चालू घडामोडी - २३ डिसेंबर २०१८

Date : 23 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
बजेटचा तिढा - अमेरिकेचे प्रशासन ठप्प; निधी होणार बंद :
  • वॉशिंग्टन : घुसखोरांना पायबंद घालण्यासाठी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी पाच अब्ज डॉलर मंजूर करण्यास सिनेटमध्ये बहुमत असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाने नकार दिल्याने अमेरिकेचा संघीय अर्थसंकल्प संमत न होण्याचा तिढा निर्माण झाला आहे. परिणामी, नाताळाच्या सुटीनंतर अमेरिकेचे निम्म्याहून अधिक प्रशासन ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

  • उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई व ज्येष्ठ सल्लागार जेरेड आणि व्हाईट हाऊसचे बजेट प्रमुख माईक मुलवेनी यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी शुक्रवारी झालेल्या वाटाघाटींतून तोडगा निघाला नाही.

  • नाताळाच्या सुटीत काँग्रेसचे अधिवेशन भरून विनियोजन विधेयक मंजूर होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुलवेनी यांनी खातेप्रमुखांना शिस्तबद्ध पद्धतीने काम बंद करण्याची तयारी ठेवण्याचे कळविले आहे. काँग्रेसमध्ये हा तिढा फार काळ ताणला जाणार नाही, हे स्पष्ट आहे.

  • कर्मचाऱ्यांना घरी बसवणार - विनियोजन विधेयक वर्ष संपण्यापूर्वी मंजूर न झाल्यास संघीय सरकारमधील १५ पैकी नऊ खात्यांचे व अनेक संघीय सेवांचे कामकाज ठप्प होईल. याचा परिणाम संघीय सरकारच्या आठ लाख कर्मचाºयांवर होईल. यापैकी ४.२० लाख कर्मचारी अत्यावश्यक सेवांचे असल्याने ते पगार न मिळताही काम सुरू ठेवतील. बाकीच्या ३.८० लाख कर्मचाºयांना घरी बसविले जाईल. जेव्हा अर्थसंकल्प मंजूर होईल तेव्हा कर्मचाºयांना या काळाचा पगार दिला जाईल.

"मोदींच्या लोकप्रियतेत घट, लोकसभा निवडणुकीत १०० जागांचं होणार नुकसान" :
  • नवी दिल्ली- भाजपासह मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत असल्याचं सूचक विधान एक राजकीय नेत्यानं केलं आहे. स्वराज इंडियाचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी भाजपाच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत असल्याचं म्हटलं आहे. पत्रकारांची बोलत असताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या खासदारांची संख्या 100नं कमी होईल, असंही ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे.

  • काँग्रेस अजूनही झोपेत आहे, तसेच काँग्रेस एक अयोग्य पक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यादव यांनी स्वतःच्या पक्षाकडून जनआंदोलन सुरू केलं आहे. तसेच चांगलं काम करणाऱ्या लोकांना त्यांनी समर्थन दिलं आहे. 

  • यादव म्हणाले, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. त्याची भविष्यवाणी करण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. ते सर्व स्पष्टच आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रदर्शनाचा हवाला देत त्यांना काँग्रेस राजकारणात अयोग्य पार्टी असल्याचंही म्हटलं आहे.

  • काँग्रेसला कोणत्याही संधीचा योग्य फायदा उचलता येत नाही. काँग्रेस अजूनही झोपेतच आहे. त्यांची झोप अद्यापही उडालेली नाही. हा निष्काळजीपणा आहे. जर ते या तीन राज्यांतील विजयानंतर 2019चं लोकसभा जिंकण्याचं स्वप्न पाहत असतील, तर ते मूर्ख स्वर्गातच आहेत, असं म्हणावे लागेल. भाजपामध्ये उदासीनता नाही. भाजपा देशासाठी घातक असली तरी ती सक्रिय आहे. भाजपा देशाला विनाशकारी मार्गावर घेऊन जात असल्याची टीकाही योगेंद्र यादव यांनी केली आहे. 

एसटीची 'विठाई' सोमवारपासून भाविकांच्या सेवेत दाखल होणार :
  • मुंबई : एसटी महामंडळाच्या विठाई बससेवेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते या सेवेचं लोकार्पण केलं जाणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना याचा फायदा होणार आहे.

  • पंढरपूर येथे येण्यासाठी राज्यभरातून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनाने प्रवास करतांना त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामनाही करावा लागतो. मुक्कामाची आणि जेवणाचीही गैरसोय होते. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची समस्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने खास पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन एसटी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • विठाई बस वारकऱ्यांच्या सेवेत सोमवारपासून दाखल होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात 24 डिसेंबर रोजी विठाई एसटी बसचं उद्घाटन होणार आहे.

  • सुरुवातीला दहा बस वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील. दापोडी (पुणे) येथे या बसची निर्मिती करण्यात येत आहे. एसटीच्या प्रत्येक विभागात ही विठाई बस लवकरच दाखल होणार आहे. 2x2 पुश बॅक सीट असल्याने राज्यातील वारकऱ्यांचा पंढरपूर तसंच पंढरपूर ते आपल्या गावापर्यंतचा प्रवास आरामदायी होणार आहे.

