चालू घडामोडी - २२ फेब्रुवारी २०१८

Date : 22 February, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
विशिष्ट जात बघून निवडले जातात राष्ट्रपतींचे अंगरक्षक - प्रथा बंदीसाठी जनहित याचिका :
  • राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांची निवड जात बघून केली जाते, असा आरोप करत ही पद्धत बंद करावी अशी जनहित याचिका पंजाब व हरयाणा हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. जाट शीख, हिंदू जाट व हिंदू राजपूत या तीन जातींमधील उमेदवारांचाच विचार राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड निवडताना केला जातो असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

  • “ही प्रथा म्हणजे सगळ्या भारतीयांना समान वागणूक देण्याच्या घटनेच्या तत्वाविरोधी असून घटनेनुसार जे अंगरक्षक म्हणून काम करू शकतात त्यांना संधी मिळायला हवी,” असे ही याचिका दाखल करणाऱ्या सौरव यादव या महाविद्यालीयन विद्यार्थ्यानं म्हटलं आहे.

  • इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार 19 वर्षांच्या सौरवच्या वतीमे हिमांशू राज या वकिलानं ही याचिका दाखल केली आहे. जनहित याचिकेसंदर्भात असलेले हायकोर्टाचे नियम पाळण्यात आले आहेत का ते स्पष्ट करा असे हायकोर्टाने सांगितले असून पुढील सुनावणी आठ मार्च रोजी होणार आहे.

  • “अनेक वर्षांपासून ही कायद्याची पायमल्ली सुरू आहे. समानतेच्या हक्काविरोधात ही कृती असून जात अथवा धर्माच्या आधारे भेदभाव न करण्याच्या घटनात्मक तरतुदीचे उल्लंघनही याद्वारे होत आहे,” राज यांनी आपली बाजू मांडली आहे.(source :loksatta)

कॅनडाच्या पंतप्रधानांचे भारतावर प्रेम - अमृता फडणवीस :
  • मुंबई : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रिदेऊ, त्यांच्या पत्नी सोफी आणि त्यांच्या तिन्ही मुलांचेही भारतावर किती निस्सीम प्रेम आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना कालच्या भेटीत जाणवले.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्रिदेऊ यांच्याशी मंगळवारी दुपारी चर्चा केली. त्यात प्रामुख्याने कॅनडा आणि महाराष्ट्रातील औद्योगिक संबंध अधिक दृढ करण्याचा विषय होता. मात्र, या भेटीत त्रिदेऊ यांनी फडणवीस यांची जिव्हाळ्याने विचारपूस केली आणि आपल्यासारखे तरुण नेतृत्व महाराष्ट्राला प्रगतीकडेच नेईल, असा विश्वासही व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांशी स्रेहबंध निर्माण केले.

  • या स्नेहबंधाचाच एक भाग म्हणून अमृता फडणवीस यांनी सायंकाळी ताज हॉटेलमध्ये जाऊन त्रिदेऊ, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली तेव्हा अमृता यांनी दाखविलेल्या आदरातिथ्याची त्रिदेऊ दाम्पत्याने प्रशंसा केली. ‘भारतीय संस्कृती आणि इतिहासाचे आम्हा दोघांनाही आकर्षण आहे.

  • मी स्वत: रोज नियमित योगा करते आणि काही वर्षे मी योगा ट्रेनर म्हणूनही काम केले आहे. योगा भारताने जगाला दिलेली आरोग्याची अनमोल देणगी आहे, अशी भावना त्रिदेऊ यांच्या पत्नी सोफी यांनी व्यक्त केली.

  • यावेळी त्रिदेऊ, त्यांची पत्नी, मुलांनी आवर्जून भारतीय पेहराव केला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी आज दुपारी आपली अतिशय चांगली चर्चा झाली. आजच्या भेटीत आपण आज त्यांना कॅनडा भेटीचे आमंत्रण दिले आहे. कॅनडा आणि महाराष्ट्रातील व्यापारी संबंध अधिक व्यापक करण्याचा आपलाही प्रयत्न असेल. असे त्रिदेऊ यांनी यावेळी आवर्जून सांगितले.(source :lokmat)

जिओ पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात आणखी १० हजार कोटी गुंतवणार - मुकेश अंबानी :
  • लखनऊ - उत्तर प्रदेश पुढे गेल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. आम्हाला उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवायचा आहे असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी सांगितले. ते यूपी इन्वेस्टर्स समिट 2018 मध्ये बोलत होते.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये या समिटचे उदघाटन झाले. सुरुवातीला उद्योगपती मुकेश अंबानी यांचे भाषण झाले. 

