चालू घडामोडी - २१ जानेवारी २०१८

Date : 21 January, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फर्स्ट लेडी पुरस्कार : महाराष्ट्रातील १६ जणींसह ११२ महिलांचा गौरव; राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत वितरण :
  • नवी दिल्ली : विविध क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणा-या महाराष्ट्रातील १६ महिलांसह देशातील ११२ कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी ‘फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यावेळी उपस्थित होत्या. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने क्रीडा, कला, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात सर्वप्रथम विक्रम प्रस्थापित करणाºया देशातील ११२ महिलांची निवड ‘फर्स्ट लेडी’ पुरस्कारासाठी करण्यात आली होती. सन्मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप होते.

  • भारतात सर्वप्रथम प्रवासी रेल्वे चालविण्याचा विक्रम करण्याºया सातारा येथील सुरेखा यादव यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यांनी १९८८ मध्ये रेल्वेची पहिली ‘महिला स्पेशल’ लोकल ट्रेन चालवून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. ८ मार्च २०११ ला त्यांनी ‘डेक्कन क्वीन’ ही पुणे ते मुंबई (सीएटी) या कठीण मार्गावरील रेल्वे चालवून असा विक्रम करणारी आशियातील पहिली महिला रेल्वेचालक बनण्याचा मान मिळविला.

  • देशातील पहिल्या महिला आॅटोरिक्षाचालक परभणी जिल्ह्यातील शीला डावरे यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत त्यांनी १९८८ मध्ये सर्वप्रथम आॅटोरिक्षा चालविला. त्याची नोंद लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली. त्यांनी सतत १३ वर्ष आॅटोरिक्षा चालविला, त्यानंतर महिला आॅटोरिक्षा चालकांसाठी अकादमी सुरू केली.

  • भारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघाच्या पहिल्या कर्णधार पद्मश्री डायना एडलजी यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९७५ ते १९९५ पर्यंत त्यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करून महिला क्रिकेटला नवी दिशा दिली. महिला जागतिक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी भारताचे दोन वेळा नेतृत्व केले.(source :Lokmat)

अमेरिका मोठ्या आर्थिक संकटात, 2013 नंतर पुन्हा 'शटडाउन' :
  • वॉशिंग्टनः पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच 2013 मध्ये 'शटडाउन'ची नामुष्की ओढवलेल्या अमेरिकेवर पुन्हा आर्थिक संकटाचे ढग दाटले आहेत. सरकारी खर्चासाठी अमेरिकी संसदेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला मंजुरी न मिळाल्यानं अनेक सरकारी विभागांचं काम सोमवारपासून ठप्प होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास, तब्बल आठ लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागू शकतं. 

  • राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या वर्षपूर्तीला काही दिवस शिल्लक असतानाच, अमेरिका आर्थिक पेचात अडकलीय. शुक्रवारी रात्री रिपब्लिकन पक्षानं सरकारी खर्चासाठी आवश्यक प्रस्ताव सीनेटपुढे मांडला. त्याच्या बाजूने 50 मतं पडली, तर 48 सदस्यांनी विरोधात मतदान केलं. हे आर्थिक विधेयक मंजूर होण्यासाठी 60 मतांची आवश्यकता होती. तेवढी मतं न मिळाल्यानं सरकारला 'शटडाउन'ची घोषणा करावी लागली आहे. त्यावरून रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक पक्ष एकमेकांवर आरोप करताहेत.    

  • रिपब्लिकन पक्षाचं बहुमत असलेल्या प्रतिनिधी सभेत हा प्रस्ताव सहज मंजूर झाला, पण सीनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाच्याच तीन सदस्यांना विधेयकाला विरोध असल्याने ते मंजूर होऊ शकलं नाही. अमेरिकेतील अँटी डेफिशियन्सी अॅक्टनुसार, निधीची तरतूद नसल्यास सरकारी यंत्रणांना आपलं काम थांबवावं लागतं. निधीची कमतरता दूर करण्यासाठी सरकार स्टॉप गॅप डील आणतं, त्याला अमेरिकन काँग्रेसची मंजुरी बंधनकारक आहे. परंतु, सीनेटमध्ये त्यावर चर्चा होत असतानाच रात्रीचे 12 वाजले आणि विधेयक अडकलं. 

