चालू घडामोडी - २५ फेब्रुवारी २०१८

Date : 25 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे आकस्मिक निधन :
  • सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या.

  • आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

  • श्रीदेवी यांना लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड होती. ४ वर्षांची असतानाच ‘थुनीवावन’ या चित्रपटातुन एक बाल कलाकार म्हणुन त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली. पुढे १९७१ साली ‘पूमबत्ता’ या एका मल्याळम चित्रपटात त्यांनी अभिनय केला. दरम्यान त्यांना ‘केरला स्टेट फिल्म’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

  • पुढे जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर श्रीदेवीने १९७९ साली ‘सोलावा सावन’ या चित्रपटातुन आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दिची सुरवात केली. खरेतर श्रीदेवी ज्युली या सिनेमातीही झळकली होती. मात्र त्यात तिची भूमिका छोटी होती.

  • सोलवा सावननंतर मात्र तिने मागे वळून पाहिलेच नाही.  त्यानंतर ‘सदमा’, ‘हिम्मतवाला’, ‘जाग उठा इन्सान’, ‘अक्लमंद’, ‘इंकलाब’, ‘तोहफा’, ‘सरफ़रोश’, ‘बलिदान’, ‘नया कदम’, ‘नगीना’, ‘घर संसार’, ‘नया कदम’,’मकसद’, ‘सुल्तान’, ‘हल्ला बोल’, ‘इंग्लिश विंग्लिश’ यांसारख्या तब्बल १०० हुन अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अलिकडे आपली मुलगी ‘जान्हवी कपूर’ला अभिनयाचे धडे देण्यात त्या व्यस्त होत्या.(source :loksatta)

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय; टी-२० मालिका खिशात :
  • भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान झालेल्या तिसऱ्या टी-२० समान्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी  विजय मिळवला. या विजयासहित दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा टी-२० मालिका जिंकण्याचाही विक्रम केला.

  • नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या जे.पी. ड्युमिनीच्या संघासमोर पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेल्या सुरेश रैना आणि सलामीवीर शिखर धवन या डावखुऱ्या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

  • परंतु भारताची अचुक गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आफ्रिकेला केवळ १६५ धावांचीच मजल मारता आली. परिणामी भारताने ७ धावांचे अंतर ठेउन सामना जिंकला.(source :loksatta)

अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव होणार :
  • स्टीव्ह जॉब्स हे नाव जगात ठाऊक नसलेला माणूस विरळाच असेल. अॅपल या सुप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी चार दशकांपूर्वी म्हणजेच १९७३ मध्ये एका कंपनीला पाठवलेला बायोडेटा पुढील महिन्यात लिलावात निघणार आहे. सध्या त्या बायोडेटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा बायोडेटा मिळवण्यासाठी किमान ५० हजार डॉलरपासून पुढे बोली लावण्यात येईल असा अंदाज लिलावकर्त्यांनी लावला आहे.

  • ऑक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार या बायोडेटामध्ये अनेक ठिकाणी स्पेलिंग आणि विराम चिन्हे यांच्या प्रचंड चुका या बायोडेटामध्ये आहेत. तसेच हा बायोडेटा अवघ्या एका पानाचच आहे. नोकरीसाठी दिलेल्या या बायोडेटामधे स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांचे नावही स्टीव्हन असे लिहिले होते. तसेच ऑरेगन ऐवजी रीड असेही लिहिले होते.

  • एवढेच नाही तर बायोडेटामध्ये कॅलफोर्नियाच्या कंपनीत हेवलट पॅकर्डचे नाव चुकून हेविट पॅकर्ड असे लिहिले होते. अर्जात स्टीव्ह जॉब्स यांनी ड्रायव्हिंग चा परवाना असेही म्हटले होते. या अर्जात जॉब्स यांनी कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे हेदेखील नमूद केले नव्हते.

