चालू घडामोडी - २३ एप्रिल २०१८

Date : 23 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२७ एप्रिलपासून मोदी जाणार चीनच्या दौऱ्यावर :
  • बीजिंग : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात व्दिपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा होणार असून मोदी हे २७ व २८ एप्रिल रोजी वुहान शहरात एका अनौपचारिक शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती चीनचे विदेश मंत्री वांग यी यांनी रविवारी दिली.

  • चीनमध्ये दाखल झालेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत वांग यी यांनी सांगितले की, राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी येणार आहेत. सुषमा स्वराज म्हणाल्या, या माध्यमातून परस्पर संवादाला चालना देण्याचा उद्देश आहे. व्दिपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणांवर विचारविमर्श होणार आहे.

  • येथे सोमवारपासून सुरु होणाºया शांघाई सहयोग संघटनेच्या (एससीओ) विदेश मंत्र्यांच्या दोन दिवसीय बैठकीत सहभाग घेण्यासाठी स्वराज येथे आल्या आहेत. 

साखर उत्पादनासंदर्भात शरद पवारांची आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक :
  • कोल्हापूर  - राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. साखर उत्पादनासंदर्भात दोघांमध्ये बैठक होणार आहे.

  • कोल्हापूरच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. साखर उत्पादनसंदर्भात पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. 

  • यंदा देशात साखरेचं गरजेपेक्षा अधिक उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर परदेशात निर्यात करणं गरजेचं असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवाय, 60 टक्के साखरेवर सेस लावून, रक्कम उत्पादकांना द्यावी. तसंच साखरेच्या वाहतूक खर्चासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, अशी मागणीदेखील पवार यांनी यावेळी केली आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला :
  • नवी दिल्ली- उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. या प्रस्तावावर 7 निवृत्त खासदारांच्या स्वाक्ष-या असल्यानं तो प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

  • प्रस्तावावर 71 खासदारांपैकी 7 निवृत्त खासदारांच्या सह्या होत्या. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळल्याचं व्यंकय्या नायडूंनी सांगितलं आहे. कायदेतज्ज्ञांच्या सल्लानुसार हा प्रस्ताव फेटाळल्याची चर्चा आहे. 

  • तत्पूर्वी काँग्रेससह इतर पक्षांनी दिलेल्या महाभियोगाच्या नोटिशीवर व्यंकय्या नायडू यांनी चर्चेची प्रक्रिया सुरू केली होती. यासाठीच रविवारी त्यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासह संविधान आणि कायदेतज्ज्ञाबरोबर सल्लामसलत केली होती. संविधान विशेषज्ज्ञ सुभाष कश्यप, पी. के. मल्होत्रासह अन्य कायदेतज्ज्ञांकडून सल्ला मागितला होता. नायडू लवकरच विरोधी पक्षांच्या या नोटिशीवर निर्णय घेतील, अशीही चर्चा असतानाच नायडूंनी तो प्रस्ताव फेटाळून लावला आहे.

  • नायडू यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन हैदराबादेतील त्यांचा दौरा रद्द करत कायदेतज्ज्ञांबरोबर बैठक घेतली होती. लोकसभेचे माजी महासचिव सुभाष कश्यप, पूर्व विधी सचिव मल्होत्रा आणि न्यायिक प्रकरणाचे माजी सचिव संजय सिंह यांच्याशी या प्रकरणाचवर विचार-विमर्श केला होता. तसेच नायडू यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांचंही मत जाणून घेतलं होतं. त्यानंतर आता हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. 

काँग्रेसचा सर्वात श्रीमंत युवा उमेदवार, १ हजार कोटींची संपत्ती :
  • बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. भाजपा, काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षांनी श्रीमंत उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. आजतकच्या वृत्तानुसार, काँग्रेसने दिलेल्या उमेदवारापैकी सर्वात श्रीमंत उमेदवार प्रिया कृष्णा आहे. त्यांच्याकडे 1020.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

  • कर्नाटक निवडणुकीत स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या चेहऱ्यांमध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार सर्वात श्रीमंत आहेत. प्रिया कृष्णा यांच्याशिवाय एम.टी.बी. नागाराजू, डी.के शिवकुमार आणि अनिल लाड यांचंही श्रीमंत उमेदवारांच्या यादीत नाव आहे. 

  • कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रिया कृष्णा यांनी नामांकन पत्राबरोबर दाखल केलेल्या शपथ पत्रात 1020.5 कोटींची संपत्ती असल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार एम.टी.बी नागाराजू यांच्याकडे 709.3 कोटींची संपत्ती आहे.

  • राज्य सरकारचे मंत्री डी.के.शिवकुमार यांनाही काँग्रेसने तिकिट दिलं आहे. त्यांच्याकडे 619.8 कोटी रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसच्या श्रीमंत उमेदवारांच्या यादीत बेल्लारी सिटीचे उमेदवार अनिल लाड यांचंही नाव आहे. ते 342.2 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. 