  • आता सोमवारपासून, अत्यावश्यक सेवा वगळता अमेरिकन प्रशासनाचे बहुतांशी विभाग बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे सुमारे 8 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना बिनपगारी घरी बसावं लागेल. याआधी, 2013 मध्ये अमेरिकेत फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी 'शटडाउन'चा मोठा फटका बसू नये, यादृष्टीने सरकारला व्यवस्थापन करावं लागणार आहे.((source :Lokmat))

63 व्या जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात इरफान खान, विद्या बालनची बाजी : 

मुंबई : बॉलिवूडमधील प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या पुरस्कारांपैकी एक म्हणजे 63 वा जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा शनिवारी रात्री पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट म्हणून अभिनेता इरफान खान आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालन यांनी बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) झायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील गोरेगाव येथील एनएससीआय, एसव्हीपी स्टेडियमवर रंगला होता. यावेळी अनेक बॉलिवूडमधील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. 

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे - 

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु  

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अॅवॉर्ड) : झायरा वसीम, सिक्रेट सुपरस्टार 

  •  सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मिडिअम 

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)  

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी) 

  • सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन) 

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार) 

  • सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान) 

  • सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन) 

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा - सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना - बद्रीनाथ की दुल्हनिया) 

  • सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - सिनेमा जग्गा जासूस) ((source :Lokmat))

बजेट 2018 – ‘यंग ब्रिगेड’ला हवाय आधार; काय देणार मोदी सरकार :
  • नवी दिल्ली – येत्या 1 फेबु्वारीला अर्थमंत्री अरुण जेटली 2018-19चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. येत्या वर्षभरात प्रमुख राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षीची लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडला जाणार असल्यानं स्वाभाविकच त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तसंच, जीएटी लागू झाल्यानंतरचं हे पहिलंच बजेट असल्यामुळेही त्याला अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे.

  • भारताची निम्मी लोकसंख्या 35 वर्षांखालची आहे. या तरुणाईला खुश करण्यासाठी सरकारला बजेटमध्ये काही विशेष तरतुदी कराव्याच लागणार आहेत. कारण त्यावरच पुढची बरीच गणितं अवलंबून आहेत. नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, महाविद्यालयीन शिक्षण थोडं स्वस्त करावं आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या किंमती कमी कराव्यात, या तरुणाईच्या अपेक्षा आहेत.

  • नोकरदार होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा, असा मंत्र आजवर अनेक ज्येष्ठांनी दिला आहे. पण, स्वतःचा व्यवसाय करणं तितकंसं सोपं नाही. भांडवल, कुशल मनुष्यबळ, जागा या सगळ्या गोष्टी उभ्या करणं जिकिरीचं आहे. त्यासाठी सरकारने स्टार्ट-अप, मेक इन इंडियासारख्या काही योजना सुरू केल्यात. पण त्यांचं आणखी थोडं सुलभीकरण होणं आणि त्यांचा लाभ अधिकाधिक तरुणांना मिळणं गरजेचं आहे. त्यासाठीही बजेटमध्ये काय तरतूद केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.  

  • भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. मात्र रोजगाराचा विचार केल्यास भारतातील स्थिती वाईट असल्याचं समोर आलं आहे.

  • देशातील 15 ते 29 वर्षे वयोगटातील तब्बल 30 टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांकडे रोजगार आणि पुरेसे शिक्षण किंवा रोजगाराभिमुख प्रशिक्षण नसल्याची चिंताजनक आकडेवारी मार्च 2017 च्या आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (The Organisation for Economic Co-operation and Development) अहवालातून समोर आली होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा आलेख चढता असला तरीही देशातील रोजगाराच्या संधी वाढत नसल्याचे या अहवालातून समोर आले.(source :Lokmat)

डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवणाऱ्या सत्यपाल सिंहांना विरोध :
  • मुंबई : डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह गोत्यात येण्याची चिन्हं आहेत. डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरवणारं भाषण सत्यपाल यांनी मागे घ्यावं, अशी मागणी केली जात असून त्यांच्या विरोधात वैज्ञानिकांनी ऑनलाईन मोहीम सुरु केली आहे.