  • स्टीव्ह जॉब्स यांच्या बायोडेटाचा लिलाव ८ ते १५ मार्च दरम्यान होईल. स्टीव्ह जॉब्स यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५५ ला झाला. २०११ मध्ये म्हणजेच वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आता त्यांच्या पहिल्या बायोडेटाचा लिलाव केला जाणार आहे. ‘द गार्डियन’ ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.(source :loksatta)

भारत व चीन यांच्यामुळेच पॅरिस करारातून माघार :
  • भारत व चीन यांच्यामुळेच अमेरिकेने हवामान करारातून माघार घेतली, असा आरोप अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेतली हे खरे आहे, पण त्यासाठी भारत आणि चीन जबाबदार आहेत. कारण तो करार अन्यायकारक होता. त्यात आम्हाला भारत व चीन यांना पैसे द्यावे लागले असते, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

  • ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात पॅरिस हवामान करारातून माघार घेतली होती. तेव्हा त्यात त्यांनी या करारामुळे अमेरिकेला लाखो डॉलर्सचा फटका बसला असता, अनेक नोकऱ्यांच्या संधी गेल्या असत्या, तेल, वायू व कोळसा तसेच उत्पादन उद्योगांना फटका बसला असता अशी कारणे दिली होती.

  • आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो, अन्यथा ती मोठी शोकांतिका ठरली असती. देशासाठी तो करार घातक होता, असे ट्रम्प यांनी राजकीय कृती समितीसमोर शनिवारी सांगितले.

  • चीन व भारत यांना पॅरिस करारातून फायदा मिळण्याची शक्यता होती असे सांगून ते म्हणाले की, हवामान बदलाचा हा करार अमेरिकेसाठी अन्यायकारक होता, त्यामुळे अमेरिकेतील उद्योग व नोकऱ्या धोक्यात आल्या असत्या. करारातून माघारीचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, आमच्याकडे तेल व नैसर्गिक वायू मोठय़ा प्रमाणात आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आहे.(source :loksatta)

सी-डॅक देणार कर्करोगावरील संशोधनाला चालना :
  • पुणे : सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅप अ‍ॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग (प्रगत संगणन विकास केंद्र) आगामी काळात महासंगणकाद्वारे कर्करोगावर संशोधन करण्यावर मोठा भर देणार आहे. शरीर यंत्रणेसाठी सुयोग्य अशी ‘पी-५३’ रेणूची प्रतिकृती बनविण्यासाठी औैषध द्रव्यांच्या पुनर्रचनेचा अभ्यास केला जाणार आहे. मुंबईचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल; तसेच अमेरिकेच्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेशी संवाद साधला आहे, अशी माहिती सी-डॅकचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांनी दिली.

  • सी-डॅकच्या परम शावक- आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी) या नवीन महासंगणकाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. दरबारी यांनी औषधद्रव्यांच्या उद्दिष्टांची पुनर्तपासणी करण्याबद्दलही त्यांच्या एका पथकाचे काम सुरू असल्याची माहिती दिली. ‘‘पी-५३ म्हणजेच ट्युमर प्रथिन हे पेशीचक्राचे नियंत्रण करणाºया प्रथिनाशी संबंधित असे जनूक आहे. म्हणूनच ते ट्युमर सप्रेसर (अर्थात - गाठीचे दमन करणारे) म्हणून काम करते.

  • औषधद्रव्यांची पुनर्रचना (किंवा त्यांच्या उद्दिष्टांची पुनर्तपासणी) म्हणजे, आधीपासून माहीत असलेल्या औषधीद्रव्यांचा व संयुगांचा नवीन रोगांवरील उपचारास वापर. या संकल्पनेंतर्गत औषधद्रव्यांच्या पुनर्रचनांचा अभ्यास सी-डॅक, करत असून, मधुमेहावरील औषधद्रव्यांचा उपयोग स्तनांच्या कर्करोगावरील संशोधनासाठी केला जाऊ शकतो, असेही डॉ दरबारी यांनी सांगितले.

