चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० जुलै २०१९

Date : 20 July, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा - सिंधूची विजयी घोडदौड :
  • जकार्ता : भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा अडथळा पार करत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. यंदाच्या मोसमातील पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या सिंधूने या स्पर्धेत पहिल्यांदाच शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत सहज विजय मिळवला.

  • ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने ४४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात जपानच्या तिसऱ्या मानांकित ओकुहारावर २१-१४, २१-७ अशी आरामात मात केली. आता सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या दुसऱ्या मानांकित चेन यू फेई हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

  • जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पदकांना गवसणी घालणाऱ्या सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यावर सुरुवातीपासूनच आपली हुकूमत गाजवली. सिंधूला सुरुवातीला स्थिरावण्यासाठी थोडासा वेळ लागला, पण तिचे फटके जोरदार बसू लागल्यानंतर ६-६ अशा परिस्थितीतून तिने मागे वळून पाहिले नाही. एकापाठोपाठ गुणांची कमाई करत सिंधूने १०-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर २१-१४ अशा फरकाने पहिला गेम जिंकून सिंधूने सामन्यात आघाडी घेतली.

  • दुसरा गेम सिंधूने अप्रतिम फटक्यांनी गाजवला. एकतर्फी झालेल्या या गेममध्ये सिंधूने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या प्रतिस्पर्धीला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. ओकुहाराच्या चुकांचा फायदा उठवत सिंधूने दुसऱ्या गेमसह सामन्यावर मोहोर उमटवली.

आयसीसीच्या नियमात महत्वाचे बदल :
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICCने क्रिकेटमधील नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत नियमातील बदलाचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही वर्षातील क्रिकेटमधील घटनांचा अभ्यास करून आयसीसीने हा निर्णय घेतला आहे.

  • एक ऑगस्ट २०१९ पासून नवीन नियम लागू होणार आहेत. या नियमाची सुरुवात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेपासून होणार आहे. बदली खेळाडूला फलंदाजी आणि गोलंदाजी करता येईल आणि षटकांची गती कमी राखल्यामुळे आता संपूर्ण संघातील खेळाडूंना दंड आकारण्यात येणार आहे.

  • अनेक वेळा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघांना कमी खेळाडूंसह सामना खेळावा लागला आहे. सामन्यादरम्यान एखादा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होतो. म्हणूनच यापुढे बदली खेळाडू फळंदाजी आणि गोलंदाजी करू शकणार आहे. यापूर्वी बदली खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण करत असे.

  • षटकांची गती धिमी राखल्याबद्दल यापुढे आंतरराष्ट्रीय कर्णधारांना बंदीला सामोरे जावे लागणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या नियमांत बदल केला असून, आता अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास, कर्णधाराऐवजी संपूर्ण संघाला ही शिक्षा भोगावी लागणार आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीने सुचवलेली ही शिफारस आयसीसीने मान्य केली आहे.

निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विमा योजनेची सक्ती :
  • मुंबई : राज्य सरकारने सध्या सेवेत असलेल्या व निवृत्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमाछत्र योजना सुरू केली आहे. परंतु या योजनेच्या वार्षिक हप्ता  कर्मचाऱ्यांचे डोळे पांढरे करायला लावणारा आहे. या योजनेंतर्गत एक लाख रुपये विमा संरक्षणासाठी वर्षांला ९ हजार ७३५ रुपये, तर २० लाख रुपयांसाठी १ लाख २९ हजार ८०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे ३० जून २०२० पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी होणे सक्तीचे करण्यात आले आहे.

  • कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांसाठी विमाछत्र योजना चांगली आहे, परंतु खासगी विमा कंपन्यांपेक्षा सरकारी विमा कंपन्यांचा हप्ता जास्त आहे, एका वर्षांसाठी एवढी मोठी रक्कम मोजणे आवाक्याच्या बाहेरचे आहे, त्यामुळे हप्त्याची रक्कम कमी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी केली आहे. या योजनेत पती-पत्नीबरोबर २५ वर्षांपर्यंतच्या दोन मुलांचाही समावेश केला आहे, त्याचे त्यांनी स्वागत केले आहे.

  • राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांमध्ये किंवा खासगी रुग्णालयांत तातडीचा वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्यांना झालेल्या खर्चाची रक्कम शासनाकडून परत मिळते. तरीही राज्य सरकारने २०१७-१८ पासून न्यू इंडिया अ‍ॅशुरन्स कंपनीमार्फत विमाछत्र योजना सुरू केली. दर वर्षी त्याचे नूतनीकरण केले जाते.

  • १ जुलै २०१९ ते ३० जून २०२०  या कालावधीसाठी ही योजना आता लागू करण्यात येत असल्याचा वित्त विभागाने शुक्रवारी शासन आदेश काढला आहे. सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. या वर्षांत सेवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी होणे सक्तीचे करण्यात आले आहे. अर्थात ज्यांनी इतर कंपन्यांकडून वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली आहे, त्यांना त्यातून सूट देण्यात आली आहे.

आदर्श व्यक्तींच्या यादीमध्ये मोदींनी रोनाल्डोलाही मागे टाकले :
  • ब्रिटनमधील ‘योगोव्ह’ या अंतरराष्ट्रीय मार्केट रिसर्च आणि डेटा अॅनलिसीस करणाऱ्या कंपनीने जगभरातील आदर्श घ्यावा अशा व्यक्तींची यादी तयार केली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या यादीमध्ये मायकोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे पहिल्या स्थानी कायम आहेत. मात्र या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बढती मिळली आहे.

  • मागच्या वर्षी या यादीत आठव्या क्रमांकावर असणारे मोदी यंदा सहाव्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे मोदी यांनी या यादीत पोर्तुगालचा लोकप्रिय फुटबॉलपटू आणि इटलीच्या युवेंटसचा मुख्य खेळाडू असणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही मागे टाकले आहे.

  • जगभरातील लोक कोणाला आपला आदर्श मानतात यासंदर्भात ‘योगोव्ह’ने यंदा ४१ देशांमधील नागरिकांची मते जाणून घेतली. या सर्वेक्षणामध्ये ४२ हजारहून अधिक जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर जगातील सर्वात प्रभावशाली २० पुरुष आणि २० महिलांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये पुरुषांच्या यादीतील पहिली पाच नावे मागील वर्षाप्रमाणेच आहेत.

  • पहिल्या क्रमांकावर बील गेट्स, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबमा, तिसऱ्या स्थानावर अभिनेता जॅकी चॅन, चौथ्या स्थानावर चीने अध्यक्ष शी जिंगपिंग आणि पाचव्या स्थानावर ‘अलीबाबा’चा संस्थापक जॅक मा यांचा समावेश आहे. या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून त्यांचा एकूण स्कोअर ४.८ इतका आहे. पाचव्या स्थानी असणाऱ्या जॅक मा यांचा स्कोअर ४.९ इतका आहे.

  • नरेंद्र मोदींबरोबरच या यादीमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन (१२ व्या स्थानी), शाहरुख खान (१६ व्या स्थानी) आणि सलमान खान (१८ व्या स्थानी) या तीन भारतीयांचा समावेश आहे. एकाही भारतीय क्रिकेटपटूचा या यादीत समावेश नाही. अमिताभ यांचे स्थान मागील वर्षापेक्षा तीन जागांनी खाली घसरले असून शाहरुख आणि सलमान यांचा पहिल्यांदाच या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

रणगाडाभेदी ‘नाग’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण : 
  • भारतीय सेनेने राजस्थानातील पोखरण फायरींग रेंजवर स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या पिढीतील एंटी – टँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) ‘नाग’ चे  परीक्षण यशस्वीरित्या पुर्ण केले. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) चे कौतुक केले आहे. हे परीक्षण ७ ते १८ जुलै दरम्यान करण्यात आले. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.

