चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ जुलै २०१९

Date : 26 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
'कारगिल विजय' दिवसाची २० वी वर्षपूर्ती, देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन :
  • नवी दिल्ली : कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती आज देशभर साजरी केली जात आहे. 26 जुलै 1999 रोजी पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या घटनेला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय जवानांनी मोठ्या शौर्याने पाकिस्तानला चोख उत्तर दिलं होतं.

  • कारगिल विजय दिनानिमित्ताने द्रासमधील कारगिल युद्ध स्मारकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तर दिल्लीतील वॉर मेमोरियलवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शहिदांना श्रद्धांजली वाहतील. शिवाय, राज्यासह देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • कारगिल विजय दिवसाची 20 वी वर्षपूर्ती 25 जुलै ते 27 जुलै अशी तीन साजरी होत आहे. या कार्यक्रमाचा समारोप 27 जुलैला इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी होणार आहेत.

  • 20 वर्षापूर्वी कारगिलमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं होतं. 8 मे ते 26 जुलै दरम्यान झालेल्या युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले होते, तर 1363 जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.

तिहेरी तलाकबंदी विधेयक लोकसभेत मंजूर :
  • नवी दिल्ली : मोदी सरकारसाठी महत्त्वाचे असणारे तिहेरी तलाकबंदी विधेयक गुरुवारी १७ व्या लोकसभेत ३०३ विरुद्ध ८२ मतांनी मंजूर झाले.

  • तिहेरी तलाकबंदी विधेयकाचा कोणत्याही धर्माशी वा कुठल्या राजकारणाशीही संबंध नाही. महिलांच्या न्यायाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदा ठरल्यानंतरही २४ जुलैपर्यंत देशात ३४५ तिहेरी तलाक झालेले आहेत. या घटस्पोटित महिलांना रस्त्यावर सोडायचे का? मी मोदी सरकारमधील मंत्री आहे, राजीव गांधी सरकारमधील नव्हे, असा युक्तिवाद केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी चर्चेला उत्तर देताना केला. स्त्री-पुरुष समानेतेसाठी हे विधेयक गरजेचे असल्याचेही प्रसाद म्हणाले.

  • तिहेरी तलाक दिल्यास पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असून त्यामुळे मुस्लीम महिलांचे नुकसान होणार असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. या विधेयकाला एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जनता दल (सं)ने विरोध केला. राजीव रंजन सिंह यांनी, या विधेयकामुळे विशिष्ट समाजामध्ये अविश्वास निर्माण होण्याची भीती असल्याचा दावा केला. तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

  • भारत धर्मनिरपेक्ष देश असून इथे स्त्री-पुरुष समान आहेत. मग, विशिष्ट समाजातील महिलांनाच का सोडून द्यायचे. त्यांना न्याय का मिळू नये?, असे सवाल करत भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी या विधेयकाचे समर्थन केले.

ब्रिटनच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या तिघांचा समावेश :
  • लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गृहमंत्री म्हणून प्रीती पटेल यांच्यासह मूळ भारतीय वंशाच्या तिघांचा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून समावेश केला आहे. ब्रिटनचे ‘सर्वात वैविध्यपूर्ण मंत्रिमंडळ’ असे याचे वर्णन केले जात आहे. कुठल्याही जर-तर शिवाय ब्रिटन ३१ ऑक्टोबरला युरोपीय महासंघातून बाहेर पडेल, असा निर्धार जॉन्सन यांनी व्यक्त केला आहे.

  • राणी एलिझाबेथ यांनी जॉन्सन यांची ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्यानंतर काही तासांतच त्यांनी प्रीती पटेल यांची गृहमंत्रिपदी, आलोक शर्मा यांची आंतरराष्ट्रीय विकास मंत्रिपदी, तर ऋषी सुनाक यांची वित्त विभागाचे प्रमुख मंत्री म्हणून नेमणूक केली. गुरुवारी सकाळी १० डाऊनिंग स्ट्रीट येथे मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली.

  • आम्ही आमच्या लोकशाहीवरील विश्वास पुनस्र्थापित करू. संसदेने लोकांना वारंवार दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करणार असून, कुठल्याही जर-तर शिवाय ३१ ऑक्टोबरला युरोपीय महासंघातून बाहेर पडू, असे पंतप्रधान म्हणून बुधवारी केलेल्या पहिल्याच भाषणात जॉन्सन म्हणाले.

  • ब्रेग्झिट समर्थन मोहिमेतील जॉन्सन यांच्या सहकारी असलेल्या प्रीती पटेल यांच्याकडे ब्रिटनची सुरक्षा, इमिग्रेशन आणि व्हिसाविषयक धोरणांचा कार्यभार राहणार आहे.