  • संरक्षणक्षेत्रात रणांगणाचे प्रत्यंतर देणारी प्रणाली तयार करण्यासाठी; तसेच जाहिरातक्षेत्रात, शिक्षणक्षेत्रात, वाहन-अभियांत्रिकीमध्ये, इतकेच काय तर पुरातत्त्वशस्त्रामध्येही या महासंगणकाचा उपयोग करता येणे शक्य आहे. कालवश झालेली द्वारकेसारखी प्राचीन राज्ये आणि हडप्पासारख्या संस्कृतीमधील मूळ रचना डोळ्यांसमोर आणून त्यांची पुनर्निर्मितीही करणे या यंत्रामुळे शक्य होणार आहे. असे डॉ. दरबारी यांनी सांगितले.(source :lokmat)

‘विक्रम’ वाचनालय जपतेय बडोद्याचे मराठीपण :
  • बडोद्याच्या भूमीत मराठी साहित्याची रुची, वाचन संस्कृती जपण्याचे अखंड व्रत मानेकर कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. १९७३ साली श्रीकांत मानेकर यांनी बडोद्यात घरातच सुरू केलेल्या या वाचनालयाच्या इवल्याशा रोपट्याचा महावृक्ष झाला आहे. गेली तब्बल ४५ वर्षे हे वाचनालय शासनाच्या अनुदानाशिवाय बडोदेकरांपर्यंत वाचन संस्कृतीचे बीज रुजविते आहे.

  • बडोद्यातील दांडियाबाजार येथे असणाºया या वाचनालयात २५ हजार ग्रंथांचा खजिना आहे. त्यात ८० टक्के ग्रंथसंपदाही मराठी साहित्यविश्वाची आहे. या वाचनालयाचे ७०० सभासद आहेत. त्यात पाच वर्षांच्या लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या वाचनालयात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमधील साहित्यसंपदा आहे.

  • याशिवाय, मराठी चित्रपट-नाटकांच्या सीडीज्ही उपलब्ध आहेत. या वाचनालयाच्या माध्यमातून अनेक वर्षे बडोदेकरांना मराठी साहित्याशी नाते जोडण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. बडोद्यातील केवळ मराठी भाषिकांना नव्हेच तर अन्य भाषिकांनाही मराठी साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने हे वाचनालय कार्यरत आहे. बडोद्यातील विविध परिसरांत घरपोच विनामूल्य सेवा देण्यात येते. तीन स्वयंसेवक ही सेवा पुरवितात.

  • या वाचनालयाची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारी मानेकर कुटुंबीयांची दुसरी पिढी विक्रम मानेकर यांनी याविषयी सांगितले की, वाचनालयाच्या माध्यमातून सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात.

  • मराठी भाषेसह नाट्यकला, संगीतकला आणि सांस्कृतिक कार्यक्रमही वाचनालयाद्वारे आयोजित केले जातात. आतापर्यंत या वाचनालयाला गायक श्रीधर फडके, पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, गायक आनंद भाटे, गायिका मंजुषा कुलकर्णी आदी दिग्गजांनी भेट देऊन सादरीकरण केले आहे.(source :lokmat)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १५१०: पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

  • १८१८: ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला. दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतील बहुतेक सर्व किल्ल्यांची मोडतोड केली.

  • १९३५: फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई – नागपूर – जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – अमेरिकन विमानवाहू नौकांनी टोकियोवर बॉम्बहल्ला केला.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९६८: मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९८६: जनआंदोलनाच्या रेट्यामुळे २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडुन देशातुन पलायन केले.

  • १९९६: स्वर्गदारा तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले.

जन्म

  • १८४०: बालवाङ्‌मयकार विनायक कोंडदेव ओक यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑक्टोबर १९१४)

  • १८९४: आध्यात्मिक गुरू अवतार मेहेरबाबा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६९ – मेहराझाद, पिंपळगाव, अहमदनगर, महाराष्ट्र)

  • १९३८: भारतीय क्रिकेट खेळाडू आणि पंच फारूक इंजिनिअर यांचा जन्म.

  • १९४३: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर २००१)

  • १९४८: चित्रपट अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा यांचा जन्म.

  • १९७४: हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री दिव्या भारती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल१९९३)

मृत्यू

  • १५९९: संत एकनाथ यांचे निधन.

  • १९२४: जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.

  • १९६४: चित्रपट अभिनेत्री शांता आपटे यांचे निधन.

  • १९७८: प्राच्यविद्यासंशोधक डॉ. प. ल. वैद्य यांचे निधन. (जन्म: २९ जून १८९१)

  • १९८०: लेखिका व नाटककार गिरजाबाई महादेव केळकर यांचे निधन.

  • १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सीबोर्ग यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १९१२)

  • २००१: ऑस्ट्रेलियन फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)

  • २०१६: भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक भवरलाल जैन यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९३७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.