चालू घडामोडी - २३ फेब्रुवारी २०१८

Date : 23 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने रचला नवा इतिहास :
  • जामनगर/ गुजरात : इंडियन एअरफोर्सची फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने नवा इतिहास रचला आहे. कारण, फायटर प्लेन चालवणारी ती देशातली पहिली महिला वैमानिक ठरली आहे.

  • अवनीने गुजरातच्या जामनगरमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी तिने मिग 21 या फायटर प्लेनसह आकाशात झेप घेतली.

  • यापूर्वी अवनी महिला फायटर प्लेन चालवत असे. मात्र, त्यावेळी तिच्या मदतीला पुरुष कर्मचारीही असायाचा. पण मिग 21 हे विमान तिने एकटीने चालवल्याने, तिच्य नावावर नव्या इतिहासाची नोंद झाली आहे.

  • अवनी चतुर्वेदीचा अल्प परिचय - मध्य प्रदेशच्या शहडोलची रहिवासी असलेल्या अवनीचा जन्म 27 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. तिने प्राथमिक शिक्षण आपल्या गावीच पूर्ण केलं. यानंतर राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठातून त्यांनी बीटेक पर्यंतचं शिक्षण घेतलं. तिचे वडील दिनकर प्रसाद चतुर्वेदी मध्य प्रदेशच्या बाणसागर धरण प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते.

  • 2016 मध्ये भारतीय वायूदलात ज्या तीन महिला वैमानिकांचा समावेश झाला. त्यापैकी अवनी एक होती. निवडीनंतर पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एअरफोर्समध्ये जाण्याच्या निर्णयाबाबत खुलासा केला.

  • कल्पना चावलांचा आदर्श - तिने सांगितलं की, “मी तिसरीत असताना टीव्हीवर कल्पना चावलांचं स्पेसशिप क्रॅश झाल्याने मृत्यूची बातमी पाहिली. या बातमीमुळे माझी आई खूप अस्वस्थ झाली होती. ती टीव्हीसमोर बसून सतत रडत होती. त्यावेळी मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की, ‘मी पुढची कल्पना चावला बनेन’.”

११७ वर्षांपासून २४ तास जळतोय हा दिवा :
  • आपल्या घरातील दिवा असो की ट्यूबलाइट, फार तर दोन-तीन वर्षं त्यांचं आयुष्य असतं. काही वेळा त्याआधीच ते बंद होतात आणि आपणही हल्ली दिवेही चांगल्या दर्जाचे नसतात, अशी कुरकुर करतो. अलीकडे तर सीएफएल नको, तर एलईडी बल्ब वापरा, अशा जाहिराती सतत टीव्हीवर दाखवल्या जातात. वीज कंपन्याही असे एलईडी दिवे स्वस्तात ग्राहकांना देतात. एलईडी बल्ब अधिक काळ टिकतात आणि कमी वीज खेचतात, असं सांगण्यात येतं.

  • पण अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लिवरमोर शहरातील अग्निशामक दलाच्या केंद्रातील दिवा गेल्या ११७ वर्षांपासून बंद झालेला नाही. तो दिवस-रात्र जळत आहे. इतक्या वर्षांत तो बंद पडला नाही, हे सांगितलं तर कोणाचा विश्वास बसत नाही. पण ते खरं नाही. हल्ली तर ११७ वर्षं सतत उजेड देत राहणारा दिवा पाहण्यासाठी तिथं पर्यटक जात असतात. शिवाय अमेरिकेतले जे कोणी लिवरमोरला जातात, ते अग्निशामक दलाच्या केंद्रात हमखास दिवा पाहायला पोहोचतात.

  • गेल्या ३0 वर्षांत लाखो लोक तो दिवा पाहायला गेले. त्यामुळे केंद्रात ज्या खोलीत तो दिवा आहे, ते ठिकाण पर्यटनस्थळच बनलं आहे. तो पाहण्यासाठी तिकीट लावलं असतं, तर आतापर्यंत त्या केंद्राला लाखो डॉलर्सचं उत्पन्न मिळालं असतं. हा दिवा १९0१ साली लावण्यात आला.

  • नाही म्हणायला तो दिवा दोनदा विझला. पहिल्यांदा १९३७ साली. पण वायर खराब झाल्यानं तसं घडलं होतं. त्यामुळे नवी वायर टाकताच तो पुन्हा पेटला. त्यानंतर २0१३ साली तो पुन्हा बंद झाला. त्याचं कारण होतं १९३७ साली म्हणजे ७६ वर्षांपूर्वी जी वायर टाकण्यात आली होती, ती पुन्हा खराब झाली होती.

