लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जागा घेतील. ब्रक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जून रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, जॉन्सन हे पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशा शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आल्या होत्या.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो. दरम्यान, थेरेसा मे सरकारमधील परराष्ट्र मंत्री अॅलन डंकन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच जॉन्सन यांच्यासोबत आपण काम करू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
यापूर्वी रविवारी अर्थमंत्री फिलिप हॅमंड यांनीही जॉन्सन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. तर डेव्हिड गुईके यांनीही जॉन्सन यांच्या निवडीनंतर अनेक मंत्री राजीनामा देतील, असे म्हटले होते.
नव्या पंतप्रधान पदाच्या निवडीपर्यंत थेरेसा मे या पंतप्रधानपदी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, मंगळवारी त्या अखेरची मंत्रिमंडळाची बैठक घेतील. त्यानंतर राणी एलिझाबेथ यांच्याकडे त्या आपला राजीनामा सोपवतील. त्यानंतर पुढील पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाईल. बोरिस जॉन्सन हे बुधवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभारही सांभाळला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरप्रश्नी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यस्थीची कोणतीही विनंती केलेली नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी राज्यसभेत नि:संदिग्ध शब्दांत स्पष्ट केले.
काश्मीरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती, असे खळबळजनक वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सोमवारी केले. त्यावर केंद्र सरकारच्या वतीने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी स्पष्टीकरण दिले.
पाकिस्तानशी असलेल्या कुठल्याही असहमतीचे मुद्दे द्विपक्षीय चर्चेद्वारेच सोडवले जातील. पाकिस्तानमधून होणारा दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही. दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा विचार सिमला आणि लाहोर कराराअंतर्गतच केला जाईल, असे निवेदन जयशंकर यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वाचून दाखवले. मात्र, विरोधकांचे समाधान न झाल्याने त्यांनी पंतप्रधानांनीच सभागृहामध्ये निवेदन देऊन देशाला आश्वस्त करावे, अशी मागणी केली.
भारताचा आर्थिक विकासदराचा २०१९ व २०२० या वर्षांतील अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ०.३ टक्क्य़ांनी कमी केला आहे. आता दोन्ही वर्षांचा आर्थिक विकासदर अनुक्रमे ७ व ७.२ टक्के राहील, असा सुधारित अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सुधारित अंदाजाचा विचार केला तरी भारत ही वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहणार असून ती चीनच्या पुढे राहील, असे सांगण्यात आले आहे.
भारतासोबत चीनच्या आर्थिक विकासदराबाबतही नाणेनिधीने भाष्य केले आहे. चीनला अमेरिकेशी सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा फटका बसणार असून त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आधीच ताण आलेला आहे. त्यामुळे रचनात्मक सुधारणांना खीळ बसली असून कर्जावरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी त्यांना नियंत्रणांची गरज आहे. बाहेरच्या धक्क्य़ातून सावरण्यासाठी काही धोरणात्मक उपाययोजना चीनने केल्या असल्या तरी चीनचा आर्थिक वाढीचा दर २०१९ मध्ये ६.२ टक्के आणि २०२० मध्ये ६ टक्के राहील. चीनचा विकास दराचा अंदाज ०.१ टक्क्य़ांनी कमी करण्यात आला आहे.
चिलीची राजधानी सँटियागो येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले, की नाणेनिधीने जागतिक आर्थिक वाढीचा अंदाजही कमी केला असून जागतिक आर्थिक विकास दर २०१९ मध्ये ३.२ टक्के, तर २०२० मध्ये ३.५ टक्के राहणार आहे. यात ०.१ टक्के कपात करण्यात आली आहे,याआधी एप्रिलमध्ये नाणेनिधीने अंदाज दिले होते. अमेरिका- चीन यांच्यातील व्यापार युद्धाने जागतिक आर्थिक विकास दर २०२० मध्ये ०.५ टक्क्य़ांनी कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हैदराबाद : आंध्र प्रदेश सरकारने राज्यातल्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि उद्योगातील तब्बल 75 टक्के नोकऱ्या फक्त स्थानिक भूमिपुत्रांनाच मिळतील असा आदेश जारी केला आहे. देशात असा आदेश जारी करणारं आंध्र प्रदेश हे पहिलंच राज्य बनलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेशने राज्यातील खाजगी नोकऱ्यात स्थानिक भूमिपुत्रांना 70 टक्के आरक्षण देणार असल्याचं सूचित केलं होतं. त्यासाठी कमलनाथ सरकार अध्यादेशही जारी करणार होतं. मात्र आंध्र प्रदेशमधील जगनमोहन सरकारने थेट निर्णय घेत सर्वांवर कडी केली आहे.
आंध्र प्रदेशच्या अधिनियमातील महत्वाची तरतूद अशी आहे की, सरकारने एखाद्या उद्योगाला आर्थिक किंवा जमीन वगैरे अन्य सहाय्य दिलं असो की नसो, त्यांना या स्थानिक भूमिपुत्रांसाठी 75 टक्के आरक्षणाचं धोरण राबवावंच लागणार आहे.
मध्य प्रदेश सरकारने 9 जुलै रोजी घोषणा केली, त्याच्या बातम्याही आल्या. डिसेंबर 2018 मध्ये सत्तेत आलेल्या कमलनाथ सरकारने खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 70 टक्के आरक्षण ठेवण्याची घोषणा गाजावाजा करत केली होती. मात्र प्रत्यक्षात सुधारित औद्योगिक धोरण तयार करताना, ज्या उद्योगांना राज्य सरकारने आर्थिक आणि अन्य मदत केली आहे, अशा उद्योगांसाठीच हे 70 टक्के आरक्षणाचा नियम लागू असल्याचं जाहीर केलं.
