चालू घडामोडी - २५ डिसेंबर २०१७

Date : 25 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री :
  • सलग पाच वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. हिमाचलमधील भाजप आमदारांच्या बैठकीत एकमताने ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

  • हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत ६८ पैकी ४४ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला २१ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपचा विजय झाला असला तरी भाजपचे हिमाचलमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांचा अनपेक्षित पराभव झाला. यामुळे आता मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची, असा पेच भाजपसमोर निर्माण झाला होता.

  • केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जयराम ठाकूर आदी नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. रविवारी भाजपच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत धुमल यांनी जयराम ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ठाकूर यांच्या नावाला जे.पी. नड्डांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व आमदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि हिमाचलमध्ये ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले. 

  • ठाकूर हे सेरज विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. २००७ ते २००९ या कालावधीत ते भाजपचे हिमाचलमधील प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असल्याने ठाकूर यांचे पारडे जड होते. हिमाचलची जनता दर पाच वर्षांनी सत्ताबदल करते असा गेल्या दोन-अडीच दशकांचा तेथील अनुभव आहे.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचा आज 93वा वाढदिवस, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन दिल्या शुभेच्छा :
  • नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 93 वा वाढदिवस आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांनी ट्विटवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 25 डिसेंबर 1924 रोजी वाजपेयी यांचा जन्म झाला. 1998 ते 2004 या काळात त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांनी आपल्या वक्तृत्त्व कौशल्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यांनी लिहिलेल्या अनेक हिंदी कविता लोकप्रिय आहेत. 

  • वाढदिवसानिमित्त अटल बिहारी वाजपेयी  यांच्यावर शुभेच्छा प्रचंड वर्षाव होत आहे. उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यकर्त्यांनी कानपूर येथे वाजपेयी यांच्यासाठी हवन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या निरोगी आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठीदेखील प्रार्थना केली. 

रेल्वेची खानपान सेवा नववर्षात महागणार , ३० ते ५० टक्के वाढीचा अंदाज :
  • मुंबई : नवीन वर्षात रेल्वेकडून प्रवाशांच्या खिसा हलका केला जाणार आहे. स्टेशन तसेच गाड्यांमधील खाद्यपदार्थांचे दर ३० ते ५० टक्के वाढविण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे. रेल्वेकडून देशभरातील जवळपास ८०० गाड्यांमध्ये जेवणाचा विशेष डबा (पॅन्ट्री कार) लावला जातो.

  • यासोबतच ५० कंपन्यांना विविध स्टेशन्स तसेच पॅन्ट्री कार नसलेल्या गाडीत खाद्यान्न पुरविण्याची ३०० विविध प्रकारची कंत्राटे देण्यात आली आहेत. आता मात्र जीएसटीअंतर्गत कच्च्या मालाचे दर कमी-अधिक झाल्याने खाद्यान्नाचे दर वाढविण्याची मागणी कंत्राटदारांकडून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेही त्याबाबत सकारात्मक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • खाद्यान्नाची सेवा पुरविणाºया रेल्वे मंडळाच्या पर्यटन व कॅटरींग संचालनालयाची अलिकडेच रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सध्याचे खाद्यान्नांचे दर हे २०१२ चे आहेत. तेव्हापासून आतापर्यंत महागाई वर्षाला ६-७ टक्क्यांनी वाढत आहे. यासोबतच आता स्टेशनवरील खाद्यपदार्थांवर पाच टक्के आणि गाडीतील खाद्यपदार्थावर १८ टक्के जीएसटी लागत आहे.

  • मात्र त्याचा समावेश प्रवाशांना देण्यात येणाºया खाद्यान्नाच्या दरात करण्यात आलेला नाही. तसेही रेल्वेचे सध्याचे खाद्यान्नाचे दर बाजारापेक्षा खूप कमी आहेत. यामुळेच जीएसटी आणि महागाई यांचा विचार करून दरांचा सुधारित तक्ता तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. २०१८ पासून हे सुधारित दर लागू केले जाऊ शकतात.

कुलभूषण जाधव आज आई आणि पत्नीला भेटणार :
  • इस्लामाबाद : कथित हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार आहेत. इस्लामाबादस्थित परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात कुलभूषण जाधव आणि त्यांच्या आई आणि पत्नीची भेट होणार आहे. ही भेट दुपारी 12.30 वाजता असेल.

