आसाममधील बेकायदा स्थलांतरित शोधून काढण्याची राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी मोहीम (एनआरसी) हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मंगळवारी येथे सांगितले. बांगलादेशचे समपदस्थ ए. के.अब्दुल मोमीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जयशंकर हे सध्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी ढाक्यात आले आहेत. मंत्रिपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांचा हा पहिला बांगलादेश दौरा आहे. मोमीन यांच्या समेवत संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी म्हणजे एनआरसी हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. एनआरसी मोहिमेत बेकायदा बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेतला जात असून विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ही घुसखोरी सुरू होती. १९५१ मध्ये पहिली नागरिकत्व नोंदणी करण्यात आली होती. ३० जुलै २०१८ रोजी अलीकडच्या नागरिकत्व नोंदणीचा पहिला मसुदा जाहीर झाला तेव्हा ४०.७ लाख लोक वगळले गेले होते. एकूण ३.२९ अर्जापैकी २.९ कोटी लोकांची नावे एनआरसीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
जयशंकर यांनी सांगितले की, तिस्ता पाणी करारास भारत वचनबद्ध आहे. मोमीन यांनी सांगितले की, जयशंकर यांच्या बरोबरची भेट ही चांगली झाली. सर्वच प्रश्नांवर जवळपास मतैक्य झाले आहे. मात्र चर्चेत नेमके कुठले विषय होते हे त्यांनी सांगितले नाही.
जयशंकर यांनी मंगळवारी बांगलादेश भेटीत बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांना धनमोंडी येथील बंगबंधू स्मृती संग्रहालयात जाऊन श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान शेख हसीना यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
प्रशासकीय सेवेचा समाजहितासाठी उपयोग करून परिवर्तन घडविणाऱ्या देशभरातील १६ जिल्हाधिकाऱ्यांचा आज (बुधवारी) ‘द इंडियन एक्स्प्रेस एक्सलन्स इन गव्हर्नन्स’ या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
कृषीपासून शिक्षणापर्यंत आणि तंत्रज्ञानापासून महिला विकासापर्यंत १६ गटांत विभागलेले हे पुरस्कार पाच केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. यासाठी केंद्रीय रस्ता आणि महामार्ग वाहतूक तसेच लघू-सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ग्राहक, अन्न आणि शिधावाटपमंत्री रामविलास पासवान, केंद्रीय विधि आणि न्याय, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि कार्मिक, निवृत्तिवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ, पंतप्रधान कार्यालय तसेच ईशान्य प्रांत विकास (स्वतंत्र कार्यभार) या खात्यांचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
माजी सरन्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काटेकोर छाननीनंतर ही निवड केली आहे. या समितीत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष वजाहत हबीबउल्ला, माजी परराष्ट्र सचिव तसेच अमेरिकेत राजदूत म्हणून देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या निरुपमा राव आणि माजी केंद्रीय मंत्रिमंडळ सविच के. एम. चंद्रशेखर यांचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘केपीएमजी’ने या उपक्रमात नॉलेज पार्टनर म्हणून जबाबदारी पार पाडताना अभिनवता, समाजावरील सकारात्मक परिणाम, अंमलबजावणी आणि लोकसहभाग या निकषांवर आलेल्या अर्जातील दाव्यांची छाननी आणि क्रमवार मांडणी केली. त्यांनी निवडलेल्या अर्जातील माहितीची आणि दाव्याची ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वार्ताहरांनी आणि संपादकांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. त्यानंतर अंतिम यादी तयार झाली आहे.
जिल्हा पातळीवर प्रशासकीय आव्हानांतून स्वतंत्र विचार, अंमलबजावणी आणि अभिनवता या आधारावर योग्य मार्ग काढणाऱ्या अधिकाऱ्यांना दर दोन वर्षांनी या पुरस्काराने गौरविले जाते. कृषी, शिक्षण, आरोग्य, केंद्रीय योजनांची अंमलबजावणी, तंत्रज्ञान, महिला विकास, बालकल्याण, उद्यमशीलता, कौशल्य विकास, ऊर्जा आदी गटांतील कार्याचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले जातात.
फेसबुक, व्हॉट्सअॅप यासह सर्व समाजमाध्यमांना आधार क्रमांकाशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न असून विविध राज्यांत याविरोधात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यासाठी फेसबुकने धाव घेतली आहे. त्यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेत केंद्र सरकारसह गूगल, ट्विटर, यू-टय़ूब आणि इतरांवर नोटीस बजावली आहे.
मद्रास मुंबई आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयात या संबंधातील याचिका दाखल आहेत. त्या दाखल करून घेण्याच्या सुनावणीत तमिळनाडू सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनीही देशाच्या संरक्षणाच्या मुद्दय़ावर आधार जोडणीचे जोरदार समर्थन केले आहे. त्यामुळे अशा जोडणीकडे केंद्र सरकारही सकारात्मकतेने पाहात असल्याचे संकेत मिळत आहेत.
वेणुगोपाल तमिळनाडू सरकारची बाजू मांडताना म्हणाले की, या मुद्दय़ावर मद्रास उच्च न्यायालयात १८ वेळा सुनावणी झाली आहे. त्यामुळे त्यांना सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यास अटकाव करू नये. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिबल आणि मुकुल मोहतगी यांनी सांगितले की, एखाद्या फौजदारी तपासात या सेवा देणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकाचा तपशील द्यावा का, याचा निर्णय न्यायालयाने करावा कारण या निर्णयाचा जागतिक पातळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
वेणुगोपाल यांनी मात्र ब्ल्यू व्हेल या आत्मघातक खेळाचा संदर्भ देत सांगितले की, या खेळाचा सूत्रधार कोण आहे, हे सरकारला शोधता येत नाही. तसेच समाजमाध्यमांवरून पसरविल्या जाणाऱ्या खोटय़ा बातम्या, देशविरोधी संदेश, बदनामीकारक आणि अश्लील मजकूर यावर अंकुश ठेवण्यासाठी समाजमाध्यमांची आधार क्रमांकाशी जोडणी अत्यावश्यक आहे.
