चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० सप्टेंबर २०१९

Date : 20 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
‘अस्मिता लाल’ निर्मितीचा राज्यातील पहिला प्रयोग अकोल्यात :
  • ग्रामीण भागात मासिक पाळी विषयी अनेक गैरसमज असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या गंभीर प्रश्नावर काम करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. जनजागृतीपासून ते वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कार्याची साखळी करून त्यावर काम केले जात आहे. अकोल्यातील युवक वर्गाच्या सहकार्यातून सर्वप्रथम ‘रक्तस्राव होण्यात आनंद’ या संगीत अल्बमची निर्मिती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही त्याची दखल घेऊन ते गाणे ट्विट केले. आता महिला बचत गटांच्या सहकार्यातून ‘अस्मिता लाल’ सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार आहेत.

  • २८ मे रोजी मासिक धर्म स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात या प्रश्नावर कार्य करण्याची संकल्पना अकोल्यात पुढे आली. सामाजिक कार्य करणाऱ्या अकोल्यातील युवांनी त्यासाठी पुढाकार घेतला. सुफी कलाकार, शास्त्रीय संगीताचा विद्यार्थी आणि एमबीबीएस पदवीधर २८ वर्षीय तारिक फैज याने गीत लिहिले. रमिझ राजा याने त्या गाण्याला संगीतबद्ध केले. कृतिका आणि रसिक बोरकर या भगिनींनी ते गाणे गायले. विनाशुल्क हे कार्य करण्यात आले. या विषयावर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करणारी २२ वर्षीय सांची गजघाटे हिची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.

  • अत्याधुनिक पद्धतीने गाणे रेकॉर्डिग करून त्याचे चित्रिकरण करण्यासाठी निधीची समस्या होती. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी युनिसेफशी संपर्क साधला. युनिसेफसह मुंबई येथील माहितीपटाचे निर्माते प्रीतेश पटेल यांनी सहकार्य केले. पुणे जिल्हय़ाच्या भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत अल्बमचे २९ ते ३१ जुलै दरम्यान चित्रिकरण करण्यात आले. त्यामध्ये स्थानिक विद्यार्थी व पालकांनाच कलाकार म्हणून संधी मिळाली. तिशीच्या आतील युवांच्या चिकाटीतून ‘खून जिस्म से निकले, तो ये जहाँन चले’ हा संगीत अल्बम तयार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हे गाणे  ट्विट केले.

राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, नरेंद्र मोदींची हात जोडून विनंती :
  • अयोध्या राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून न्यायालयावर विश्वास ठेवणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “गेल्या काही दिवसांपासून राम मंदिरासंबंधी वक्तव्य केली जात आहेत. देशातील सर्व नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणं आवश्यक आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असताना वक्तव्य करणारे कुठून येत आहेत. सर्व प्रकरणात अडथळा का आणला जात आहे ?. आपला सर्वोच्च न्यायालय, राज्यघटनेवर, न्याय प्रक्रियेवर विश्वास असला पाहिजे. राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवा, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

  • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली . नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचं आवाहन केलं.

  • राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी टीका केली. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

इंडियन एअर फोर्सचे पुढचे प्रमुख आरकेएस भदौरिया :
  • एअर मार्शल आरकेएस भदौरिया भारताचे पुढचे हवाई दल प्रमुख असतील. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी ही घोषणा केली. सध्या ते एअर फोर्सचे व्हाइस चीफ आहेत. त्यांनी फ्रान्सबरोबरच्या राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात महत्वाची भूमिका बजावली होती. सध्याचे इंडियन एअर फोर्सचे प्रमुख बी.एस.धनोआ ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत.

  • सरकारने एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांची हवाई दल प्रमुखपदावर नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने टि्वटरवरुन ही माहिती दिली. आरकेएस भदौरिया १९८० साली फायटर पायलट म्हणून एअर फोर्समध्ये रुजू झाले. भदौरिया यांच्याकडे ४२५० तासांपेक्षा जास्तवेळ उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांना फायटर, ट्रान्सपोर्ट विमानांसह २६ वेगवेगळया प्रकारच्या विमान उड्डाणाचा अनुभव आहे.

  • एअर फोर्स प्रमुख पदावर पोहोचण्याआधी त्यांनी अन्य महत्वाच्या पदांवर वेगवेगळया जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. जॅग्वार स्क्वाड्रनचे नेतृत्व त्यांनी केले आहे.

