चालू घडामोडी - २६ जानेवारी २०१८

Date : 26 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
पद्म पुरस्कारांची घोषणा, डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांचा सन्मान :
  • नवी दिल्ली- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणा-या पद्मश्री पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला करण्यात येते. यंदाच्या वर्षात पुरस्कारासाठी 15,700 लोकांनी अर्ज केला होता. त्यातील अनेकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. डॉ. अभय बंग, राणी बंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.

  • साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील अरविंद गुप्ता यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर संपत रामटेके यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.  

  • मध्य प्रदेशमधील भज्जू श्याम, केरळच्या लक्ष्मी कुट्टी, पश्चिम बंगालच्या सुधांशू बिस्वास, केरळच्या एमआर राजगोपाल, क्रीडाजगतात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्रातील मुरलीकांत पेटकर यांनाही पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारानं 85 पुरस्कार जाहीर केले असून, त्यात 73 पद्मश्री, 3 पद्मविभूषण, 9 पद्मभूषण पुरस्कारांचा समावेश आहे.

  • कर्नाटकातल्या सुलागट्टी नरसम्मा, महाराष्ट्रातल्या विजयलक्ष्मी नवनीतकृष्णन, पश्चिम बंगालमधल्या सुभासिनी मिस्त्री, तामिळनाडूमधले राजगोपालन वासुदेवन यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या वर्षात 89 लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 4417 जणांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला आहे.

  • कला, साहित्य, शिक्षा, खेळ, चिकित्सा आणि सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा या पुरस्कारानं सन्मान करण्यात येतो.(source :Lokmat)

प्रत्येक भारतीयाने सहिष्णुता जपावी, देशाचे भविष्य तरुणांच्या हाती - राष्ट्रपती :
  • नवी दिल्ली : एखाद्याची भूमिका मान्य नसली तरी त्याबाबत प्रत्येक भारतीयाने सहिष्णू भूमिका घेणे आवश्यक आहे. खºया लोकशाहीचे तेच लक्षण असून, राज्यघटनाकारांची तीच अपेक्षा होती, असे सांगतानाच, अंधश्रद्धा व विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुवारी केले.

  • प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी परस्परांचा आदर, सहिष्णुता, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि उत्तम आरोग्य या मुद्द्यांवर विशेष भर दिला.

  • राष्ट्रपतींनी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन असल्याचा उल्लेख करून, प्रत्येकाने मतदान करावे आणि इतरांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही आवाहन केले. राज्यघटना व लोकशाही टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाच्या अधिकाराचा उपयोग करायलाच हवा, असे ते म्हणाले.

  • देशाचे भविष्य तरुणांच्या हाती-

  • आज भारतातील ६0 टक्क्यांहून अधिक नागरिक ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य त्यांच्यात हाती आहे. देशाच्या साक्षरतेत मोठी वाढ झाली आहे. त्यापुढील टप्पा आहे शिक्षणाला आणखी चालना द्यायचा, असे ते म्हणाले.(sorce :Lokmat)

एएसआय वाघमारे यांना राष्ट्रपती पोलीस पदक :
  • अमरावती : शहर पोलीस दलात ३७ वर्षांच्या सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिलीप वाघमारे यांना प्रजाकसत्ताक दिनी आयोजित समारंभात राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान केले जाणार आहे.

  • ते मूळचे अंजनगाव तालुक्यातील निमखेड बाजार येथील रहिवासी आहेत. १ मे २०१७ रोजी पोलीस महासंचालक पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले. दिलीप वाघमारे हे १५ डिसेंबर १९७९ मध्ये पोलिस सेवेत दाखल झाले आहेत.

  • राजापेठ पोलिस ठाण्यापासून त्यांनी आपल्या सेवेची सुरूवात केली आहे.याशिवाय शहराच्या बहूतांश ठाण्यासह गुन्हे शाखेत त्यांनी सेवा केली.

प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, १० देशांचे प्रमुख राजधानीत :
  • नवी दिल्लीदेशभरात आज 69 वा प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. यानिमित्त राजधानी दिल्लीतील दरवर्षीप्रमाणे राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं, सांस्कृतिक विविधतेचं दर्शन घडवणारी परेड होणार आहे.