  • तेव्हाही नवी वायर लावताच दिव्यातून उजेड आला. इतकी वर्षं आणि तेही २४ तास पेटता राहणारा हा जगातील एकमेव दिवा आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे.

जेकब झुमा पायउतार होताच कोसळले 'गुप्ता साम्राज्य' :
  • जोहान्सबर्ग- दक्षिण आफ्रिकेच्या सत्ता आणि उद्योग वर्तुळात वावरणारे आणि गेली चार वर्षे दक्षिण आफ्रिकेतील महत्वांच्या लोकांमध्ये नाव असणाऱ्या अजय, अतुल, राजेश या गुप्ता बंधुंच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पदत्याग केल्यानंतर या गुप्ता बंधुंचे दिवस झपाट्याने फिरले आहेत.

  • गेले अनेक महिने गुप्ता बंधुंवर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. लग्नसमारंभात पाहुण्यांची ये-जा करण्यासाठी अत्यंत सुरक्षित अशा लष्करी तळाचा वापर करणे, सरकारी कंपन्यांमध्ये आपले लोक विविध पदांवर बसवणे, नेमणुका करण्यासाठी कॅबिनेटमधील सदस्यांवर प्रभाव टाकणे, मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर होत होते. मात्र केवळ तपास चालू आहे असे सांगत तपास यंत्रणांनी कोणतीही प्रत्यक्ष कारवाई त्यांच्यावर केली नव्हती.

  • मात्र ही सगळी परिस्थिती 14 फेब्रुवारी रोजी बदलली. राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली. गुप्तांच्या जोहान्सबर्गमधील सॅक्झनवर्ल्ड येथील आलिशान अशा संकुलावर छापा टाकण्यात आला तसेच त्यांच्या अनेक सहकार्यांना अटक झाली. इतकेच नाही तर गुप्तां बंधूंमधील ज्येष्ठ बंधू अजयला फरार घोषित करण्यात आले.

नगरसेवकांना दिलासा, जातवैधता प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत :
  • मुंबई : जात प्रमाणपत्र पडताळणीअभावी मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्याच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आता मुभा देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. हा निर्णय या संदर्भातील अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकापासून 30 जून 2019 पर्यंत होणाऱ्या निवडणुकांसाठी लागू होणार आहे.

  • राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग आणि महिला यांच्यासाठी असलेल्या राखीव प्रवर्गातून सदस्यत्वासाठी तसेच नगराध्यक्ष, महापौर पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक जिंकल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात 7 एप्रिल 2015 च्या अधिनियमानुसार परवानगी देण्यात आली होती.

  • हा अधिनियम 31 डिसेंबर 2017 पर्यंतच लागू होता. मात्र त्यानंतरच्या काळात निवडणूका लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराला जातवैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडणं आवश्यक होतं. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र मिळालं नाही म्हणून इच्छुक उमेदवारांना निवडणूक संधीपासून वंचित रहावं लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. या निर्णयामुळे यापुढे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानी :
  • नवी दिल्ली : जागतिक पातळीवरील भ्रष्ट देशांच्या यादीत भारत ८१व्या स्थानावर आला आहे. याशिवाय लाचखोरी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत अत्यंत सुमार कामगिरी असलेल्या देशांत भारताचा क्रमांक लागला आहे.

  • ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या ‘जागतिक भ्रष्टाचार अनुभूती निर्देशांक २०१७’मध्ये भारत ८१वा आहे. या निर्देशांकात जगातील १८० देशांचा समावेश आहे. सन २0१६ साली १७६ देशांच्या निर्देशांकात भारताचे स्थान ७९वे होते.

  • या निर्देशांकासाठी भ्रष्टाचाराच्या बाबतीत 0 ते १00 असे गुणांकन करण्यात आले. ० गुण म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट देश, तर १०० गुण म्हणजे सर्वाधिक स्वच्छ देश, अशी पट्टी वापरण्यात आली. ताज्या मानांकनात भारताचे गुण ४० इतके स्थिर राहिले. २0१५मध्ये ते ३८ होते. ताज्या मानांकनात न्यू झीलंड आणि डेन्मार्क अनुक्रमे ८९ व ८८ गुण मिळवून सर्वोच्च स्थानी आहेत.

  • सीरिया, दक्षिण आफ्रिका व सोमालिया या देशांना सर्वांत कमी अनुक्रमे १४, १२ व ९ गुण मिळाले आहेत. ४१ गुणांसह चीन ७७व्या स्थानी आहे. ब्राझील ३७ गुणांसह ९६व्या स्थानी, तर रशिया २९ गुणांसह १३५व्या स्थानी आहे.