ISRO ने चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरबद्दल दिली महत्वाची माहिती :
  • चांद्रयान-२ मोहिमेत पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानल्यानंतर इस्रोने आज ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली. ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे असे इस्रोने टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • चांद्रयान-२ चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत. ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. विक्रम लँडरबरोबर संपर्क का तुटला? ते शोधून काढण्यासाठी इस्रोच्या तज्ञांची समिती त्यावर काम करत असल्याची माहिती टि्वटमधून देण्यात आली आहे.

  •  

  • चांद्रयान-२ मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला होता. ऑर्बिटरचे वाढलेले आयुष्य चांद्रयान-२ मोहिमेच्या पथ्यावर पडणारे असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे. पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

  • ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली १० मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे. आपण इतिहास घडवू असा विश्वास सिवन यांनी व्यक्त केला. ऑर्बिटरची कक्षा बदलून त्याला चंद्राच्या आणखी जवळ नेण्याचा इस्रोमध्ये विचार सुरु असल्याचे एका वैज्ञानिकाने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले होते.

‘जन जागरण अभियान’साठी अमित शाह २२ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार :
  • जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवण्यात आल्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून देशभर ‘जन जागरण अभियान’ आयोजीत करण्यात आले आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह २२ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत.

  • अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र भाजपाकडून एका विशेष महासभेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. भाजपाच्या या ‘जन जागरण अभियान’ चा उद्देश जनतेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने का घेतला, हे पटवून देणे असा आहे.

  • कलम ३७० पंतप्रधान मोदी सरकाने हटवल्यांतर सातत्याने काँग्रेसकडून टीक केली जात आहे. या मुद्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते अनेक विधानं देखील करत आहेत. याच पार्श्वभूमीवर व महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पाहता भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह आता मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे . माध्यमांच्या माहितीनुसार, भाजपाच्यावतीने ‘जन जागरण अभियान’ अंतर्गत देशभरात ३५ सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विक्रम लॅन्डर पाठवलेल्या भागाची ‘नासा’कडून छायाचित्रे; विश्लेषण सुरू :
  • ह्य़ूस्टन : ‘चांद्रयान-२’शी संपर्क प्रस्थापित करण्याची मुदत जवळ येत असतानाच; भारताने चंद्रावर अवतरणाचा ज्या भागात अयशस्वी प्रयत्न केला, त्या भागाची नासाच्या मून ऑर्बिटरने छायाचित्रे टिपली असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेतील एका प्रकल्प शास्त्रज्ञाच्या हवाल्याने एका माध्यमाने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

  • अद्याप ज्या भागाची माहिती मिळालेली नाही, अशा चंद्रावरील दक्षिण ध्रुवाकडील भागावर अवतरणाचा ‘विक्रम’ लॅण्डरने प्रयत्न केला होता. नासाच्या ल्यूनार रिकनाईसन्स ऑर्बिटरने (एलआरओ) १७ सप्टेंबरला या भागावरून उडताना तेथील अनेक छायाचित्रे टिपली असून, ही संस्था आता या छायाचित्रांचे विश्लेषण करत आहे.

  • विक्रमशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या शक्यतेला २१ सप्टेंबपर्यंत मुदत आहे. त्यानंतर चंद्राच्या भागावर रात्र (ल्यूनार नाईट) सुरू होणार आहे.

  • नासाच्या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने ही छायाचित्रे टिपली असल्याच्या वृत्ताला एलआरओचे प्रकल्प शास्त्रज्ञ जॉन केलर यांनी दुजोरा दिल्याचे सीनेट डॉट कॉमच्या वृत्तात म्हटले आहे.

  • एलआरओसी चमू या नव्या छायाचित्रांचे विश्लेषण करेल आणि लॅण्डर दृष्टीस पडते की नाही (ते सावलीत असू शकते किंवा छायाचित्र घेतलेल्या भागाबाहेर असू शकते) हे पाहण्यासाठी त्यांची यापूर्वीच्या छायाचित्रांशी तुलना करेल, असे केली यांनी म्हटल्याचे या वृत्तात नमूद केले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.

  • १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.

  • १९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.

  • १९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.

  • १९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.

  • १९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.

जन्म 

  • १८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)

  • १८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)

  • १९०९: गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.

  • १९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)

  • १९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.

  • १९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.

  • १९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.

  • १९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)

  • १९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)

  • १९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.

  • १९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

  • १९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.

  • १९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.

  • १९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.

  • १९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)

मृत्यू 

  • १९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)

  • १९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.

  • १९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)

  • १९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.

  • १९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.

  • १९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ - खांडवा, मध्य प्रदेश)

  • २०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.