  • या परेडचं वैशिष्टय म्हणजे यंदा पहिल्यांदाच भारत-आशियाई संमेलनाच्या निमित्ताने 10 आशियाई राष्ट्रांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत.

  • सकाळी साडे नऊ वाजता ध्वजारोहणानंतर पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख अमर ज्योतीवर शहिदांना श्रद्धांजली वाहतील आणि 10 वाजता परेडला सुरुवात होईल.

  • थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई या देशाचे प्रमुख आज उपस्थित राहणार आहेत. यांच्यासमोर भारत राजपथावर आपली ताकद दाखवेल.(source :abpmajha)

इल्याराजा, गुलाम मुस्तफा खान 'पद्मविभूषण' , ‘पद्म’ पुरस्कारांमध्ये राज्याचे ११ मानकरी :
  • नवी दिल्ली : दक्षिणेकडील थोर संगीतकार गणतेशिकन ऊर्फ इल्याराजा, रामपूर साहसवन घराण्याचे ज्येष्ठ हिंदुस्तानी शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खान आणि केरळमधील ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ परमेश्वरन यांना यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.

  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्र सरकारने एकूण ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. त्यात ११ मानकरी महाराष्ट्रातील आहेत. तिघांना ‘पद्मविभूषण’, नऊ जणांना ‘पद्मभूषण’ व ७३ जणांना ‘पद्मश्री’ जाहीर झाली. आॅनलाइन पद्धतीने आलेल्या ३५ हजार नामांकनांमधून हे विजेते निवडले गेले. प्रसिद्धी आणि सन्मान यापासून दूर राहून इतरांच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-यांना सन्मानित करणे सरकारने गेल्या वर्षीपासून सुरू केले. त्यानुसार यंदा २२ जणांचा ‘पद्मश्री’ने सन्मान करण्यात आला.

  • ‘पद्मभूषण’ मानक-यांमध्ये बिलियर्डस व स्नूकरचे विश्वविजेते खेळाडू पंकज आडवाणी, ख्रिश्चन धर्मगुरू फिलिपोस मार च्रिसोत्तम, क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी व रशियाचे भारतातील दिवंगत राजदूत अ‍ॅलेक्झांडर कडाकिन, तमिळनाडूतील शास्त्रज्ञ रामचंद्रन नागस्वामी, अमेरिकेत वास्तव्य करणारे साहित्यिक वेद प्रकाश नंदा, चित्रकार लक्ष्ण पै, ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिख यांचा समावेश आहे.

  • प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने एकूण ८५ ‘पद्म’ पुरस्कारांच्या मानक-यांची यादी जाहीर केली. यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार गुरुवारी रात्री जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान यंदा कोणालाही जाहीर झाला नाही.(source :Lokmat)

प्रजासत्ताकदिनी भेट ! पुण्यात 150 ठिकाणी मोफत वाय-फाय :
  • पुणे : प्रजासत्ताक दिनी महापालिका व पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी यांच्याकडून पुणेकर नागरिकांनी अनोखी भेट दिली जात आहे. शहरातील तब्बल १५० ठिकाणी शुक्रवारपासून मोफत वाय-फाय सुविधा उद्याने, पोलीस ठाणी, रुग्णालये, सरकारी कार्यालये, संग्रहालये अशा ठिकाणांचा यात समावेश आहे.

  • महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त कुणाल कुमार व कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. प्रायोगिक स्तरावर हा उपक्रम असून त्यातील त्रुटी लक्षात घेऊन नंतर तो कायमस्वरूपी व आणखी अनेक ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.

