चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ ऑगस्ट २०१९

Date : 26 August, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
नरेंद्र मोदी यांना बहारिनचा पुरस्कार :
  • भारत आणि बहारिन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहारिनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

  • बहारिनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असलेले मोदी यांनी शनिवारी रात्री  बहारिनच्या राजांची भेट घेतली असता त्यांना हा गौरवास्पद पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याने मला माझा मोठा सन्मान झाल्याचे वाटत आहे.

  • बहारिनच्या राजांच्या माझ्याबद्दल व माझ्या देशाबद्दल असलेल्या मैत्रीभावनेमुळे माझा तितकाच सन्मान झाला आहे. १३० कोटी भारतीयांच्या वतीने मी हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारतो. हा संपूर्ण भारताचा सन्मान आहे. बहरैन साम्राज्य व भारत यांच्यातील घनिष्ठ व मैत्रीपूर्ण संबंधांना मिळालेली ही मान्यता आहे. हे संबंध हजारो वर्षांपूर्वीचे आहेत, असे मोदी म्हणाले.

  • भारत व  बहारिन यांनी सहकार्याची नवे क्षेत्रे जोडण्याचे आणि द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याचे मान्य केले आहे, याचा मोदी यांनी उल्लेख केला. भारतीय वंशाचे लोक हे बहरैनमधील सर्वात जास्त संख्येतील परदेशी नागरिक आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  या लोकांचे येथे मनापासून स्वागत केले जाते. त्यांची काळजी घेत असल्याबद्दल मी  बहारिनच्या नेतृत्वाचे आभार मानतो, असे पंतप्रधानांनी म्हटल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले.

गांधी जयंतीपासून देश प्लास्टिकमुक्त करा :
  • महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीपासून देशाला प्लास्टिकमुक्त करा, अशी हाक देण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘दिवाळीपूर्वी प्लास्टिकचा कचरा नष्ट करण्याचे मार्ग पालिका, स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांनी सुचवावेत’, असे आवाहन रविवारी केले.

  • ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी गांधी जयंतीपासून प्लास्टिकविरोधी जनचळवळ उभारण्याची हाक दिली. स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही त्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापर टाळण्याचे आवाहन केले होते.

  • गेली काही वर्षे गांधी जयंती निमित्ताने दोन-दोन आठवडे स्वच्छता कार्यक्रम होत आहेत. या वेळी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम ११ सप्टेंबरपासूनच सुरू केला जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

  • आपण यंदा २ ऑक्टोबरला बापूजींची १५०वी जयंती साजरी करू तेव्हा केवळ हागणदारीमुक्त भारतच त्यांना समर्पित करणार नाही, तर प्लास्टिकविरोधात नव्या क्रांतीची मुहूर्तमेढही आपण या दिवशी रोवू, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतमातेला प्लास्टिकमुक्त करण्याचा दिवस म्हणून समाजाच्या सर्व घटकांनी गांधी जयंती साजरी करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले.

  • नगरपालिका, महापालिका, जिल्हा प्रशासनाने, ग्रामपंचायती, सरकारी आणि बिगरसरकारी संस्थांनी प्लास्टिक जमा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. प्लास्टिकचा कचरा नष्ट करण्यासाठी किंवा त्याचा पुनर्वापर वा त्यापासून इंधननिर्मिती करण्यासाठी कंपन्यांनी पुढे यावे. दिवाळीपूर्वी प्लास्टिक कचरा नष्ट करण्याचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे आणि त्यासाठी महात्मा गांधी यांच्यापेक्षा अन्य महान प्रेरणा दुसरी कोणती असू शकते, अशा भावनाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.

जाणून घ्या पंतप्रधान मोदींची हिंदी बेअर ग्रिल्सला कशी काय समजली : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ ऑगस्ट रोजी डिस्कव्हरी चॅनलवरील प्रसिद्ध ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाच्या विशेष भागात बेअर ग्रिल्स बरोबर दिसून आले होते. या विशेष भागामुळे ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ ला जगातील सर्वाधिक ट्रेंडिग शो होण्याचा मान मिळाला होता.  या विशेष कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी आणि बेअर ग्रिल्स यांनी एकमेकांबरोबर आपल्या अनेक अनुभवांविषयी चर्चा केली होती. याचबरोबर जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील घनदाट जंगलामधून प्रवासही केला होता.