  • आशिया-प्रशांत विभागातील काही देशांत पत्रकार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते व कायदेपालन संस्थांच्या कर्मचाºयांना धमक्या दिल्या जातात. हत्याही होतात. फिलिपिन्स, भारत व मालदीवमध्ये हे प्रकार सर्वाधिक आहेत. या देशांत भ्रष्टाचार प्रचंड आहे आणि माध्यमस्वातंत्र्य मर्यादित आहे. या देशांत पत्रकारांच्या हत्यांचे प्रमाणही अधिक आहे.

  • गेल्या सहा वर्षांत भ्रष्टाचाराच्या बातम्यांवर काम करणाºया १५ पत्रकारांच्या हत्या या देशांत झाल्या, असे कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट (पत्रकार संरक्षण समिती) या संस्थेने जाहीर केले.

राजकीय क्षेत्रातून आजन्म हद्दपार करण्याचे प्रयत्न – नवाझ शरीफ :
  • आपल्याला राजकीय क्षेत्रातून आजन्म हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. पक्षाचे नेतृत्व करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांनी वरील आरोप केला आहे.

  • पनामा पेपर्सप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर शरीफ वार्ताहरांशी बोलत होते. पक्षाचे नेतृत्व करण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय आपल्याला अनपेक्षित नव्हता, प्रथम त्यांनी सरकार खिळखिळे केले आणि त्यानंतर बुधवारी त्यांनी संसदेचे अधिकार काढून घेतले, असे ते म्हणाले.

  • तथापि, हे कृत्य कोणी केले ते शरीफ यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, त्यांचा रोख सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे होता. पक्षाचे नेतृत्व करण्यास अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला तो पंतप्रधान म्हणून पदच्युत करण्यात आल्यानंतरचे पुढील पाऊल आहे. आपल्याला राजकीय क्षेत्रातून आजन्म हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

  • जुलै महिन्यात आपले पंतप्रधानपद काढून घेण्यात आले, त्यानंतर बुधवारी पीएमएल-एन पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात आले, आपले नाव मोहम्मद नवाझ शरीफ आहे ते नावही आपल्यापासून हिसकावून घ्यायचे असल्यास तेही काढून टाकण्यास आपली हरकत नाही, असेही शरीफ म्हणाले.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४५५: पाश्चिमात्य देशातील पहिले छापील पुस्तक गटेनबर्ग बायबल प्रकाशित झाले.

  • १९४१: डॉ. ग्लेन सीबोर्ग यांनी प्लूटोनिअम हे मूलद्रव्य प्रथमच वेगळे केले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – इवो जिमाची लढाई – अमेरिकन नौदलाचे काही सैनिक (मरीन्स) प्रशांत महासागरातील माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

  • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केली.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.

  • १९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फोर्झेम शहर बेचिराख केले.

  • १९४७: आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची (ISO) स्थापना.

  • १९९६  कोकण रेल्वेच्या चिपळूण – खेड टप्प्यातील वाहतूकीचा शुभारंभ झाला.

  • १९९७: रशियाच्या मीर या अंतराळस्थानकामधे आग लागली.

  • २०००: संस्कृत पंडित रा. ना. दांडेकर आणि काश्मिरी कवी रेहमान राही यांना साहित्य अकादमीची फेलोशिप जाहीर.

जन्म

  • १६३३: विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक सॅम्युअल पेपिस यांचा जन्म. (मृत्यू: २६ मे१७०३)

  • १८५०: रिट्झ हॉटेल, लंडन आणि रिट्झ हॉटेल, पॅरिस चे निर्माते सीझर रिट्झ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९१४ )

  • १८७६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)

  • १९१३: जादूगार प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९७१)

  • १९५७: तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते येरेन नायडू यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर २०१२)

  • १९६५: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हेलेना सुकोव्हा यांचा जन्म.

  • १९६५: मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर अशोक कामटे यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर २००८)

मृत्यू

  • १७७७: जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ कार्ल फ्रेड्रिक गाऊस यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल१७७७)

  • १७९२: ब्रिटिश चित्रकार व रॉयल अ‍ॅकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रेनॉल्ड्स यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १७२३ – प्लिम्प्टन, प्लायमाऊथ, इंग्लंड)

  • १९०४: होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक महेन्द्र लाल सरकार यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १८३३ – पैकपारा, हावडा, पश्चिम बंगाल)

  • १९४४: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १८६३ – घेन्ट, बेल्जिअम)

  • १९६९: चित्रपट अभिनेत्री मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी१९३३ – नवी दिल्ली)

  • १९९८: क्रिकेटपटू रमण लांबा यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९६०)

  • २००४: केन्द्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९१८)

  • २०११: सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: २१ मार्च१९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.