  • कुलभूषण यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पाकिस्तानकडून केवळ 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. यावेळी भारताचे उप-उच्चायुक्त जे पी सिंह सुद्धा उपस्थित असतील.

  • मानवतेच्या दृष्टीकोनातून कुलभूषण यांना आई आणि पत्नीला भेटण्यास परवानगी दिल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. या भेटीबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी अधिकृतरित्या सांगितले होते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांची आई आणि पत्नीला यासंदर्भात माहिती दिली.

  • कुलभूषणच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमी भारताने पाकिस्तानकडून घेतली आहे.

  • कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने बलुचिस्तानच्या सीमेवरुन 3 मार्च 2016 रोजी अटक केली होती. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर चाललेल्या खटल्यात त्यांना रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह, चर्चमध्ये गर्दी :
  • मुंबई : भारतासह जगभरात ख्रिसमसचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध चर्चमध्ये येशू जन्माचा उत्सव साजरा केला जात असून चर्चना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

  • आनंद आणि उत्साहाचं प्रतिक असलेला ख्रिसमस संपूर्ण ख्रिश्चन समाजाचा सर्वात मोठा सण आहे. 25 डिसेंबर रोजी प्रभू येशूंच्या जन्मदिवस म्हणून हा सण साजरा केला जातो.

  • मुंबई, वसई तसंच गोव्यात ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले होते. अत्यंत धार्मिक पद्धतीने मिसा झाला. चर्चमध्ये प्रभू येशूच्या आगमनाचं गीतही गायलं. यानंतर चर्चच्या फादरनी सर्वांना आशीर्वाद देवून, ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

  • दुसरीकडे मुंबईतील जुहू चौपाटीवर सॅण्ड आर्टिस्ट लक्ष्मी गौड यांनी सलग 12 तास मेहनत करुन 12 फुटांचा सांताक्लोज बनवला. यासोबत स्वच्छता राखा असा संदेशही त्यांनी दिला.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • नाताळ / चांगले शासन दिन

  • तुलसी पुजन दिन

महत्वाच्या घटना

  • ३३६: रोममध्ये पहिल्यांदा नाताळ साजरे करण्यात आले.

  • १९७६: आय. एन. एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील.

  • १९९०: वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी.

  • १९९१: मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या (USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

जन्म

  • १८२१: अमेरिकन रेड क्रॉसच्या संस्थापिका क्लारा बार्टन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९१२)

  • १८६१: बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक पण्डित मदन मोहन मालवीय यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)

  • १८७८: शेवरले कंपनीचे सहसंस्थापक लुई शेवरोलेट यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुन १९४१)

  • १९११: अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ बर्न होगार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९६ – पॅरिस, फ्रान्स)

  • १९२१: भारतीय-पाकिस्तानी पत्रकार आणि लेखक झैब-अन-नसीसा हमिदुल्ला यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर २०००)

  • १९२४: भारताचे १० वे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांचा जन्म.

  • १९२६: हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार डॉ. धर्मवीर भारती यांचा जन्म. (मृत्यू: ४ सप्टेंबर१९९७)

  • १९३२: व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार प्रभाकर जोग यांचा जन्म.

  • १९३६: भारतीय-इंग्रजी दिग्दर्शक व निर्माते इस्माईल मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)

  • १९४९: पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा जन्म.

  • १९५९: भारतीय कवी आणि राजकारणी रामदास आठवले यांचा जन्म.

मृत्य

  • १९४९: वॉर्नर ब्रदर्स कार्टूनचे संस्थापक लिओन स्चलिंगर यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४)

  • १९५७: साहित्यिक, विचारवंत व समाजसुधारक प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८८६)

  • १९७२: भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचे निधन. (जन्म: १० डिसेंबर१८७८)

  • १९७७: अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार चार्ली चॅपलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १८८९)

  • १९८९: रोमेनियाचे पहिले अध्यक्ष निकोला सीउसेस्कु यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १९१८)

  • १९९४: भारताचे ७ वे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे निधन. (जन्म: ५ मे १९१६)

  • १९९५: अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते डीन मार्टिन यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१७)

  • १९९८: नाटककार व दिग्दर्शक दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.