  • उत्तर प्रदेशात मोठी गुंतवणूक करणाऱ्यांपैकी जिओ एक आहे. जिओने आतापर्यंत उत्तर प्रदेशात 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कमेची गुंतवणूक केली आहे. 2018 च्या अखेरपर्यंत उत्तर प्रदेशच्या प्रत्येक गावात जिओची सेवा सुरु झालेली असेल. पुढच्या तीन वर्षात उत्तर प्रदेशात जिओ आणखी 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे असे मुकेश अंबानी म्हणाले. 

  • दोन दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये पाच हजार उद्योगपती सहभागी होणार आहेत. या समिटमुळे उत्तर प्रदेशात 20 लाख युवकांना रोजगार मिळेल असा दावा योगी सरकारने केला आहे. या समिटमध्ये 900 करारपत्रकांवर स्वाक्षऱ्या होतील असा अंदाज आहे. या समिटच्या माध्यमातून पाच लाख कोटीच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे.(source :lokmat)

सरकारचा नोकरदारांना दणका, पीएफचं व्याजदर घटवलं :
  • नवी दिल्ली : सरकारने नोकरदारांना दणका दिला आहे. ईपीएफओने पीएफवरचं व्याजदर 8.65 टक्क्यांहून 8.55 टक्के केलं आहे. चालू वर्षातील या बदलामुळे पीएफवर मिळणाऱ्या व्याजात आता कपात होणार आहे. परिणामी नोकरदारांच्या खिशाला याची झळ बसेल.

  • पीएफवरचं व्याजदर घटवून ते 8.55 टक्के करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याला ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आणि पीएफ अकाऊंटच्या व्याजदरात कपात केली, अशी माहिती केंद्रीय कामगारमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिली.

  • पीएफचं व्याजदर कमी करण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. ईपीएफओने 2016-17 साठी 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. 2015-16 साली 8.8 टक्के व्याजदर होतं आणि आता ते 2017-18 साठी 8.55 टक्क्यांवर आलं आहे.

  • दरम्यान, चालू वर्षातील व्याजदर 8.65 टक्के कायम ठेवण्यासाठी ईपीएफओने एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफमध्ये आपल्या गुंतवणुकीचा एक भाग याच महिन्यात 2886 कोटी रुपयांमध्ये विकला होता. ज्यामुळे व्याजदर 8.65 टक्के ठेवलं जाणार होतं. मात्र यामध्ये बदल करण्यात आला.

  • सध्या सरकारने अनेक छोट्या बचत योजनांचं व्याजदर कमी केलं आहे. त्यामुळे छोट्या योजनांमधील गुंतवणूक आता पहिल्यासारखी फायदेशीर राहिलेली नाही.(source :abpmajha)

'...तर भारत शेजाऱ्यांचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचा संदेश गेला असता :
  • नवी दिल्ली: डोकलाममध्ये चीनने घेतलेल्या भूमिकेमागे लष्करी किंवा वर्चस्ववादाचा हेतू नसून चीनला या माध्यमातून भारत आणि भूतानमध्ये फूट पाडायची होती. मात्र, भारताने ज्याप्रकारे चीनला प्रत्युत्तर दिले, ते कौतुकास्पद होते, असे विधान देशाचे माजी सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केले. ते बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. 

  • यावेळी त्यांनी म्हटले की, चीनला भारत आणि भूतान यांच्यात फूट पाडायची होती. त्यासाठी त्यांनी डोकलाम वाद उकरून काढला. यामागे चीनचा कोणताही लष्करी किंवा वर्चस्ववादाचा हेतू नव्हता. या सगळ्यामागे चीनचे व्यापक राजकारण होते.

  • त्यांना भूतानला दाखवून द्यायचे होते की, भारत तुमचे रक्षण करू शकणार नाही. जेणेकरून त्यांचे भारताविषयीचे मत बदलेल. परंतु, भारताने डोकलाममध्ये चीनला ज्याप्रकारे प्रत्युत्तर दिले, ते निश्चितच प्रशंसनीय होते, असे मेनन यांनी म्हटले. 