  • या क्षेपणास्त्राची निर्मितीचे कार्य या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होईल. आतापर्यंत याची चाचणी सुरू होती. २०१८ मध्ये या क्षेपणास्त्राची हिवाळी चाचणी घेण्यात आली होती.

  • भारतीय सेना ८ हजार नाग क्षेपणास्त्रांची खरेदी करू शकते, ज्यापैकी सुरूवातीस ५०० क्षेपणास्त्रांची ऑर्डर दिली जाण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात क्षेपणास्त्र तयार करणारी एकमेव सरकारी कंपनी भारत डायनामिक्स लिमिटेड करणार आहे.

चित्तथरारक चांद्र मोहिमेची आज पन्नाशी : 
  • वॉशिंग्टन : मानवाच्या चांद्रविजयाला आज (शनिवारी) ५० वर्षे पूर्ण होत आहेत. २० जुलै १९६९ रोजी मानवाने चांद्रविजय मिळवला, तेव्हा ते अज्ञाताच्या प्रांतातील सर्वात मोठे पाऊ ल होते. मानवाच्या या अभूतपूर्व विजयाचा सोहळा जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जात असून, समाज माध्यमांमध्ये देखील त्या महत्त्वपूर्ण क्षणांना उजाळा दिला जात आहे.

  • एडविन बझ अल्ड्रिन, नील आर्मस्ट्राँग आणि मायकेल कॉलिन्स यांना घेऊन जाणारे अपोलो ११ यान १६ जुलै १९६९ रोजी चंद्रावर निघण्यास सज्ज झाले तेव्हा दहा लाख लोक साशंक मनाने हे उड्डाण पाहण्यास जमले होते. सर्वच खंडांमध्ये अमेरिकेच्या चंद्रवारीचे कुतूहल होते.

  • साहित्यिक, कवी आणि चित्रकर्त्यांना या विषयाने बरेच खाद्य पुरविले. या मोहिमेच्या यशस्वीतेनंतरही ती खोटी असल्याचे षड्यंत्र सिद्धांत कित्येक वर्षे लढविले गेले. मात्र सर्वच षड्यंत्र सिद्धांतांना मागे टाकत मानवतेच्या उत्तुंग झेपेची पन्नाशी आज साजरी केली जात आहे. त्याचबरोबर आर्टेमिस कार्यक्रमाअंतर्गत पुन्हा चांद्रमोहीम आखली जात आहे. आता चीन चंद्रावर माणूस पाठवण्याच्या तयारीत असल्याने अमेरिकेलाही पुन्हा चंद्रावर माणूस पाठवण्याची घाई झाली आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

महत्वाच्या घटना  

  • १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

  • १९०३: फोर्ड मोटर कंपनीतून पहिली मोटारगाडी बाहेर पडली.

  • १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदा ची स्थापना झाली.

  • १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.

  • १९४९: इस्त्रायल व सीरीयाने शांतता करार केल्यामुळे १९ महिने सुरू असलेले युद्ध संपले.

  • १९६९: नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव ठरला.

  • १९७३: केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस कियानो यांनी जाहीर केले की देशातील आशियाई लोकांचे उद्योग-धंदे वर्षअखेरीस सक्तीने बंद करण्यात येतील.

  • १९७६: मंगळावर प्रथमच व्हायकिंग-१ हे मानवरहित अंतराळयान उतरले.

  • २०००: अभिनेते दिलीपकुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‌भावना पुरस्कार जाहीर.

  • २०१५: पाच दशकांनंतर अमेरिका आणि क्युबा यांच्यामध्ये राजनयिक संबंध पुन्हा सुरू झाले.

जन्म 

  • १८८९: बीबीसी चे सहसंस्थापक जॉन रीथ यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९७१)

  • १९११: भारतीय क्रिकेट खेळाडू बाका जिलानी यांचा जन्म.

  • १९१९: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी २००८)

  • १९२१: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९९४)

मृत्यू 

  • १९३७: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १८७४)

  • १९४३: कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी१८८२)

  • १९५१: जॉर्डनचा राजा अब्दुल्ला (पहिला) यांचे निधन.

  • १९६५: क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९१०)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.