  • हा कार्यक्रम सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर जवळपास सर्वांनाच एका गोष्टीबाबत प्रश्न पडला होता की? या संपूर्ण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे हिंदीत बोलत होते मग इंग्रजी भाषा समजणाऱ्या बेअर ग्रिल्सला त्यांचे बोलणे कसे काय समजले? त्यांनी आपसात चर्चा कशी काय केली? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदींनी स्वतः आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यामातून दिले आहे.

  • पंतप्रधान मोदींनी याबाबत सांगताना म्हटले की, अनेक जणांची हे जाणून घ्यायची इच्छा आहे की बेअर ग्रिल्सला हिंदी कशी काय समजली? लोकांनी हे देखील विचारले की हा कार्यक्रम दाखवण्या अगोदर एडिट केला होता का? की या कार्यक्रमाचे अनेकवेळा शुटींग करण्यात आले होते? मात्र असे काहीच नव्हते, म्हणूच मी लोकांच्या मनातील या शंकांबाबत खुलासा करत आहे. खरतर यात रहस्यमय असे काहीच नाही, माझ्या आणि बेअर ग्रिल्सच्या दरम्यान तंत्रज्ञानाने अहम भूमिका निभावली. एक कॉडलेस डिवाइस बेअर ग्रिल्सच्या कानाला जोडलेले होते, जे अतिशय वेगाने हिंदीला इंग्रजीत भाषांतरीत करत होते. मी त्यांच्याशी हिंदीत बोलायचो व ते इंग्रजीत ऐकत होते. याप्रकारे आमच्या दोघांमधील संवाद अतिशय सोपा व हलकाफुलका झाला, हा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे.

कोमालिका बारीला जगज्जेतेपद :
  • कोमालिका बारी हिने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या जपानच्या सोनोडा वाका हिला एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत पराभूत करत रिकव्‍‌र्ह कॅडेट गटात जगज्जेतेपदाला गवसणी घातली. भारताने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

  • जमशेदपूर येथे जन्मलेल्या आणि टाटा तिरंदाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या कोमालिकाने सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ७-३ अशा फरकाने तिने अंतिम फेरीवर वर्चस्व गाजवले. रिकव्‍‌र्ह कॅडेट (१८ वर्षांखालील) गटात १७ वर्षीय कोमालिका ही भारताची दुसरी जगज्जेती ठरली आहे. यापूर्वी दीपिका कुमारीने २००९ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.

  • भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघाने बंदी घातल्यामुळे यापुढे भारतीय तिरंदाजांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. मात्र या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

  • जागतिक स्पर्धेत विजेती ठरल्याने मी अत्यंत आनंदी आहे. माझ्या प्रशिक्षकांमुळेच हे शक्य झाले. दीर्घ श्वास घेत असल्याने मला अचूक वेध घेता येत नव्हता. पण मी स्वत:ला संयम आणि शांत राहण्याचे बजावले. आत्मविश्वास उंचावल्यानंतर मी सुवर्णपदकावर कब्जा केला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.

  • १४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.

  • १७६८: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.

  • १७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.

  • १८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने पॅरिसमधे प्रवेश केला.

  • १९७२: जर्मनीतील म्युनिच येथे २०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.

  • १९९४: लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर.

  • १९९६: दक्षिण कोरियात १९७९ मध्ये झालेल्या लष्करी कटाबद्दल माजी अध्यक्ष चुन दू वान यांना मृत्यूदंडाची तर त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना साडेबावीस वर्षे कारावासाची शिक्षा.

जन्म 

  • १७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८१०)

  • १७४३: आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १७९४)

  • १९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७)

  • १९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २०१०)

  • १९२७: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.

  • १९२८: हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट २०१५)

  • १९४४: लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२)

  • १९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२)

  • १९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन.

  • १९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन.

  • १९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ तासात जिंकणारा वैमानिक चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९०२)

  • १९९९: डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू नरेन्द्रनाथ यांचे निधन.

  • २०१२: चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचेनिधन.  (जन्म: १ फेब्रुवारी १९१७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.