चालू घडामोडी - २४ एप्रिल २०१८

Date : 24 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर होणार :
  • रघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे अशी माहिती समोर येते आहे. यु.के. मधील ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बँक ऑफ इंग्लंड च्या गव्हर्नर पदाचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्या यादीत सर्वात चर्चेत नाव आहे ते रघुराम राजन यांचेच. बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कुणाला नियुक्त करायचे आहे याची प्रक्रिया ब्रिटनचे चान्सलर फिलीप हॅमंड सुरु करणार आहेत.

  • रघुराम राजन हे आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर होते. आठवड्याभरापूर्वीच त्यांनी नोटाबंदीवर टीका करत नोटाबंदीचे हा काही सकारात्मक निर्णय नाही हे सरकारला सांगितले होते असे म्हटले होते. केंब्रिज मधील हार्वर्ड केनेडी स्कूल या ठिकाणी झालेल्या एका व्याख्यानात आरबीआयशी सल्ला मसलत न करता सरकारने जनतेवर नोटाबंदीचा निर्णय लादला अशीही टीका त्यांनी केली. याआधीही त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर वारंवार टीका केली आहे. नोटाबंदी हा निर्णय कसा चुकीच्या पद्धतीने घेतला गेला हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. आपली परखड मते त्यांनी याआधीही मांडली आहेत.

  • रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थ तज्ज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या ४० व्या वर्षी प्रमुख झाले. २००५ मध्ये त्यांनी शोध निबंध सादर करून आर्थिक मंदीचा अंदाजही व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

  • मात्र तीन वर्षांनी राजन यांनी व्यक्त केलेले भाकीत खऱे ठरले. अमेरिकासह जागतिक अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा फटका बसला. आता याच रघुराम राजन यांचे नाव बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी चर्चेत आहे. राजन यांच्यासोबतच श्रिती वडेरा या ब्रिटनमधील राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ असलेल्यांचेही नाव चर्चेत आहे.

नरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त :
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चालू आठवडयात महत्वपूर्ण बैठक होणार आहे. भारत-चीन संबंधात सुधारणेच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमधील ही भेट अत्यंत महत्वपूर्ण आहे. दोन्ही देशांच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब असली तरी पाकिस्तान मात्र या भेटीमुळे टेन्शनमध्ये आला आहे. मोदी-जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे.

  • पाकिस्तानची हीच अस्वस्थतता लक्षात घेऊन चीनने त्यांना आश्वस्त केले आहे. आमच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधात कुठलाही फरक पडणार नाही. दोन्ही देशांचे संबंध पूर्वी होते तसेच दृढ राहतील असे चीनने म्हटले आहे. आज भारतासमोर मुख्य आव्हान या दोन देशांचेच आहे आणि हे दोन्ही देशही भारताकडे शत्रूत्वाच्या नजरेनेच पाहतात.

  • मागच्या वर्षभरात भारत-चीनसंबंध मोठया प्रमाणावर खराब झाले आहेत. दोन्ही देशांचा परस्परांवर विश्वास राहिलेला नाही. डोकलाममध्ये दोन्ही देशांच्या फौजा आमने-सामने आल्या होत्या. त्यानंतर तिबेटी अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्या अरुणाचल भेटीवरुनही चीनने आगपाखड केली होती. या सर्व मुद्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जात असून ते शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. २७ आणि २८ एप्रिल रोजी अनौपचारिक उच्चस्तरीय बैठकीत मोदी आणि जिनपिंग हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. आमचा पाकिस्तानला पाठिंबा राहिल असे वँग यी यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा असिफ यांना सांगितले.

नायडूंचा निर्णय योग्यच- फली नरिमन :
  • महाभियोगाच्या नोटिशीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ात फारसे गांभीर्य नव्हते, त्यामुळे ती फेटाळण्याचा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा  निर्णय योग्यच आहे, असे मत प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांनी व्यक्त केले आहे.

  • ते म्हणाले, की राज्यसभेच्या अध्यक्षांना महाभियोग नोटिशीवर निर्णय घेण्याचा वैधानिक अधिकार घटनेने दिला आहे. काँग्रेस व सात विरोधी पक्षांनी सरन्यायाधीशांविरोधात गेल्या आठवडय़ात महाभियोग नोटीस नायडू यांच्याकडे सादर केली होती.

