चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ जुलै २०१९

Date : 23 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
धोनीची विनंती सैन्याकडून मान्य, जम्मू काश्मीरमध्ये दोन महिने प्रशिक्षण घेणार :
  • मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला सैन्यात प्रशिक्षणाची परवानगी मिळाली आहे. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी धोनीची विनंती मंजूर केली आहे. आता तो पॅराशूट रेजिमेंटमध्ये दोन महिन्यांचं प्रशिक्षण घेणार आहे.

  • हे प्रशिक्षण जम्मू काश्मीरमध्ये होऊ शकतं, परंतु धोनी कोणत्याही ऑपरेशनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. महेंद्रसिंह धोनी टेरिटोरियल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल आहे.

  • आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचं सांगत महेंद्रसिंह धोनीने दोन महिन्याचा ब्रेक घेतला आहे. धोनीने बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्याच्याऐवजी संघात युवा खेळाडू रिषभ पंतचा समावेश करण्यात आला आहे. धोनी आता सैन्यात पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षण घेणार आहे.

मराठमोळे लेफ्टनंट जनरल एम एम नरवणे नवे लष्कर उपप्रमुख :
  • नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या उपप्रमुखपदी मराठी माणसाची नेमणूक झाली आहे. ईस्टर्न आर्मी कमांडर, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबू 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी एम एम नरवणे यांची वर्णी लागली आहे.

  • नरवणे गेल्या 37 वर्षांपासून भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत आहेत. याआधी त्यांनी इन्फंट्री ब्रिगेडचंही नेतृत्त्व केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील घुसखोरांना यमसदनी पाठवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • दरम्यान, एम एम नरवणे यांच्या जागी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केला होता. ही बालाकोट मोहीम फत्ते करण्यात चौहान यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये :
  • ९३ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. साहित्य महामंडळाच्या पत्रकार परिषदेत उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा करण्यात आली. जानेवारी महिन्यात साहित्य संमेलन पार पडणार आहे. गेल्या आठ वर्षांपासून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे मराठवाड्यात साहित्य संमेलन घेतलं जावं अशी मागणी होत होती.

  • यंदाचं साहित्यसंमेलन मराठवाड्यात घेतलं जाणार असा अंदाज लोकसत्ताने जून महिन्यात वर्तवलाच होता. तो खरा ठरवत साहित्य महामंडळाने ९३ वं मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये घेतलं जाणार आहे. मराठवाड्यातल्या उस्मानाबादमध्ये पार पडण्याची दाट शक्यता लोकसत्ताने जून महिन्यात दिलेल्या बातमीत वर्तवली होती. त्याच नावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब केलं आहे.

  • १६ जुलै रोजी उस्मानाबाद शहर आणि परिसरातल्या विविध संस्था, संघटनाच्या उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय या ठिकाणी जाहीर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेल्या आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या वास्तव्याने पावन झालेल्या उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय साहित्यसंमेलन व्हावे यासाठी मराठवाड्याच्या साहित्य परिषदेच्या शाखेने गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. ९३ व्या संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार ठिकाणाहून संमेलनाची मागणी झाली. मात्र त्यामध्ये उस्मानाबादचे पारडे जड ठरले आणि हे साहित्य संमेलन घेण्याचा मान उस्मानाबादला मिळाला आहे.

यांनी शोधला चांद्रयान-२ प्रक्षेपकातील बिघाड :
  • भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेचे सोमवारी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन हे यान अंतराळात झेपावले. चंद्रावर पोहचण्यासाठी या यानाला चाळीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. चांद्रयान-२ मोहिमेत जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या क्रायोजेनिक इंजिनातील हेलियम टाकीत दाब कमी झाल्याने १५ जुलै रोजी ऐनवेळी उड्डाण रद्द करावे लागले होते.

  • त्यानंतर यानाच्या प्रक्षेपणासाठी फार कमी कालावधी उरला होता. या अवघड परिस्थितीत कमी काळात प्रक्षेपकातील बिघाड शोधून काढणे आवश्यक होते. ते काम तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे सध्याचे संचालक डॉ. डी. सोमनाथ यांनी पार पाडले. ते मेकॅनिकल अभियंता आहेत. त्याशिवाय प्रक्षेपण संचालक जे. जयप्रकाश व प्रक्षेपक संचालक रघुनाथ पिल्ले यांनीही हा बिघाड शोधून काढण्यात मोठी भूमिका पार पाडली.