  • ही सर्व ठिकाणी तसेच कशा पद्धतीने वाय-फाय जोडणी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये करून घ्यायची याबाबतची सर्व माहिती पुणे स्मार्ट सिटी फेसबुक पेजवरील इव्हेंट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, अशी माहिती देण्यात आली

  • वेळेचे बंधन नाही- सुरुवातीला या सेवेला वेळेचे बंधन नाही. या सर्व ठिकाणांहून कितीही वेळ इंटरनेटची सुविधा पुरवली जाईल. स्मार्टफोन तसेच लॅपटॉपवरही ही सुविधा वापरता येईल. नेटवर्कच्या क्षेत्रात असणा-यांना मोबाईलवर पाठवला जाणारा वन टाईम पासवर्ड (ओटीपी) टाकून सोप्या लॉग इन प्रक्रियेने ही सेवा सुरू करता येईल. तसेच क्युअर कोड स्कॅन वापरूनही सेवा मिळवता येईल. या सर्व ठिकाणांच्या प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतरच त्या ठिकाणांचा यादीत समावेश करण्यात आला आहे.(source :Lokmat)

नाशिकमधील दुधाच्या एटीएमचे आज उद्घाटन :
  • नाशिक : पैसे आणि पाण्याचे एटीएम सर्वांनाच माहिती आहे, परंतु नाशिकमध्ये चक्क दुधाचे एटीएम सुरू होत आहे. सिन्नर तालुका दूध संघाने हे पाऊल उचलले आहे.

  • कॉलेज रोडवरील या एटीएमचे उद्घाटन शुक्रवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.

  • सिन्नर तालुका विभागीय सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. कार्ड मशीनमध्ये टाकल्यानंतर १० रु पयांपासून पाच-दहा लिटर दूध मिळू शकेल.

१५२ वर्षांनी आकाशात दिसणार दुर्मीळ नजराणा! खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून, ब्ल्यूमूनचा तिहेरी योग :
  • मुंबई : येत्या बुधवारी, ३१ जानेवारी रोजी खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल, असे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. १५२ वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग ३१ मार्च १८६६ रोजी आला होता.

  • ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. ‘सुपरमून’ हे नाव रिचर्ड नोले यांनी १९७९मध्ये दिले होते. अशा वेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के जास्त प्रकाशित दिसते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार, ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख ५९ हजार किलोमीटर अंतरावर येईल. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसेल.

  • दुसरीकडे एका इंग्रजी महिन्यात ज्या वेळी दोन पौर्णिमा येतात, त्या वेळी दुसºया पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून ’ म्हणतात. जरी त्याला ‘ब्ल्यूमून’ म्हटले गेले असले, तरी त्या वेळी चंद्र काही ‘ब्ल्यू’ रंगाचा दिसत नाही. या वेळी २ जानेवारी आणि ३१ जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून ३१ जानेवारीच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ म्हटले आहे. याचप्रमाणे बुधवार, ३१ जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहणदेखील आहे. भारतातून ते खग्रास स्थितीत दिसेल.

  • अशा प्रकारे बुधवार, ३१ जानेवारी रोजी ‘खग्रास चंद्रग्रहण’, ‘सुपरमून’ आणि ‘ब्ल्यूमून’ असा तिहेरी योग आला आहे. म्हणून खगोलप्रेमींच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे. छायाचित्रकारांनादेखील ही एक मौल्यवान संधी आहे.(source :Lokmat)

​​​​​​​दिनविशेष :

जागतिक दिवस

  • भारतीय प्रजासत्ताक दिन

महत्वाच्या घटना

  • १५६५: विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.

  • १६६२: लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.

  • १८७६: मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.

  • १९३३: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.

  • १९४९: भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

  • १९५०: भारताची राज्यघटना अस्तित्त्वात आल्याने भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा शपथविधी झाला.

  • १९५०: एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९६५: भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.

  • १९७८: महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.

  • १९९८: कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.

जन्म

  • १८९१: बडोद्याचे राजकवी चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९३७)

  • १९२१: सोनी कार्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९९९)

  • १९२५: अभिनेता, दिग्दर्शक व रेस कार ड्रायव्हर पॉल न्यूमन यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर २००८)

  • १९५७: क्रिकेटपटू शिवलाल यादव यांचा जन्म.

मृत्यू

  • १७३०: कवी श्रीधर यांनी समाधि घेतली.

  • १८२३: देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर एडवर्ड जेन्‍नर यांचे निधन. (जन्म: १७ मे१७४९)

  • १९५४: देशभक्त, क्रांतिकारक व भारतातील कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानबेंद्रनाथ रॉय यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १८८७)

  • १९६८: लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १८८०)

  • २०१५: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर१९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.