चांद्रयान २ हे चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात मंगळवारी यश आले. या मोहिमेतील हा पहिला अवघड टप्पा असल्याने ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. या महत्त्वाकांक्षी प्रयत्नात काळजाचे ठोके चुकण्याचाच अनुभव आला, असे इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सकाळी ९ वाजून २ मिनिटांनी ही प्रक्रिया पूर्ण झाली. यानावरील द्रव इंधन इंजिने प्रज्वलित करून हे यान कक्षेत प्रस्थापित करण्यात आले, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने स्पष्ट केले. एकूण १७३८ सेकंदात यान चंद्राच्या कक्षेत नेण्यात यश आले. चांद्रयानाचे अलगद अवतरण करण्यात यश येईल, हा विश्वास के. शिवन यांनी व्यक्त केला.
१४ ऑगस्टला हे यान चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. चांद्रयान २ ही इस्रोची दुसरी चांद्र मोहीम असून त्यात हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्राचा जन्म व उत्क्रांती तसेच त्याची स्थान शास्त्रीय व खनिज शास्त्रीय माहिती यात मिळणार असून अनेक प्रयोग अपेक्षित आहेत. चांद्रयान १ च्या मोहिमेत चंद्रावर पाण्याचे रेणू सापडले होते. त्याचा पाठपुरावा आताच्या मोहिमेत केला जाणार आहे. चांद्रयान २ मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम) व रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाल एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या १४ दिवसांबरोबर असतो.
यानंतरचे सर्वच टप्पे यापेक्षाही महत्त्वाचे आहेत. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० कि.मी. उंचीच्या कक्षेत हे यान यानंतर प्रस्थापित करण्यात येईल. त्यानंतर लँडर हे ऑर्बिटरपासून वेगळे होऊन १०० कि.मी. बाय ३० कि. मी. कक्षेत येईल. नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ते ७ सप्टेंबरला अलगदपणे उतरेल. यापुढे त्याची कक्षा सुधारण्याचा प्रयत्न बुधवारी दुपारी १२.३० ते १.३० दरम्यान केला जाणार आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-२ चा वेग कमी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त त्यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी या दिग्गजांसह काँग्रेसमधील ज्येष्ठ-कनिष्ठ नेत्यांनी मंगळवारी आदरांजली वाहिली.
दिल्लीतील वीरभूमी येथील स्मारकस्थळी राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांमध्ये त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्ष सरचिटणीस प्रियांका गांधी, गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, भूपिंदरसिंह हुडा आदींचा समावेश होता. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारीही यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रार्थनासभाही आयोजिण्यात आली होती. राजीव गांधी यांच्या ७५व्या जयंतीचा दिवस काँग्रेसने सद्भावना दिन म्हणून पाळला. त्यानिमित्त मंगळवारी काही कार्यक्रम पार पडले. तसेच या आठवडाअखेरपर्यंत काँग्रेसतर्फे अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, माझे वडील राजीव गांधी देशभक्त होते. त्यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे देश घडविण्यास मोलाचा हातभार लागला. कधीही कोणाचाही द्वेष करू नका, प्रत्येकाबद्दल प्रेम व आदरभाव बाळगा हीच शिकवण त्यांनी मला दिली.
प्रियांका गांधी यांनी सांगितले की, लोकांच्या मनातले जाणून घ्या ही शिकवण मी माझे वडील राजीव गांधी यांच्याकडून घेतली. आपल्याला न पटणारे विचारही शांतपणे ऐकून घ्यावे असे त्यांचे सांगणे होते. अहमद पटेल म्हणाले की, प्रागतिक धोरणे, सहिष्णूता यांना पाठबळ देण्याचे राजीव गांधी यांचे धोरण होते.
काँग्रेस पक्षाने सद्भावना दिनानिमित्त म्हटले आहे की, जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांना या देशाचे तुकडे पाडण्यापासून रोखणे हीच राजीव गांधी यांना खरी आदरांजली ठरेल. भारताला २१व्या शतकातील सामर्थ्यशाली देश बनविणे हे त्यांचे स्वप्न होते. त्यामुळेच त्यांनी तंत्रज्ञान, शिक्षण याच्यावर भर देत समाजातील दुर्बलांचे सबलीकरण करण्याचे प्रयत्न केले.
महत्वाच्या घटना
१८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
१९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
१९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
जन्म
१७६५: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)
१८७१: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)
१७८९: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १८५७)
१९०५: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)
१९०७: भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)
१९०९: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २०००)
१९१०: जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
१९२४: गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००१)
१९३४: महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००१)
१९६१: भारताचा फिरकी गोलंदाज व्ही. बी. चन्द्रशेखर यांचा जन्म.
१९६३: मोरोक्कोचा राजा मोहम्मद (सहावा) यांचा जन्म.
१९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.
१९८६: जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म.
मृत्यू
१९३१: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)
१९४०: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)
१९४७: बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)
१९७६: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)
१९७७: एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.
१९७८: भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१७)
१९८१: गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ - सातारा, महाराष्ट्र)
१९९१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १९१४)
१९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)
२०००: समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.
२०००: स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.
२००१: मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
२००१: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.
२००४: भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)
२००६: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खान यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९१६)
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.