  • 'डार्विनच्या उत्क्रांतीचा सिद्धांत पूर्णत: चुकीचा आहे. माणूस माकडापासून उत्क्रांत झाल्याचा उल्लेख विज्ञान आणि इतिहासाच्या पुस्तकांतून काढून टाकायला हवा', असं वक्तव्य सत्यपाल सिंह यांनी औरंगाबादमधल्या अखिल भारतीय वैदिक संमेलनामध्ये शुक्रवारी केलं होतं.

  • आपण किंवा आपल्या पूर्वजांपैकी कोणीही जंगलात वानरांपासून मानवाची उत्क्रांती होताना पाहिल्याचं लिहून ठेवलेलं किंवा सांगितलेलं नाही. आपण लहानपणी वाचलेल्या पुस्तकात, बालकथेत किंवा आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीतही याचा उल्लेख नाही, असं सत्यपाल सिंह म्हणाले होते.

  • जेव्हापासून माणूस भूतलावर आला आहे, माणूसच होता आणि माणूसच राहील. परदेशातील भारतीय वैज्ञानिकांनी 35 वर्षांपूर्वीच डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचा असल्याचं सांगितलं आहे, असाही दावा सिंह यांनी केला.

  • सत्यपाल सिंह यांच्या भाषणाचा तीव्र विरोध करत वैज्ञानिकांनी शनिवारपासून ऑनलाइन मोहीम सुरु केली. या मोहिमेत सत्यपाल सिंह यांना खुलं पत्र लिहिण्यात आलं असून समर्थनासाठी संशोधक, वैज्ञानिकांना सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे.

  • सत्यपाल सिंह यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिलं आहे. 2014 मध्ये उत्तर प्रदेशातील बागपतमधून भाजपच्या तिकीटावर ते खासदारपदी निवडून आले. 2017 मध्ये त्यांची नियुक्ती राज्यमंत्रिपदी करण्यात आली.(source : abpmajha)

दिनविशेष

महत्वाच्या घटना

  • १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.

  • १७९३: राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला.

  • १८०५: होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.

  • १८४६: डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला.

  • १९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट.

  • १९७२: मणिपूर आणि मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

  • २०००: फायर अँड फरगे या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताने यशस्वी चाचणी घेतली.

जन्म

  • १८८२: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९४३)

  • १८९४: कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन यांचा जन्म. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९३९)

  • १९१०: गीतकार, लेखक आणि दिगदर्शक शांताराम आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९७५)

  • १९२४: माजी केंद्रीय मंत्री समाजवादी नेते प्रा. मधु दंडवते यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर २००५)

  • १९५३: मायक्रोसॉफ्टचे एक संस्थापक पॉल अ‍ॅलन यांचा जन्म.

मृत्यू

  • १७९३: फ्रान्सचा राजा लुई (सोळावा) यांचे निधन. (जन्म: २३ ऑगस्ट १७५४)

  • १९०१: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३५)

  • १९२४: रशियन क्रांतिकारक व्लादिमिर लेनिन यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १८७०)

  • १९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. (जन्म: २३ मार्च १९२३)

  • १९४५: क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचे टोकियो जपान येथे निधन. (जन्म: २५ मे १८८६)

  • १९५०: इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल यांचे निधन. (जन्म: २५ जून१९०३)

  • १९५९: दिगदर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते सेसिल बी. डी. मिल यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट१८८१)

  • १९६५: अभिनेत्री हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली यांचे निधन.

  • १९९८: भारताचे ९ वे नौदल प्रमुख सुरेन्द्रनाथ कोहली यांचे निधन. (जन्म: २१ जून १९१६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.