  • जेव्हा सरन्यायाधीशांबाबत महाभियोग नोटीस दिली जाते व त्यात महत्त्वाचे आरोप असण्याऐवजी ते हे करीत नाहीत ते करीत नाहीत असे किरकोळ आरोप असतील तर त्याला अर्थ नाही. उपराष्ट्रपतींना नोटीस फेटाळण्याचा अधिकार असतो. त्या नोटिशीत जे मुद्दे होते ते बघता ती फेटाळण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • नोटिशीतील आरोपांचे गांभीर्य ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांची चौकशी समिती नेमायला पाहिजे होती या मुद्दय़ावर ते म्हणाले, की सरन्यायाधीश या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवृत्त होत आहेत. त्यामुळे हे प्रकरण तोपर्यंत चालू शकणार नाही. जर ते अजून चार-पाच वर्षे अधिकारपदावर राहणार असते तर हा युक्तिवाद योग्य होता. आताच्या परिस्थितीत त्याला अर्थ नाही.

आकर्षक रंग व ऑफरसह मिळणार हा स्मार्टफोन :
  • मुंबई- या वर्षाच्या प्रारंभी स्मार्टरॉन कंपनीने टी. फोन पी या थोड्या विचित्र नावाने स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला होता. आता हेच मॉडेल गोल्ड अर्थात सोनेरी रंगाच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. ही नवीन आवृत्ती ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आली आहे. याच्या लाँचींगसाठी स्मार्टरॉन कंपनीने डिस्को किंग आणि गोल्डमॅन म्हणून ख्यात असणार्‍या भप्पी लाहिरीसोबत करार केला आहे. भप्पीदाने यासाठी सोशल मीडियातून सोना कहा है या नावाने एक कँपेन सुरू केले आहे. खरं तर ही एक काँटेस्ट म्हणजेच स्पर्धा आहे.

  • यात विजयी होणार्‍या  स्पर्धकांना स्मार्टरॉन टी. फोन पी मॉडेलची गोल्ड एडिशन जिंकण्याची संधी आहे. हा स्मार्टफोनदेखील मूळ आवृत्तीप्रमाणेच ७,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आला आहे. रंग वगळता यातील अन्य फिचर्सदेखील मूळ मॉडेलनुसारच असतील.

  • या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा एचडी(१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.

  • यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह फिंगरप्रिंट स्कॅनर, ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी-ओटीजी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

खात्यात १५ लाख कधी येणार? RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नावर मिळालं 'हे' उत्तर :
  • नवी दिल्ली- 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून पंतप्रधान पदाचे दावेदार असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी प्रचाराच्या वेळी नागरिकांना अनेक आश्वासनं दिली. यामधील सर्वात मोठं आश्वासन म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील, असं वचन मोदींनी दिलं होत.

  • पण आता मोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्ष झाली तरिही 15 लाख रुपये मिळण्याची कुठलीही शक्यता नाही. मोदी सरकार सत्तेत आल्यावर काळ्या पैशांवर मोठी कारवाई करत प्रत्येक नागरिकाला सरकार 15 लाख रुपये देईल, असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या या मोठ्या घोषणेवर आरटीआय अॅक्टिव्हिस्ट मोहन कुमार शर्मा यांनी माहितीच्या अधिकारातून नेमके कोणत्या तारखेला १५ लाख रुपये नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार याबाबत माहिती मागवली. 

  • मोहन कुमार शर्मा यांनी नोटबंदीच्या घोषणेच्या १८ दिवसांनंतर म्हणजे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी आरटीआयअंतर्गत १५ लाख रुपयांबाबत माहिती मागितली होती. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होण्यास नेमकी केव्हापासून सुरूवात होणार असं शर्मा यांनी विचारलं. 

  • त्यावर मोहन कुमार शर्मा यांना उत्तर मिळालं की,  नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेबाबत विचारलेला प्रश्न माहिती अधिकार कायद्यात येत नाही, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही असं उत्तर पंतप्रधान कार्यालयाने केंद्रीय माहिती आयोगाला दिलं आहे. 

