चालू घडामोडी - २१ नोव्हेंबर २०१७

Date : 21 November, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आता ‘इज आॅफ ट्रेडिंग, वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूंचे सूतोवाच :
  • मुंबई : ‘इज आॅफ डुइंग बिझनेस’ नंतर आता ‘इज आॅफ ट्रेडिंग’ येत आहे. देशातील पाच-सहा दुर्लक्षित क्षेत्रांना मुख्य प्रवाहात आणून निर्यातदारांना त्याद्वारे प्रोत्साहन देण्याचे सुतोवाच केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सोमवारी येथे केले.

  • राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसएई) ‘इमर्ज’ या लघु-मध्यम उद्योग (एसएमई) एक्सचेंजमध्ये सोमवारी १०० वा आयपीओ प्रविष्ट झाला. ‘निफ्टी५०’च्या धर्तीवर निफ्टी एसएमई निर्देशांकाचेही उद्घाटन प्रभू यांनी केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

  • मूडीजच्या अहवालाने बाजारात उत्साह आला आहे. तरीही पाच-सहा निर्यातक्षम क्षेत्रे दुर्लक्षित आहेत. त्यांच्या क्षमतेला नेमका प्लेटफॉर्म उपलब्ध करून देणे आणि निर्यातदारांना सुविधा देणे, हा त्याचा हेतू आहे. जगभरातील गरजेनुसार त्यासंबंधीची सेवा अथवा वस्तू कशी निर्यात करायची, याबाबतचे धोरण आखून ‘इज आॅफ ट्रेडिंग’ आणले जाईल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले.

  • मेक इन इंडियापाठोपाठ ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडिया’ धोरण आणणार असल्याची माहितीही प्रभू यांनी दिली. त्याअंतर्गत जुन्या तंत्रज्ञानाच्या कंपन्यांचे आधुनिकीकरण केले जाईल.

भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी :
  • भारताचे दलवीर भंडारी यांचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे.

  • आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५ न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी नेमणूक होते. मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली होती.

  • भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत असून या पदासाठी भारताने पुन्हा न्या. भंडारी यांना नामांकन जाहीर केले होते.

  • न्या. भंडारी यांच्या फेरनियुक्तीत ब्रिटनचा अडथळा होता. ब्रिटनने या पदासाठी क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ब्रिटनचा समावेश असून अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांचे ग्रीनवुड यांना समर्थन होते. त्यामुळे ब्रिटनचे पारडे जड दिसत होते.

डीएसके आज काय सांगणार ? याकडेच सर्वांचे लक्ष :
  • पुणे : हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झालेले व हायकोर्टाने हे पैसे कसे परत करणार यासाठी शेवटची मुदत दिलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी आज स्वतः पत्रकार परिषद बोलावली असून त्यात ते आपली अटक टाळण्यासाठी कोणती योजना जाहीर करतात ?

  • गेले वर्षभर त्यांच्या विषयी उलट सुलट बातम्या आल्या तरी त्याविषयी त्यांनी कधीही त्याबाबत कोणताही खुलासा केला नाही, त्यामुळे आज ते काय सांगणार याकडे गुंतवणूकदार, फ्लॅटधारक यांच्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • आतापर्यंत डीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत.

  • सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. या गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.

  • एफडी धारकांच्या गुन्ह्याबरोबरच डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांच्या चार संचालकांवर कर्मचाऱ्यांचा निर्वाह भत्ता न भरता अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धा, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा :
  • वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) करणा-या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे.

  • 9 वर्षांपूर्वीसुद्धा उत्तर कोरियाचं नाव या यादीत टाकण्यात आलं होतं. त्यानंतर जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देश असल्याचं जाहीर केलं आहे. खरंतर हे आधीच करायला हवं होतं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.

  • राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कॅबिनेट बैठकीत म्हणाले, उत्तर कोरियावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लादण्यात येतील. ट्रम्प यांनी आण्विक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांच्या कारवाईचं समर्थन केल्याप्रकरणी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत टाकलं आहे.

  • उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी संयुक्त राष्ट्रानं घातलेलं निर्बंध झुगारून स्वतःचा आण्विक कार्यक्रम आणि अणुचाचणी सुरूच ठेवली आहे.

ब्लू व्हेल ब्लॉक करणे अशक्य :
  • नवी दिल्ली : ब्लू व्हेल चॅलेंजसारखे आॅनलाइन खेळ हे अ‍ॅपवर आधारित नसल्यामुळे त्यांना बंद (ब्लॉक) करणे शक्य नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

  • ब्लू व्हेलसारख्या संभाव्य जीवघेऊ खेळाबद्दल मुलांमध्ये जागृती करावी, असे आदेश राज्य सरकारांना याआधीही न्यायालयाने दिले होते. अशा खेळांच्या धोक्यांविषयी शाळकरी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सगळ्या राज्यांच्या मुख्य सचिवांना सांगितले.

  • सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने अशा खेळांचे वाईट परिणाम काय आहेत याची माहिती देशातील सगळ्या शाळांना देण्याचे आदेश केंद्राला दिले.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक टेलीव्हिजन दिन.

महत्वाच्या घटना

  • १८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

  • १९११: संसदेच्या निवडणुकीत  उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

  • १९४२: राजा नेने दिग्दर्शित दहा वाजता हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

  • १९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

  • १९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

  • १९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

  • १९७२: दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.

जन्म

  • १६९४: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८)

  • १८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)

  • १९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

  • १९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)

  • १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म. (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)

  • १९८७: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.

मृत्यु

  • १९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

  • १९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)

  • १९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

  • १९९६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)

  • १९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

  • २०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट१९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.