००: अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक श्रीपाद वामन काळे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.