भारताची अनुभवी बॉक्सिंगपटू भाग्यवती कचारीने मंगळवारी थायलंड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारून किमान कांस्यपदक निश्चित केले. त्याशिवाय पुरुषांमध्ये आशीष कुमार आणि मोहम्मद हुसामुद्दीन यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
भाग्यवतीने ७५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात व्हिएतनामच्या नगुएन हॉगला ५-० अशी धूळ चारली.
पुरुषांमध्ये आशीषने ६९ किलो गटाच्या उपउपांत्यपूर्व लढतीत क्रोएशियाच्या पीटर सेटिनिचला ५-० असे नामोहरम केले. मोहम्मदने ५६ किलो गटात जॉर्ज मोलवांताला ५-० असे पराभूत केले. याव्यतिरिक्त मनीषा मौन (५७), मंजू राणी (४८), ब्रिजेश यादव (८१) यांनीसुद्धा उपांत्यपूर्व फेरी गाठली.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ने आज आयकर विवरणपत्र (आयटीआर) फाइल करण्यासाठी अगोदर निर्धारित केलेली ३१ जुलै ही तारीख वाढवून आता ३१ ऑगस्ट केली आहे. इन्कम टॅक्स विभागाने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती दिली आहे.
आयकर विवरणपत्र फाइल करण्याच्या ३१ ऑगस्ट या अंतिम तारखेनंतर दंड देखील द्यावा लागू शकतो. त्यामुळे अंतिम तारखेच्या आतच आयटीआर फॉर्म फाइल करणे फायद्याचे राहणार आहे. यासाठी फॉर्म १६ आणि पॅन कार्डसारख्या अन्य कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी होत होती.
आयटीआर प्रत्येकवर्षी फाइल करणे बंधनकारक आहे. आयटीआर फाइल केला नाहीतर आयकर विभागाकडून नोटीस अथवा दंड ठोठावला जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घटना
१५६७: स्कॉटलंडची राणी मेरी पदच्युत झाल्यामुळे १ वर्षाचा जेम्स (सहावा) स्कॉटलंडच्या राजेपदी विराजमान झाला.
१७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला.
१८२३: चिलीमध्येे गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली.
१९११: हायराम बिंगहॅम – ३रे यांनी पेरूतील माचुपिच्चू हे प्राचीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
१९३१: पिटसबर्ग, पेनसिल्व्हानिया येथील एका वृद्धाश्रमास आग लागुन ४८ लोक मृत्यूमुखी पडले.
१९४३: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन गोमोरा – दोस्त राष्ट्रांनी जर्मनीतील हॅम्बर्ग शहरावर तुफानी बॉम्बहल्ले सुरू केले.
१९६९: चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११हे अंतराळयान पृथ्वीवर सुखरूप परतले.
१९७४: वॉटरगेट प्रकरण – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिर्चड निक्सनने स्वत:विरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.
१९९०: इराकने कुवेतच्या सीमेजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरूवात केली.
१९९१: अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घालणारा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
१९९७: बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९७: माजी हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा आणि स्वातंत्र्यसैनिक अरुणा असफ अली यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान.
१९९८: परकीय चलन नियमन कायद्याच्या (FERA) जागी परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) जारी करण्यात आला.
२०००: विप्रो आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चेन्नईची विजयालक्ष्मी सुब्रह्यण्यम भारताची पहिला महिला ग्रँडमास्टर बनली.
२००१: टोकियो येथे झालेल्या जागतिक जलतरण स्पर्धेत शिखा टंडनने फ्रीस्टाइल प्रकारात १०० मी. अंतर ५९.९६ सेकंदांत पार केले.
जन्म
१७८६: फ्रेंच गणितज्ञ संशोधक जोसेफ निकोलेट यांचा जन्म.
१८५१: जर्मन गणितज्ञ फ्रेडरिक शॉटकी यांचा जन्म.
१९११: हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांचा जन्म.
१९११: बासरीवादक संगीतकार अमलज्योती तथा पन्नालाल घोष यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९६०)
१९२८: गुजरातचे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा सदस्य केशुभाई पटेल यांचा जन्म.
१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक मनोज कुमार यांचा जन्म.
१९४५: विप्रो या जगप्रसिद्ध कंपनीचे चेअरमन अझीम प्रेमजी यांचा जन्म.
१९४७: पाकिस्तानी फलंदाज जहीर अब्बास यांचा जन्म.
१९६९: अमेरिकन अभिनेत्री, गायिका आणि नर्तिका जेनिफर लोपेझ यांचा जन्म.
मृत्यू
११२९: जपानी सम्राट शिराकावा यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १०५३)
१९७०: भारतीय उद्योगपती पीटर दि नरोन्हा यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९७)
१९७४: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर१८९१)
१९८०: बंगाली हिंदी चित्रपट अभिनेते उत्तम कुमार यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९२७)
१९८०: इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक पीटर सेलर्स यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२५)
२०१२: सीटी स्कॅन चे शोधक रॉबर्ट लिडले यांचे निधन. (जन्म: २८ जुन १९२६)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.