चालू घडामोडी - २६ डिसेंबर २०१८

Updated On : Dec 26, 2018 | Category : Current Affairsमिनिटभराच्या संभाषणासाठी 16.80 रुपये मोजावे लागायचे...मोबाईलचे बिल कोणी स्वस्त केले :
 • नवी दिल्ली : 1999 मध्ये मोबाईल सेवेने मोठी क्रांती केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने नवीन टेलिकॉम पॉलिसी लागू केली आणि एका मिनटाच्या कॉलचा दर 16.80 रुपये होता. आज या पॉलिसीमुळे काही पैशांत मिनिटभर बोलता येत आहे. महत्वाचे म्हणजे मोबाईल फोनवर पहिले संभाषण 31 जुलै 1995 मध्ये झाले होते.

 • 1994 मध्ये नवीन टेलिकॉम पॉलिसी लागू करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसचे पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान होते. यावेळी टेलिकॉम सेक्टरची वाढ ही 1.2 टक्के होती. 1999 मध्ये ही वाढ 2.3 टक्के झाली. याकाळात फोनवर बोलण्यासाठी एक मिनिटाला 16.80 रुपये लागत होते. याचे कारण असे होते की, टेलिकॉम कंपन्यांना नेटवर्कच्या वापरासाठी प्रत्येक वर्षाला परवाना खरेदी करावा लागत असे, जो खूप महागडा होता.

 • कंपन्यांना एका ग्राहकामागे 6023 रुपये वर्षाला द्यावे लागत होते. एवढे पैसे कंपनी ग्राहकांकडून वसूल करत होती. यामुळे एका मिनिटासाठी एवढे पैसे वसूल केले जात असत. मात्र, अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारने या परवाना शुल्कालाच लगाम घालत ते रद्द केले आणि महसूल विभागणी केली. 

 • यावेळी देशात जवळपास 22 टेलिकॉम ऑपरेटर होते. त्यांनी वाजपेयींना 7700 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. यानंतर वाजपेयींनी हा निर्णय घेतला. या नुसार या कंपन्यांना महसुलाच्या 15 टक्के रक्कम सरकारला देणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे टेलिकॉम कंपन्याही फायद्यात आल्या. 

अंदमानातील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव :
 • नवी दिल्ली : सरकारने शहरांचे नावे बदलण्याचा धडाका लावलेला असताना आता मोदी सरकार अंदमान येथील तीन बेटांचे नाव बदलणार आहे. हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज बेट तर, नेल बेटाचे नाव शहीद बेट आणि रोस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस, असे करण्यात येणार आहे.

 • बेटांचे नाव बदलण्यासाठी गृहमंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्ट ब्लेअरच्या दौऱ्यादरम्यान रविवारी, ३० रोजी या बेटांचे नाव बदलण्यात येणार आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री राजनाथसिंह यांची उपस्थिती राहणार आहे.

 • मार्च २०१७ मध्ये भाजपाच्या एका खासदारांनी राज्यसभेत अशी मागणी केली होती की, या पर्यटन स्थळावरील बेटांची नावे बदलण्यात यावीत. येथील हॅवलॉक बेटाचे नाव हे ब्रिटिश जनरल सर हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरून देण्यात आले होते.

देशातील सर्वात मोठ्या डबल डेकर पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन :
 • दिसपूर : देशातल्या सर्वात मोठ्या डबल डेकर ब्रीजचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पायाभरणीनंतर तब्बल 21 वर्षांनी आज बोगीबील पूलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला हा भारतातील सर्वात लांब डबल डेकर पूल आहे. आज पंतप्रधान मोदींनी संपूर्ण पुलावरुन प्रवास करत पुलाची आणि कामाची पाहाणी केली आणि त्यानंतर पुलाचं उद्घाटन केलं.

 • बोगीबील पुलामुळे आसामचा दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील ढेमजी हे दोन जिल्हे जोडले जाणार आहेत. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. या पुलामुळे चार तासाचा वेळ वाचणार आहे. चीनच्या सीमेजवळ असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा भारतासाठी हा अत्यंत महत्वाचा पूल ठरणार आहे. युद्धप्रसंगात रणगाडे सुद्धा सहज या पुलावरुन जाऊ शकतात अशी या पुलाची बांधणी करण्यात आली आहे.

 • आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वाधिक लांबीचा दुमजली रेल-रोड पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले. हा दुमजली पूल पूर्ण होण्यासाठी तब्बल 21 वर्षांचा कालावधी लागला. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल 4.94 किलोमीटर अंतराचा आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील दक्षिण-उत्तर भागाला जोडणारा हा पूल आहे.

 • दुमजली पुलावर रेल्वेसाठीच्या दोन मार्गिका करण्यात आल्या असून रस्ते वाहतुकीसाठी तीन मार्गिका आहे. या पुलावरुन 100 किलोमीटरच्या वेगाने ट्रेन धावू शकते. हा पूल बनवण्यासाठी 5800 कोटींचा खर्च आला.