  • शिवशंकर मेनन हे 2010 ते 2014 या काळात यूपीए सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. याशिवाय, त्यांनी ऑक्टोबर 2006 ते ऑगस्ट 2009 भारताचे परराष्ट्र सचिव म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. गेल्यावर्षी डोकलाममध्ये 73 दिवस भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

  • रत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा सामरिकदृष्ट्या महत्वाचा भूभाग चीनच्या टप्प्यात आला असता. (source :lokmat)

‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा :
  • नवी दिल्ली : ‘नॅशनल क्रश’ प्रिया वारियरला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. प्रिया आणि दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांच्याविरोधातील मुंबई आणि हैदराबादमधील तक्रारीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारसह तक्रारदारांकडून उत्तरही मागितले आहे.

  • प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्यावरुन वाद सुरु आहे. यावरुन मुंबई, हैदराबादमध्ये प्रिया आणि दिग्दर्शक ओमर यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर या तक्रारी रद्द करण्यासाठी प्रियासह दिग्दर्शकाने सुप्रीम कोर्टाचा दार ठोठावला होता. आज सुप्रीम कोर्टाने या तक्रारींना स्थगिती दिली आहे.

  • प्रिया वारियरने याचिकेत काय म्हटले आहे - आपल्या मुलभूत अधिकारांचा उल्लेख करत प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदेशीररित्या व्यावसाय करण्याचा घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार आहे. गाण्याचा चुकीचा अनुवाद केल्याचा आरोप करत तक्रारदार आमच्या मुलभूत अधिकारांचं हनन करत आहेत, असे प्रिया आणि ओमर यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे

  • प्रकरण काय आहे - ‘ओरु अदार लव्ह’ या मल्ल्याळम सिनेमातील 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यावरुन वाद झाला आहे.हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली होती. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटात प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

  • 'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे.(source :abpmajha)

मॅग्नेटिक महाराष्ट्र : १२ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ४ हजार MoU :
  • मुंबई : 'मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018' च्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 4 हजार 106 सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून 36 लाख 77 हजार 185 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

  • वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन 2018 जागतिक गुंतवणूक परिषदेचा समारोप काल (मंगळवारी) झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आदी यावेळी उपस्थित होते.

  • यावेळी रिलायन्स उद्योग समूहाबरोबर 60 हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या तसेच राज्य शासन व भारतीय रेल्वे यांच्या समवेत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 'सहभाग' या वेबपोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

  • मॅग्नेटिक महाराष्ट्रला प्रचंड यश मिळालं आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक झाली आहे. त्याचा फायदा मराठवाड्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकूण 4 हजार 106 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून राज्यात 12 लाख 10 हजार 464 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

  • सर्वात जास्त गुंतवणूक उद्योग क्षेत्रात (5 लाख 48 हजार 166 कोटी) इतकी होणार असून गृह निर्माण क्षेत्रात 3 लाख 85 हजार कोटी तर ऊर्जा क्षेत्रात 1 लाख 60 हजार 268 कोटी गुंतवणूक होणार आहे. शासनाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचे 104 सामंजस्य करार झाले असून त्या माध्यमातून 3 लाख 90 हजार 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.(source :abpmajha)

दिनविशेष :

महत्वाच्या घटना

  • १८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.

  • १९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

  • १९४८: झेकोस्लोव्हाकिया मध्ये कम्युनिस्ट क्रांती.

  • १९५८: इजिप्त आणि सीरिया या देशांनी एकत्र येऊन युनायटेड अरब प्रजासत्ताक तयार केले.

  • १९७८: श्री. यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९७९: सेंट लुशिया ला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले.

जन्म

  • १७३२: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९)

  • १८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६)

  • १८५७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १८९४)

  • १८५७: बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९४१)

  • १९०२: जर्मन भौतिकशात्रज्ञ फ्रिट्झ स्ट्रासमान यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९८०)

  • १९२०: चरित्र अभिनेता इफ्तिखार यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९९५)

  • १९२२: व्हायोलिनवादक व्ही. जी. जोग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)

  • १९६४: मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेमचे निर्माते एड बून यांचा जन्म.

  • १९७५: अमेरिकन अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माता ड्रिव बॅरीमोर यांचा जन्म

मृत्यू

  • १८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१)

  • १८२७: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील अमेरिकन यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १७४१)

  • १९२५: ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट यांचे निधन. (जन्म: २० जुलै १८३६ – ड्युजबरी, यॉर्कशायर, इंग्लंड)

  • १९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८६९)

  • १९५८: स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबूल कलाम आझाद यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८)

  • १९८२: ऊर्दू कवी जोश मलिहाबादी यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८९४)

  • २०००: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट१९२८)

  • २०००: प्रकाशक, श्री विद्या प्रकाशन चे संस्थापक दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३)

  • २००९: लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९४३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.