चालू घडामोडी - २४ डिसेंबर २०१७

Date : 24 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ए. राजा, कनीमोळी यांचे चेन्नईत भव्य स्वागत :
  • माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि डीएमकेच्या राज्यसभा खासदार कनीमोळी यांचे शनिवारी चेन्नई विमानतळावर एखाद्या सेलिब्रटीप्रमाणे भव्य स्वागत करण्यात आले. या दोघांची 2G घोटाळ्यातून सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नुकतीच निर्दोष सुटका केली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

  • तामिळनाडूतील डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे आपली बहिण कनीमोळी आणि पक्षाचे नेते राजा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. यावेळी कनीमोळी यांचे वडिल डीएमकेचे सुप्रीमो करुणानिधी यांच्या सोबतचे फोटो फलकांवर झळकवण्यात आले होते. त

  • सेच या फलकांवर करुणीधींनी दिलेला तमिळ भाषेतील संदेशही छापण्यात आला होता. लोककलावंतांनी ढोलच्या तालावर नृत्य सादर करुन त्यांचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने डिएमकेचे समर्थक उपस्थित होते.

  • विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कनीमोळी आणि राजा हे ज्या टर्मिनलवरुन बाहेर पडणार होते त्या ठिकाणचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. जेणे करुन त्यांना तत्काळ बाहेर पडता यावे आणि त्याचा त्रास इतर प्रवाशांना होऊ नये. मात्र, येथे जमलेल्या गर्दीमुळे विमानतळातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना थोड्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. 

महाराष्ट्र केसरीसाठी दोस्तीत कुस्ती, सख्खे मित्र फायनलमध्ये भिडणार :
  • पुणे : पुणे शहरचा अभिजीत कटके की, साताऱ्याचा किरण भगत? कोण होणार 2017 सालचा महाराष्ट्र केसरी? उभ्या महाराष्ट्रातल्या लाखो कुस्तीशौकिनांना सध्या याच प्रश्नाच्या उत्तराची उत्सुकता लागून राहिलीय.

  • पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावात आज सायंकाळी त्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. पण तोवर महाराष्ट्राच्या गावागावात महाराष्ट्र केसरीचाच विषय चवीचवीनं चघळला जाईल. आपणही त्या निमित्तानं अभिजीत कटके आणि किरण भगत या दोन्ही पैलवानांच्या ताकदीचं मूल्यमापन करुया.

  • अभिजीत कटके आणि किरण भगत हे दोघंही एकाच वयाचे म्हणजे बावीस वर्षांचे आहेत. पण या वयातही त्या दोघांनीही महाराष्ट्राच्या कुस्तीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राष्ट्रीय तालीम संघातून बाळासाहेब लांडगे निलंबित, विश्वस्त मंडळाचा निर्णय :
  • पुणे : राष्ट्रीय तालीम संघाची बदनामी केल्याच्या आरोपावरुन कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचे राष्ट्रीय तालीम संघातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय (वरिष्ठ) समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी दिली.

  • तालीम संघाच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तालीम संघाने लांडगे यांना ३० नोव्हेंबर २०१७रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली होती. त्यात आपण तालीम संघाच्या हिताविरोधात कृत्य करीत असल्याचे, तसेच संघाची बदनामी करणाºया व्यक्तींना पाठबळ देत असल्याचे म्हटले आहे.

  • यावर आपण सात दिवसांत खुलासा न केल्यास आपले सदस्यत्व व प्रतिनिधीत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. लांडगे यांच्याकडून त्याबाबतचा खुलासा न मिळाल्याने विश्वस्त मंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

  • त्यांचे गुलशे तालिमीकडून राष्ट्रीय तालीम संघाकडे आलेले सदस्यत्व व आजीव सभासदत्व निलंबित करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठ समिती नेमण्यात येणार आहे. त्यांचा निर्णय होईपर्यंत राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने राज्य कुस्तीगीर परिषदेतील आपले प्रतिनिधित्व देखील रद्द करण्यात येत आहे. 

टीम इंडियाचा ‘क्लीन स्वीप’चा निर्धार; वानखेडे स्टेडियमवर आज सामना, रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर :
  • मुंबई : तुफान फॉर्ममध्ये असलेली टीम इंडिया रविवारी भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेला टी-२० मालिकेत क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने उतरेल. त्याचवेळी सध्या लंकेला रडकुंडीला आणणारा कर्णधार रोहित शर्मा घरच्या मैदानावर कोणता पराक्रम करणार, याचीच उत्सुकता भारतीयांना लागली आहे. दुसरीकडे, मालिकेतील उरलीसुरली प्रतिष्ठा जपण्यासाठी श्रीलंकेचा संघ मुंबईत खेळेल.