नववर्षाच्या तोंडावर सामान्यांना दिलासा, ३३ वस्तूंवरील जीएसटी कमी :
  • नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने सामान्य ग्राहकांना दिलासा देणारे काही निर्णय घेतले आहेत. जीएसटी परिषदेच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत सिनेमाचं तिकीट, टीव्ही यांसह अनेक वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर सामान्यांना खास भेट देण्यात आली आहे. तसेच 31 मार्च 2019 पर्यंत जीएसटी रिटर्न भरल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही.

  • 33 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात 26 वस्तूंवरील जीएसटी दर आधीच्या 18 टक्क्यांवरून आता 12 किंवा 5 टक्के असा करण्यात आला आहे. टायर, व्हीसीआर आणि लिथियम बॅटरीवर आता 28 ऐवजी 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. 32 इंचाच्या टीव्हीवरही आता 28 ऐवजी 18 टक्के जीएसटी घेतला जाईल.

  • अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची 31 वी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन जेटली यांनी निर्णयांचा तपशील दिला. एकूण 33 वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात 26 वस्तूंवरील जीएसटी दर आधीच्या 18 टक्क्यांवरून आता 12 किंवा 5 टक्के असा करण्यात आला आहे.

  • 28 टक्के जीएसटीच्या कक्षेतील 6  वस्तू आता 18 टक्के जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत, असे जेटली यांनी नमूद केले.

आता रेल्वे प्रवासातही वस्तू खरेदी करता येणार :
  • मुंबई : काही विमानांसारखं रेल्वे प्रवासादरम्यानही आता प्रवासी घरगुती सामान, सौंदर्य प्रसाधने आणि फिटनेस उपकरणं खरेदी करु शकतील. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. सुरुवातीला काही विशेष रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

  • पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने एका खासगी कंपनीसोबत पाच वर्षाचा करार केला आहे. 16 मेल आणि एक्सप्रेस रेल्वेंमध्ये प्रवांशासाठी ही सुविधा सुरु करण्यात येईल. या कंपनीकडे घरगुती वस्तू, सौंदर्य प्रसाधनांसह अन्य वस्तू विकण्याचा परवाना असणार आहे.

  • या रेल्वेत खाद्य पदार्थ, सिगारेट, गुटखा आणि दारु विकण्याची परवानगी नसेल. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत या वस्तू विक्रीला असतील. गणवेश घातलेल्या दोन कर्मचाऱ्यांकडे ही जबाबदारी असेल.

  • प्रवासी डेबिट किंवा क्रेडिट कार्डने केलेल्या सामानाचे पैसे भरु शकतील. प्रथमत: दोन रेल्वेत प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरु करण्यात येईल. त्यानंतर दोन-दोन रेल्वेंना या सेवेत जोडलं जाईल.

देशभरातील टॉप १० पोलिस स्थानकांमध्ये महाराष्ट्र नाही :
  • नवी दिल्ली : वर्षभर उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशभरातील दहा पोलिस स्थानकांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशन यादीत अव्वल असून महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला टॉप 10 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही.

  • पहिल्या स्थानावर राजस्थानमधील कालू बिकानेर, दुसऱ्या क्रमांकावर अंदमान निकोबरमधील कॅम्पबेल बे, तर  तिसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील फरक्का पोलिस स्टेशनचं नाव घोषित करण्यात आलं आहे.

  • गुजरातमध्ये सुरु असलेल्या डीजीपी-आयजीपी कॉन्फरन्सला 20 डिसेंबरपासून सुरुवात झाली. यावेळी गृह मंत्रालयाकडून  2018 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या देशभरातील  दहा पोलिस स्थानकांचा गौरव करण्यात आला. गृहमंत्री राजनाथ सिंह याच्या हस्ते या तिन्ही पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आलं.

  • खेदाची बाब म्हणजे उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या दहा पोलिस स्टेशन्सच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाचा समावेश नाही. खरं तर महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची तत्परताही ट्विटरवर पाहायला मिळते, मात्र प्रत्यक्षात त्यांची कामगिरी टॉप 10 ला साजेशी नसल्याचं म्हणावं लागेल.

उत्तम कामगिरी बजावणाऱ्या दहा पोलीस स्टेशनची यादी

1. कालू (बिकानेर, राजस्थान)

2. कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार)

3. फरक्का (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल)

4.  नेत्तापक्कम (पुदुच्चेरी)

5. गुदेरी (कर्नाटक)

6. चोपाल (हिमाचल प्रदेश)

7. लाखेरी - (राजस्थान)

8. पेरियाकुलम (तामिळनाडू)

9. मुन्स्यारी (उत्तराखंड)

10. कुडचरे (गोवा)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८९३: हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.

  • १९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.

  • १९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

  • १९४७: अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.

  • १९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.

  • १९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.

  • २०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी

  • २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.

  • २०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.

जन्म 

  • १६९०: मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.

  • १८५४: ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेन्‍री बी. गुप्पी यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)

  • १८९७: ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटनाईक यांचा जन्म.

  • १९०२: भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९८७)

मृत्यू 

  • १८३४: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)

  • १९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या. (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)

  • १९६५: नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन. (जन्म: २ जुलै १८८०)

  • १९९८: स्वातंत्र्यसैनिक रत्‍नाप्पा कुंभार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)

  • २०००: मलिका-ए-तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)

  • २००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२१)

  • २००८: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १९३१)

  • २०१०: केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के. करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.