चीन-पाकशी एकत्र निपटण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज- बी. एस. धनोवा :
  • नवी दिल्ली- भारतीय हवाई दल चीन आणि पाकिस्तानबरोबर एकत्रित दोन हात करण्यासाठी तयार आहे, असे संकेत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोवा यांनी दिले आहेत. हवाई दलाच्या 13 दिवसांच्या युद्धाभ्यासा(गगनशक्ती)नं निश्चित उद्दिष्ट्यांहून चांगले परिणाम मिळवले आहेत. हवाई दलाच्या तीन दशकातील हा युद्धाभ्यास 20 एप्रिलला संपन्न झाला.

  • लढाऊ विमान, रोटरी विंग विमानांनी 11 हजारांहून जास्त वेळा उड्डाण करून युद्धासाठीच्या स्वतःच्या क्षमतेचं परीक्षण केलं आहे.  8 एप्रिलपासून 20 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या युद्धाभ्यासात ब्रह्मोस आणि हार्पून अशा क्षेपणास्त्रांसह सुखोई आणि जग्वार सारख्या विमानांनी सहभाग नोंदवत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. आम्ही 48 तासांच्या आताच शस्त्रास्त्र आणि साधनांना एका भागातून दुस-या भागात नेण्याचं लक्ष्य पूर्ण केलं आहे, असंही बी. एस. धनोवा म्हणाले आहेत.

  • हवाई दलानं गगनशक्ती युद्धसरावादरम्यान वाळवंट, लद्दाखसारखी उंच ठिकाणं, समुद्रात सराव केला आहे. हवाई दलाच्या अधिका-यांनी युद्धसरावादरम्यान मलाक्क्याची सामुद्रधुनी हल्ला केल्याच्या बातमीचं खंडन केलं आहे. परंतु हवाई दलानं 4000 किलोमीटर दूरवर असलेल्या मलाक्क्याची सामुद्रधुनीला लक्ष्य करण्याची क्षमता प्राप्त केल्याही माहिती वायुसेना प्रमुखांनी दिली आहे.

  • नौदलानं दिलेल्या ठिकाणांनाच आम्ही टार्गेट केलं आहे. त्यात मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या समुद्री मार्गांचा समावेश नाही. याच वेळी हवाई दलानं नौदलाबरोबर संयुक्तरीत्या समुद्री आणि हवाई ऑपरेशनचा अभ्यास केला आहे. चीन हिंदी महासागरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय हवाई दलाला युद्धसरावात मिळालेलं यश हा चीनसाठी एक प्रकारचा इशाराच आहे.

दिनविशेष :
  • भारतीय पंचायती राज दिन

महत्वाच्या घटना

  • १६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करून जिंकला.

  • १७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.

  • १८००: जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरवात.

  • १९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमीर कोमारोव्ह हे मरण पावणारे पहिले अंतराळवीर आहेत.

  • १९६८: मॉरिशस देशाचा संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) प्रवेश

  • १९७०: गाम्बिया देश प्रजासत्ताक बनले.

  • १९९०: अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.

  • १९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचे अतिरेक्यांनी अपहरण केले. सर्व १४१ प्रवाशांची सुखरूप मुक्तता झाली.

  • २०१३: ढाका, बांगलादेश मध्ये इमारत कोसळून ११२९ जणांचा बळी गेला आणि २५०० जण जखमी झाले.

जन्म

  • १८८९: इंग्लिश राजकारणी सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)

  • १८९६: रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९८०)

  • १९१०: चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजा परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)

  • १९२९: कन्नड चित्रपट अभिनेता व गायक राजकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल २००६)

  • १९४२: अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका बार्बारा स्ट्रायसँड यांचा जन्म.

  • १९७०: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डॅमियन फ्लेमिंग यांचा जन्म.

  • १९७३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा जन्म.

मृत्यू

  • १९४२: नाट्यसंगीत, गायक आणि अभिनेते मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर१९००)

  • १९६०: नामवंत वकील लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर यांचे निधन.

  • १९७२: चित्रकार जामिनी रॉय यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८८७)

  • १९७४: देशभक्त तसेच हिंदी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)

  • १९९४: उद्योगपती, किर्लोस्कर उद्योग समूहाचे आधारस्तंभ शंतनुराव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०३)

  • १९९९: चित्रपट कला दिग्दर्शक सुधेंदू रॉय यांचे निधन.

  • २०११: आध्यात्मिक गुरू सत्य साईबाबा यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)

  • २०१४: भारतीय राजकारणी शोभा नेगी रेड्डी यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९६८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.