आता मेसेजप्रमाणे पैसेही सहज पाठवता येणार; लवकरच सुरु होणार WhatsAppची UPI पेमेंट सेवा :
  • जर आपण व्हॉट्सअॅपच्या UPI पेमेंट सेवेची वाट पाहत असाल तर आपल्यासाठी एक खूशखबर आहे. कारण, व्हॉट्सअॅपची ही सेवा याच वर्षात सुरु होणार आहे. व्हॉट्सअॅपचे ग्लोबल हेड विल कॅथकार्ट यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात याची घोषणा केली.

  • भारताच्या दौऱ्यावर असलेल्या कॅथकार्ट यांनी म्हटले की, पैसे ट्रान्सफर करणे अधिक सोपे करण्याचा व्हॉट्सअॅपचा विचार आहे. मात्र, यावेळी त्यांनी ही UPI पेमेंट सेवा नक्की कधी सुरु होणार याची तारीख जाहीर केली नाही. व्हॉट्सअॅपकडून भारतातील आपले सर्वसामान्य युजर्स तसेच छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांसाठी पीयर-टू-पीयर युपीआय बेस्ट पेमेंट सेवा सुरु करण्यात येणार आहे. या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे व्हॉट्सअॅपवरील मेसेजप्रमाणे सहजतेने यावरुन पैसे पाठवता येणार आहेत.

  • व्हॉट्सअॅपकडून गेल्या वर्षापासून भारतातील १० लाख युजर्ससोबत आपल्या UPI पेमेंट सेवेची पडताळणी सुरु आहे. सध्या भारतात व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या सुमारे ४० कोटी इतकी आहे. दरम्यान, २०२३ पर्यंत भारतात डिजिटल पेमेंटचे मार्केट एक ट्रिलिअन डॉलर इतके होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात डिजिटल पेमेंटमध्ये भीम अॅप, पेटीएम, फोन पे आणि गुगल पे या कंपन्यांचा दबदबा आहे.

  • रिझर्व्ह बँकेच्या अटी, नियम आणि पेमेंटचे प्रमाणीकरण आणि डेटा स्टोरेजची समस्या या कारणांनी भारतात व्हॉट्सअॅपच्या UPI पेमेंट सेवेला उशीर होत आहे. दरम्यान, व्हॉट्सअॅपने गेल्या वर्षीच सांगितलेही होते की, रिझर्व्ह बँकेच्या अटींनुसार, कंपनीने पेमेंटसंबंधी डेटा भारतातच साठवून ठेवण्यासाठी स्टोरेज सिस्टिम तयार केली आहे.

६० दिवसांच्या आत 'त्या' प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट उभारा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश :
  • नवी दिल्ली : देशभरात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज एक मोठा फैसला सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाची 100 पेक्षा अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यात पॉक्सो कोर्ट बनवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 60 दिवसांच्या आत ही पॉक्सो न्यायालय उभारावी, असे आदेश कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. ही न्यायालय केवळ अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराबाबतच्या खटल्यांवर सुनावणी घेतील.

  • लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी 2012 मध्ये संसदेने 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस' (पॉक्सो)हा कायदा पास केला होता. या कायद्यानुसार फक्त अत्याचार करणाराच नाही तर ज्याला अत्याचाराची माहिती आहे, परंतु तो तक्रार दाखल करत नाही तोदेखील आरोपी आहे. मुलांवर अत्याचार करणे, बलात्कार करणे, तसेच त्याची अश्लील चित्रफीत बनवणारादेखील गुन्ह्यास पात्र आहे.

  • देशभरातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पॉक्सो अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या 100 हून अधिक आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये विशेष पोलिसांची टीम बनवण्याची, जिल्ह्यात विशेष कोर्ट बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 60 दिवसांच्या आत विशेष पॉक्सो कोर्ट उभारण्याचे आदेश दिले आहेत.

  • देशभरातील प्रलंबित पॉक्सो खटल्यांचा अहवाल सुप्रीम कोर्टाने मागवला होती. या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे की, मागील सहा महिन्यात देशभरात पॉक्सो अंतर्गत 24 हजार 212 एफआयआर दाखल झाले आहेत. त्यापैकी केवळ 6 हजार 449 गुन्ह्यांचे खटले सुरु झाले आहेत.

दिनविशेष :
  • कारगिल विजय दिन

महत्वाच्या घटना 

  • १७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.

  • १७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.

  • १८४७: लायबेरिया स्वतंत्र.

  • १९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.

  • १९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.

  • १९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.

  • १९६५: मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.

  • १९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

  • १९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.

  • १९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.

  • १९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

जन्म 

  • १८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)

  • १८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)

  • १८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)

  • १८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)

  • १८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)

  • १०९४: फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१)

  • १९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.

  • १९४२: स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.

  • १९४९: थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.

  • १९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)

  • १९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.

  • १८४३: टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.

  • १८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.

  • १९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.

  • १८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)

  • २००९: मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)

  • २०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)

  • २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.