देशभरात उद्या तीन तास केबल सेवा बंद राहणार :
 • नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) देशभरातील केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचबरोबर केबल टीव्ही व्यावसायिकांवर जाचक अटी घातल्या असल्याचा आरोप करत देशभरातील केबल व्यावसायिकांनी गुरुवारी 27 डिसेंबर रोजी तीन तास केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 • केबल व्यावसायिक उद्या (27 डिसेंबर) संध्याकाळी सात ते रात्री 10 या वेळेत केबल सेवा बंद ठेवणार आहेत. या आंदोलनामुळे प्रेक्षक ‘प्राइम टाइम’मधील अनेक मालिकांना मुकणार आहेत. तसेच यासंदर्भात चर्चा करण्य़ासाठी केबल व्यावसायिकांचीआज मुंबईत बैठक होणार आहे.

 • केबल व्यावसायिकांनी ट्रायच्या नव्या धोरणांवर आरोप केले आहेत की, नव्या धोरणातील नियम आखताना ट्रायने केबल, डीटीएच सेवा देणाऱ्या घटकांचे भविष्य अधांतरी ठेवले आहे. तसेच नवे नियम ग्राहकांच्या हिताचे नाहीत. ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध नोंदवण्यासाठी केबल व्यावसायिक उद्या लाक्षणिक आंदोलन करणार आहेत.

 • ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड करता यावी यासाठी, ट्रायने सर्व अधिकृत वाहिन्यांचे दर निश्चित करायला लावले आहेत. नवे नियम २९ डिसेंबरपासून लागू करण्यासाठी ट्रायकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

पेट्रोल दराची २०१८ या वर्षातली नीचांकी नोंद :
 • डिसेंबर महिना संपत आला आहे. नव्या वर्षात इंधनदरांमध्ये कपात होईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र 2018 चा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये वर्षाच्या अखेरीस कपात झालेली पाहावयास मिळते आहे.

 • पेट्रोलच्या प्रति लिटर दराने नीचांकी दराची नोंद केली आहे. तर डिझेलने मार्चनंतचा नीचांकी दर नोंदवला आहे. मंगळवारी पेट्रोलचा दर 75 रुपये 41 पैसे प्रति लिटर असा होता. तर डिझेलचा दर 66 रुपये 79 पैसे असा होता.

 • आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सहा टक्के घसरण झाली. ज्यामुळे इंधनदरांमध्ये कपात झाली. पेट्रोल 21 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 19 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले. तर मंगळवारी पेट्रोलच्या दरांमध्ये लिटरमागे सात पैशांची कपात झाली, तर डिझेलचे दर जैसे थेच राहिले.

 • आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता कच्च्या इंधन दराचा दर गेल्या वर्षभरातील नीचांकी दर ठरला. क्रूड ऑइलचा दर प्रति बॅरल 42.53 अमेरिकी डॉलर्स इतका घसरलेला बघायला मिळाला.

‘शाळा प्रवेशासाठी आधारकार्ड सक्ती नको’ :
 • शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आधारकार्डची पूर्वअट लादू नये, असे करणे हे सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निकालाच्या विरोधातील आहे, असा इशारा यूआयडीएआयने दिला आहे.

 • दिल्लीतील १५०० हून अधिक खासगी शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यूआयडीएआयने हा इशारा दिला आहे. काही शाळा प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज म्हणून आधारकार्डची मागणी करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

 • आधारकार्डची मागणी करणे योग्य नाही, ते बेकायदेशीर आहे, शाळेत प्रवेश घेण्यासाठी आणि मुलांना अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आधारकार्ड ही अट घालता येणार नाही, असे यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

आरबीआय लवकरच आणणार २० रूपयांची नवी नोट :
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच नवीन वैशिष्ट्यांसह २० रूपयांची नवी नोट चलनात आणणार आहे. आरबीआयनेच ही माहिती दिली आहे. २००, २००० रूपयांच्या नोटा चलनात आणण्याशिवाय १०, ५०, १०० आणि ५०० रूपयांच्या नेाटा आधीच नव्या रंगरूपात सादर करण्यात आल्या आहेत.

 • नोव्हेंबर २०१६ पासून नव्या रूपात महात्मा गांधी मालिके अंतर्गत या नोटा जारी करण्यात येत आहे. ही नोट आधीच्या नोटेपेक्षा तुलनेने वेगळा आकार आणि डिझाइनमध्ये आहे.

 • आरबीआयच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१६ पर्यंत २० रूपयांच्या नोटांची संख्या ४.९२ अब्ज होती. जी मार्च २०१८ पर्यंत १० अब्ज झाली. या चलनातील नोटांची संख्या सध्या ९.८ टक्के इतकी आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.

 • १९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.

 • १९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.

 • १९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.

 • १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.

जन्म 

 • १७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८७१)

 • १७९१: इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ चार्ल्स बॅबेज यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १८७१)

 • १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६)

 • १९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)

 • १९१७: साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म.

 • १९४८: डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९७२: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन. (जन्म: ८ मे १८८४)

 • १९८९: व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)

 • १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)

 • २००६: अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)

 • २०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)