  •  

  • चांद्रयान २ मोहिमेत याशिवाय अग्निबाण अभियंता व उपग्रह निर्मितीतज्ञ पी. कुन्हीकृष्णन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. ते सध्या यू.आर. राव उपग्रह केंद्राचे संचालक आहेत. अहमदाबादच्या फिजिकल रीसर्च लॅबोरेटरीचे डॉ. अनिल भारद्वाज यांचाही यात मोठा सहभाग होता.

  • दरम्यान, चंद्रापासून ३० किमी अंतर राहिल्यानंतर चांद्रयान २ चा वेग कमी करण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यान चंद्रावर उतरण्याच्या आधीची १५ मिनिटं महत्त्वाची आहेत असं के. शिवन यांनी म्हटलं आहे. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास तो जगातला चौथा देश ठरणार आहे.

अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कट ऑफमध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण :
  • मुंबई : अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर झाली आहे. यामध्ये पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत सरासरी 1 ते 2 टक्क्यांनी घसरणही दुसऱ्या गुणवत्ता यादीत पाहायला मिळत आहे. पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आज दुपारी 3 वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

  • या दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये आर्टस्, कॉमर्स, सायन्स, एमसीव्हीसी या सर्व शाखांसाठी 1,07,785 विद्यार्थ्यांपैकी एकूण 69170 विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले असून यामध्ये 16337 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे.

  • पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळल्यामध्ये आर्टस् 1972, कॉमर्स 9890, सायन्स 4130 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले त्यांना या प्रवेश फेरीमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असणार आहे. तर इतर ज्या विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये कॉलेज मिळाले आहे अशा विद्यार्थ्यांनी 25 जुलै दुपारी 3 वाजेपर्यंत आपले प्रवेश आपल्याला मिळालेल्या कॉलेजमध्ये जाऊन निश्चित करायचे आहेत.

  • दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये एसएससीच्या 63600 विद्यार्थ्यांना, सीबीएसई 1845 विद्यार्थ्यांना तर आयसीएसईच्या 2454 विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमांक 2 ते 10 मधील कॉलेज मिळाले आहे आणि या फेरीमध्ये प्रवेश घ्यायचा नसल्यास त्यांना तिसऱ्या फेरीमध्ये उरलेल्या जागांसाठी प्रवेश घेता येईल.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १९०३: फोर्ड मोटर कंपनीने पहिली कार विकली.

  • १९२७: मुंबईत रेडिओ क्लब ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केला, त्याचेच पुढे आकाशवाणीत रूपांतर झाले.

  • १९८२: इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन ने व्हेल माशांच्या व्यापारी मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

  • १९८३: माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ – २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले.

  • १९८६: हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात.

  • १९९९: केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

  •  

जन्म 

  • १८५६: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

  • १८९९: पश्चिम जर्मनीचे ३रे राष्ट्राध्यक्ष गुस्ताफ हाइनिमान यांचा जन्म.

  • १९०६: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात भवरा येथे झाला. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

  • १९१७: नाट्य-चित्रपट अभिनेत्री लक्ष्मीबाई यशवंत तथा माई भिडे यांचा जन्म.

  • १९२५: बांगलादेश चे पहिले पंतप्रधान ताजुद्दीन अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९७५)

  • १९२७: जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका धोंडुताई कुलकर्णी यांचा जन्म.

  • १९७६: हंगेरीची बुद्धीबळपटू ज्यूडीथ पोल्गार यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८५: अमेरिकेचे १८वे राष्ट्राध्यक्ष युलिसिस ग्रांट यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८२२)

  • १९९७: शास्त्रीय गायिका वसुंधरा पंडित यांचे निधन.

  • १९९९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ – अकोले, अहमदनगर)

  • २००४: विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेमूद यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

  • २०१२: आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.