  • कटक आणि इंदूर येथे सलग दोन टी-२० सामने जिंकून भारताने आधीच तीन सामन्यांच्या मालिकेत २-० असा कब्जा केला आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरचा सामना जिंकून लंकेला क्लीन स्वीप देण्याच्या निर्धाराने टीम इंडियाने खेळेल. भारतीय संघ यासाठी लंकेला कोणतीही दयामाया दाखवणार नसल्याचे स्पष्ट असले, तरी त्यांची मुख्य मदार कर्णधार रोहित शर्मावर असेल.

  • मोहाली येथे झालेल्या दुसºया एकदिवसीय सामन्यात जबरदस्त द्विशतक ठोकलेल्या रोहितने दुसºया टी-२० सामन्यातही वेगवान शतकी तडाखा देत लंकेला अक्षरश: रडकुंडीला आणले. त्यांच्या कोणत्याच गोलंदाजाचा रोहितपुढे निभाव लागला नाही. त्यातच, गेल्या सामन्यात रोहितसह लोकेश राहुलनेही आपला झंझावात सादर करताना लंकेची आगीतून फुफाट्यात आल्यासारखी अवस्था केली होती.

  • शिवाय, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या असे एकाहून एक हिटर असलेल्या भारताच्या मजबूत फलंदाजीला रोखण्याचे मुख्य आव्हान श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे असेल. 

पाकिस्तानी हॅकर्सला भारतीयांचं जशास तसं उत्तर, पोलिसांची वेबसाइट हॅक करुन लिहिलं 'वंदे मातरम :
  • नवी दिल्ली - एका भारतीय हॅकर ग्रुपने शुक्रवारी कराची पोलिसांची वेबसाइट हॅक केली. हॅकर्स फक्त वेबसाइट हॅक करुन थांबले नाहीत, तर त्यांनी साइटवर 'वंदे मातरम' असं लिहिलं. महत्वाचं म्हणजे जितका वेळ वेबसाइट हॅक होती, तितका वेळ तिथे भारताचं राष्ट्रीय गीत वाजत होतं. कराची पोलिसांना वेबसाइट हॅक झाली आहे, हे कळायला वेळ लागला. पण नंतर त्यांची चांगलीच धावपळ सुरु झाली.

  • अथक प्रयत्नानंतर वेबसाइट पुर्ववत करण्यात त्यांना यश मिळालं. गतवर्षी काही पाकिस्तानी हॅकर्सनी भारताच्या वेबसाइट्स हॅक केल्या होत्या. या वेबसाइट्सवर त्यावेळी पाकिस्तानी लष्कराची गाणी वाजवली गेली होती.

  • भारतीय हँकर्सनी कराची पोलिसांची वेबसाइट हॅक करुन त्यांना त्यांच्याच शब्दात उत्तर दिलं जात असल्याचं बोललं जात आहे. कराची पोलिसांची वेबसाइट हॅक करणा-यांनी आपण ‘मल्लू साइबर सोल्जर्स’ असल्याचा दावा केला आहे. वेबसाइटवर त्यांनी वंदे मातरमसहित लिहिलं होतं, हॅक्ड बाय D3VIL S3C।. 

  • इतकंच नाही हॅकर्सने पुढे लिहिलं होतं की, 'आम्ही भारतावर प्रेम करतो'. वेबसाइट जितका वेळ हॅक होती, तितका वेळ त्याच्यावर भारताचं राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' सुरु होतं. 1998 पासून सीमारेषेपलीकडून हॅकिंग होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. जून महिन्यात भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानमधील पीपीपी नावाची एक वेबसाइट हॅक केली होती. 

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

  • १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.

  • १९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

  • १९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.

  • १९५१: लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.

  • १९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

  • २०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.

जन्म

  • १८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)

  • १८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर१९३४)

  • १८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)

  • १८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९५०)

  • १९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८०)

  • १९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)

  • १९३२: भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काऊड्रे यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०००)

  • १९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)

  • १९५७: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचा जन्म.

  • १९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.

मृत्य

  • १९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)

  • १९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)

  • १९७७: आसामी कवयित्री व लेखिका नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८)

  • १९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१७)

  • १९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९०५)

  • १९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)

  • २०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)

  • २००५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.