पुण्यातील आयपीएल प्लेऑफ सामने लखनौला हलवणार :
  • मुंबई : चेन्नईत कावेरी पाणीवाटपाच्या मुद्द्यावरुन होत असलेल्या विरोधामुळे, चेन्नई सुपरकिंग्जला पुण्याचं गहुंजे स्टेडिअम होम ग्राऊंड म्हणून देण्यात आलं. महेंद्रसिंह धोनीचा संघ खेळणार पुण्यात खेळणार असल्यामुळे चाहते खुश होते, मात्र या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पुण्यात होणारे आयपीएल प्लेऑफचे सामने लखनौच्या मैदानावर हलवण्याची शक्यता आहे.

  • चेन्नई सुपरकिंग्जचे सामने सध्या पुण्यात होणार आहेत. मात्र 23 आणि 25 मे रोजी होणारे प्लेऑफ सामने इतर ठिकाणी हालवण्याच्या ठिकाणी सुरु आहेत.

  • ''पुण्याच्या मैदानापेक्षा लखनौच्या मैदानाची प्रेक्षकसंख्या जास्त आहे. अंदाजे 50 हजार प्रेक्षक लखनौच्या मैदानात सामना पाहू शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मैदानाची चाचपणी करुन अंतिम निर्णय घेतला जाईल,'' असं बीसीसीआयमधील सूत्रांनी म्हटलं आहे.

  • लखनौसोबत राजकोट आणि कोलकाता या दोन ठिकाणीही प्लेऑफचे सामने हलवले जाऊ शकतात. मात्र बीसीसीआयचे माजी सचिव निरंजन शाह प्लेऑफचे सामने राजकोटच्या मैदानावर खेळवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्ज आपले घरचे सामने पुण्याच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे बीसीसीआय प्लेऑफचे सामने अन्यत्र हलवण्याच्या मनस्थितीत आहे.

  • दरम्यान, पुण्यात नुकत्याच खेळवण्यात आलेल्या चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याची तिकिटं अनेक प्रेक्षकांना मिळाली नव्हती. तिकिटं लवकर बूक झाल्यामुळे चाहत्यांच्या हाती निराशा लागली. धोनीचा संघ पुण्यात खेळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

सीताराम येचुरी पुन्हा माकपचे सरचिटणीस :
  • हैदराबाद : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गेले चार दिवस येथे भरलेल्या २२ व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सीताराम येचुरी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी रविवारी एकमताने फेरनिवड करण्यात आली.

  • माकपच्या मध्यवर्ती समितीतील ९५ नवनियुक्त सदस्यांनी या फेरनिवडीवर शिक्कामोर्तब केले. २०१५ साली विशाखापट्टणम येथे झालेल्या पक्षाच्या याआधीच्या येचुरी यांची पहिल्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. त्याआधी या पदावर ज्येष्ठ नेते प्रकाश करात होते.

  • येचुरी यांच्या पहिल्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांच्या जागी कोणाला नेमावे याबाबत त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार, पॉलिट ब्युरो सदस्य वृंदा करात, चिटणीस बी. व्ही. राघवुलू यांच्यासह आणखी काही नावांची चर्चा झाली.

  • काँग्रेसशी युती नाही - भाजपाशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेसशी सहकार्य करायचे किंवा नाही, याविषयी माकपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. या विषयावर हैदराबाद येथील २२व्या काँग्रेसमध्ये शनिवारी मध्यममार्ग स्वीकारण्यात आला. ‘काँग्रेसशी कोणत्याही प्रकारचा समझोता किंवा निवडणूक युती केली जाणार नाही, असा जो माकपच्या धोरणविषयक मसुद्यात उल्लेख होता, त्यात आता ‘माकप काँग्रेसशी कोणतीही राजकीय युती करणार नाही,' अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. हा सीताराम येचुरी यांनी घेतलेल्या भूमिकेचा एकप्रकारे विजय आहे.

दिनविशेष :
  • जागतिक पुस्तक दिन / इंग्रजी भाषा दिन (यूएन)

महत्वाच्या घटना

  • १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

  • १८१८: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.

  • १९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • २००५: मी अॅट द झू  हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

जन्म

  • १७९१: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)

  • १८५८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर१९४७)

  • १८५८: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

  • १८७३: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९४४)

  • १८९७: नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)

  • १९३८: शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.

  • १९७७: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.

मृत्यू

  • १६१६: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल१५६४)

  • १८५०: काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल१७७०)

  • १९२६: ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १८५४)

  • १९५८: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८७१)

  • १९८६: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)

  • १९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२१)

  • १९९७: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१८)

  • २००१: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१)

  • २००७: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)

  • २०१३: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९१९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.